March 30, 2010

तो आणि ती भाग..९ --सांस्कृतिक महोत्सवात चित्तवेधक एकांकिका

अभिनय हा त्यांचा प्रांत नसतानाही उपजत हुशारी, दुर्दम्य आत्मविश्‍वास, सळसळता उत्साह, अपार कष्ट उपसण्याची तयारी ठेवून रसिकराजाचे निखळ मनोरंजन केले. तिनेही आळशी मनोवृत्तीला भीक न घालता त्याच्या प्रयत्नांचे चीज करून दाखविले. आपल्या उणिवांकडे काणाडोळा न करता मानवी क्षमतांचा कस लागेल, असा सराव केला. विजयश्री खेचून आणली.

यंदा कॉलेजात होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. स्पोर्टस, फिस्ट, विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आदी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली होती. तरुणाईचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत होता. तो आणि ती यांच्या वर्गातील प्रत्येकानेच कोणत्या-ना-कोणत्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यांचा चार-सहा जणांचा ग्रुपही याला अपवाद नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रमांत 'तें'ची म्हणजेच आपल्या आवडत्या विजय तेंडुलकरांची एकांकिका सादर करण्याचा त्यांनी बेत आखला होता. अभिनयाचा गंधही नसल्याने एकांकिकेत एखादे पात्र साकारण्यास तिचा विरोध अपेक्षित होता. त्यामुळे तिच्या नकळतच तिचे नाव या एकांकिकेसाठी त्याने दिले होते. यावर ती नाराज नसली तरी बघू या काय होतंय ते, असाच तिचा पवित्रा होता. अर्थात, त्याने तिला एकटीलाच या महासंकटात लोटले नव्हते, तर तोही यात भाग घेणार होता. त्याची मुख्य भूमिका होती. त्यानेच एकांकिका सादर करण्याचा प्लॅन तयार करून ग्रुपच्या इतरांचे मनोधैर्य वाढविले होते. सर्वांचा होकार मिळविण्यापासून एकांकिकेच्या विषयाची निवड करण्यापर्यंतची जबाबदारी लीलया पेलली होती.

त्याचा कोथरूडला मोठा बंगला होता. तो सर्वांनाच मध्यवर्ती ठिकाणी पडत होता. बंगल्यात एकांकिकेच्या रिहर्सल करण्याबाबत त्याच्या आई-वडिलांचीही काही हरकत नव्हती. उलट त्यांनी एक संबंध खोली त्यांना देऊ केली होती. कॉलेजात रिहर्सल करायची म्हटली, तर दररोज स्वतंत्र खोली मिळण्याची शक्‍यता कमीच. शिवाय फुशारकी मारणाऱ्या बघ्यांना आवरण्यातच सर्व वेळ खर्ची होतो. या अतिउत्साही फुकट्या प्रेक्षकांमुळे सादरीकरणाची लिंकही लागत नाही. म्हणून कॉलेज सुटल्यावर दररोज दोन-एक तास त्याच्या बंगल्यात रिहर्सल करण्याचे त्यांनी ठरविले. बंगल्यात पहिल्या मजल्यावर एक आयताकृती बंद खोली होती. त्यात अनावश्‍यक फर्निचर ठेवले होते. त्या खोलीचा वापर होत नसल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. त्यांच्या ग्रुपने एक दिवस मोकळा काढून आधी त्या खोलीची साफसफाई केली. बसायला काही मोजक्‍या खुर्च्या ठेवून बाकीचे फर्निचर स्टोअर रूममध्ये जमा केले.

एकांकिकेला दोन आठवडे शिल्लक असताना रिहर्सलचा श्रीगणेशा झाला. प्रत्येकाने आपले संवाद पाठ करून आणायचे आणि त्याला अनुसरून अभिनय करायचा, अशी रिहर्सलची प्राथमिक अवस्था होती. अभिनयाचा कुणालाच फारसा अनुभव नव्हता. आरंभी प्रत्येकाचीच चुकामूक व्हायची. कालांतराने सर्वांचीच लय जमायला लागली. ती पाठांतरात थोडी कच्ची होती. मध्येच संवाद विसरायची, तर कधी संवाद आणि अभिनयाचा काहीच ताळमेळ नसे. तसा तिचा अभिनयही बेताचाच होता. कितीही प्रयत्न केले तरी चेहऱ्यावरचे हावभाव तिला जमत नसत. शेवटी तिची अडचण लक्षात घेऊन त्याने तिला सर्वतोपरी मदत केली. अभिनयाची मूळाक्षरे गिरवण्यापासून तिला सुरवात करावी लागली. कर्तव्यात कसूर न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ती चुकांमधून हळूहळू शिकत गेली.

शेवटी तो दिवस उगवला. आज त्यांची एकांकिका सादर होणार होती. कॉलेजच्या कसलेल्या कलाकारांच्या सहा एकांकिकांशी त्यांची थेट स्पर्धा होती. सकाळपासूनच तिच्या जिवाची घालमेल सुरू झाली. सर्व व्यवस्थित पार पडावे, यासाठी तिने कॉलेजला जाण्याआधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. लगोलग कॉलेज गाठून कार्यक्रमांची रचना समजावून घेतली. एकांकिका सादर करण्याचा त्यांचा तिसरा क्रमांक होता. आधीच्या दोन एकांकिका त्यांनी मिळून बघितल्या. त्या एकापेक्षा एक सरस होत्या. त्यांच्या एकांकिकेची पहिली घंटा वाजताच तिच्या हृदयात धस्स झालं. सादरीकरणाच्या आधी मंचावर झालेल्या ओळखपरेडदरम्यान हजारो प्रेक्षकांना बघून तिच्या अंगावर सरसरून काटा आला. खुल्या मंचावर अभिनय करण्याची पहिलीच वेळ असल्याने, आत्मविश्‍वास डगमगू लागला. परंतु, रसिकराजाला वंदन करून एकदा सुरवात झाल्यावर त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. त्यांच्या प्रत्येक संवादाला आत्मविश्‍वासाची किनार दिसून येत होती. त्यांचा अभिनय एखाद्या कसलेल्या कलाकारापेक्षाही सरस वाटत होता.

सादरीकरण तांत्रिक न होता नैसर्गिक वाटत असल्याने सगळे जग स्तब्ध होऊन केवळ प्रेक्षक आणि ते कलाकार, अशी बायनरी भाषा प्रेक्षागृहात दिसून येत होती. प्रत्येक अदाकारीला टाळ्या ठरलेल्याच होत्या. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा उत्साह त्यांना आणखी प्रोत्साहन देत होता. प्रेक्षकांचे समाधान आणि अविस्मरणीय अदाकारी, अशा ऐतिहासिक क्षणांचे ते साक्षीदार होते. काही प्रेक्षकांनी तर आपल्या मित्रांना मोबाईल करून एकांकिका बघण्यासाठी मुद्दाम बोलावून घेतले. प्रयोग संपल्यावर त्यांनी रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले. मंचावरून खाली उतरल्यावर क्‍लास टीचरची कौतुकाने ओतप्रोत भरलेली नजर बघून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळून आले. त्यांनी मॅडमना वाकून नमस्कार केला. मॅडमनी तोंडभरून कौतुक केले. आता त्यांना वेध लागले होते ते क्रमांकाचे. प्रत्येक क्षण उत्कंठा वाढविणारा होता. एकांकिकेला किमान दुसरा क्रमांक मिळेल, असा त्यांचा विश्‍वास होता. सुदैवाने नशीब फळफळले. पहिला क्रमांक मिळाल्याचे जाहीर होताच त्यांनी प्रचंड जल्लोष केला. शिट्या वाजविल्या. एकमेकांना शुभेच्छा देत मंचाकडे मोर्चा वळविला. बक्षीस घेताना त्याने कुणाच्याही न कळत एका खास लकबीत दोन्ही डोळे मिचकावून तिला यशाचे श्रेय दिले. तिनेही थोडे लाजत, थोडी जिवणी खुलवत सुहास्य वदनाने त्याचा स्वीकार केला.

(क्रमशः)

March 29, 2010

तो आणि ती भाग..८ --कॉलेजच्या प्रिन्सेसने घातला घोळ

कॉलेजच्या प्रिन्सेसने त्यांच्या साध्या-सरळ आयुष्यात मोठी खळबळ निर्माण केली. त्याचं प्रिन्सेससोबत हसून बोलणं, कॉलेजमध्ये फिरणं, हात मिळवणं हिच्या चांगलंच जिव्हारी लागत होतं. तशी तिने उघड नाराजी व्यक्त केली नसली, तरी मनात सात्त्विक संताप खळबळत होता. कालांतराने त्याने उग्र रूप धारण केलं. शेवटी प्रकरण एक तर "ती' नाही तर "मी' येथवर येऊन पोचलं.

कोणत्याही कॉलेजचा सांस्कृतिक महोत्सव म्हणजे अतिउत्साही तरुणाईची मांदियाळीच. कॉलेज सुरू झाल्यानंतर आतुरतेने वाट पाहिली जाते ती याच उत्सवाची. दिवाळीच्या सुट्ट्या सरल्या, की चर्चा रंगते ती सांस्कृतिक महोत्सवात कुणी काय भूमिका वठवायची याची. त्यांच्या कॉलेजच्या सांस्कृतिक महोत्सवात यंदा "फॅशन शो'सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं होतं. प्रत्येक जण मी कसा स्मार्ट दिसतो, हे सांगण्यात व्यग्र दिसत होता. या "फॅशन शो'ला कॉलेजच्या स्मार्ट म्हणवून घेणाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात होणाऱ्या "मिस कॉलेज कॉम्पिटिशन्स'मध्ये प्रथम येणारी मुलगी कॉलेजची प्रिन्सेस म्हणून ओळखली जाते. किमान चार-दोन महिने तरी तिच्याच नावाची चर्चा असते. इतर कॉलेजेसमध्येही तिची ख्याती पसरते. तिला "बघायला' येणाऱ्या थव्यांमध्ये दिवसागणिक वाढ होते. अशा एका कॉलेज प्रिन्सेसने त्यांच्या नात्यात चांगलाच खोडा घातला.

प्रिन्सेसचं त्याच्यासोबत हसून बोलणं, मोबाईलवर वारंवार फोन करणं, कॉलेजमध्ये फिरणं, हात मिळवणं तिच्या चांगलंच जिव्हारी लागायला लागलं होतं. सुरवातीला तिने काही ऑब्जेक्‍शन घेतलं नाही. कारण त्याच्या इतरही मैत्रिणी थोड्याफार मोकळ्या स्वभावाच्या होत्या. त्या त्याच्याशी थोड्या खुलूनच बोलायच्या, वागायच्या; पण या प्रिन्सेसने मात्र कळसच केला. रात्री दहानंतर सगळी महत्त्वाची कामं आटोपती झाल्यावर तो आणि ती मोबाईलवर बोलत असत. ही त्यांची ठरलेली वेळ. यात कधी व्यत्यय आला नाही. कारण दोघांच्याही स्वतंत्र खोल्या होत्या आणि रात्री नऊनंतर साधारणपणे त्यांच्या खोलीत कुणी प्रवेश करीत नसे. पण काल तिने त्याला फोन लावला, तर तो बिझी होता. एवढ्या रात्री सहसा त्याचा फोन बिझी लागत नसे. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. साधारणतः अर्धा तास तरी ती बेडवर शून्यात नजर लावून बसली होती. तरी त्याचा रिप्लाय आला नाही. तिने परत फोन केला. तो बिझीच होता. आता तिच्या मनात शंकांचं काहूर माजलं. संयमाचा बांध फुटला. काय झालं असेल, असा प्रश्‍न तिला छळू लागला. तिने वारंवार पाच-सहा वेळा फोन लावला; पण काहीच रिप्लाय नाही. शेवटी तिला एक एसएमएस मिळाला. तो त्याचाच होता. "मी प्रिन्सेसशी बोलतोय, थोड्याच वेळात फोन करतो,' असं त्यात लिहिलं होतं. ते वाचून तिचा अनावर झालेला राग थेट गगनात जाऊन पोचला.

कालचीच गोष्ट. तो कॅडबरी खात होता. तेव्हा प्रिन्सेस त्याच्याजवळ आली. तीही त्याच्यासोबत होतीच. तिच्याशी साधा "हाय'-"हॅलो'ही प्रिन्सेसने केला नाही. तिला बघून थोडं स्मित करीत ओळख दाखवणं तर दूरच. प्रिन्सेसने हळूहळू त्याच्याशी सलगी करायला सुरवात केली. बोलता बोलता त्याच्या हातातल्या उष्ट्या कॅडबरीचा तुकडा तोडत आपल्या तोंडात कोंबला. हे बघून तिचं टाळकंच फिरलं; पण आवंढा गिळावा तसा तिनं राग गिळून घेतला. वर हसत काही झालं नाही, असा खोटा देखावा करीत राहिली. पण हे मात्र अतिच झालं. रात्री दहानंतर मोबाईवर बोलण्याची त्यांची हक्काची वेळ. या वेळेवर प्रिन्सेसने अतिक्रमण केलं होतं. तिच्या रागाने संतापाच्या सर्व पातळ्या ओलांडल्या. क्षणभरही न थांबता तिने आपला मोबाईल फोन "स्विच ऑफ' केला. रोज तिच्या उशीखाली राहणारा मोबाईल दूर कुठं तरी भिरकावून दिला. एका उशीला छातीशी कवटाळून विचारांच्या जत्रेत ती नकळत सामील झाली. थोड्याच वेळात डोळे डबडबले.

दुसऱ्या एका उशीखाली डोकं ठेवून ती झोपेच्या आहारी गेली. तो रात्रभर तिचा मोबाईल ट्रायच करीत राहिला. दुसऱ्या दिवशी कॉलेजला आल्यावर, ""तू मोबाईल का स्विच ऑफ केला होतास?'' असा प्रश्‍न विचारताच तिने त्याच्यावर घणाघाती आरोपांचा भडिमार केला. त्याने प्रिन्सेसशी केलेली जवळीक आता सहन केली जाणार नाही, असं स्पष्ट बोलून दाखविलं. प्रिन्सेसला अभ्यासाशी संबंधित काही काम असल्याने तिनं मला फोन केला होता, असं सत्य सांगूनही तिचं काही समाधान होत नव्हतं. शब्दाने शब्द वाढत गेला. "तू फारच "पझेसिव्ह' होत आहेस,' असं त्यानं तिच्या लक्षात आणून दिलं. त्यावर ""होय, मी पझेसिव्ह आहे तुझ्याबाबत. तुला माझा त्रास होत असेल, तर तू नातं तोडायला मोकळा आहेत. तुला जर नातं कायम राहावं असं वाटत असेल, तर एक तर तिच्याशी असलेली मैत्री तोड किंवा मला स्पष्ट सांग,'' असं तिनं ठणकावलं. तिचं रौद्र रूप पाहून तो पुरता स्तंभित झाला. हिला एवढा कसा काय राग आला, हेच त्याला कळत नव्हतं. शेवटी त्यानं तिची समजूत काढली आणि यानंतर "मी तिला कधीच एंटरटेन करणार नाही,' असं वचन दिलं. तिचीही रुसलेली खळी खुलली. चेहऱ्यावर समाधान पसरलं.

(क्रमशः)

March 26, 2010

तो आणि ती भाग.७ --सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन

तांबड्या, पिवळ्या रंगाचा शालू अंगावर ल्यालेल्या ढगांवर मान ठेवून मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे मनोहारी दृष्य बघून दोघेही पुरते स्तंभित झाले होते. एकमेकांच्या साक्षीने सूर्यास्त बघण्याचा विलक्षण अनुभव ते मनाच्या तिजोरीत मौल्यवान दागिन्याप्रमाणे साठवून घेत होते. थोड्याच वेळात तिचा मोबाईल गुणगुणू लागला. ती पुरती घाबरली. कपाळावर घामाचे दवबिंदू फुटले. क्षणात ते ओघळू लागले. आता लगोलग घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

बोलता बोलता कॉलेजमधल्या एक ना अनेक सोनेरी क्षणांना उजाळा मिळाला. मोबाईलवर दोघांची तासन्‌तास चर्चा चालायची, तरीही एकमेकांशी प्रत्यक्ष बोलण्याचा अनुभव काहीसा वेगळाच होता. दोघांनाही गप्पांसाठी विषय सुचत होते आणि निरंतर रंगत जात होते. गार वातावरणात जणू गप्पांचा उबदार फडच जमला होता. पाणी ओंजळीतून चटकन सांडावं, तसा वेळ निघून गेला. दोघांनाही कळालं नाही. पोटात ओरडणारे कावळे शांत झाले नसले, तरी मनातील पाखरांना कधीच आयुष्याचा जोडीदार मिळाला होता. बोलताना तिला जाणवले, की त्याच्यावर स्वामी विवेकानंदांचा विचारांचा जबरदस्त पगडा आहे. त्याला कन्याकुमारी येथील स्वामींच्या रॉक मेमोरियला भेट द्यायची होती. तिला काश्‍मीरचे विलक्षण आकर्षण होते. गेल्याच वर्षी मम्मी-पप्पांसह तिने हिमाचल दौरा केला होता. तरीही काश्‍मीरचा भुसभुशीत बर्फ आणि हिमाच्छादित शिखरे तिला भुरळ घालीत होती.

थोड्यावेळात दोघांच्याही पोटात भुकेचा मोठा खड्डा पडला. त्यांनी जवळच्याच एका झोपडीवजा हॉटेलकडे मोर्चा वळविला. पिठलं-भाकरीवर ताव मारीत कांदाभजीचाही आस्वाद घेतला. हॉटेल चालकाच्या अतिआग्रहास्तव दह्याचे गाडगेही रिते केले. पोटाची पोकळी भरल्याने जिवाला थोडी उभारी मिळाली. तितक्‍यात मावळ्याचा वेश धारण केलेला एक व्यक्ती हॉटेलजवळ आला. त्याने नरवीर ताजानी मालुसरे यांच्या जीवनावर आणि सिंहगडच्या इतिहासावर पोवाड्यांमधून झगमगीत प्रकाश टाकला. तानाजींच्या पराक्रमाला त्यांनी मनोमन वंदन केले. त्यानंतर नरवीर ताजानी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ऐतिहासिक कल्याण दरवाजा बघितला. जुन्या बांधणीचा हा त्या वेळचा गडाचा मुख्य दरवाजा इतिहासप्रेमींना कायम भुरळ घालत आला आहे. कल्याण दरवाजा बघितल्याशिवाय सिंहगडाची भेट पूर्ण होत नाही, जे म्हणतात ते येथे पटते. कित्येक वर्षे होऊनही या जुन्या बांधकामाला अजूनही साधा एक तडा गेलेला नाही. अवजड दगडांना आयताकृती आकार देऊन एकमेकांवर रचून या भक्कम दरवाज्याची निर्मिती करण्यात आली आहे. या तुलनेत फ्लॅटच्या भिंतींना चार-दोन वर्षांतच क्रॅक पडतात, ओल येते. त्यामुळेच जुनं ते सोनं का म्हणतात, ते इथे पटतं. त्यानंतर दोघे विंड पॉईंटकडे वळले. येथे कायम हवेचा जोर असतो. पोहचल्याबरोबर तो जाणवतो. या कडेवर फोटो काढल्याशिवाय समाधान मिळत नाही. मोबाईल फोनच्या मदतीने त्यांनी काही क्षण कॅमेराबद्ध केले. त्यावेळी संध्याकाळचे बरोबर ६ वाजले होते. सूर्य मावळतीला जात होता. पिवळी, तांबडी छटा लाभलेल्या ढगांमध्ये लालचुटूक सूर्य फारच मनमोहक दिसत होता. रणरणत्या उन्हात आपला दिनक्रम पूर्ण करून दमलेल्या सूर्याला कवेत घेण्यासाठी जमलेल्या डोंगरांनी धुक्‍याची दुलई पांघरली होती. शाळेतून परतणाऱ्या आपल्या जिवाच्या तुकड्याला कवेत घेण्यासाठी आसुसलेल्या आईप्रमाणे त्या डोंगरांची अवस्था झाली होती.

दोघांची मने सूर्यास्ताच्या हिंदोळ्यावर झुलत असताना तिचा देखणा मोबाईल गुणगुणू लागला. तिने पर्सची बटण सैल करीत मोबाईल न बघताच उचलला. पलीकडून आईचा आवाज! तिच्या पायाखालची जमीन सरकली. आई म्हणाली, ""अगं तुझा फोन लागत नव्हता. आहेस कुठे तू?'' आईच्या प्रश्‍नावर सावरासावर करीत, ""मी थोड्याच वेळात घरी पोहचते'' असे तिने सांगितले. कॉलेज सुटल्यावर मैत्रिणीच्या घरी जाणार असल्याचा बहाणा तिने केला होता. संध्याकाळ झाल्यावरही मुलगी घरी न आल्याने आईचे मन व्याकूळले. त्यामुळे तिने फोन करून आपले समाधान करून घेतले. तरीही आईचा फोन आल्याने ती पुरती घाबरली होती. आताच घरी निघूया असा रेटा तिने लावला. सूर्यास्तानंतर गडावर अंधार दाटू लागला होता. दोघेही तडक घरी जाण्यासाठी निघाले. गडावरून खाली उतरताना तुरळक वाहनेच आजू-बाजूने जात होती. गडावर बऱ्यापैकी उजेड असला, तरी रस्त्यावर गडद अंधार पडला होता. आईचा फोन आल्याने ती आधीच घाबरली असताना अंधाराची तिला आणखी भीती वाटू लागली. शिवाय वाटेत कुणी आडवे तर येणार नाही ना, या शंकेचे मनात काहूर माजले. एवढ्या काळ्याकुट्ट अंधारात, ती याआधी कधीच घराबाहेर पडली नव्हती. ती अंधाराला भीत नसली, तरी बाईकच्या हेटलाईटच्या प्रकाशात दिसणारी वेडीवाकडी झाडे जिवाचा ठाव घेत होती. गड उतरताना थोडी सोबत असण्यासाठी आपण इतर कपल्सच्या सोबत जाऊयात, असा विचार तिने बोलून दाखविला. त्यालाही तो पटला. थोड्याच वेळात त्यांच्या बाजूने जाणाऱ्या एका कपल्सच्या बाईकशी साथ करीत ते सिंहगड पायथ्याशी येऊन पोहचले. खडकवासल्याचा बेत कधीच रद्द केला होता. शुकशुकाट असणाऱ्या रस्त्यावरून त्यांची बाईक गर्दीच्या कोलाहलात संचारली. तिची बाईक असलेल्या हॉटेलसमोर त्याने तिला सोडून दिले. ती घाईघाईतच घरी पोहचली.

दिवसभर घराबाहेर असल्याने तिला थकवा जाणवत होता. जेवण आटपून ती थेट बिछ्यान्यावर पहुडली. शिणलेल्या देहाला विश्रांती मिळाली. उद्या बोलू, असा एसएमएस त्याला टाकून दिवसभरातील घडामोडींचा तिने धावता आढावा घेतला. ती कधी झोपेच्या आहारी गेली ते तिलाच कळले नाही. फक्त टेबल लॅम्प आणि हृदयाची स्पंदनं जागी होती.


क्रमशः

March 25, 2010

तो आणि ती भाग..६ --पहिली सोनेरी भेट ऽ सिंहगड फोर्ट

त्या दोघांनी सिंहगडावर जाण्याचा बेत रचला. परतीच्या प्रवासात खडकवासल्यात थांबण्याचा प्लॅन होताच. त्याच्यासोबत एकटीने पुण्याबाहेर जाण्याच्या विचारांनी ती पुरती "एक्‍साइट' झाली होती. अर्थात, त्याचंही स्वप्न सत्यात उतरलं होतं. पहिल्यावहिल्या सिंहगड भेटीच्या कल्पनेने दोघेही भलतेच खूष होते.

वारीला जाणाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा देहू-आळंदीला भेट दिली नाही, तर त्यांना चैन पडत नाही. तसेच काहीसे पुण्यातील प्रेमवीरांचे आहे. पण यांची श्रद्धास्थाने मात्र पुरती भिन्न आहेत. महिन्यातून एकवार तरी खडकवासला, सिंहगड आणि पानशेतचे दर्शन घेतले नाही, तर त्यांनाही काहीसे चुकल्या चुकल्यासारखे वाटते. मग बेत ट्रेकचा असो किंवा बाईकवर फेरफटका मारण्याचा. तो आणि तीसुद्धा याला अपवाद नव्हते. दोघांच्या प्रेमप्रकरणाला आताशी सुरवात झाली असली, तरी दोघांची मने कधीच या श्रद्धास्थळांच्या दर्शनासाठी पुरती व्याकुळ झाली होती. अर्थात, दोघांनीही या आधी मित्र-मैत्रिणी, नातलग आणि घरच्यांसोबत अनेकदा सिंहगडला भेट दिली होती. पण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत तेथे जाण्याची मजा काही औरच. खडकवासल्याचे निळेशार पाणी बघितल्याबरोबर पुण्यापासून तेथे जाण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा क्षणात विरतो. नकळत आपल्या तळव्यांना थंडगार पाण्याचा स्पर्श झाल्याची जाणीव होते आणि अख्खे शरीर शहारते. गार वारा चक्क आपल्याभोवतीच रुंजी घालतोय, असा भास होतो. आणि मग वाऱ्यावर हेलकावणारे मन सांभाळत सूर्यास्ताचे मनोहारी दृश्‍य डोळ्यांचे पारणे फेडते.

रविवारी दोघांचा सिंहगडला जाण्याचा विचार होता. पण या दिवशी खडकवासला, सिंहगड किंवा पानशेतला भेट द्यायची म्हणजे एका दिव्यातून जावे लागते. एखाद्या जत्रेला जमलेल्या गर्दीप्रमाणे माणसांचे जथ्थेच्या जथ्थे खडकवासला धरणाशेजारी जमलेले असतात. त्या गर्दीच्या महासागरातून वाट काढत आपण कसेबसे धरणाच्या पाण्याजवळ पोचलो, की काठावरचे गढूळ पाणी बघून त्यात पाय टाकायचीही इच्छा होत नाही. सिंहगडकडे जायचे म्हटले, तर रस्त्यावर गाडी चालविण्याएवढीही जागा सापडत नाही. त्यात सारखं डोकं हॉर्नवर आपटत गर्दीत वाट शोधावी लागते. काही अतिउत्साही लोकांच्या गाड्या तर अक्षरशः सुसाट वेगाने पळत असल्याने आपण जीव मुठीत घेऊनच राहतो. गडावर ट्रेकिंग करीत जायचे म्हटले, तरी पायवाटेवर जणू शेकडो मुग्यांची रांग लागावी तसे उत्साही ट्रेकर्स दिसतात. मग एकमेकांना "फॉलो' करीत गड चढण्यात काय मजा! आणि मुख्य म्हणजे या गर्दीत कोणी आपले ओळखीचे दिसले तर... उगाच गावभर चर्चा! म्हणून दोघांनी शनिवारचा बेत पक्का केला.

पहिल्यांदाच त्याच्यासोबत पुण्याबाहेर जात असल्याने ती थोडी घाबरली होती. थोडी भेदरली होती. पण त्याच्यावर पूर्ण विश्‍वास असल्याने अस्वस्थ मनाला थोडा आधार होता. त्याच आधाराच्या बळावर तिने हा धैर्यशील निर्णय घेतला होता. कॉलेज संपल्यानंतर दोघेही दुपारी एक वाजता राजाराम पुलावर आले. त्याला बघितल्याबरोबर तिच्या जिवात जीव आला. त्याची सोबत असल्याने ती थोडी बिनधास्त झाली. पुढची वाटचाल केवळ एकाच गाडीवर करण्याचा बेत असल्याने तिची गाडी एका हॉटेलसमोर पार्क केली. सिंहगड रस्त्यावर कोणतेही हॉटेल किंवा मॉलसमोर गाडी ठेवली, तरी ती दिवसभर सुरक्षित राहते. शिवाय गाडी पार्क करताना कोणी गुरगुरत (डरकाळी फोडणे दूरच) नाही. कारण हे पार्किंग रस्ता वजा फुटपाथवर असल्याने आपणही थोडी अरेरावीची भाषा करू शकतो, याची सर्वांना पुरेपूर जाण असते.

हॉटेलसमोर गाडी ठेवल्याने सर्वांचा असाच समज होतो, की गाडीचा मालक या हॉटेलात असावा आणि थोड्या वेळातच परतेल. म्हणून गाडीच्या सुरक्षिततेची शंभर टक्के हमी असते. गाडी पार्क केल्यावर दोघेही त्याच्या बाईकवर स्वार झाले. त्यानंतर संतोष हॉल, आनंदनगर, वडगावचा अजस्त्र उड्डाणपूल आणि नंतर वाटेत लागणारी लहाने-मोठी खेडी पार करीत ते खडकवासल्यात येऊन धडकले. शनिवार असल्याने तुलनेने ट्रॅफिक जरा कमी होतं. त्यामुळे गाडीच्या वेगाच्या मर्यादाही चोखाळता आल्या. आणि सफाईदारपणे बाईक चालविण्याच्या त्याच्या कौशल्याचीही तिला ओळख झाली. धरणाच्या शेजारी पोहचल्याबरोबर गार वाऱ्याने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. सगळा थकवा क्षणार्धात नाहीसा झाला. सिंहगडापर्यंत बाईक चालविण्याचे त्याच्या मनगटात बळ आले. परत येताना खडकवासल्यात थांबण्याचा पूर्वनियोजित "प्लॅन' असल्याने त्यांनी बाईकवरूनच तलाव डोळ्यात साठविला. काही वेळात बाईक सिंहगड पायथ्याशी आली. तो म्हणाला, ""चल ट्रेक करीत गडावर जाऊया. खूप मज्जा येईल. मीठ लावलेली कोवळी काकडी, इवल्याशा मडक्‍यातले दही, खारट-गोड कुल्फी आणि आंबट ताकाची चक जिभेवर ठेवत पायवाट कापूया. खरंच खूप मजा येईल.''

त्याच्या अचानक ठेवलेल्या प्रस्तावाने ती थोडी गोंधळली. कारण तिने चक्क मोठ्या हिल्सची सॅंडल घातली होती. बाईकवर सिंहगडला जाणार असल्याने मेकअपवरही बराचसा वेळ घालविला होता. त्यामुळे तिने बाईकवरूनच गडावर जाण्याचा हट्ट धरला. शेवटी दर वेळीप्रमाणे त्याने तिच्यासमोर माघार घेतली. लहान-मोठ्या डोंगरांच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या झाडांमधून निघालेला नागमोडी रस्ता नाकासमोर ठेवत त्यांनी बाईकने गडावर चढाई सुरू केली. जाताना डोंगर-दऱ्यांचे मनोहारी दृश्‍य लक्ष वेधून घेत होते. एखाद्या खोलगट दरीत जमलेले दाट धुके एकमेकांना बोटाने दाखवत सुखद प्रवास सुरू होता. दरीत मान लपून बसलेल्या कौलारू गढ्या असलेले छोटेसे गाव डोंगरावरून अधिकच खुलून दिसत होते. त्या गावावरून त्यांना डोंगराच्या उंचीचा अंदाज येत होता.

गडाजवळ जाताच पावसाची भुरभूर सुरू झाली. धूर आणि धुक्‍याचे पारदर्शक ढग त्यांना छेदत जात असल्याचा भास होऊ लागला. अवघा सिंहगड धुक्‍याने ओथंबून वाहत होता. शेवटी ते गडावर पोचले. गाडी पार्क करून पहिल्यांदी कुल्फीचा आस्वाद घेतला. थंडीत कुल्फी खाण्याची मजा काही औरच. दातांना स्पर्शही होऊ न देता गारठलेल्या जिभेवर कुल्फी ठेवल्याबरोबर वितळते. एकमेकांच्या हातात हात देऊन कुल्फी खात गडाच्या पायऱ्या चढताना मन अगदी पिसासारखं हलकं होतं. पायऱ्या कधी संपूच नयेत अशा वाटतात. पण शेवटी दुर्भाग्य आड येणारच. पायऱ्या संपतात. पुणे दरवाजा कधी मागे पडतो तेही कळत नाही. भूक लागली असतानाही दोघांनी आधी गड बघण्याचा निर्णय घेतला. फारशी गर्दी नव्हती. पण भरपूर कपल्स आली होती. त्यामुळे गारठ्याला गुलाबी झालर चढली होती. दोघांनी गडाच्या रेलिंगला टेकून गप्पा मारण्यास सुरवात केली. ती म्हणाली, ""खरंच सगळं कसं स्वप्नासारखं वाटतंय. आपण दोघांनी एकमेकांना "प्रपोज' केलं. चक्क वेळ घेऊन दोघांनीही ते "एक्‍सेप्ट' केलं. सगळं कसं मनासारखं झालं. आता आपण या गडाच्या बुरुजावर उभे आहोत. फक्त दोघंच. समोर दऱ्या-खोऱ्यांचं विलोभनीय दृश्‍य जणू आपल्याला साद घालतंय. खरंच आपण भाग्यवान आहोत...'' तो तिच्याकडे बघत म्हणतो, ""मला फक्त तुला डोळे भरून बघायचंय.''
पुन्हा दोघांमध्ये संवाद सुरू होतो. केवळ दोघांपुरता.


(क्रमशः)

March 24, 2010

तो आणि ती भाग..५ --पहिलं प्रेम अन्‌ 'गाजर का हलवा'

त्यानं तिचं प्रेम म्हणजेच आयुष्यभर साथ निभावण्याचा प्रस्ताव स्वीकारला. प्रेमाची मुळाक्षरं गिरवताना थोडी मनांची ओढाताण झाली खरी; पण मनाजोगं उत्तर मिळाल्याने ती भलतीच खूष होती. हळवी संवेदनशीलता जपताना निखळ प्रेमाच्या बंधामुळे तिचा जीवनाचा प्रवास सुखकर झाला होता.

"त्याने निर्णय घेतला. अगदी ठाम. तोही माझ्यासाठी. माझ्या हळव्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी. माझ्या सरळसोट बोलण्यानं तो कदाचित दुखावला असेल. थोडा चिडलाही असेल; पण माझी बाजू स्पष्ट मांडण्याविना पर्याय नव्हता. मला हातचं राखून वागण्याची सवय नाही. जे आहे, ते मी स्पष्ट करते. माझा स्वभावच आहेच तसा. त्याच्या निखळ, निःस्वार्थी, निर्मळ मनाचा वारंवार प्रत्यय येत होता. अनपेक्षित परिस्थितीचा सामना करताना तो थोडा डगमगेल, असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही. त्याने स्वतःला केवळ व्यक्तच केलं नाही, तर एक जबाबदारी स्वीकारली. अगदी मनमोकळेपणाने. मला असाच मुलगा हवा होता. विचार करून निर्णय घेणारा. दृढनिश्‍चयी. तसंही, if and is noble, then why to worry about means.. शेवट दोघांच्या मनासारखा झाला, यातच मोठं समाधान आहे...'' ती स्वतःशीच बोलत होती. तिच्या स्वतंत्र खोलीत कुणीच नसलं, की ती अशीच विचारांमध्ये गुरफटून जायची. तिचं तिलाच भान राहत नसे.

ती पुन्हा शून्यात बघू लागली, "आम्ही आमच्या नात्याची कुठंही वाच्यता न करण्याचा निर्णय घेतला. त्यामागे नातं लपविण्याचा उद्देश नव्हता, तर मित्र-मैत्रिणींना आमच्या नात्याबाबत चिडविण्याची आयती संधी द्यायची नव्हती. अन्यथा त्यांनी चिडवून चिडवून हैराण केलं असतं. आमच्या ग्रुपला चेष्टा-मस्करीसाठी एखादा विषय मिळाला, की ते त्याचा चोथा केल्याशिवाय थांबत नाहीत. एखाद्याचं सूत जमलं म्हटलं, तर त्यांच्या उत्साहाला उधाण येतं. त्यांच्या चिडविण्याने दोघांनाही वाटावं, की आपण काही तरी गुन्हाच केलाय. अख्ख्या कॉलेजमध्ये तोच-तो विषय चर्चिला जायचा. आधी आम्हीही त्यांच्याच सारखे होतो. कॉलेज कपल्सला चिडविणाऱ्या अशा टारगट ग्रुपचा एक अविभाज्य भाग होतो. त्यामुळे मित्र-मैत्रिणींच्या स्वभावाची पुरेपूर जाणीव असल्याने आधीच सावध पवित्रा घेतला. अगदी दोघांनी मिळून.''

कॉलेजात असताना वर्गात दोघंही दूर दूर बसत असले, तरी त्यांची मनं मात्र एकमेकांमध्ये गुंतलेली असायची. दोघांचेही आत्मे कायम एकमेकांशी संवाद साधायचे. आता तो काय विचार करीत असेल, याची पुरेपूर कल्पना तिला येत असे. यालाच कदाचित "टेलिपथी' म्हणतात. मॅडमने विचारलेल्या प्रश्‍नावर त्याने चटकन उत्तर दिलं, की तिला त्याचा फार अभिमान वाटायचा. जणू काही मॅडमने तिच्याच पाठीवर कौतुकाची थाप दिली. आता दोघांचं मोबाईल फोनवरचं बोलणं बऱ्यापैकी वाढलं होतं. विषय कुठलाही असला, तरी सहज अर्धा-एक तास चर्चा रंगायची. सकाळी आणि रात्री तर चक्क एक-दीड तास बोलण्यात जायचा. रात्री बोलणं संपल्यावर तो थोडा भावुक होऊन "गुड नाईट' म्हणायचा. त्याचे हे शब्द मनाला उभारी देणारे होते. एकदा का त्याचं "गुड नाईट' ऐकलं, की रात्रभर ते शब्द कानाजवळ रुंजी घालत असत. त्यांचा मोबाईलवरचा संवाद वाढला असताना कॉलेजमधलं बोलणं मात्र कमी झालं होतं. मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात एकमेकांकडे साधा कटाक्षही ते टाकत नसत; पण वर्गात जाता-येता व्हरांड्यात नजरभेट झाली, तरी डोळ्यांतील भावना सहज वाचता यायच्या. कुणाच्या नकळत संदेशांचं आदान-प्रदान व्हायचं.

त्यांनी त्यांचं नातं लपविण्याचा लाख प्रयत्न केला; पण वर्गमित्रांच्या नजरेतून काही सुटत नव्हतं. त्यांच्या मनात आलेली पुसटशी शंकाही त्यांना अस्वस्थ करून सोडी. कोणीही त्यांच्याविषयी बोलून दाखवत नव्हतं; पण हळूहळू सर्वांच्याच लक्षात येतंय, याची जाणीव होत होती. कधी कोणी विषय काढण्याचा प्रयत्न केला, की दोघंही त्यांचं बोलणं उडवून लावायचे. तिने तर प्रपोज करण्याआधी मैत्रिणीच्या मदतीने त्याची सर्व माहिती काढली होती. त्यामुळे तिच्या मैत्रिणींना दाट शंका होती. मुलींचा स्वभाव मुळात शंकेखोर असतो. त्यावर काही औषध नाही. आता त्याची बाईकही तिला आपलीशी वाटू लागली होती. गाडी पार्क करताना ती मुद्दाम त्याच्या बाईकशेजारी गाडी लावायची. त्यामुळे त्याच्यासोबत बोलण्याची, त्याला डोळे भरून बघण्याची संधी तिला मिळत होती. तो पार्किंगमध्ये नसताना ती त्याच्या बाईकच्या सीटवरून हळुवारपणे हात फिरवायची. या वेळी ती थोडी हळवी व्हायची. भावना दाटून यायच्या. डोळे आसवांनी डबडबायचे.

एकदा रात्री त्यांचा सुसंवाद सुरू असताना तो म्हणाला, ""तू तयार केलेला एखाद्या पदार्थ मला खायचाय. तुला गाजराचा हलवा करता येतो? माझी आई फारच चविष्ट हलवा करते. मला फार आवडतो. तू गाजराचा हलवा कशी करतेस ते मला बघायचं आहे.'' तिने त्याचा हट्ट साफ फेटाळून लावला. किचनमध्ये पायही न ठेवणारी ती चक्क त्याच्यासाठी गाजराचा हलवा करून आणेल, हे अशक्‍यच होतं. शिवाय त्याची आई चांगली सुगरण असल्याने तो कायम आईची स्तुती करायचा. एखाद्या पदार्थाचं नाव काढलं, की माझी आई हा पदार्थ फारच अप्रतिम करते, असं त्याचं ठरलेलं वाक्‍य. तेव्हा थोडीही रिस्क घ्यायची कशाला! कारण गाजराचा हलवा करणं हे वरकरणी सोपं वाटतं असलं, तरी त्याला उत्तम कौशल्य लागलं; पण तो काही माघार घ्यायला तयार नव्हता. शेवटी आढेवेढे न घेता तिने "हो' म्हटलं. हो म्हणणं जेवढं सोपं होतं, तेवढंच हलवा करणं कठीण. "साम मराठी' वाहिनीवर "सुगरण' या कार्यक्रमात दाखविलेल्या गाजराच्या हलव्याची रेसिपी तिने लिहून घेतली. बाबा ऑफिसला आणि आई भिशीला गेली असताना रेसिपीत दिल्याप्रमाणे हलवा बनवला. घाईघाईत हलव्याचा डबा भरून तिच्या गाडीच्या डिकीत ठेवला. कॉलेजात हळूच त्याच्या हातात गाडीची किल्ली सरकवली. पार्किंगमध्ये कोणी नसताना त्याने डिकी उघडली. डबा ताब्यात घेतला. थोड्याच वेळात तिला त्याचा कॉल आला. तो म्हणाला, ""हलवा छान झालाय. तू खाल्ला नसेलच. मी तुझ्यासाठी थोडा डब्यात ठेवलाय.''
""अरे, पण मी हलवा खाल्ला नाही. हे याला कसं काय कळालं,'' ती स्वतःशीच बोलली. त्वरित पार्किंगमध्ये जाऊन गाडीतला हलव्याचा डबा उघडला. त्यातला एक चमचा जिभेवर ठेवला, तर तो चक्क तुरट होता. गोड नव्हताच!!! अगं बाई मी साखर घालायलाच विसरले !

क्रमश :

March 23, 2010

तो आणि ती भाग..४ --गुलाबी थंडीला प्रीतीची झालर!

त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना. ठाम निर्णय घेण्यासाठी वेळ मागितल्याने त्याचं मन खजील झालं होतं; पण दिलेला शब्द मोडणारा तो मुलगा नव्हता. त्याने निर्णय घेतला. तोही अगदी ठाम...

पुन्हा एकदा रात्रीची भकास शांतता. खोलीत फक्त भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांची आणि त्याच्या हृदयाची हालचाल. बिछान्यावर पाय दुमडून तो विचार करतोय. थोड्या वेळात बाहेरच्या बोचऱ्या थंडीचं अस्तित्व खोलीतही जाणवायला लागतं. पाय झाकले जातील, तेवढंच पांघरूण घेतो. पुन्हा विचारचक्र सुरू. मणामणाचं ओझं मनावर घेऊन तळमळत बिछान्यावर थोडा पहुडतो. तरीही नजर शून्यात. अंतर्मनाचा वेध घेण्याच्या प्रयत्नात मनात एक अनपेक्षित द्वंद्व सुरू... ""एक निर्णयही किती महत्त्वाचा असतो. तुमचं आख्खं आयुष्य पालटण्याची ताकद त्यात असते.

म्हणून तो विचार करूनच घ्यावा, हे समजत असलं तरी उमगत नाही,'' तो स्वतःशीच बोलत होता. त्यानं तिला वेळ मागणं, हे वरकरणी त्याला फारच अपराधीपणाचं वाटत होतं, पण पर्याय नव्हता. आयुष्यभराच्या "कमिटमेंट'वर सहज उत्तर देणं तितकं सोपं नव्हतं. त्यातही एकदा शब्द दिला, तर त्यासाठी प्राणही गेला तरी बेहत्तर, असा त्याचा मराठी बाणा. पण शब्द देताना थोडा विचार करून निर्णय घेण्याचा त्याचा लहानपणापासूनचा स्वभाव. त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना.

त्याचं एक मन म्हणालं, ""अरे, तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची त्या मुलीची तयारी आहे. ती तुझी आयुष्यभरासाठी साथ मागतेय. तिला केवळ टाइमपास करायचा असता, तर केव्हाच "हो' म्हणून मोकळी झाली असती, पण तसं नाही. एवढी समजूतदार मुलगी तुला शोधून सापडणार नाही. या मुलीनं तुला वास्तवाचं दर्शन घडवलं. शेवटी प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं "सेम' असतं, हेच खरं. तिला पहिल्यांदा बघितल्याबरोबर मनाने साद दिली. नुकत्याच आलेल्या एका इंग्रजी चित्रपटात दाखविलं आहे ना. परग्रहावरील प्राणी त्यांच्या वेणीसारख्या संवेदकाच्या माध्यमातून एकमेकांच्या संवेदना जाणून घेतात. आपल्याला देवाने "सिक्‍स्थ सेन्स' दिलाय. एखाद्याचे डोळे, चेहरा, स्वभाव आणि वागणूक बघून आपण आपलं मत बनवितो. यालाच दुसऱ्याच्या संवेदना, भावना जाणून घेणं म्हणतात. ती भावुक होऊन बोलत असताना प्रेमाचा साक्षात्कार होत होता आणि त्या प्रेमाच्या परतफेडीची निरागस आशा तिच्या बोलक्‍या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. डोळ्यांमध्ये जमलेल्या आसवांवरून ती तुझ्याबाबत किती हळवी आहे, याचा पुरेपूर अंदाज येत होता. यालाच कदाचित दोघांची "लिंक' लागणं म्हणत असावं. तसंही तू तिला बघितलं आणि ती तुला "क्‍लिक' झाली. "वुई मेड फॉर इच अदर', अशी मनाने साद दिली. ती तुझी वाट बघतेय. जा, पळत जा तिच्यापाशी.''

तर दुसरं मन म्हणत होतं, ""अरे, आई-वडिलांच्या स्वप्नांचा जराही विचार न करता एखाद्याला आयुष्यभराचं "कमिटमेंट' देणं खरंच योग्य आहे? आणि तू दिलेला शब्द पाळू शकला नाहीस तर? प्रेमात रममाण होण्यासाठी तिने तुझ्यात ऊर्मी जागविली. पण चाकोरीबाहेरचा विचार करणं फारच कठीण आहे. तिच्या निखळ, निःस्वार्थ आणि निर्मळ मनाला दुखविण्याचं दुःसाहसही तुझ्याकडून होणार नाही, हे खरं. पण जोखीम घेण्यासही मन धजावत नाही. तिच्या बोलण्यात पोरकटपणा नव्हता, तर एका समजूतदार मुलीने कोणताही आडपडदा न ठेवता परखडपणे आपलं मत मांडलं होतं. त्यामुळे तुझी भीती अनाठायी व अप्रस्तुत आहे. मात्र, विचार करून निर्णय घे. आणि एकदा विचार पक्का झाल्यावर त्यावर ठाम राहा.''

बऱ्याच विचारांती त्याने आपली मान होकारार्थी या अर्थाने हलविली आणि निर्णय घेतला. एकदम पक्का आणि झोपेच्या आहारी गेला.
दुसऱ्या दिवशी टवटवीत लाल गुलाबाचं फूल आणि तळहाताच्या आकाराची कॅडबरी घेऊन तो कॉलेजला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव तिने क्षणात टिपले आणि ती कमालीची लाजली. तिच्या गालावरची गोड खळी आणखीच खुलली. त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलाचा तिनं सुहास्य वदनानं स्वीकार केला. कॅडबरी जणू हिसकूनच घेतली. तो श्‍वास रोखून बघत होता. एक शब्दही न बोलता तिने एक चिठ्ठी दिली. त्यात गुलाबाचं कोमेजलेलं फूल होतं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्‍नांकित भाव उमटला. त्याने तिच्याकडे मान वळविली, तेव्हा ती म्हणाली, ""मी चार दिवसांआधीच चिठ्ठी लिहिली होती. तुझी थोडी परीक्षा घेतली. सॉरी. माफ कर. पुन्हा असं करणार नाही.''

तो चिठ्ठी उघडून पाहतो तर त्यात लिहिलं होतं...
चांदणी मी तुझी, चांद साक्षी नभी,
स्वामी हृदया, मी तुझी रे सखी,
नाव रे तुझे, कोरले हृदयी,
उच्चार स्मरे, प्रत्येक स्पंदनी.

March 22, 2010

तो आणि ती भाग..३ --प्रेम हे प्रेम असतं...'

ती त्याला "हो' म्हणेल की "नाही', या विचारात संबंध आठवडा गेला. तरीही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. तर चला बघू या, त्यांच्या आयुष्यात काय घडतं ते...

रात्रीची नीरव शांतता. तो आपल्या खोलीत कॉटवर पाय दुमडून गाढ विचारात बसलाय. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. तास सरला की ठोक्‍यांच्या कर्कश आवाजाने त्यांची तंद्री भंगते, ती काही क्षणांसाठीच. पुन्हा तो विचारांच्या दरीत लोटला जातो. आपोआप. भावना व्यक्त केल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसत असलं तरी ती "हो' म्हणेल की "...' हा प्रश्‍न त्याला छळतोय. ""मुलीसुद्धा ना... एक "हो' किंवा "नाही' म्हणायला किती वेळ घेतात. दुसऱ्याची परीक्षा घेण्यात यांना फारच आवडतं. आमचा येथे जीव जातो. हे त्यांना कसं कळत नाही!'' तो स्वतःशीच बडबडत होता. उद्या कॉलेजात गेल्यावर तिला थेट विचारावं, असा मनात तो पक्का निर्धार करतो.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला येतच नाही. तो दिवसभर कॉलेजच्या पार्किंगमध्ये तिची वाट पाहत घुटमळत असतो. पण पदरी निराशाच पडते. शेवटचा तासही सरतो. आता त्याच्या धीराचा बांध फुटतो. तो तिच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतो. फोन फिरवतो तर "नॉट रिचेबल.' आता काय करावे! तो हतबल होतो; पण नाउमेद होत नाही. शेवटी पडल्या चेहऱ्याने बिछान्यात गुडूप होतो. ती का आली नसेल, तिला राग तर आला नसेल ना, असे अनेकानेक प्रश्‍न मनात रुंजी घालत असतात. तिसरा दिवस उगवतो. तो पुन्हा पार्किंगमध्ये तिची वाट पाहत उभा असतो. ती येते. गाडीला पार्क करून थेट त्याच्या दिशेने सरसावते. दोघेही न बोलताच जणू पूर्वनिर्धारित प्लॅनप्रमाणे कॅंटीनला जातात. कॉलेजचा पहिलाच तास असल्याने कॅंटीनमध्ये कमालीचा शुकशुकाट असतो. दोघेही गप्प असतात. केवळ त्यांच्या हृदयाची स्पंदने नकळत संवाद साधत असतात.

ती बोलती होते. म्हणते, ""मी तुझ्या भावनांचा आदर करते. तू स्वतःला निर्भीडपणे व्यक्त केलंस, याचा हेवाही वाटतो. या वयात अशा भावना मनात येणं स्वाभाविक आहेत. त्या व्यक्त करण्यातच त्याचं फलित असतं. काही मुलं घुम्या स्वभावाची असतात. मुलगी कितीही आवडली तरी व्यक्तच होत नाहीत. मुलगी बिचारी वाट बघत बसते. शेवटी त्याच्या मनात माझ्याबाबत काही नसेल, या निष्कर्षापर्यंत येऊन पोचते. अशात एखाद्या दुसऱ्या मुलानं "प्रपोज' केलं तर त्याचा भावनांचा आदर करीत केवळ त्याच्यासाठी "हो' म्हणते. मुलीला कधी कुणाच्या भावना दुखवता येत नाहीत. एखाद्या मुलाने "प्रपोज' केल्यावर एखादी मुलगी नकार देत असेल, तर त्यामागे काही छुप्या बाबी असतात. परिस्थिती त्यांना "नाही' म्हणण्यास भाग पाडते. तू मला "प्रपोज' केलंस याचा मला सार्थ अभिमान आहे.''

ती थोडी थांबून म्हणाली, ""दोघे प्रेमात पडले, गावभर गोंधळ घातला आणि शेवटी "ब्रेकअप' झाला असं सध्या प्रेमाचं स्वरूप आहे. मला तसं करायचं असतं, तर याआधीही अनेक मुलांनी मला "प्रपोज' केलं होतं. मी त्यांनाही "हो' म्हणू शकले असते. माझा तात्पुरत्या प्रेमप्रकरणावर विश्‍वास नाही. वय उथळ असलं तरी माझ्या भावना उथळ नाहीत. "ऍलुम्नी मीट'मध्ये वर्गमित्रांनी माझ्या प्रेमाबद्दल दबक्‍या आवाजात बोलावं, हे मी कधीही सहन करू शकणार नाही. मला त्यांच्यापुढे अभिमानानं मिरवायचं आहे. केवळ आजच नाही, तर शेवटच्या श्‍वासापर्यंत.''

ती बोलत होती, ""येत्या तीन-चार वर्षांत माझ्या लग्नाची बोलणी सुरू होतील. तुझं आणि माझं वय सारखंच असल्यानं या अल्पावधीत स्वतःला सिद्ध करणं तेवढं सोपं नाही. तरीही आपण मिळून काही प्रयत्न करू. त्यासाठी माझी सर्वतोपरी साथ तुला मिळेल. मी शब्द देते. तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझं वचन राहिलं. मी कुठेही कमी पडणार नाही. पण त्यासाठी हवाय तुझा जन्मभरासाठी मला साथ देण्याचा निर्धार. तो असेल तर तू माझा स्वीकार कर; अन्यथा मला फसविल्याचं पाप तुझ्या माथी लागेल. तू विचार करून उत्तर दे. मला काही घाई नाही. तू म्हणशील तोपर्यंत वाट बघण्याची तयारी आहे माझी. मला हवंय ते केवळ तुझं आश्‍वासक उत्तर. नीट विचार कर. माझ्यासाठी.''

त्याला तिचं बोलणं काही केल्या कळत नव्हतं. आता बॉल त्याच्या कोर्टात होता. ""मी उद्या सांगतो,'' असं म्हणून तो विषय संपवतो.
(
क्रमशः)

March 19, 2010

तो आणि ती भाग..२ --प्रेमात पाहावं "पडून'

त्यानं तिला प्रपोज केलं. तेही अगदी अनपेक्षितपणे. बोलायलाही घाबरणारा थेट प्रपोजचं धाडस करतो कसा, हा प्रश्‍न मलाही पडला. चला जाणून घेऊ या त्याच्याकडून...

आता बऱ्यापैकी मैत्री झाली होती. कॅंटीनच्या मळकट कॉफीसह वह्या-पुस्तकांची देवाण-घेवाणही सुरू झाली होती. गरज नसतानाही तो तिची वही मुद्दाम घरी घेऊन जाई. वहीतील सुवाच्य अक्षरांवरून बोटं फिरवली तरी तिच्याशी संवाद साधल्याचे समाधान मिळे. मुलींमधील नीटनेटकेपणा वहीवरूनही सहज लक्षात येण्यासारखा असतो. वहीला सुंदर कव्हर, एकाही पानावर खोडतोड किंवा रफ काम नाही, पानाला दुमड नाही की पानांची ओढाताण नाही. जणू काही मुलांना देण्यासाठीच वह्या सुटसुटीत ठेवलेल्या असतात. वहीसाठी तिने कधी त्याला "नाही' म्हटले नाही.

वहीचे निमित्त पुढे करून थोडा संवाद आणि एखादी कॉफी हमखास ठरलेली असे. ती असली तर कॉलेजला जाण्याचा त्याचा उत्साह द्विगुणित होई; तर तिच्या अनुपस्थितीत कशातच मन लागत नसे. कोणी कॉलेज "बंक' करण्याचा विषय काढला तरी अस्वस्थता वाढे. पहिल्या तासाला त्याच्या उत्साहाला उधाण आलेले असे, तर शेवटच्या तासाला कॉलेज संपण्याचा विचाराने मन हिरमुसले होई. अशा प्रकारे रात्रं-दिवस ती मनात राहत असल्याने त्याच्यात दडलेला कवी कधीच जागा झाला होता. त्याने चार-दोन ओळींच्या बोलक्‍या कविता तिला वाहिल्या होत्या. त्यातील एक कडवे असे...

प्रिये तुझ्यासाठी, ओतलीत सारी नाती,
तुझ्याविना मज, राहिले ना आता कोणी,
तुझ्या एका नजरेस, एकवटले माझे जग,
रूप तुझे देखणे, माझ्या डोळ्यात बघ,
प्रिये, फक्त तुझ्याचसाठी...

एखादा मंत्र जपावा तसे हे कडवे त्याच्या ओठांवर रुळत असे. असा हा दिवास्वप्नातील निरंतर प्रवास एक दिवस त्याच्या मित्रांनी दिलेल्या खळबळजनक बातमीने भंगला. ती बातमी ऐकून पायाखालची जमीन सरकली. प्रेमातील खाचखळगे बघून काही सुचेनासे झाले. कॉलेजमधला एक "सीनियर' तिच्यावर कायम पाळत ठेवतो, बोलण्याचा प्रयत्न करतो, असे ते वृत्त होते. त्याच्या मित्रांनी तिला त्या "सीनियर'सोबत हसत बोलताना आणि शेकहॅंड करतानाही बघितले होते. दोघांमध्ये चांगला सुसंवाद रंगत असल्याची बातमीही थोड्याच दिवसांत येऊन धडकली. आता आपले काही खरे नाही बुवा. त्या "सीनियर'ने तिला कदाचित प्रपोजही केले असावे, या शंकेचे मनात काहूर माजले. दिवसागणिक अस्वस्थता वाढत होती. प्रेमाच्या दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू झाली होती. पण तिच्या मताचे गूढ अद्यापही कायम होते. तिच्या मनात त्या "सीनियर'विषयी विष कालवून दोघांच्या संबंधांमध्ये खोडा घालण्याचा विचारही मनात डोकावला. पण अजून तशी वेळ आलेली नव्हती. तिची बाजू माहिती करून घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलणे त्याच्या हितसंबंधांना घातक होते.
एकदा रात्री झोपताना या विचारांमुळे झोपच येत नव्हती. कड पलटून झाले, पलंगावर सर्व दिशा फिरून झाल्या तरी पापण्यांना पापण्या काही केल्या लागत नव्हत्या. शेवटी कसाबसा तो झोपला. पण स्थिर पाण्यात कोणी मध्येच दगड फेकावा, तसा खडबडून जागा झाला. बघतो तर काय, कपाळ घामानं चिप्प भिजलेलं. श्‍वासांची गतीही वाढलेली. त्याला खोकल्याची प्रचंड उबळ आली. घशाला लागलेली कोरड पाणी पिऊनही मिटेना. ते भयावह स्वप्न वारंवार डोळ्यांसमोर तरळून येत होतं. स्वप्नात त्या "सीनियर'नं तिला प्रपोज केलं. ती हसून "हो' म्हणाली. मग त्यांचं बाईकवर फिरणं, बागेत हुंदडणं. लग्नही जमलं. लग्नात आपण अक्षता फेकतोय आणि तो दुष्ट "सीनियर' अग्नीच्या साक्षीने फेरे घेतोय. बाप रे! माय गॉड... हे शक्‍य नाही. मी हे कदापि होऊ देणार नाही. तो स्वतःशीच बाष्कळ बडबड करीत होता. त्याने दुसऱ्या दिवशीच प्रपोज करण्याचा निर्धार केला- मी माझ्या भावना व्यक्त करणार. तिला वाट्टेल तो निर्णय घेऊ देत! तो अट्टाहासाला पेटला होता. आता गाडी सुटली तर छत्री घेऊन कायमचे बस स्टॉपवर "एकटेच' उभे राहावे लागेल, याचा पुरता अंदाज आला होता.
दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन तासांनंतर त्याने सरळ तिला कॅंटीनमध्ये नेले. आणि घाईघाईत थेट प्रपोज केले. प्रपोजची काहीही पूर्वतयारी नसल्याने पुरता गोंधळ उडाला. प्रपोज करताना प्रेमाचे ट्रेडमार्क असलेले साधे गुलाबाचे फूलही देण्याचे राहून गेले. रसभरीत कॅडबरी तर दूरच राहिली. अर्धवट मारलेल्या उडीत त्याचे चांगलेच कंबरचे मोडले. पण आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचल्याचे समाधान होते. तसा तिने सकारात्मक प्रतिसाद दिला नसला तरी, "ठीकए, उद्या सांगते' असे म्हणाल्याने आशेचा किरण अद्याप तेजोमय होता. आता ती हो म्हणेल, की "...' हा जीवघेणा प्रश्‍न त्याला छळत होता.

(क्रमशः)

March 17, 2010

तो आणि ती भाग..१३ --प्रिन्सेसच्या प्रेमभावनेला 'त्याची' सोईस्कर बगल

'व्हॅलेंटाइन डे' उजाडला की तरुणाईच्या प्रेमभावनेला नकळत धुमारे फुटतात. या दिवसाची प्रिन्सेस अगदी चातकासारखी वाट बघत होती. पण पुण्यातल्या बॉंबस्फोटांनी तिच्या कुरघोडीची राखरांगोळी केली. तरीही ती डगमगली नाही. बेत अगदी पक्का होता. कारण या रविवारी त्यांचा "व्हॅलेटाइन डे' साजरा होणार होता.

या रविवारी प्रिन्सेसनं त्याला आपल्या जाळ्यात फसविण्याचा कुटिल प्रयत्न केला. एव्हाना तिला तो आणि ती यांच्यातील नात्याचा सुगावा लागला होता. पण आपलं घोडं दामटल्याशिवाय प्रिन्सेसला चैन पडणं काही शक्‍य नव्हतं. शेवटी प्रिन्सेसनं डाव साधला. त्याला कॅम्पात भेटायला बोलावलं. जाऊ की नाही, या द्विधा मनःस्थितीत असताना त्यानं तिला फोन केला. तिनं प्रारंभी कडाडून विरोध केला. पण प्रिन्सेसची बाजू ऐकूनच घ्यायची नाही, याला तिचं मन धजावेना. शेवटी तीही एक मुलगी होती. तिनं त्याला प्रिन्सेसला भेटण्याची परवानगी दिली. तरीही, प्रिन्सेस त्याला फूस लावून आपल्यापासून दूर नेणार तर नाही ना, असा भयकंप मनात माजला. पण विश्‍वासाची धार प्रखर होती... तो भेटायला गेला. ज्याचा अंदाज होता, तेच घडलं. प्रिन्सेसनं त्याला प्रपोज केलं. चालून आलेल्या संधीचं सोनं केलं. तो तिला सोडून आपल्याकडे येईल, असं प्रिन्सेसला प्रारंभी वाटलं होतं. निरंतर वाहणाऱ्या झऱ्यासारखी प्रिन्सेस आपल्या भावना व्यक्त करीत होती. अडखळत्या शब्दांमध्ये एखाद-दुसरा आवंढा गिळत अश्रूंना गालांवर ओघळू देत होती. स्फुंदत स्फुंदत बोलताना तिच्या हातातील लाल गुलाबावर डोळ्यातील काही मोती सांडले. गुलाबाच्या नाजूक तळात भावनांचं दाट धुकं दाटलं. मुक्‍या पाकळ्यांना कंठ फुटून प्रक्षुब्ध मनानं टवटवीत अवसानाची कात टाकली. अगदी काकुळतीला येऊन प्रिन्सेसनं त्याचा हात हातात घेतला. आयुष्यभर साथ देण्याचा ध्यास केला; पण तो पुतळ्यासारखा स्तब्ध होता. प्रिन्सेसचं एक वेगळंच रूप त्याच्यासमोर आज उलगडलं होतं.

"मी तुझ्या भावना समजू शकतो... पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे. अगदी जिवापाड... तुला ते ठाऊक आहेच! तुला दुखविण्याचा माझा तिळमात्र हेतू नाही... पण जीवनाला समजून घे! स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर. आम्ही तुला साथ देऊ... पुन्हा उभं राहण्याचं बळ देऊ. मी तुला एक प्रियकर देऊ शकत नसलो, तरी एक सच्चा मित्र म्हणून पदोपदी तुझ्या सोबत राहीन. विश्‍वास ठेव... खरंच विश्‍वास ठेव!'' त्यानं आलेलं गंडांतर टाळून सोईची भूमिका घेतली. वातावरणातील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला; पण प्रिन्सेसची कांती काही उजळेना. अपमानाचं शल्य तिला सारखं बोचत होतं. कारण स्वप्नरंजनाला कायमचा पूर्णविराम मिळाला होता. त्याचा तीक्ष्ण इन्कार प्रिन्सेसला सहन होईना. उद्‌भवलेल्या परिस्थितीत कुठलाच मार्ग सापडेना. छातीत रुतलेल्या तलवारीसारखा त्याचा "नाही' खोलवर टोचत होता. विनंती, विनवणी करूनही त्याचा कणखरपणा काही निवळत नव्हता.

अपमानाचं ओझं मिरवत तिनं गाडी "स्टार्ट' केली. लगोलग घरी येऊन बिछान्यावर बेफाम तळमळली. उशी छातीशी कवटाळून पुन्हा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अनावर वेदनेनं ग्रासलेल्या हळव्या मनानं बेछूट आकांत केला. अपमानाचा कडू घोट चघळत प्रिन्सेस निद्रेच्या आहारी गेली... तो घरी परत आला. प्रिन्सेसचं अनावर दुःख सारखं नजरेसमोर तरळून येत होतं. पण आपली बाजू स्पष्ट करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. प्रिन्सेसला मायेचा आधार देणं ही माणुसकी असली, तरी जास्त जवळीक साधणं तिच्या म्हणजे प्रेयसीच्या प्रेमाशी अप्रत्यक्ष प्रतारणाच ठरली असती. बेसिनजवळ जात त्यानं चेहरा ओला केला. मनातल्या तगमगीला थोडा गारवा मिळाला. त्यानं तिला फोन करून प्रिन्सेसच्या "प्रपोज'चं इतिवृत्त कळवलं. त्याचा नकार ऐकून तिचा जीव भांड्यात पडला. तिनं मनोमन देवाचे आभार मानले. दोघांच्या मनातील जळमटं दूर झाली. त्यांनी संध्याकाळच्या पार्टीचा बेत पुन्हा एकदा ताजा केला.

त्याला यायला थोडा विलंब झाला. सर्व मित्र-मैत्रिणी "एफसी'समोर तिष्ठत बसले होते. रविवार असल्यानं परिसरात प्रेमपाखरांची मांदियाळी जमली होती. तिनं उंच हिलची सॅंडल, काळे स्लॅगिंग्ज आणि डिझायनर कुडता घातला होता. "ब्लॅक आउटफिट'मध्ये तिची दुधाळ तेजस्वी कांती फारच खुलून दिसत होती. त्यानं आल्याबरोबर तिला बघत "सुटलो रे बुवा' या अर्थानं खांदे उडविले. अचानक गुडघ्यांवर वाकत गुलाबाचं टवटवीत फूल आणि भलीमोठी कॅडबरी तिच्यासमोर धरली. तिनं आश्‍चर्याने दोन्ही हात कपाळाला टेकविले. "काय हा कलंदर!!!' असा भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शेजारी बसलेले प्रेमवीरही त्यांच्याकडे अवाक होऊन बघत होते. त्याला साथसंगत करीत मित्र-मैत्रिणींनी टाळ्यांचा धो-धो पाऊस पाडला... त्यांनी "एफसी रोड'ला "इव्हिनिंग वॉक' करीत दीर्घ फेरी मारली. हवेत प्रसन्न गारवा होता. सूर्य मावळतीला गेल्यानं अंधाराच्या साम्राज्याला सुरवात झाली होती. लहान-मोठी हॉटेल आणि काही दुकानांवर रोषणाई पसरलेली होती. "हार्टशेप' असलेले लाल-गुलाबी फुगे विकायला आले होते. फुलांची दुकाने रंगीबेरंगी गुलाबांनी, त्यांच्या आकर्षक "बुकें'नी ओसंडून वाहत होती. अवघा रस्ता उत्साहात, नवचैतन्यात पार विरघळून गेला होता. आइस्क्रीम, पिझ्झा, बर्गर, सिझलर, चायनीज हादडत उधाणत्या उत्साहासोबत त्यांचा ग्रुप पोटाची पोकळी भरत होता. रात्रीचे आठ वाजायला आले. पोटात किंचितही जागा नव्हती. त्यांनी डिनरचा प्लॅन रद्द केला. एवीतेवी ग्रुपच्या मुलींनी घरी जाण्याचा धावा सुरू केला होता. ती जाणार तेव्हा तो म्हणाला, ""एकदा प्रपोज कर ना... किमान "व्हॅलेंटाइन डे'चा फिल तर येऊ दे!'' ती थोडी लाजली. गालातल्या गालात हसली. म्हणाली, ""इश लिब दिश...'' जर्मन क्‍लासचा प्रभाव!

(क्रमशः)

तो आणि ती भाग..११ --'त्याच्या' वाढदिवशी रंगली केकची रंगपंचमी

सहलीच्या दुसऱ्या दिवशी "त्याचा' म्हणजेच आपल्या हिरोचा वाढदिवस होता. सर्वांनी धम्माल केली. केकची रंगपंचमी झाली. दोन दिवसात अख्खे बंगळूर पालथे घातले. नंदी टेंपलमध्ये सोबत पूजा करून आयुष्यभर साथ देण्याच्या कमिटमेंटला बळकटी दिली.

सहलीच्या पहिल्या दिवशी त्यांनी इन्फि आणि विप्रो या कंपन्यांचे चकचकीत कार्यालय बघितले. दुसऱ्या दिवशी "त्याचा' वाढदिवस होता. मध्यरात्रीच वाढदिवस धुमधडाक्‍यात साजरा करण्याचा मित्रांचा प्लॅन होता. पण क्‍लास इन्चार्जने परवानगी नाकारल्याने प्लॅनवर पाणी पडले. त्याला रात्री उशिरापर्यंत अभिनंदनाचे कॉल्स येत होते. तिने ठीक 12 वाजता फोन करून पहिला नंबर लावला. "वाढदिवसाचे एक स्पेशल गिफ्ट तुझी वाट बघत आहे. मी कालच तुझ्यासाठी खरेदी केले. आणी हो...उद्या खास तुझ्यासाठी तयार होणार आहे,'' मधाळ स्वरात ती म्हणाली. "खास तुझ्यासाठी,'' हे शब्द कानात पडताच तो मनोमन शहारला. पहिल्यांदी कुणीतरी खास त्यासाठी तयार होणार होते. तशी कमिटमेंटच मिळाली होती. ड्रेसचा तर्क लावण्यात रात्र अंगावरून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या बॅंक्वेट हॉलमध्ये सर्व गोळा झाले. त्यांनी कॉन्ट्रीकरून हार्टशेप बदामी रंगाचा केक आणला. त्यावर रंगीबेरंगी एकवीस मेणबत्त्या रोवण्यात आल्या. पण त्याकडे त्याचे लक्ष नव्हतेच. त्याची नजर तिला शोधत होती. ती आज खास त्याच्यासाठी तयार होणार होती. अखंड वाहणाऱ्या धबधब्यातील पाण्यासारखा पांढराशुभ्र आणि निमुळता आकार असलेल्या जिन्यावर ती आली. तिला बघातक्षणी गोठलेल्या पुतळ्यासारखा तो जागेवरच स्थिरावला. मोरपंखी कलरच्या अनारकली पॅटर्न ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य फारच खुलून दिसत होते. त्यावर फिक्कट निळ्या रंगाची ओढणी आणि ओढणीवर पाचूसारख्या चमकणाऱ्या चांदण्या लक्ष वेधून घेत होत्या. हिल्सच्या सॅन्डल्स, हातातली छोटेखानी पर्स, मॉडर्न हेअरस्टाईल आणि ओठांवर उबदार हसू एकंदर व्यक्तीमत्ताला खुलवत होते. बॅंक्वेट हॉलच्या छताला असलेल्या सनरूफमधून आलेल्या सकाळच्या कोवळ्या उन्हात तिची गोरी नितळ कांती अगदी सोन्यासारखी चमकत होती. स्वर्गातील अप्सरा पांढऱ्या शुभ्र छगांवर पदन्यास करीत भूतलावर अवतरावी, अशीच एकएक पायरी उतरत ती हॉलमध्ये आली. ती आल्यावर हॉलमध्ये परफ्युमचा दरवळ उठला. वातावरणात एकदम तजेला आला. तिच्या लोभस पण तेजस्वी चेहऱ्यावर त्याची नजर स्थिरावली. अगदी वेड्यासारखा तो तिला बघत होता. लांब कानातले, छोटीशी बिंदिया, रेखीव नाक, लालचुटूक ओठ, नाजूक जिवणी आणि सडपातळ देखणा बांधा त्याच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली. एका मित्राने त्याला हळूच धक्का दिल्यावर तो भानावर आला. त्यानंतर हॉलच्या मध्यभागी एक मोठ्या टेबलावर ठेवलेल्या केककडे वळला. "हॅपी बर्थडे'च्या जल्लोषात आणि टाळ्यांच्या निनादात त्याने केक कापला. केकचा पहिला तुकडा कुणाला द्यावा, यावरून मित्रांमध्ये खसखस पिकली. एव्हाना त्यांना त्या दोघांच्या नात्याची चुणूक लागली होती.

त्यांनी तिलाच पहिला घास म्हणजेच केकचा तुकडा भरविण्याचा खासगी आग्रह धरला. कुणाच्याही नकळत केकचा दुसरा तुकडा कापून त्याने क्‍लास इन्चार्जच्या जिभेवर ठेवला. सर्व लेक्‍चरर्स गेल्यावर त्याच्या ग्रुपला दोघांभोवती घेराव घालण्याचा इशारा केला. आणि हातातल्या केकचा भलामोठा पहिला तुकडा तिच्या तोंडात कोंबला. आता तिने त्याला केक भरवावा असा आग्रह त्याच्या मित्रांनी केला. पण सहलीला आलेल्या प्रिंसेसच्या नजरेने ते अगदी अचूक टिपले. तिची जिरविण्याच्या ईर्षेने तरातरा केकजवळ जाऊन प्रिंसेसने केकचा एक तुकडा तोडला. आणि सर्वांसमोर बळेच त्याच्या तोंडात घातला. तिला प्रिंसेसच्या स्वभावाचा पुरता अंदाज आला होता. तिने काहीही आक्षेप घेतला नाही. उलट सर्वांसोबत टाळ्यांचा उत्साही गजर केला. केक कापण्याची फॉर्मेलीटी आटोपल्यावर मित्रांनी त्याचे दोन्ही हात मागे पकडून केकचा क्रीम त्याच्या चेहऱ्यावर थापला. काहींनी तर डोक्‍याच्या केसांनाही क्रीम चोळला. आता तो अगदी विदुषकासारखा दिसत होता. एवढे करूनही त्यांचे भागले नाही. त्याच्या नव्या कोऱ्या ड्रेसला क्रीमचे भरलेले हातही पुसले. केकची रंगपंचमी संपल्यावर तिने त्याला डोळे बंद करण्यास सांगितले. त्याने पापण्या मिटल्यावर स्पेशल गिफ्ट हातावर ठेवले. डोळे उघडण्याची परवानगी दिल्यावर त्याने एखाद्या लहान मुलासारखे गिफ्ट उघडले. गिफ्ट फारच आकर्षक होते. बटण दाबल्यावर काचेच्या इवल्याशा डब्यातील राजकुमार आणि त्याच्या प्रियसीचे पुतळे फारच लोभस नाचत. पार्श्‍वभागी डिस्को लाईट्‌स आणि मधूर संगीतही पेरले होते. त्याला गिफ्ट फारच आवडले. तसेही तिने दिलेले गिफ्ट त्याला न आवडणे, हे शक्‍य नव्हते. राजकुमार आणि त्याच्या प्रियसीचे मनोहारी नृत्य बघून तीला पुन्हा एकदा प्रपोज करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावला. पण सर्वांसमोर हे शक्‍य नव्हतं. अगदी ओठांवर आलेले शब्द त्याने तसेच गिळून घेतले.

गिफ्ट प्रोग्रॅम आटोपल्यावर मित्रांनी त्याला बॅंक्वेट हॉलच्या बाहेर हिरवळीवर नेले. दोन्ही हात आणि पाय पकडून अलगद उचलले. आणि बघताक्षणी लहान मुलाला फेकावे तसे आकाशात फेकले. तेही चक्क तीनदा. "एनडीए'च्या दीक्षांत समारंभात मेडल मिळालेल्या मुलाला त्याचे सहकारी फेकतात, अगदी तसेच. त्यानंतर 21 लाथांची सलामी दिली. इतक्‍यात त्याला शोधत ती तेथे पोहचली. ""हा काय अघोरी प्रकार. तोंडाला क्रीम फासला. नवेकोरे शर्ट खराब केले. ते एकदाचे ठिकएै. पण चक्क लाथा! त्याही वाढदिवशी!!!'' ती रागाने फणफणली. चेहरा लालबुंद झाला. त्याचा मित्रांना चांगलेच सुनावले. तिचे रौद्ररूप पाहून त्यांनी काढता पाय घेतला. त्याला कुठे लागले तर नाहीना, याची आस्थेने चौकशी केली. यावेळी तिचे डोळे डबडबले. अश्रू पाघळू लागले. त्याला जरी मार बसला असला, तरी वेदना तिला झाल्या होत्या. त्याने रुमालाने तिचे डोळे पुसले आणि ""मला काहीच झाले नाही,'' असा निर्वाळा देत प्रसन्नमुद्रेने तिची समजूत काढली. त्यानंतर तीचा चेहरा निवळला.

त्यांनी दुपारी आयटी पार्क, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंस, वसवनगुडी परिसरातील प्रसिद्ध नंदी टेंपल आणि विधान सौंध म्हणजेच कर्नाटकची विधानसभा बघितली. नंदी टेंपलसमोर असलेल्या कॉफी शॉपमध्ये त्याने पिझ्झा आणि कोल्ड कॉफीची पार्टी दिली. कोल्ड कॉफी रिचवल्यावर ओठांवर फुटणाऱ्या नाजूक मिसरूडांसह ग्रुप फोटोही काढला. काहींनी तर ग्लासमध्ये राहिलेल्या कॉफीत बोटं बुडवून खास फोटोसाठी मुद्दाम अक्कड मिशा चितारल्या. तो फोटो कायम स्मरणात राहील, असाच निघाला. नंदी टेंम्पलमध्ये असताना मित्रांना विश्‍वासात घेऊन त्या दोघांनी सोबत पूजा केली. साधारणतः साडेचार-पाच फुटांच्या नंदीच्या मूर्तीसमोर दोघेही हात जोडून उभे असताना तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती धिरगंभीर झाली. नंदी हे शंकराचे वाहन. आणि गणपती हा त्यांचा मुलगा. तिची गणपतीवर नितांत श्रद्धा. म्हणजे गणपतीच्या कुटुंबातील सदस्यासमोर नतमस्तक होताना गहिवरून आले. देव त्यांच्या मनातील इच्छा जाणतो. त्यांच्या भावना अधिकारवाणीने समजून घेऊ शकतो. तेव्हा आता या नात्याचे तूच संवर्धन आणि रक्षण कर, अशी प्रार्थना केली. सहलीच्या तिसऱ्या दिवशी चिन्नास्वामी स्टेडिअम, एमजी मार्गावरील पब्लिक युटिलिटी बिल्डिंग आणि निळ्याशार पाण्याचा हेसरगट्टा तलाव पाहिला. त्याच दिवशी रात्री पुण्याकडे प्रस्थान केले. भल्या पहाटे नयनरम्य कात्रज घाटाचे दर्शन झाले.

(क्रमशः)

तो आणि ती भाग..१ --पहिल्या 'प्रपोज'चा पहिलाच गंध

सकाळ मध्ये आलेल्या विजय लाड यांच्या तो आणि ती या लेख मालेतील लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.




पहिलं हे पहिलंच असतं, असा आपण वारंवार उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊ या.

एव्हाना त्यांची मैत्री वर्गातल्या बाकापासून कॅंटीनच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात कॅंटीनचा कडवट चहा गळ्याखाली ढकलण्यासाठी काही तरी कारण अकारण पुढे करावे लागत असे. मग गप्पा-गोष्टी आणि टिंगलटवाळकीच्या निमित्तानं एकमेकांशी एखाद-दुसरा संवाद साधला जाई, तर कधी कधी वादविवाद झडे. असे दिवसांमागून दिवस जात होते. तो आज "प्रपोज' करील, उद्या करील, परवा करील, अशा भाबड्या आशेला कुरवाळत ती येणारा प्रत्येक दिवस ढकलत होती. पण "तो' सोन्याचा दिवस काही केल्या उगवत नव्हता. तशीच मनाची घालमेल काही केल्या शमत नव्हती. शेवटी भावनात्मक कोंडी फोडण्यासाठी तिने स्वतःच "प्रपोज' करण्याचा चाकोरीबाहेरचा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला.

तसेही ती काही अशोकाचं झाड नव्हती; ज्याला फूलही नाही, सावलीही नाही की फळंही नाही! एकविसाव्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये, हे शक्‍य तरी आहे काय! तशीही ती स्वभावाने खूप नम्र आणि संकोची मुलगी नव्हती. मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी एका दिव्यातून जावे लागेल, याचा तिला पुरेपूर अंदाज होता. त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती. "कल करे सो आज, और आज करे सो अब,' या उक्तीप्रमाणे तिने उद्याच प्रपोज करण्याचे ठरविले.

पहिल्या अर्थात पहिल्या आणि शेवटच्या प्रपोजची मनात थोडी धाकधूक होतीच. तो "हो' म्हणेल की ..!' याचा राहून-राहून मनात विचार येत होता. गुलाबाच्या पाकळ्या तोडून झाल्या, गणिताच्या वहीची पानं मोजून झाली, तरी विश्‍वासक आणि थोडे आश्‍वासक उत्तर काही सापडेना. शेवटी थेट त्याच्यासमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. पण तिला पठडीबाज प्रपोज करायचे नव्हतं. काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.

त्यामुळे थेट, पण थोड्या वेगळ्या धाटणीच्या प्रपोजचा सराव करण्याचा विचार मनात डोकावला. रात्री बळेबळे चार घास खाऊन ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून आरशासमोर पंधरा-वीस वैविध्यपूर्ण प्रपोज मारले. त्यांतील एका वाक्‍याचा दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. प्रपोजमध्ये थोडी सुसूत्रता येण्यासाठी जे म्हणायचे आहे, ते नीट लिहून परत सराव केला. तरीही समाधान झाले नाही. प्रपोज सत्राच्या मध्यंतरी थोडा विरंगुळा म्हणून आकाशाला हात टेकवून एक-दोन गाण्यांच्या मधुर चालींवर पाय थिरकायचे. सर्व करून झाले; पण त्याला थेट प्रपोज करण्याची हिंमत नसल्याची तिला सारखी जाणीव होत होती. त्यापेक्षा प्रेमपत्र लिहून भावना व्यक्त करणे जास्त सोईस्कर वाटले. त्याने तिची गणिताची वही मागितलेली होतीच. उद्या ती देताना त्यात प्रेमपत्र ठेवण्याचा बेत तिने रचला. पत्राच्या प्रस्तावनेतच सकाळचे तीन वाजले; नंतर चारचा अर्धा ठोकाही पडला. शेवटी मोजून चार ओळीचे; पण भावनांनी ओतप्रोत भरलेले पत्र फायनल केले. ते सहज दिसेल अशा जागी वहीत लपवून ठेवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बागेतले एक ताजे, टवटवीत गुलाबाचे फूल पत्राच्या शेजारी ठेवले. पहिले दोन तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व्हरांड्यात जमा झाले. ती त्याचा जवळ जाऊन म्हणाली, ""मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.'' तो म्हणाला, ""मलाही!'' दोघेही कॅंटीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. या गोंधळातच तो तिला थेट म्हणाला, ""तुझे माझ्यावर प्रेम आहे?'' ती थोडी दचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन "नाही' म्हणाली. असे काही घडण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्‍न केला, "तुझे आहे काय?' आता तिने नाही म्हटल्यावर माझे तुझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, असे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यात मैत्री गमावण्याची रिस्कही होती. पण त्याला "नाही' म्हणताच आले नाही. त्याने "लिटल बिट' म्हटले.

तिला काहीच कळाले नाही. तिने परत विचारणा केली. तर तो नजर झुकवून अपराधी भावनेने "हो' म्हणाला. तो पुन्हा पुटपुटला, ""तू विचार करून उत्तर दे ना. माझ्यासाठी थोडा वेळ घे.'' हुकमी पत्ता आपल्या हातात ठेवत ती, ""ठिकै, उद्या सांगते'' म्हणाली. वही तशीच हातात घेऊन आनंदाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मनाने वर्गात परतली. त्याच्याप्रमाणेच तिलाही काही तरी "महत्त्वाचे' सांगायचे होते, याचा त्याला पुरता विसरच पडला.
(क्रमशः)