'व्हॅलेंटाइन डे' उजाडला की तरुणाईच्या प्रेमभावनेला नकळत धुमारे फुटतात. या दिवसाची प्रिन्सेस अगदी चातकासारखी वाट बघत होती. पण पुण्यातल्या बॉंबस्फोटांनी तिच्या कुरघोडीची राखरांगोळी केली. तरीही ती डगमगली नाही. बेत अगदी पक्का होता. कारण या रविवारी त्यांचा "व्हॅलेटाइन डे' साजरा होणार होता.
या रविवारी प्रिन्सेसनं त्याला आपल्या जाळ्यात फसविण्याचा कुटिल प्रयत्न केला. एव्हाना तिला तो आणि ती यांच्यातील नात्याचा सुगावा लागला होता. पण आपलं घोडं दामटल्याशिवाय प्रिन्सेसला चैन पडणं काही शक्य नव्हतं. शेवटी प्रिन्सेसनं डाव साधला. त्याला कॅम्पात भेटायला बोलावलं. जाऊ की नाही, या द्विधा मनःस्थितीत असताना त्यानं तिला फोन केला. तिनं प्रारंभी कडाडून विरोध केला. पण प्रिन्सेसची बाजू ऐकूनच घ्यायची नाही, याला तिचं मन धजावेना. शेवटी तीही एक मुलगी होती. तिनं त्याला प्रिन्सेसला भेटण्याची परवानगी दिली. तरीही, प्रिन्सेस त्याला फूस लावून आपल्यापासून दूर नेणार तर नाही ना, असा भयकंप मनात माजला. पण विश्वासाची धार प्रखर होती... तो भेटायला गेला. ज्याचा अंदाज होता, तेच घडलं. प्रिन्सेसनं त्याला प्रपोज केलं. चालून आलेल्या संधीचं सोनं केलं. तो तिला सोडून आपल्याकडे येईल, असं प्रिन्सेसला प्रारंभी वाटलं होतं. निरंतर वाहणाऱ्या झऱ्यासारखी प्रिन्सेस आपल्या भावना व्यक्त करीत होती. अडखळत्या शब्दांमध्ये एखाद-दुसरा आवंढा गिळत अश्रूंना गालांवर ओघळू देत होती. स्फुंदत स्फुंदत बोलताना तिच्या हातातील लाल गुलाबावर डोळ्यातील काही मोती सांडले. गुलाबाच्या नाजूक तळात भावनांचं दाट धुकं दाटलं. मुक्या पाकळ्यांना कंठ फुटून प्रक्षुब्ध मनानं टवटवीत अवसानाची कात टाकली. अगदी काकुळतीला येऊन प्रिन्सेसनं त्याचा हात हातात घेतला. आयुष्यभर साथ देण्याचा ध्यास केला; पण तो पुतळ्यासारखा स्तब्ध होता. प्रिन्सेसचं एक वेगळंच रूप त्याच्यासमोर आज उलगडलं होतं.
"मी तुझ्या भावना समजू शकतो... पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे. अगदी जिवापाड... तुला ते ठाऊक आहेच! तुला दुखविण्याचा माझा तिळमात्र हेतू नाही... पण जीवनाला समजून घे! स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर. आम्ही तुला साथ देऊ... पुन्हा उभं राहण्याचं बळ देऊ. मी तुला एक प्रियकर देऊ शकत नसलो, तरी एक सच्चा मित्र म्हणून पदोपदी तुझ्या सोबत राहीन. विश्वास ठेव... खरंच विश्वास ठेव!'' त्यानं आलेलं गंडांतर टाळून सोईची भूमिका घेतली. वातावरणातील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला; पण प्रिन्सेसची कांती काही उजळेना. अपमानाचं शल्य तिला सारखं बोचत होतं. कारण स्वप्नरंजनाला कायमचा पूर्णविराम मिळाला होता. त्याचा तीक्ष्ण इन्कार प्रिन्सेसला सहन होईना. उद्भवलेल्या परिस्थितीत कुठलाच मार्ग सापडेना. छातीत रुतलेल्या तलवारीसारखा त्याचा "नाही' खोलवर टोचत होता. विनंती, विनवणी करूनही त्याचा कणखरपणा काही निवळत नव्हता.
अपमानाचं ओझं मिरवत तिनं गाडी "स्टार्ट' केली. लगोलग घरी येऊन बिछान्यावर बेफाम तळमळली. उशी छातीशी कवटाळून पुन्हा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अनावर वेदनेनं ग्रासलेल्या हळव्या मनानं बेछूट आकांत केला. अपमानाचा कडू घोट चघळत प्रिन्सेस निद्रेच्या आहारी गेली... तो घरी परत आला. प्रिन्सेसचं अनावर दुःख सारखं नजरेसमोर तरळून येत होतं. पण आपली बाजू स्पष्ट करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. प्रिन्सेसला मायेचा आधार देणं ही माणुसकी असली, तरी जास्त जवळीक साधणं तिच्या म्हणजे प्रेयसीच्या प्रेमाशी अप्रत्यक्ष प्रतारणाच ठरली असती. बेसिनजवळ जात त्यानं चेहरा ओला केला. मनातल्या तगमगीला थोडा गारवा मिळाला. त्यानं तिला फोन करून प्रिन्सेसच्या "प्रपोज'चं इतिवृत्त कळवलं. त्याचा नकार ऐकून तिचा जीव भांड्यात पडला. तिनं मनोमन देवाचे आभार मानले. दोघांच्या मनातील जळमटं दूर झाली. त्यांनी संध्याकाळच्या पार्टीचा बेत पुन्हा एकदा ताजा केला.
त्याला यायला थोडा विलंब झाला. सर्व मित्र-मैत्रिणी "एफसी'समोर तिष्ठत बसले होते. रविवार असल्यानं परिसरात प्रेमपाखरांची मांदियाळी जमली होती. तिनं उंच हिलची सॅंडल, काळे स्लॅगिंग्ज आणि डिझायनर कुडता घातला होता. "ब्लॅक आउटफिट'मध्ये तिची दुधाळ तेजस्वी कांती फारच खुलून दिसत होती. त्यानं आल्याबरोबर तिला बघत "सुटलो रे बुवा' या अर्थानं खांदे उडविले. अचानक गुडघ्यांवर वाकत गुलाबाचं टवटवीत फूल आणि भलीमोठी कॅडबरी तिच्यासमोर धरली. तिनं आश्चर्याने दोन्ही हात कपाळाला टेकविले. "काय हा कलंदर!!!' असा भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शेजारी बसलेले प्रेमवीरही त्यांच्याकडे अवाक होऊन बघत होते. त्याला साथसंगत करीत मित्र-मैत्रिणींनी टाळ्यांचा धो-धो पाऊस पाडला... त्यांनी "एफसी रोड'ला "इव्हिनिंग वॉक' करीत दीर्घ फेरी मारली. हवेत प्रसन्न गारवा होता. सूर्य मावळतीला गेल्यानं अंधाराच्या साम्राज्याला सुरवात झाली होती. लहान-मोठी हॉटेल आणि काही दुकानांवर रोषणाई पसरलेली होती. "हार्टशेप' असलेले लाल-गुलाबी फुगे विकायला आले होते. फुलांची दुकाने रंगीबेरंगी गुलाबांनी, त्यांच्या आकर्षक "बुकें'नी ओसंडून वाहत होती. अवघा रस्ता उत्साहात, नवचैतन्यात पार विरघळून गेला होता. आइस्क्रीम, पिझ्झा, बर्गर, सिझलर, चायनीज हादडत उधाणत्या उत्साहासोबत त्यांचा ग्रुप पोटाची पोकळी भरत होता. रात्रीचे आठ वाजायला आले. पोटात किंचितही जागा नव्हती. त्यांनी डिनरचा प्लॅन रद्द केला. एवीतेवी ग्रुपच्या मुलींनी घरी जाण्याचा धावा सुरू केला होता. ती जाणार तेव्हा तो म्हणाला, ""एकदा प्रपोज कर ना... किमान "व्हॅलेंटाइन डे'चा फिल तर येऊ दे!'' ती थोडी लाजली. गालातल्या गालात हसली. म्हणाली, ""इश लिब दिश...'' जर्मन क्लासचा प्रभाव!
(क्रमशः)
No comments:
Post a Comment