December 30, 2010

ई साहित्य संमेलनं

ई-संमेलन कार्यक्रम पत्रिका

आपली साहित्य संमेलनं गाजतात ती साहित्येतर कारणांनीच. ज्या विषयांवर संमेलनांमध्ये चर्चा होतात, त्यांचे पडसाद संमेलनाच्या मंडपाबाहेर उमटल्याचे फारसे ऐकू येत नाही. म्हणूनच साहित्यातील समकालीन मुद्‌द्यांवर निर्भिड चर्चा घडावी आणि अशा विषयांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी युनिक फीचर्स (http://uniquefeatures.in/) आपल्या नव्या वेबसाइटवर ३१ डिसेंबर २०१० ते तीन जानेवारी २०११ दरम्यान पहिलं अनुभव ई-साहित्य संमेलन भरवत आहे.
या पहिल्या ऑनलाइन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी.

या संमेलनाचे उद्घाटन ३० डिसेंबर २०१० रोजी संध्याकाळी ५ वाजता पत्रकार संघ येथे होत आहे. यावेळी रत्नाकर मतकरी यांच्यासोबत एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत हेदेखील उपस्थित असतील.
परिसंवाद, मुलाखती, कविकट्टा अशी मुख्य संमेलनातील सगळी वैशिष्ट्ये या ई-संमेलनातही असतील. अनेक ज्येष्ठ लेखकांनी समकालीन साहित्यातील कळीच्या मुद्‌द्यांवर थेट भूमिका घेतली आहे. संमेलनाध्यक्षांचे भाषण आणि तसेच काही साहित्यिकांचे विचार व्हिडिओमधूनही पाहता येतील.

अशी आहे या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका.

शुक्रवार, ३१ डिसेंबर २०१०
रत्नाकर मतकरी यांचे अध्यक्षीय भाषण

परिसंवाद
साहित्येतर दबावापुढे लेखकांनी शरणागती पत्करली आहे.

सहभाग- रंगनाथ पठारे, दीनानाथ मनोहर, अवधूत परळकर
समारोप- वसंत आबाजी डहाके

ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांची प्रशांत खुंटे यांनी घेतलेली मुलाखत

शनिवार, एक जानेवारी २०११

परिसंवाद
इंटरनेटमुळे साहित्याचा पैस वाढतो आहे.

सहभाग- कविता महाजन, अरूण भालेराव, प्रसाद शिरगावकर
समारोप- अच्युत गोडबोले

कथाकार सानिया यांच्याशी संजय भास्कर जोशी यांनी
मारलेल्या दिलखुलास गप्पा

रविवार, दोन जानेवारी २०११
परिसंवाद
वर्तमानपत्रांनी साहित्याला बेदखल केले आहे.

सहभाग- अरूण खोरे, शंकर सारडा, जयदेव डोळे
समारोप- अरूण साधू

नाट्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवणारी नाटककार शफाअत खान यांची रवींद्र पाथरे यांनी घेतलेली मुलाखत.

सोमवार, तीन जानेवारी २०११
परिसंवाद
संमेलनाला मिळणारा एकगठ्ठा पैसा ही चिंतेची बाब आहे का ?

सहभाग- निळू दामले, संजय जोशी, अविनाश कदम
समारोप- सदा डुंबरे

कविता - निमंत्रितांच्या आणि तुमच्या-आमच्यादेखील

कवी कट्‌ट्यावर तिन्ही दिवस खास वेबसाइटसाठी लिहिलेल्या निमंत्रित कवींच्या कविता वाचता येतील. त्यात सतीश काळसेकर, दासू वैद्य, आसावरी
काकडे, सतीश सोळांकूरकर, वर्जेश सोळंकी, श्रीकांत देशमुख, संगीता बर्वे, प्रशांत असनारे, प्रफुल्ल शिलेदार, अंजली कुलकर्णी, बालाजी इंगळे अशा
आजच्या आघाडीच्या कवी-कवयित्रींच्या कवितांचा आस्वाद या ई-संमेलनात रसिकांना घेता येईल. एवढेच नव्हे तर वाचकांना, नवोदित कवींना या
वेबसाइटवर आपल्या कविता प्रकाशित करता येतील, अशीही सोय आम्ही केली आहे.

तुम्हीही या ई- साहित्य संमेलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा.


December 27, 2010

तो आणि ती भाग..१५ --स्थळांची लागली रांग; 'त्याचा' संताप संताप...

गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागल्यावर तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. अगदी सातासमुद्रापार राहणाऱ्या भारतीयांनीही प्रपोजल्स पाठविली; पण ती लग्नासाठी तयार झाली नाही. तिचं त्याच्यावर जिवापाड प्रेम होतं. मात्र, यातून जन्माला आलं एक षड्‌यंत्र. लग्न टाळण्यासाठीचं...

तिला आकर्षक पगाराची नोकरी लागल्यावर स्थळांची अक्षरशः रांग लागली. अगदी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामधून "एनआरआय' लोकांची स्थळं चालून येऊ लागली. तशीही घरामागे राहणाऱ्या जोशीकाकांनी तिच्या लग्नाची घाई चालविली होती. त्यांच्या वधू-वर सूचक मंडळात कधीच तिच्या नावाची निःशुल्क नोंद करण्यात आली होती. (जोशी सुस्वरूप मुला-मुलींची नोंद निःशुल्क करीत!) ती पदवीला असतानाच ते तिच्या पप्पांना तिच्या लग्नाविषयी कायम विचारत असत.

आता तिला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती. जोशीकाका तर दर दोन दिवसांनी घरी चहाला येऊ लागले. येताना ते चार-दोन मुलांचे पत्ते आणायला विसरत नसत. त्यांनी जणू तिच्या लग्नाचा विडाच उचलला होता. पण तिने आधीच घरी सांगून ठेवले होते, की आणखी एक-दोन वर्षं तरी तिला लग्न करायचं नाही. आताशी कुठे नोकरी लागली. आयुष्य थोडं स्थिरस्थावर झालं आहे. तरीही घरी एखाद्या नातलगाकडून लग्नाची पत्रिका आली किंवा एखाद्याच्या लग्नाचा विषय निघाल्यावर, ""अगं बाळा, तू कधी लग्न करणार आहेस? वय निघून गेल्यावर तुला कुणी पसंत करणार नाही. अगं, मुलीचं वय आणि मन चंचल पाण्यासारखं असतं. म्हणून मुलीचं लग्न कसं पंचविशीच्या आत झालेलं बरं... कळतंय का आम्ही काय म्हणतोय ते...!'' आई तिला निक्षून सांगत असे. लग्नाचा विषय निघाला की तिच्या जिवाचा तिळपापड होई. हातातलं काम अर्धवट सोडून ती तरातरा घराबाहेर निघून जात असे. आता तिच्या घरच्यांनाही शंका यायची लागली. ते बोलताना तसा उल्लेख करू लागले. ""अगं तुझं कुणावर प्रेमबिम असेल, तर तसं सांग ना आम्हाला... आमची काही हरकत नाही! मुलगा फक्त चांगल्या घरचा आणि तुझ्यापेक्षा जास्त कमावणारा हवा, एवढीच आमची रास्त अपेक्षा आहे!''

या रविवारी ते दोघे संभाजी उद्यानात भेटले. आज पहिल्यांदाच ती अबोल होती; अन्यथा दोघे भेटल्यावर तिच्या ऑफिसच्या घडामोडींचा धावता आढावा कधी संपतो, याची त्याला वाट बघावी लागायची. काही तरी अघटित झाल्याची त्याला शंका आली. त्यानं विचारल्यावर ती बोलती झाली, ""अरे, मला नोकरी लागली तेव्हापासून लग्नाची अनेक प्रपोजल्स येत आहेत. मम्मी-पप्पांनी लग्नाचा नुसता धोशा लावलाय. आमच्या घरामागचे जोशीकाका नाहीत का; तुला मी सांगितलं होतं... ते लग्नासाठी हात धुवून मागे लागले आहेत. ऑफिसला गेल्यावर कामाचा ताणतणाव आणि घरी आल्यावर घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं.... माझं अगदी सॅंडविच झालंय. कुठलाच मार्ग सापडत नाहीय...!''

""अगं, म्हणजे तू दुसऱ्याशी लग्न करणार!!! मला परकं करून जाणार... आणि मला दिलेल्या वचनाचं काय? अगदी क्षणात विसरलीस. तब्बल चार-पाच वर्षांपासून आपण एकत्र आहोत. लग्नाच्या आणाभाका घेतल्या, त्या हाच दिवस बघण्यासाठी? तुला जमणार नव्हतं तर वचन दिलंच कशाला...!'' तो जवळजवळ गळा फाडून ओरडलाच.

""स्टुपिड... असा कसा बोलतोस. उगाच गैरसमज करून घेऊ नको. तुझा माझ्यावर विश्‍वास नाही का? अरे हे आलेलं गंडांतर कसं टाळायचं, याचं सोल्यूशन तुला विचारतेय मी... आणि तू मला आधार द्यायचं सोडून माझ्यावरच संशय घेतोय. काही लाज वाटते की नाही, असं बोलायला...'' तिचाही आवाज चढला.

तिचा काही दोष नसल्याचं कळल्यावर तो थोडा वरमला. त्याला आपली चूक त्याच्या लक्षात आली. त्यानं लगेच ""सॉरी गं...माझं आजकाल असंच होतं. एसओआरआरवाय... अगं तुझ्या लग्नाचा विषय निघाल्यावर माझ्या जिवाचा संताप संताप झाला. बरं सांग, तुला काय म्हणायचं होतं ते...'' असं म्हणून तिची समजूत काढली.

ती पुन्हा बोलू लागली, ""अरे, मम्मी-पप्पा चहा-पोह्यांच्या कार्यक्रमांसाठी आग्रह करीत आहेत. मी त्यांना "नाही' म्हणून सांगितलं; पण आता ते माझ्यावरच शंका घ्यायला लागलेत. त्यांना सांगणार तरी काय? तुला नोकरी नाही. त्यांना आपल्या प्रेमप्रकरणाचं कळलं तर ते जबरदस्तीनं लग्न लावून देतील. वेळ कशी मारून घ्यावी, तेच कळत नाहीय.''
तो गप्प होता. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. घामाच्या धारा फुटल्या. खिशातून रुमाल काढून तो चेहऱ्यावरचा घाम पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होता. त्याची अस्वस्थता बघून ती म्हणाली, ""मला तुझी अवस्था कळते रे... पण मी काय करू... आपण असं केलं तर...!'' त्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं. ती बोलत होती, ""मी घरच्यांना चहा-पोह्यांसाठी "हो' म्हणते; पण कोणत्याही मुलाला पसंत करणार नाही. सर्वांमध्ये काही तरी खोट काढीन. म्हणजे मम्मी-पप्पांची नाराजी थोडी तरी दूर करता येईल आणि आपल्यालाही वेळ मिळेल. मला मुलगा पसंत नसताना ते जबरदस्तीनं लग्न करायला भाग पाडणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. तू निश्‍चिंत राहा. पण तुला स्वतःला लवकर सिद्ध करावं लागेल. नाहीतर माझा जीव टांगणीला लागायचा. कायमचा...!''

तो निरुत्तर होऊन नाराजीनंच "हो' म्हणाला. "नाही' म्हणण्याचं बळ त्याच्यात नव्हतं; पण या नव्या मार्गानं मनावर मणामणाचं ओझं आलं. त्याच्या मनानं अजूनही हा पर्याय स्वीकारलेला नव्हता. "दगडापेक्षा वीट मऊ', असं समीकरण धरत त्यानं मनाला समजावलं होतं. तरीही तिच्या घरच्यांनी एखाद्या चांगल्या स्थळाचा आग्रह धरला तर... हा खेळ जीवघेणाही ठरू शकतो. तो अगदी खिंडीत सापडला...


(क्रमशः)

December 09, 2010

"ई-वर्ले अक्षर २०१०"

"ई-वर्ले अक्षर २०१०". १९ डिसेंबर, दु. ४ ते सा. ७.३०, फर्ग्युसन कॉलेज ऍम्फीथिएटर, पुणे

http://sahityachintan.com/blog/eavrle-akshar-e-duniyetun-wyaspithavar.html
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6904844.cms

December 06, 2010

तो आणि ती भाग..१४ --'कॅम्पस इंटरव्ह्यू'ने सुखी स्वप्नांना तडा

अभ्यास करून पास होता येतं, चांगले मार्क्‍स कमविता येतात; पण घसघशीत पगाराची नोकरी मिळविण्यासाठी व्यक्तिमत्त्वविकास आणि संभाषणकौशल्य अत्यंत आवश्‍यक आहे, हे त्याला पहिल्यांदा कळलं. तो खडबडून जागा झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण समाधानकारक यश मिळालं नाही.

बघता बघता पदवी मिळाली आणि "पीजी'चे सोपस्कारसुद्धा पार पडले. कॉलेजचे दिवस अगदी चटकन सरतात. म्हणतात ना, सुख क्षणिक असतं आणि दुःख सरता सरत नाही. सुख क्षणभंगुर असलं, तरी त्याचा गारवा कायम हवाहवासा वाटतो. म्हणूनच कॉलेजच्या आठवणी मनःपटलावर ताज्या राहतात! "तो' आणि "ती' यांना तर कॉलेजनं एकत्र आणलं. तलावातील स्थिर पाण्यात तरंग उठावेत तशी प्रेमाची ऊर्मी जागविली. एक नवं आश्‍वासक नातं बहाल केलं. मनातील सुखी स्वप्नांच्या नाजूक पाऊलखुणांची हळुवारपणे जपणूक केली. या नात्याच्या संवर्धनासाठी मित्र-मैत्रिणींनी मोलाची मदत केली होती. म्हणून कॉलेज आणि वर्गमित्र-मैत्रिणी त्यांच्यासाठी फार स्पेशल होते. कारण तेच या चिरकाल टिकणाऱ्या नात्याचे, अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होते.

"पीजी'ला असताना पुण्यातल्या एका मल्टिनॅशनल कंपनीचे "कॅम्पस इंटरव्ह्यू' झाले. चांगला "फोर पॉइंट टू'चे आकर्षक पॅकेज ऑफर करण्यात आले होते. याखेरीज पुण्यात नोकरी आणि "नो नाईट शिफ्ट'. इंटरव्ह्यूमध्ये तिचं सिलेक्‍शन झालं; पण तो अपयशी ठरला. त्याला पदवीत आणि "पीजी'ला वर्गात सर्वांत जास्त मार्क्‍स होते. तरीही तो "एचआर'ला इम्प्रेस करू शकला नाही. तसे बघितले, तर तो लहानपणापासून पुस्तकी किडा होता. दर वर्षी वर्गात पहिला क्रमांक पटकावीत नसला, तरी पहिल्या तिघांमध्ये त्याचं नाव असे. पण "एक्‍स्ट्रा करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटी' शून्य. त्यामुळे त्याचा स्वभावही ती भेटण्याआधी बऱ्यापैकी रिझर्व्ह होता. त्याच्याकडे कुठल्याही प्रश्‍नाचं अचूक उत्तर असे; पण ते उत्तर अगदी मोजक्‍या शब्दांत प्रभावीपणे मांडण्याचं कसब नव्हतं. त्यामुळे परीक्षेत चांगले मार्क्‍स पडायचे; पण "जीडी' आणि "पीआय'मध्ये कायमचीच बोंबाबोंब. त्याचं इंग्रजीतलं संभाषणकौशल्य तसं बेताचंच होतं. याचा फटका त्याला इंटरव्ह्यू देताना बसला. कॅम्पसला इतरही कंपन्या येणार असल्यानं नाकारलं गेल्याचं दुःख त्याला प्रारंभी नव्हतं; मात्र हा आघात पुढे फार जीवघेणा ठरला... प्रिन्सेस आणि त्यांच्या ग्रुपमधील कोल्हापूरच्या पप्याचंही इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्‍शन झालं होतं. त्यांच्या ग्रुपमधील तब्बल निम्म्या जणांची नावं सिलेक्‍शन लिस्टमध्ये झळकली होती. त्यात मुलींची संख्या अधिक असल्यानं त्यांना केवळ चेहरा पाहून सिलेक्‍ट करण्यात आलं, असं म्हणत काहींनी आपल्या अपयशाचं खापर मुलींवरच फोडलं होतं. मुलांचंही सिलेक्‍शन केवळ त्यांचं व्यक्तिमत्त्व पाहून केल्याच्या अफवा कॉलेजात होत्या. पण कोल्हापूरचा पप्या ना देखणा होता ना हुशार; मग त्याचं सिलेक्‍शन कसं झालं? हा प्रश्‍न होताच... त्यानं इतर कंपन्यांच्या इंटरव्ह्यूकडे लक्ष केंद्रित केलं. इंग्रजीतील संभाषणाचा सराव केला. तिच्याशी बोलताना तो इंग्रजीचा वापर करू लागला. पण म्हणावं तसं यश पदरात पडलं नाही. इतर कंपन्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा कोरडेच ठरले. त्याची ठार निराशा झाली. आता समोर फक्त अंधार होता.

"पीजी' झाल्यावर ती कंपनीत नोकरीला जाऊ लागली. त्याला मात्र दिवसभर काही काम नसल्यानं त्यानं इंग्रजीचा क्‍लास लावला. तरीही इंग्रजीत समाधानकारक सुधारणा झाली नाही. आता त्यांचं केवळ सकाळी आणि रात्री फोनवर बोलणं व्हायचं. तिला ऑफिसमध्ये "फाइव्ह डे वीक' असल्यानं शनिवारी आणि रविवारी त्याला पुरेसा वेळ देता यायचा. तिच्या बोलण्यात आता कायम ऑफिसचे संदर्भ येऊ लागले. त्यांचं फोनवर बोलणंही ऑफिसच्या धावत्या समालोचनानं सुरू व्हायचं. तो नोकरीवर नसल्यानं त्याला ते फारच बोचरं वाटायचं. अगदी पोतराजप्रमाणे अंगावर चाबूक बरसायचे. पण त्यानं तसं तिला कधी जाणवू दिलं नाही. उलट आपणहून तो तिला ऑफिसमधल्या घडामोडी विचारीत असे. दिवसांमागून दिवस जात होते; तशी त्याची नोकरीसाठी तगमग वाढायला लागली. नोकरीची शक्‍यता धूसर होत असल्याचं जाणवू लागलं. त्यांच्यात लहान-मोठी भांडणंही सुरू झाली. त्याला त्याचा चिडचिडेपणा कारणीभूत असे. तरी भांडण समोपचारानं मिटायचं. पण हाताला काम नसल्यानं ती आयुष्यात असतानाही त्याच्या सुखी जीवनातील रंगच कुणीतरी काढून घेतल्याप्रमाणे ते नीरस वाटत होतं.

भरीस भर म्हणून पाश्‍चिमात्य देशांमधील आर्थिक मंदीचा भारतात शिरकाव झाला. कित्येक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या बातम्यांवर बातम्या धडकू लागल्या. किमान दोन वर्षं मंदीच्या झळा सोसाव्या लागतील, असा अंदाज व्यक्त होऊ लागला. आधीच हातात नोकरी नव्हती, त्यावर नोकरकपातीचा बडगा. त्याला काहीच सुचेनासं झालं. कुठली वाट चोखाळायची, याचं उत्तर मिळत नव्हतं. एकीकडे त्याला नोकरी मिळेनाशी झाली असताना एक दिवस तिचा दुपारीच फोन आला. ""अरे सॉलिड न्यूज आहे. अगदी माईंड ब्लोईंग. तू ऐकशील तर वेडाच होशील. आमच्या कंपनीला मंदीतही एक मोठी असाईनमेंट मिळाली आहे. त्यामुळे माझ्या पॅकेजमध्ये चक्क लाख रुपयांनी भर पडली आहे. याखेरीज दिवाळी बोनस डबल करण्यात आला आहे,'' आनंदाच्या भरात ती श्‍वास रोखून बोलत होती. तिला धाप लागली. आणि दुसरीकडे याचा श्‍वास कोंडला गेला. दोन मिनिटं तो शांत होता. स्वतःला सावरत त्यानं तिचं अभिनंदन केलं. ""बरं यावर आपण रात्री बोलू'', असं म्हणत त्यानं वेळ मारून घेतली. तो स्तंभित झाला. कातडी सोलून काढणाऱ्या अतिउष्ण वादळांचं अफाट वाळवंट त्याच्या डोळ्यांसमोर तरळून आलं. वाळूतील बाष्पाचा कण न्‌ कण शोषून घेण्यासाठी सूर्य आपलं तेज वाढवीत होता. त्याला वाळवंट ओलांडून सुखी स्वप्नांना साकार करण्यासाठी हिरवळ शोधायची होती. आणि पाय लटपटायला लागले होते....कानात एकच गाणं गुंजत होतं...खेळ मांडीला...देवा...खेळ मांडीला...


(क्रमशः)

December 01, 2010

मी गर्दीत वाट हुडकतोय.................

रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.

उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो, लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.

शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.

शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................

१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.

अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.

अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.

शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................

लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.

माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, / स्विच झले, पॅकेज वाढले.

मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला "पन्या / पंक्या" होतो आता "पी. एम." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे.

एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर / तास गप्पा मारणारा मित्र नाही.

मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.

घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मलाजाउ दे त्याला निवांत महणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.

आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार………..सगळ्याना दाखवत बसतो. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....

मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल आई-आप्पा  कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही, मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही.

लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण; “च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते असे म्हणत फोटो बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.

गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण तुम्ही सुधा दु:खी व्हाल, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी...

असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय?? दु: कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.

अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.

मी विचार करतो की

मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.

काय असते ही गर्दी? इयत्ता ली ते …..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात..आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.

आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत, कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का? का मीच त्या वाटेला जात नाही. विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीन ची हॉट कॉफी मारुन पार्किंग मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो.

पण आता ठरवले आहे……काही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी जाउ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला अडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून?

बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत:चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालो..........गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय.

कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.

बसस्स.......आता ...ठरवले आहेआणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जातो, हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे, अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा "घुमाई देवी" च्या यात्रेला  गावी  जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे?

मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे ..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मला……पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे.

 

एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काहीस्क्वेरफूट घेण्यासाठी धडपडत आहोत काय?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत काय?

 

मला पुन्हा "एस. के." नाव सोडून सच्या व्हायचे आहे........

आपलाच... गर्दीत हरवलेला एक मित्र,

.................सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी.