March 30, 2010

तो आणि ती भाग..९ --सांस्कृतिक महोत्सवात चित्तवेधक एकांकिका

अभिनय हा त्यांचा प्रांत नसतानाही उपजत हुशारी, दुर्दम्य आत्मविश्‍वास, सळसळता उत्साह, अपार कष्ट उपसण्याची तयारी ठेवून रसिकराजाचे निखळ मनोरंजन केले. तिनेही आळशी मनोवृत्तीला भीक न घालता त्याच्या प्रयत्नांचे चीज करून दाखविले. आपल्या उणिवांकडे काणाडोळा न करता मानवी क्षमतांचा कस लागेल, असा सराव केला. विजयश्री खेचून आणली.

यंदा कॉलेजात होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. स्पोर्टस, फिस्ट, विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आदी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली होती. तरुणाईचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत होता. तो आणि ती यांच्या वर्गातील प्रत्येकानेच कोणत्या-ना-कोणत्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यांचा चार-सहा जणांचा ग्रुपही याला अपवाद नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रमांत 'तें'ची म्हणजेच आपल्या आवडत्या विजय तेंडुलकरांची एकांकिका सादर करण्याचा त्यांनी बेत आखला होता. अभिनयाचा गंधही नसल्याने एकांकिकेत एखादे पात्र साकारण्यास तिचा विरोध अपेक्षित होता. त्यामुळे तिच्या नकळतच तिचे नाव या एकांकिकेसाठी त्याने दिले होते. यावर ती नाराज नसली तरी बघू या काय होतंय ते, असाच तिचा पवित्रा होता. अर्थात, त्याने तिला एकटीलाच या महासंकटात लोटले नव्हते, तर तोही यात भाग घेणार होता. त्याची मुख्य भूमिका होती. त्यानेच एकांकिका सादर करण्याचा प्लॅन तयार करून ग्रुपच्या इतरांचे मनोधैर्य वाढविले होते. सर्वांचा होकार मिळविण्यापासून एकांकिकेच्या विषयाची निवड करण्यापर्यंतची जबाबदारी लीलया पेलली होती.

त्याचा कोथरूडला मोठा बंगला होता. तो सर्वांनाच मध्यवर्ती ठिकाणी पडत होता. बंगल्यात एकांकिकेच्या रिहर्सल करण्याबाबत त्याच्या आई-वडिलांचीही काही हरकत नव्हती. उलट त्यांनी एक संबंध खोली त्यांना देऊ केली होती. कॉलेजात रिहर्सल करायची म्हटली, तर दररोज स्वतंत्र खोली मिळण्याची शक्‍यता कमीच. शिवाय फुशारकी मारणाऱ्या बघ्यांना आवरण्यातच सर्व वेळ खर्ची होतो. या अतिउत्साही फुकट्या प्रेक्षकांमुळे सादरीकरणाची लिंकही लागत नाही. म्हणून कॉलेज सुटल्यावर दररोज दोन-एक तास त्याच्या बंगल्यात रिहर्सल करण्याचे त्यांनी ठरविले. बंगल्यात पहिल्या मजल्यावर एक आयताकृती बंद खोली होती. त्यात अनावश्‍यक फर्निचर ठेवले होते. त्या खोलीचा वापर होत नसल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. त्यांच्या ग्रुपने एक दिवस मोकळा काढून आधी त्या खोलीची साफसफाई केली. बसायला काही मोजक्‍या खुर्च्या ठेवून बाकीचे फर्निचर स्टोअर रूममध्ये जमा केले.

एकांकिकेला दोन आठवडे शिल्लक असताना रिहर्सलचा श्रीगणेशा झाला. प्रत्येकाने आपले संवाद पाठ करून आणायचे आणि त्याला अनुसरून अभिनय करायचा, अशी रिहर्सलची प्राथमिक अवस्था होती. अभिनयाचा कुणालाच फारसा अनुभव नव्हता. आरंभी प्रत्येकाचीच चुकामूक व्हायची. कालांतराने सर्वांचीच लय जमायला लागली. ती पाठांतरात थोडी कच्ची होती. मध्येच संवाद विसरायची, तर कधी संवाद आणि अभिनयाचा काहीच ताळमेळ नसे. तसा तिचा अभिनयही बेताचाच होता. कितीही प्रयत्न केले तरी चेहऱ्यावरचे हावभाव तिला जमत नसत. शेवटी तिची अडचण लक्षात घेऊन त्याने तिला सर्वतोपरी मदत केली. अभिनयाची मूळाक्षरे गिरवण्यापासून तिला सुरवात करावी लागली. कर्तव्यात कसूर न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ती चुकांमधून हळूहळू शिकत गेली.

शेवटी तो दिवस उगवला. आज त्यांची एकांकिका सादर होणार होती. कॉलेजच्या कसलेल्या कलाकारांच्या सहा एकांकिकांशी त्यांची थेट स्पर्धा होती. सकाळपासूनच तिच्या जिवाची घालमेल सुरू झाली. सर्व व्यवस्थित पार पडावे, यासाठी तिने कॉलेजला जाण्याआधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. लगोलग कॉलेज गाठून कार्यक्रमांची रचना समजावून घेतली. एकांकिका सादर करण्याचा त्यांचा तिसरा क्रमांक होता. आधीच्या दोन एकांकिका त्यांनी मिळून बघितल्या. त्या एकापेक्षा एक सरस होत्या. त्यांच्या एकांकिकेची पहिली घंटा वाजताच तिच्या हृदयात धस्स झालं. सादरीकरणाच्या आधी मंचावर झालेल्या ओळखपरेडदरम्यान हजारो प्रेक्षकांना बघून तिच्या अंगावर सरसरून काटा आला. खुल्या मंचावर अभिनय करण्याची पहिलीच वेळ असल्याने, आत्मविश्‍वास डगमगू लागला. परंतु, रसिकराजाला वंदन करून एकदा सुरवात झाल्यावर त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. त्यांच्या प्रत्येक संवादाला आत्मविश्‍वासाची किनार दिसून येत होती. त्यांचा अभिनय एखाद्या कसलेल्या कलाकारापेक्षाही सरस वाटत होता.

सादरीकरण तांत्रिक न होता नैसर्गिक वाटत असल्याने सगळे जग स्तब्ध होऊन केवळ प्रेक्षक आणि ते कलाकार, अशी बायनरी भाषा प्रेक्षागृहात दिसून येत होती. प्रत्येक अदाकारीला टाळ्या ठरलेल्याच होत्या. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा उत्साह त्यांना आणखी प्रोत्साहन देत होता. प्रेक्षकांचे समाधान आणि अविस्मरणीय अदाकारी, अशा ऐतिहासिक क्षणांचे ते साक्षीदार होते. काही प्रेक्षकांनी तर आपल्या मित्रांना मोबाईल करून एकांकिका बघण्यासाठी मुद्दाम बोलावून घेतले. प्रयोग संपल्यावर त्यांनी रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले. मंचावरून खाली उतरल्यावर क्‍लास टीचरची कौतुकाने ओतप्रोत भरलेली नजर बघून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळून आले. त्यांनी मॅडमना वाकून नमस्कार केला. मॅडमनी तोंडभरून कौतुक केले. आता त्यांना वेध लागले होते ते क्रमांकाचे. प्रत्येक क्षण उत्कंठा वाढविणारा होता. एकांकिकेला किमान दुसरा क्रमांक मिळेल, असा त्यांचा विश्‍वास होता. सुदैवाने नशीब फळफळले. पहिला क्रमांक मिळाल्याचे जाहीर होताच त्यांनी प्रचंड जल्लोष केला. शिट्या वाजविल्या. एकमेकांना शुभेच्छा देत मंचाकडे मोर्चा वळविला. बक्षीस घेताना त्याने कुणाच्याही न कळत एका खास लकबीत दोन्ही डोळे मिचकावून तिला यशाचे श्रेय दिले. तिनेही थोडे लाजत, थोडी जिवणी खुलवत सुहास्य वदनाने त्याचा स्वीकार केला.

(क्रमशः)

No comments: