May 11, 2019

भाषा-अस्त्राचा गजरा!


रशिया , फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन या देशांनी आपल्या भाषेला सॉफ्टपॉवर म्हणून सतत पुढे ठेवण्याचा केलेला प्रयत्न, त्यासाठी ते करत असलेली कल्चरल डिप्लोमसी या गोष्टी आपण भारतीयांनी शिकण्यासारख्या आहेत. कारण आपण आपल्या भाषांची आबाळ करतो. खरे तर आपल्या भाषेच्या प्रसार-संवर्धनातून आपला राष्ट्राभिमान, राष्ट्रहित जोपासलं जातं असतं. भाषा हे अस्त्र नाजूक असलं तरी ते तितकंच प्रभावीही असतं. या उद्देशाने १६ जून रोजी ‘संवर्धन’ या सेवाभावी संस्थेतर्फे मुंबईत संस्कृत भाषेविषयी एक परिसंवाद होतो आहे. त्यानिमित्ताने भाषिक हत्याराचे पैलू स्पष्ट करणारा हा लेख..

बोत्सन हे युरोपातल्या दक्षिण तिरोल या प्रदेशातले एक इवलेसे गाव आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी आणि इटलीच्या अगलबगल चिमटीत सापडलेलं. ते अधिकृतरीत्या येतं इटलीत, पण तेथील २५ टक्के लोक जर्मन वंशाचे- पर्यायाने जर्मन भाषिक आहेत.


तर या इटुकल्या-मिटुकल्या गावात येत्या २८ जुलैपासून चांगला आठवडाभर जर्मन या त्यांच्या मातृभाषेचा अपूर्व सोहळा साजरा होत आहे. १९६१पासून ते आजपर्यंत निरनिराळ्या जर्मन भाषिक प्रदेशांत हा सोहळा संपन्न होतो. २०१३च्या बोत्सनमधल्या या सोहळ्यात १०० देशांमधले अडीच हजार जर्मन भाषा प्रशिक्षक आणि जर्मनभाषातज्ज्ञ आमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत. जर्मन भाषा अधिकाधिक उत्तम तऱ्हेने शिकवण्यासाठी जगभरात चालू असणाऱ्या प्रयोगांना, उपक्रमांना एक व्यासपीठ मिळणार आहे. शिवाय जर्मन पाठय़पुस्तके तयार करणारे पाच-पन्नास प्रकाशक जगभरातल्या जर्मन प्रशिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या सर्वाचा खर्च साडेसात लक्ष युरोच्या (अंदाजे सव्वापाच कोटी रुपये) घरात जाईल, असा आयोजकांचा अंदाज आहे. जर्मन भाषेचे संवर्धन आणि प्रसार यासाठी जर्मन सरकार साठीच्या दशकापासून जो अवाढव्य खर्च करत असते त्या हिमनगाचे हे अगदी शेंडय़ाएवढे उदाहरण. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात ८० टक्के बेचिराख झालेल्या या देशाने युद्धानंतर अवघ्या १६ वर्षांत आपल्या मातृभाषेच्या पद्धतशीर संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी ही एवढी थोरली आर्थिक गुंतवणूक आणि तरतूद किती दूरदृष्टीने केली असली पाहिजे!


आपल्याकडच्या ‘मातृदेवो भव’ या उक्तीतील ‘मातृ’ ही अशी जन्मदात्या भाषेपर्यंतही पोहोचवता येते हे पाहिल्यावर डोळ्यात पाणी येते. आपल्या घरातल्या प्रादेशिक भाषांच्या अक्षम्य आबाळीचा विरलेला पदर सारखा आठवत राहतो.


एकंदरीत आपल्या भारतीय मनात ‘ते विज्ञान’ आणि ‘ती भाषा’ यातले डावे-उजवे खोलवर रुतलेले आहे. गणित-सायन्स खरे! बाकी भाषा प्रावीण्य वगैरे म्हणजे एरवी आयुष्यात दुसरे काहीच जमत नसलेले लोक भाषाबिशा शिकतात असा प्रवाद फार वेळा दिसतो. त्यातही पुन्हा सत्तेची उतरंड आहे. त्यात इंग्रजी भाषा सर्वात वरच्या पायदंडीवर, तर प्रादेशिक भाषा, त्यांची आजी संस्कृत ही सगळ्यात खालच्या पायरीवर. मातृभाषांच्या या हेळसांडीमागे तशी कारणेही आहेत. शिक्षण संपल्यावर नोकरीची वेळ येते, त्या वेळी विज्ञान-तंत्रज्ञान हे कर्त्यां पुरुषासारखे काठी वाजवत ओटीवर प्रवेश करताना दिसतात. त्यांच्या चंचीत पैसे खुळखुळतात. मातृभाषा मात्र अंधाऱ्या स्वयंपाकघरात रात्रंदिवस खपणाऱ्या अन्नपूर्णेसारखी मना-संस्कारांची मशागत करत बसते. तिची मुकी माया कोणाला दिसत नाही, समजत नाही. मग तिचा कसला सोहळा करायचा?


इंग्रजीचा वाढता प्रभाव हा काही फक्त आपल्या भारतापुरता प्रश्न नाही. जगभरातल्या भाषांमध्ये तिचा चंचुप्रवेश सतत होत आहे. तरीही औद्योगिक क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर असलेले सर्व देश आपापली मातृभाषा कसोशीने जपताना दिसतात. इस्राएल, जर्मनी, स्कँडेनेव्हियातले देश, रशिया, कोरिया, जपान, चीन अशा सर्व देशांत शालेय आणि विद्यापीठीय शिक्षणाचे माध्यम त्यांची त्यांची मातृभाषा असते. इंग्रजी या मडमेला ते दिवाणखान्यात जरूर प्रवेश देतात. पण म्हणून आपले अंतर्गृह तिच्या ताब्यात देत नाहीत. या देशांतील मुले आपापल्या मातृभाषेत मोठी होतात. या मातृभाषा ज्ञानभाषा व्हाव्या म्हणून हे सर्व प्रगत देश त्यामध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणूक करतात. माननीय यशवंतराव चव्हाण हेच तर सांगत होते आपल्याला! भारतीय भाषांनी त्वरेने बोलीभाषेतून ज्ञानभाषेत उत्क्रांत होणे महत्त्वाचे आहे म्हणून.


मातृभाषेचे सबलीकरण यातला भावनिक अनुबंधाचा भाग थोडा दूर ठेवू. त्यामागचे व्यवहाराचे आणि राजकीय दूरदृष्टीचे अस्तर मात्र आपण जरूर विचारात घेण्यासारखे आहे. आपापल्या भाषांचा जगभर प्रसार करू पाहणे हा आंतरराष्ट्रीय कल्चरल डिप्लोमसीचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे.


एक डिप्लोमॅट म्हणजे मुत्सद्दी नेमका काय करतो? तर प्रथम सर्वाशी लांब-रुंद चर्चा करतो. सर्व बाजू ऐकून घेतो आणि मग विरोधी विचारांना मोठय़ा खुबीने आपल्या बाजूने वळवून घेतो. अगदी पट्टीचा मुत्सद्दी तर यापुढे चार-आठ पावले जातो. आपले विचार हेच सर्वात आदर्श विचार असे एक गारूड फार यशस्वीपणे तयार करतो.


गौरवर्णीयांनी ‘योगा’ वगैरे म्हटले की मग समूहांना घाऊक प्रमाणात योगविद्येकडे वळावेसे वाटते. धुणीभांडी करणारी माऊली पोटास चिमटा घेऊन आपल्या लेकाला ‘कॉन्व्हेंट’मध्ये घालते. त्यामुळे पुढे तो म्यानेजर झालाच जणू अशा भ्रमात जगते! ‘गोरी सत्रा गुण चोरी’ अशा म्हणी आणि वृत्ती तयार होतात. ताजवरच्या भीषण हल्ल्यात बीबीसी/ सीएनएन लावावेसे वाटते, दूरदर्शन नाही.


थोडक्यात समूहांचे ब्रेनवॉशिंग करण्याचे प्रमुख अस्त्र म्हणजे ही कल्चरल डिप्लोमसी. त्याची सुरुवात भाषेच्या प्रसारापासून होते. कारण शेवटी प्रत्येक संस्कृती अमुक एका भाषेतून विचार करत असते. ती भाषा इतर समूहांना गोड वाटली, आवडू लागली की, त्यातले आचार- विचार-संस्कारही आवडू लागतात. मग स्वत:ची मातृभाषा तोकडी वाटू लागते. स्वत:ची संस्कृती तोकडी वाटू लागते. इंग्रजांनी फार पूर्वीपासून ही काळजी घेतली. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान या देशांनी इंग्रजांचा कित्ता गिरवला. या क्लबात आता चीन दाखल झाला आहे. २०२० पर्यंत जगभरात चिनी भाषा आणि चिनी कल्चरचा प्रसार करणाऱ्या तब्बल १००० कन्फ्युशिअस इन्स्टिटय़ूट्स उभारण्याचा विडा या देशाने उचलला आहे. पैकी ५०० इन्स्टिटय़ूट कार्यरतही झाल्या आहेत. प्रत्येक इन्स्टिटय़ूटपाठी प्रतिवर्षी तब्बल ४ लाख डॉलर्स खर्च केले जातात.


आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या प्रांगणात याला ‘सॉफ्ट पॉवर’ असे नाव आहे. एखाद्या महाप्रचंड अभेद्य अशा शिळेवर अव्याहतपणे थेंब थेंब पाणी पडत राहिले तर ती कालांतराने भंगू शकते..अर्थात सुरुंग लावूनही ती भंगता येते. प्रत्येक देश स्वसंरक्षणासाठी अशा सुरुंगांची म्हणजे लष्करी तयारी करत असतो. त्याला नाव आहे हार्डपॉवर. ती दिसते. मोजता येते. अण्वस्त्रांच्या, रणगाडय़ांच्या संख्येमुळे तिचा दबदबा असतो; परंतु याच्याच जोडीला दूरदृष्टी असलेले देश सॉफ्टपॉवरसाठीही तितक्याच ताकदीनिशी पैशाची तजवीज करताना दिसतात. ही सॉफ्टपॉवर वाढवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातला सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या भाषेचे सबलीकरण करणे. आणि मग ही सबला दूर दूर देशी पाठवून आपल्या संस्कृतीचे सबलीकरण करणे. म्हणजे काय? तर इतर सर्व जगवासीयांना जणू आपला ध्यास लावून देणे. मग जगभरातल्या अत्युच्च बुद्धिमत्तेला किंवा स्वस्त मजुरांना आपल्या देशाकडे खेचून आणण्यास फारसे कष्ट पडत नाहीत. शिवाय आपल्या उत्पादनांसाठी तेथील बाजारपेठ सहज काबीज करता येते ते वेगळे!


इतका दूरदृष्टीचा विचार आपण भारतीय कधी करणार? जन्मदात्यांनी स्त्री गर्भाची कळी खुडून टाकावी तशी भारतभरातल्या प्रादेशिक भाषांना आपण मरणकळा आणत आहोत. त्यांना सबला करून कल्चरल डिप्लोमसीसाठी दूरदेशी पाठवणे तर राहिले शतयोजने दूर!


गो. नी. दांडेकरांच्या ‘पडघवली’मध्ये व्यंकू खोत नावाचे एक पात्र आहे. हा व्यंकू खोत आंधळ्या भिऊआबाच्या तरण्या पत्नीसाठी- शारदेसाठी बंदरावरून येताना रोज एक भरगच्च गजरा आणतो. चांगला कलाबूत घातलेला. मग त्या बदल्यात तिचा भोग घेतो आणि शेवटी शारदेचे घर- आगार बघता बघता व्यंकू खोताच्या नावावर होते.


अशी असते सॉफ्टपॉवर आणि त्यातली कल्चरल डिप्लोमसी!


भारतीय शारदेच्या भाळी आंधळा भिऊआबाच लिहिला आहे का? 


पण लक्षात कोण घेतो!


वैशाली करमरकर 

कटी पतंग

स्वत:च्या संस्कृतीला श्रेष्ठ ठरविण्यासाठी इतर संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापण्याचा आणि त्यांना अधांतरी लटकवण्याचा उद्योग दीर्घ काळापासून सुरू आहे.


मांजा तुटलेला पतंग काही काळ दिशाहीन तरंगतो. नंतर तो एकतर कापणा:याच्या मुठीत येतो किंवा कुठेतरी अडकून फाटून जातो. स्वत:च्या संस्कृतीला श्रेष्ठ ठरविण्यासाठी इतर संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापण्याचा आणि त्यांना अधांतरी लटकवण्याचा उद्योग दीर्घ काळापासून सुरू आहे.

-----------------

गेल्या पंधरा-वीस दिवसात युरोपभर आणि इतरत्र फार अचंबित करणा:या घडामोडी घडत होत्या. त्या सर्व घडामोडी ‘सॉफ्ट पॉवर’ या विषयाच्या व्याप्तीला स्पर्श करणा:या आहेत, म्हणून त्याबद्दल उल्लेख जरुरीचा आहे -

1. जर्मनीमधे सर्व ज्यू लोकांना एक अपील करण्यात आले आहे. त्यांनी त्यांची ‘किप्पा’ नावाची तळहाताएवढी गोल टोपी जर्मनीत घालून फिरू नये. कारण त्यामुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. ‘किप्पा’ घालून फिरले आणि हल्ला झाला तर सरकार जबाबदार नाही, अशा कडक शब्दात ही ‘विनंती’ आहे.

2. ऑस्ट्रीयन सरकारने ‘इस्लामिक लॉ’ नावाचा एक नवीन कायदा केला आहे. ऑस्ट्रीयामधे सहा टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. आजवर त्यांच्यासाठी 1912 सालापासून अस्तित्वात असलेला कायदा लागू होता. तो रद्द करून दि. 25 फेब्रुवारीपासून आता हा नवीन कायदा मुस्लीम धर्मीयांना लागू होणार आहे. 

त्यानुसार मशिदींसाठी किंवा इमामांसाठी यापुढे परदेशातून पैसा आणण्यावर सक्तीची बंदी आणली आहे. मुस्लीम समाजाने यावर प्रचंड विरोध दर्शविला आहे. त्यांचे म्हणणो आहे की, सर्व ािश्चन आणि ज्यू धर्मीयांना ‘फॉरेन फंडिंग’ म्हणजे परदेशी पैशाची मदत कायदेशीरपणो शक्य आहे; मग आमच्यासाठी हा भेदभाव का?

3. डेन्मार्कमधील एका सांस्कृतिक केंद्रात एक स्वीडनचे आर्टिस्ट, फ्रान्सचे अॅम्बॅसीडर अशी बडी बडी मंडळी एका परिचर्चेसाठी जमलेली होती. चर्चेचा विषय धार्मिक स्वातंत्र्य, कलास्वातंत्र्य आणि मतस्वातंत्र्य असा होता. त्यावेळी या सांस्कृतिक केंद्रावर भीषण दहशतवादी हल्ला झाला. 

4. ब्रेमेन या उत्तर जर्मनीतील शहरात पोलिसांनी एका सांस्कृतिक केंद्रावर छापा घालून काही लोकांना अटक केली आहे आणि अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. या सांस्कृतिक केंद्राला सशस्त्र जर्मन पोलिसांनी घट्ट वेढा घातला आहे.

5. मोसूल या इराकमधील शहरात एका वास्तुसंग्रहालयावर भीषण हल्ला झाला. प्राचीन असीरीयन संस्कृतीची अनेक प्राचीन शिल्पे आणि पुतळे या ठिकाणी जतन केलेले होते. सहाव्या आणि सातव्या शतकातील अनेक मौल्यवान शिल्पे हल्लेखोरांच्या हातोडय़ाखाली येऊन चक्काचूर झाली. 

- वरील सर्व घडामोडी फक्त गेल्या काही दिवसातल्या आहेत. सर्व घडामोडींचा संबंध ‘संस्कृती’ या शब्दाशी जाऊन पोहोचणारा आहे. लष्करी तळावरील हल्ले ही गोष्ट समजण्यासारखी आहे. ती इतकी वर्षे प्रत्येक युद्धात अनुभवाला येत होती; परंतु सांस्कृतिक केंद्रे, वस्तुसंग्रहालये, पेहेरावातल्या सांस्कृतिक खुणा यावर हल्ला करण्यासारखे काय आहे? - असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

गेली तीनेक शतके ‘संस्कृती’ या संकल्पनेचा जगभर एखाद्या अस्त्रसारखा उपयोग केला गेलेला आहे. विशेषत: पाश्चात्त्यांकडून. 

चार्लस् डार्वीनने मांडलेल्या उत्क्रांतीवादाचे बोट धरत धरत 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हरबर्ट स्पेन्सर या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने त्याची अजब निरीक्षणो हिरीरीने जगापुढे मांडायला सुरुवात केली. त्यांनी अठराव्या शतकातील सर्व संस्कृतींच्या आजवरच्या उत्क्रांतीचे किंवा प्रगतीचे आलेख मांडले. त्याने त्यासाठी तीन-चार निकष वापरले. ते निकष म्हणजे- एखाद्या संस्कृतीने केलेली आर्थिक प्रगती, तंत्रविज्ञानातील प्रगती, त्या संस्कृतीतील राजकारण प्रणालींची प्रगती आणि लष्करी सामथ्र्यातील प्रगती. 

अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील जग हे बहुतांशी ब्रिटिश आणि युरोपियन टाचांखाली चिरडलेले वसाहतवादी जग होते. जगातील इतर संस्कृतींना नामशेष करीत करीत या वर्चस्ववादी संस्कृतींनी जगभर आपले जाळे पसरवायला सुरुवात केलेली होती. त्यांच्या युरोपियन संस्कारांना जे जे काही म्हणून ‘परके’, ‘वेगळे’, ‘न कळणारे’ असे दिसले, वाटले ते सर्व ‘मागासलेले’ या सदरात जमा केले गेले. 

युरोप सोडून इतर सर्व जग वरील सर्व निकष वापरता ‘अगदीच अप्रगत किंवा उत्क्रांत न झालेले’ असे असल्यामुळे हर्बर्ट महाशयांनी त्यांचा स्वत:चा असा सांस्कृतिक उत्क्रांतीवाद मांडला. या थिअरीनुसार युरोपियन हा एकच वंश ‘जगायला लायक’ असा ठरवला गेला. ‘किल ऑर बी किल्ड’ म्हणजे ‘ठार मारा, नपेक्षा मारले जा’ हे युरोपियन संस्कृतीचे सूत्र ठरविले गेले. 

बिचा:या डार्विनने अनेक शास्त्रीय प्रयोगाअंती निष्कर्ष काढला होता - ‘सव्र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ - म्हणजे ज्या प्रजाती सबळ, सक्षम असतील, त्याच जगायला लायक ठरतील. जीवशास्त्रतील डार्विन यांच्या या प्रयोगांचे निष्कर्ष सरसकट सांस्कृतिक वंशशास्त्रला लावले जातील अशी बिचा:या डार्विन यांना कल्पनाही आली नसेल.

परंतु असे झाले खरे. ‘आमची संस्कृती श्रेष्ठ आहे’ हे सांगण्याचे आणि ते इतरांच्या मनावर ठसवण्याचे कार्य हे आज फार बेमालुमपणो करावे लागते. 

 आज जगावर आपला सांस्कृतिक वरचष्मा स्थापन करण्यासाठी वर्चस्ववादी राष्ट्रांना वेगळी आखणी करणो भाग पडत आहे. त्यासाठी प्रचंड पैसे गुंतवले जात आहेत. 

या आखणीतील पहिली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक संस्कृतीतील विद्रोही गटांना आपल्या पंखाखाली घेणो. त्यांच्यावर पुरस्कारांची खैरात करणो. त्यांचे जगभराचे दौरे स्पॉन्सर करणो. त्यायोगे समाजातले विद्रोही सूर सतत खदखदत ठेवणो. 

स्वत:च्या संस्कृतीशी असलेली त्यांची नाळ जितक्या लवकर तुटेल तितके चांगले. मांजा तुटलेला पतंग काहीकाळ अधांतरी दिशाहीन तरंगतो आणि मग तो एकतर कापणा:याच्या मुठीत येतो नाहीतर काटेरी झाडांवर पडून आपोआप फाटून जातो.

प्रत्येक संस्कृतीतील विद्रोही आणि फुटीरतावादी वृत्तींना एकीकडे खतपाणी घालायचे आणि त्याचवेळी दुसरीकडे ‘तुमची संस्कृती कशी मागासलेली’ असे बहुसंख्य मनांवर ठसवत राहायचे’ 

- हा पाश्चात्त्य वर्चस्ववादी विचारांचा अगदी जुना खेळ आहे. त्यामुळे इतर संस्कृतींचे खच्चीकरण तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांच्या स्वत:च्या संस्कृतीचा इगो किंवा आत्मभान सतत फुलारण्याचे काम होत राहते.

गोष्ट म्हटली तर जुनी, म्हटली तर अलीकडची आहे. 

काळ 192क् ते 1926. एका युरोपियन शहराच्या भिंतींवर असंख्य जाहिरातपत्रके चिकटवलेली असत. त्यावरचे शब्द होते- ‘इंडियन्स इन् द झू’. त्या शहराच्या प्राणिसंग्रहालयात गवताच्या झोपडय़ा उभारल्या होत्या. दक्षिण भारतातून आणलेले आदिवासी हे त्यातले जणू प्राणी. ते झाडांवर चढून दाखवत, पुंगी वाजवून सापाला डोलावून दाखवत. मधेच नृत्ये करत. युरोपियन ‘पुढारलेले’ आबालवृद्ध या प्राणिसंग्रहालयाला भेट देत. आणि या ‘मागासलेल्या’ भारतीय वंशाकडे तुच्छतेने आणि अचंब्याने पाहत. 

या युरोपियन राजधानीच्या शहरात शिकणा:या वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि ए.सी.एन. नंबीयार या बहाद्दर भारतीय विद्याथ्र्यानी तेथील प्रसारमाध्यमांमधे तडाखेबंद लिखाण करून 192क् पासून चाललेला हा प्रकार बंद पाडला. 

त्या उभयतानी लेखणी वापरली. इतरेजन बॉम्ब आणि बंदुका वापरतात. सांस्कृतिक नाळ तुटू न देण्याची पोटतिडीक तेवढी दोनही मार्गात सामायिक म्हणायची. 

म्हणून तर ठिकठिकाणच्या संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापणो हे  ‘सॉफ्टपॉवर’च्या भात्यातले आणखी एक महत्त्वपूर्ण अस्त्र मानले जाते.

 

महत्त्वाची अस्त्रे 

जसे नेशनचे ब्रॅँडिंग तसे संस्कृतींचेही ब्रॅँडिंग कटाक्षाने केले गेले आहे. अरब जगातील ज्ञानाला तुच्छ लेखले गेले. अरबी संस्कृतीला तुच्छ लेखले गेले. आफ्रिका, पूर्वेकडील संस्कृती, रेड इंडियन्सची संस्कृती, भारतीय संस्कृती - असे अगदी कोणीही या ‘सांस्कृतिक उत्क्रांतीवादातून’ सुटले नाही. युरोपियन संस्कृतीने ‘मागासलेले’ म्हणून भाळी मारून ठेवलेली मेख आज मात्र अनेक संस्कृतींना सहन होईनाशी झालेली आहे.  त्यामुळे आगामी काळात ‘सांस्कृतिक केंद्रे’, ‘संस्कृती प्रचार करणा:या संस्था’, ‘आंतरसांस्कृतिक देवाण-घेवाण केंद्रे’ ही सॉफ्ट पॉवरच्या अस्त्रगारातील सर्वात महत्त्वाची अस्त्रे असणार आहेत.

वैशाली करमरकर

 


गारूड्याचा खेळ

दंडुकेशाहीची हार्ड पॉवर आणि लोकांच्या मनातील आकर्षणाची सॉफ्ट पॉवर यांचं कॉकटेल काहीही करून लोकांना प्यायला लावणारी वसाहतवादी ‘अण्वस्त्रांची’ अरेरावी.

आपल्या लोभस रूपात विश्‍वभरातल्या मानवी मनाला स्वत:कडे आकर्षित करते ती सॉफ्ट पॉवर. महागड्या खाद्यपेयांचे, विशिष्ट जीवनशैलीचे आकर्षण इत्यादी बाबी म्हणजे या सॉफ्ट पॉवरच्या खेळातल्या चिल्लर गोष्टी. जणू गल्लीबोळात रंगलेला विटीदांडूचा खेळ. सॉफ्ट पॉवरच्या  खेळाचा खरा सामना रंगतो तो आंतरराष्ट्रीय राजकारणात.

सर्व जग म्हणजे एक गाव मानलं तर या गावातही कोणी पुढारी असतात, कोणी श्रीमंत असतात, कोणी मध्यमवर्गीय, तर कोणी मागासवर्गीय. प्रत्येकाला आपल्या इज्जतीची आणि इभ्रतीची काळजी असते. गावात आपली प्रतिमा शक्यतो चांगली राहील याची धडपड करावी लागते. श्रीमंतांना त्यांच्या शिवारात काम करायला मजूर हवे असतात. मध्यमवर्गीयांना केरवारे-स्वयंपाक इ. कामाला मजूर हवे असतात. शिवाय शेजार-पाजारही नीट बांधायचा असतो. एक संकटकाळची तरतूद म्हणून हे आवश्यक असते. ग्लोबल व्हिलेजमधल्या मागासवर्गीय देशांना तर त्यांच्या रोजच्या भाकरतुकड्यांसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कर्जपुरवठा हवा असतो. थोडक्यात आपल्या राष्ट्राकडे आणि संस्कृतीकडे जगातल्या सगळ्यांनी मान उंचावून बघणे हे अत्यंत फायदेशीर असते. त्यात मुत्सद्देगिरी असते. कारण इथे स्वत:बद्दल नुसते आकर्षण निर्माण करून सॉफ्ट पॉवरची गोष्ट थांबत नाही, तर या आकर्षणाचा उपयोग करून स्वत:चे ईप्सित आणि स्वत:चा स्वार्थ बेमालूमपणे साधायचा असतो.

एकोणिसाव्या शतकातील युरोपीयन वसाहतवादी राष्ट्रांच्या लक्षात ही गोष्ट सर्वप्रथम आली. यात अग्रक्रम इंग्रज आणि फ्रेंच लोकांना द्यावा लागेल. इ.स. १८३५ सालचे लॉर्ड मेकॉले यांचे ब्रिटिश पार्लमेंटमधले भाषण सर्वांना माहितीच आहे. ते जे म्हणाले त्याचा सारांश असा, ‘‘भारतीयांची संस्कृती आपल्यापेक्षा फारच उच्च आहे. त्यांच्यावर अधिसत्ता गाजवायची असेल तर प्रथम भारतीय भाषा आणि भारतीय संस्कृती दस्तूरखुद्द भारतीयांना हिणकस वाटेल अशी तजवीज केली पाहिजे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी संस्कृती याकडे त्यांनी कायम आशाळभूत आणि लोलूप नजरेने पाहिले पाहिजे, तरच आपण या खंडप्राय देशाला आपल्या टाचेखाली आणू शकू.’’ लॉर्ड मेकॉलेचे शब्द तंतोतंत खरे झाले. बाळगुटीतल्या अफूच्या वळशाने बेमालूम काम केले. अलेक्झांडर द ग्रेटपासून ते तुर्की-मोगल वंशांची भारतावरील आक्रमणे सशस्त्र होती. घोडदळे, पायदळे, तोफा, सैनिकांच्या लाटा अशी. या अशा शस्त्रसज्ज आक्रमणांना नाव पडले हार्ड पॉवर. लष्करी सार्मथ्य म्हणजे हार्ड पॉवर. कारण ती दिसते. मोजता येते. त्याचा गडगडाट जगभर ऐकायला येतो. त्यात स्वत:च्या विनाशाची भीती असते. त्यामुळे या दुनियेच्या गावगाड्यात दहशतीचे वातावरण तयार होते.

फ्रेंच साम्राज्यानेदेखील हा सॉफ्ट पॉवरचा महिमा फार पूर्वीपासून ओळखला. प्रथम एखाद्या समूहाची भाषा आणि संस्कृती नष्ट करायची. त्यायोगे जेत्याच्या संस्कृतीबद्दल आकर्षण निर्माण करायचे. जिंकलेल्या समूहाने आपले सर्वतोपरी आणि हिरिरीने अंधानुकरण करावे याची पूर्ण तजवीज करायची अशी ही चाणाक्ष आखणी. फ्रेंचांनी १८८३ सालापासून फ्रेंच भाषेच्या आणि फ्रेंच संस्कृतीच्या प्रसारासाठी जगभर हे जाळे पसरवायला सुरुवात केली. आजही चीनसह इतर अनेक बलाढय़ देश आपल्या वार्षिक अंदाजपत्रकातील ५ ते ८ टक्के इतकी भक्कम तरतूद जगात आपापल्या भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी वापरतात. भाषा आणि संस्कृतीप्रसार हे ‘सॉफ्ट पॉवर’ या म्यानातले एक महत्त्वाचे अस्र आहे. आणि तीही लष्करावरील खर्चासारखीच मोठी खर्चिक बाब आहे.

नुसती खर्चिक नव्हे तर ती सतत मोजत राहणे हेही जिकिरीचे काम आहे. एखाद्या रुग्णाचा तासातासाने ताप मोजावा तसे ‘‘जगात माझ्या देशाची प्रतिमा इतरांना पुरेशी आकर्षित करते आहे की नाही’’ याचे मोजमाप मुत्सद्दी राष्ट्रे सतत करत असतात. त्यासाठी वारंवार जगभर सर्वेक्षणे होतात. त्यावरही अफाट खर्च केला जातो.

अमेरिकेचे उदाहरण घ्या. दुसर्‍या महायुद्धानंतर सर्व जग दोन गटात विभागले गेले. एकीकडे सोव्हिएट युनियनप्रणीत कम्युनिस्ट जग, तर दुसर्‍या गटात लोकशाहीप्रणीत अमेरिकेचे जग त्यांच्यामधे होता प्रचंड अभेद्द असा पोलादी पडदा. पण तो भेदून चोरून-मारून कम्युनिस्ट जग अमेरिकन संगीत ऐकत राहिले, अमेरिकन चित्रपट पहात राहिले. त्यातील स्वातंत्र्याच्या कल्पनांवर मोहित होत राहिले. अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा डोळ्यापुढे धरून टीयानमेन चौकात जमलेल्या २000 तरुण चिनी विद्यार्थ्यांचे रक्त त्यासाठी सांडले. तेथील सरकारे काहीही म्हणत असली तरी कम्युनिस्ट जगातले लोकमानस विलक्षण ओढीने अमेरिकेतल्या टोकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कांचनमृगापाठी धावत राहिले. अमेरिकन संस्कृतीच्या नेमक्या प्रसिद्धीतंत्राचा हा मोठा विजय होता. १९९१ साली झालेली गल्फवॉर सर्व जगाने आपापल्या गुबगुबीत सोफ्यावर शांतपणे बसून पाहिली. अमेरिकेची प्रतिमा अधिक उंचावर गेली. २00३साली त्याच गुर्मीत अमेरिकेने हार्ड पॉवर वापरून इराकवर हल्ला चढवला. यूनोच्या दुसर्‍या ठरावाची त्याने वाटही पाहिली नाही. सर्व जगाचे जनमत आपल्याच बाजूचे आहे असा फाजील आत्मविश्‍वास नडला. सॉफ्ट पॉवर मोजण्याच्या निर्देशांकात अमेरिकेचे स्थान प्रचंड ढासळले. थोडक्यात जगातील लोक पूर्वीसारख्या हपापल्या नजरेने अमेरिकेकडे पाहिनाशी झाली. अमेरिकेची प्रतिमा डागाळली गेली.

अमेरिकन सरकारचे सल्लागार जोजेफने यांनी अमेरिकन सरकारला खडबडून जाग आणण्यासाठी ‘सॉफ्ट पॉवर’ हा शब्द प्रथम वापरला, रूढ केला. लष्करी सार्मथ्याच्या इतकीच ‘सॉफ्ट पॉवर’ या अस्त्रासाठी अमेरिकन सरकारने खर्चाची आणि मनुष्यबळाची तजवीज करण्याची वेळ आली आहे, हे अमेरिकन सरकारला बजावले.

एकोणिसाव्या शतकापासून युरोपियन वसाहतवाद्यांनी वापरलेले हे अस्र किती प्रभावी आहे त्याची मांडणी करून दाखवली. इंटरनेटमुळे ‘युद्ध’ या संकल्पनेचेही जणू खासगीकरण झाले आहे. फक्त दंडुकेशाहीने आणि आण्विक अस्त्रांनी जग जिंकू पाहणे आज केवळ अशक्य आहे. म्हणून आगामी काळात हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर याचे आकर्षक कॉकटेल साधणे यातच राष्ट्रांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे असे जोजेफने यांचे सततचे प्रतिपादन आहे.

कसे असते हे कॉकटेल? त्यासाठी लेखातील कल्पनाचित्र पुरेसे बोलके आहे. पार्श्‍वभूमीला वाळवंटातली युद्धभूमी आहे. तहानलेल्या बालकासाठी या सैनिकाच्या हातात पाण्याची नव्हे तर कोलासदृश पेयाची बाटली आहे. सैनिकाकडे नखशिखान्त शस्त्रबळ आहे. त्यामुळे हे बालक पेयाकडे आकर्षित झाले असले तरी त्याची देहबोली दबलेली आहे. पेय पिण्यातले त्याचे ते हपापलेपण नजेरतून सुटत नाही. अगदी लहान वयापासून जेत्याबद्दल ‘गुड-विल’ म्हणजे लोकप्रियता मिळवते ती सॉफ्ट पॉवर. याच पोराने मोठे झाल्यावर अरेरावी करायला सुरुवात केली तर उगारलेली एके ४७ म्हणजे हार्ड पॉवर!


‘आशाळभूत आणि लोलूप’

 

एखाद्या समूहाची भाषा आणि संस्कृती अगोदर नष्ट करायची, आपल्याच संस्कृती आणि भाषेबद्दल त्यांच्या मनात हिणकस भावना तयार होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना जेत्यांच्या संस्कृतीबद्दल लोकांच्या मनात आकर्षण निर्माण करायचे. त्या लोकांनी सतत आपल्याकडे आशाळभूत आणि लोलूप नजरेनेच पाहावे यासाठी असतील, नसतील ते सारे मार्ग अवलंबायचे! - सॉफ्ट पॉवरची ही शक्ती सर्वात प्रथम ओळखली ती फ्रेंचांनी.

जगभरातले बलाढय़ देश या अस्राचा वापर करताना कोट्यवधी डॉलर ओततात. त्यांच्यासाठी ती लष्करी खर्चाइतकीच अत्यावश्यक बाब आहे!

 

  आपली मातृभाषा ‘गावंढळ’ कशी?

 

सॉफ्ट पॉवर ही साळसूद असते. ती भीतीवर चालत नाही तर आकर्षणावर चालते. ती हवेसारखी असते. सर्वत्र असते, पण चिमटीत पकडून दाखवता येत नाही. लष्करी सामार्थ्य वापरताना त्याला काळाची चौकट असते. ती वर्षात, महिन्यात मोजता येते. अमुक एक युद्ध किती वर्षे चालले हे सर्वांना ठाऊक होऊ शकते. सॉफ्ट पॉवर हे अस्र मात्र अनेक शतके सातत्याने वापरावे लागते, तेव्हा कुठे त्याचे इष्ट परिणाम दिसायला लागतात. आज आपण भारतीय एकमुखाने संस्कृतला मृत भाषा ठरवतो. इंग्रजी मडमेला दिवाणखाण्यात न बसवता पार अंतर्गृहात प्रवेश देतो. मराठी किंवा इतर भारतीय मातृभाषांमध्ये बोलले तर ‘मला गावंढळ म्हणतील’ असे समजतो, प्राचीन भारतात कुठलीही ज्ञान परंपरा नव्हती यावर आपल्या सर्वांचा ठाम विश्‍वास आहे. थोडक्यात ‘हिंदू पंडितांची बाष्कळ बडबड’ असे मेकॉले आणि जेम्स मिल या द्वयींनी उगाळून चाखलेले शब्द आपणच आपल्याबाबतीत उच्चारत आहोत.


 वैशाली करमरकर

ब्लेम-शेम-गेम

ब्लेम(आरोप), शेम(सांस्कृतिक शरमिंदेपणा)चा ‘गेम’ हा वर्चस्वादी राष्ट्रांच्या पब्लिक डिप्लोमसीचा एक अनिवार्य भाग आहे. लष्करावरील खर्चासारखाच या ‘ब्लेम-शेम’ मोहिमांवर या देशांकडून प्रचंड पैसा ओतला जातो. 

आठ मार्च आला आणि गेला. जगभर हा दिवस ‘स्त्री-सन्मान-दिवस म्हणून साजरा होतो. कधीपासून सुरू झाली ही परंपरा?

१९0९ साली सर्वप्रथम अमेरिकेतील समाजवादी पार्टीने असा स्त्री-सन्मानदिन जाहीर केला. पाठोपाठ १९१0 साली डेन्मार्कमधे भरलेल्या स्त्री मेळाव्यात क्लारा झेटकिन, लुईस झीत्स अशा कडव्या कम्युनिस्ट स्त्री नेत्यांनी स्त्रियांना सन्मानाने वागविण्याची मागणी करण्यासाठी अशा आंतरराष्ट्रीय दिवसाची नितांत गरज असल्याची भूमिका मांडली. विशेषत: रशियातील बोल्शेव्हिक चळवळीने रशियन स्त्रीच्या कणखरपणाचा उदो उदो करण्यासाठी या दिवसाचा उपयोग करून घेतला. या भानगडीत आठ मार्च या दिवसाला आलेला कम्युनिस्ट आणि बोल्शेव्हिग रंग लोकशाहीच्या प्रणेत्या युरोपला न आवडल्यामुळे त्यांनी १८५७ साली फ्रान्समधे झालेल्या स्त्री-कापडगिरणी कामगारांच्या आंदोलनाचा हवाला देत-देत या स्त्री सन्मान दिनावर ‘आंतरराष्ट्रीय’ या शब्दाची तातडीची मोहोर उठवण्याची तसदी घेतली.

थोडक्यात ८ मार्च या स्त्री-सन्मान-दिनाला ठसठशीत अशी राजकीय आणि सांस्कृतिक किनार आहे. २0१५ सालातल्या स्त्री सन्मान दिनाचे औचित्य आपल्याकडे विशेष गाजले. बी.बी.सी. या ब्रिटिश सरकारच्या अधिकृत वृत्तवाहिनीने ‘इंडियाज डॉटर्स’ नावाचा माहितीपट बनवून घेतला आणि तो जगभर प्रसारित केला. माहितीपटाचा विषय आहे ‘निर्भया’ आणि तिचे अधम गुन्हेगार. लेस्ली उडवीन या एकेकाळच्या सिनेअभिनेत्रीने आणि निर्मातीने हा माहितीपट बनवला आहे. या उडवीनबाई सध्या अठ्ठावन्न वर्षांच्या आहेत. त्यांच्या स्वत:च्या देशात म्हणजे ब्रिटनमधे त्या सतरा वर्षांच्या असताना त्यांच्यावर बलात्कार झालेला होता. रॉयटरला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात की पार तेव्हापासून त्यांना एका प्रश्नाने भंडावून सोडले होते. तो प्रश्न म्हणजे- ‘पुरुषजात बलात्कार का करते?’ 

- या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात त्यांनी थेट भारत गाठला. भारत हे एकतर ब्रिटिशांचे (एकेकाळचे) गुलाम राष्ट्र; त्यांना इथे कोण अडवणार? शिवाय माओ-त्से-तुंग यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक भारतीय हा विकावू. आधीच्या यू.पी.ए. सरकार या मायबापाने उडवीनबाईंना थेट तिहार जेलमध्ये प्रवेश दिला. लेस्ली उडवीन यांना त्यांच्या देशात गोर्‍या देशबांधवाने केलेल्या बलात्काराचे उत्तर हे मुकेश सिंग या ‘निर्भया’च्या केसमधल्या बलात्कार्‍याच्या मुलाखतीमुळे मिळाले. म्हणजे बघा! या माहितीपटामुळे भारतात खूप गदारोळ माजला.  त्यातील भावनिक उद्रेक हा या लेखाचा विषय नाही. कोण बरोबर? कोण चूक? हाही येथे मुद्दा नाही. तर प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याकडील आर्थिक बळ हे ‘सॉफ्ट पॉवर’ या शस्त्रागारातले किती महत्त्वाचे अस्त्र आहे, हा आपला विषय आहे. या लेखमालेच्या सुरुवातीला आपण बाळगुटीचे रुपक वापरले होते, आठवते? ‘सॉफ्ट पॉवर’ ही बाळगुटीतल्या अफूच्या वळशासारखी असते. ती मधातून चाटवली जाते. म्हणून ती नकळत मिटक्या मारत चाटली जाते. पण त्यातला अफूचा वळसा बरोब्बर काम करतो. ओला झालेला लंगोट बदलण्याची मागणी करायचाही तो विसर पाडतो. ‘इंडियाज डॉटर्स’ या माहितीपटातला मध आणि अफू वेगवेगळी करून यावर्षीच्या ८ मार्चकडे पाहिले, तर काय दिसते? हा संपूर्ण माहितीपट एकांगी नाही. बलात्काराच्या कृतीशी संबंधित भयंकर वृत्तीवर शक्य तितक्या बाजूने प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यात केला आहे.  झोपडपट्टीतले जीवन, तिथे राहतात त्या सर्वांनाच हातातोंडाशी गाठ घालताना करावी लागणारी धडपड, स्त्रियांवरील हिंसा बघत बघत मोठे झालेले बालपण असे सारे यात दिसते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपण आणि आपला समाज असे किती हिंस्त्र पुरुष आपल्या आवारात पाळत आहोत? असे विषण्णपणे मनात येते. एक मुलगा जन्माला घातलेल्या प्रत्येक भारतीय आईच्या शिरावर आज केवळ मोठी जबाबदारी आहे, याची भीषण जाणीव होते. माहितीपटात निर्भयाच्या आई-वडिलांच्या मनोगतालाही पुरेसा वाव दिलेला आहे. मुलींना पंख देऊन उडण्याचे बळ देऊ पाहणारेही अनेक आईवडील आहेत आणि ते भारतातही असतात; ही गोष्ट त्यामुळे अधोरेखित झालेली आहे. आत्मचिंतनासाठी प्रत्येक भारतीयाने हा माहितीपट जरूर बघितला पाहिजे असे म्हटल्यावाचून राहवत नाही. 

..आणि आता त्यातला अफूचा वळसा.

भावनिक उद्रेकाच्या नशेत काही साधे प्रश्न विचारणे हे यासंदर्भात महत्त्वाचे आहे :

१) पुरुष जात बलात्कार का करते?’ या प्रश्नाचे उत्तर ‘इंडियाज डॉटर्स’ कसे असू शकते? मुकेश सिंग या बलात्कार्‍याची विधाने ही साठ कोटी भारतीय पुरुष मानसिकतेचे आंधळे सार्वत्रिकीकरण कसे काय करू शकतात?

२) निर्भयाचे खरे नाव आणि ओळख उघड न करण्याचे सौजन्य भारताने दाखविले होते. तो हक्क एका परदेशी वृत्तवाहिनीने कसा काय ओरबाडून घेतला? त्याचवेळी १७ वर्षे ६ महिने वयाच्या बलात्कारी ‘बाल’ गुन्हेगाराचे नाव मात्र गुलदस्त्यात का ठेवले? ‘निर्भया’च्या बाबतीतले हे मरणोत्तर ‘विच्छेदन’ तिच्या संमतीविना चव्हाट्यावर आणणे ही तिची मानखंडना नव्हे काय?

३) गुन्हेगारांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्याआधी म्हणजे कोर्टाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना हा तथाकथित ‘सामाजिक प्रश्नांचा अभ्यास’ कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसतो?

‘सॉफ्ट पॉवर’च्या युद्धखेळी या अशाच असतात. एखाद्या लोकसमूहाच्या मनावर सततचे सांस्कृतिक शरमिंदेपण लादत राहणे, त्याच अचूक नेमबाजी करणे आणि त्यायोगे उडणार्‍या आरोपांच्या गदारोळात हे समूह आत्मभानापासून सतत वंचित ठेवणे हा या युद्धखेळीचा भाग असतो.

झालेही तसेच! भारताची ब्रॅँड इमेज पुन्हा एकदा नकारात्मक वतरुळात सापडली. ‘बलात्कार्‍यांचा देश’ ही मोहोर कायम झाली. लाइफत्झींग विद्यापीठातील एका प्रोफेसर बाईंनी भारतीय (पुरुष) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याच्या बातम्या आल्या. गार्डीयन या वृत्तपत्राने भारतीयांच्या अज्ञानाची कीव केली. ‘इंडियाज  डॉटर्स’ ची सुटका करण्यासाठी ग्लोबल मिशन उभे राहिले. संयुक्त महासंघाच्या सेक्रेटरी जनरलने रॉयटरशी बोलताना भारतातील माध्यमस्वातंत्र्याच्या गळचेपीवर कडक भाष्य केले. ब्लेम (आरोप) शेम (सांस्कृतिक शरमिंदेपण) चा हा गेम हा वर्चस्वादी राष्ट्रांच्या पब्लिक डिप्लोमसीचा एक अनिवार्य भाग आहे. लष्करावरील खर्चासारखा या ‘ब्लेम-शेम’ मोहिमांवर या देशांकडून प्रचंड पैसा ओतला जातो.

क्षणभर एक कल्पना करून पाहा.. भारताची सरकारी वृत्तवाहिनी म्हणजे दूरदर्शन! त्यांनी एका व्यावसायिक सिनेनिर्मात्याला हाताशी धरायचे. गेल्या वर्षी वांशिक विद्वेषातून पुण्यातल्या बीडकर या आडनावाच्या एका उमद्या विद्यार्थ्याची मँचेस्टरमधे हत्त्या झाली, आठवते आहे का? या हत्त्येच्या पार्श्‍वभूमीवर ‘‘गोर्‍या लोकांच्या मनात हा वांशिक विद्वेष कुठून येतो?’ अशा स्वरूपाच्या सामाजिक प्रश्नांच्या ‘अभ्यासासाठी’ बीडकरच्या मारेकर्‍याची तुरुंगात भेट घ्यायची. एक माहितीपट बनवायचा आणि तो जगभर दाखवायचा. ऑस्ट्रीयात एका वडिलांनी आपल्या पोटच्या पोरींना ३0 वर्षे तळघरात डांबून ठेवून त्यांच्यावर निर्घृण बलात्कार केले. तिथे जाऊन ‘वडील’ या जमातीला हे असे का करावेसे वाटते? या प्रश्नासाठी असा माहितीपट बनवायचा आणि ‘ऑस्ट्रीयन’ कल्चर’ म्हणून तो जगभर दाखवायचा.

- हे काहीतरी भलते सुचवल्यासारखे वाटते ना? इतकी हीन पातळी आपण गाठू शकत नाही असे वाटते ना? खरेच आहे ते! हा थर आपण गाठायची जरूर नाही, पण देश-विदेशांच्या वृत्तपत्रांतून, ई-माध्यमांतून भारताबाबत जो सदैव ‘ब्लेम-शेम’ चा गेम चालू असतो त्यावर वैचारिक उत्तरे देण्यास त्या-त्या देशातील भारतीय दूतावासात एकेक पद मात्र आपण नक्की तयार करू शकतो. तेथे त्या-त्या भाषांतील भारतीय भाषाप्रभू नेमू शकतो. बुद्धिवादाने प्रतिवाद करु शकतो. भारताची ब्रँड इमेज जपू शकतो.

या शस्त्राचे ‘सॉफ्ट पॉवर’ आहे आणि ते अहिंसक आहे.


वैशाली करमरकर

एक अदृष्य हात

कोका कोला ची गोष्ट ही एक प्रातिनिधिक गोष्ट आहे. समूहांना त्यांच्याही नकळत हवे तसे वळवता येते हा मूळ मुद्दा. त्याचा सुगावा अठराव्या शतकातील अर्थतज्ज्ञ अँडम स्मिथ यांना सगळ्यात प्रथम लागला. आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेचे ते जनक आणि उद्गाते समजले जातात. त्यांच्या काळात औद्योगिक क्रांतीची सुरुवातीची फळे बाजारात दिसायला लागलेली होती. हाताने वस्तू बनवण्याचा काळ युरोपात मागे पडत होता. अवजड यंत्रे घाऊक प्रमाणात उत्पादने बनवू लागली होती. युरोपात प्रथमच मध्यमवर्ग उदयाला येत होता. ही घाऊक उत्पादने मुलाला नवे खेळणे मिळावे तशा उत्साहाने हाताळू पहात होता. पूर्वी हा मक्ता फक्त युरोपातल्या उमराववर्गाचा होता. साहजिकच ‘बाजारपेठ’, या शब्दाला आणि त्यातले चढउतार यांना प्रथमच महत्त्व येऊ लागले होते. ‘बाजारपेठ’ म्हणजे मार्केट ही शक्ती बर्‍याच गोष्टी ठरवू शकते, बिघडवू शकते याची कुणकुण अर्थतज्ज्ञांना लागली. ग्राहक एखादी गोष्ट का खरेदी करतो? किंवा का खरेदी करत नाही? या मागे एक शास्त्र असले पाहिजे. ते एकदा समजले की बाजारपेठ आपल्या काबूत ठेवणे सहज शक्य आहे. शेवटी बाजारपेठ म्हणजे पैशाची खुळखुळ, आर्थिक सत्ता, इकॉनॉमिक पॉवर. अँडम स्मिथ यांनी याला बाजारपेठेतला ‘अदृश्य हात’ असे म्हणून ठेवले आहे.

आता समूहांना आकर्षित करणे हे एक शास्त्र आहे म्हणताना मग पाश्‍चात्त्य जगात समूहांचा काटेकोर आणि शास्त्रीय अभ्यास सुरू झाला. या प्रयोगशाळेतले उंदीर कोण? तर तुम्ही, आम्ही सर्व ग्राहक. एखाद्या सूक्ष्मदर्शकाखाली पेशींचे निरीक्षण केले जाते तशी तुमच्या आमच्या डोळ्यांच्या हालचालींपासून ते हृदयाच्या ठोक्यापर्यंतची मोजमापं होऊ लागली. मग खूप मजेमजेदार गोष्टी लक्षात येऊ लागल्या.

उदाहरणार्थ सर्व मानवजातींमध्ये ९५ टक्के माणसे चालताना किंवा काही शोधताना ‘लेफ्ट ओरिएंटेड’ म्हणजे डावीकडून सुरुवात करणारी असतात. हे कसे कळले शास्त्रज्ञांना? तर त्यासाठी सातत्याने एक प्रयोग केला गेला. विविध वयाच्या, वंशांच्या लोकांना वाळवंटात नेलं. जरा दूरवर एक राहुटी दाखवली आणि मग त्यांचे डोळे बांधले. आंधळ्या कोशिंबिरीसारखं त्यांना उगाच इकडे तिकडे वेगवेगळ्या दिशांना फिरवलं आणि मग दिलं सोडून. प्रत्येकाने राहुटीकडे येण्याचा प्रयत्न सुरू केला. ९५ टक्के लोक डावीकडून सुरुवात करताना दिसले. 

दुसरे निरीक्षण माणूस जात मुळात आळशी. नवीन जन्मलेल्या तान्हुल्याला पहिल्या ‘ट्यँहँ’बरोबर दुधाची बाटली दिली तर ते स्तनपान करत नाही. कारण त्यात कष्ट असतात.  घामाघूम होणे असते. बाटली चोखण्यात आयतेपणा असतो. ही वृत्ती ग्राहकराजातही दिसते. सुपरमार्केटमध्ये खाली ओणवून वस्तू घ्यावी लागणे किंवा टाचा उंचावून एखादी वस्तू घ्यावी लागणे यात भारी कष्ट. त्यामुळे सुपरमार्केटमधील रॅक्सवर नजरेच्या टप्प्याच्या लेव्हलवर सगळ्यात महागडी साबणाची वडी असते. 

परदेशातील सुपरमार्केटमध्ये तर हे तंत्र अतिविकसित स्वरूपात वापरले जाते. ते त्यांना वापरावे लागते कारण तेथे सर्वांची पोटे तुडुंब भरलेली आणि समोर साध्या दुधाचे छप्पन प्रकार. मग माझ्याच कंपनीचे दूध खपायला हवे असेल तर समूहाच्या मनोवृत्तीचे शास्त्रीय भान ठेवणे खूप महत्त्वाचे. 

या अभ्यासात ‘क्राउड मॉडेलिंग सॉफ्टवेअर’ हा प्रकार ग्राहकांची वागणुकीची पद्धत टिपतो, बुबळांच्या हालचाली स्कॅन करतो, हृदयाचे ठोके नोंदवितो. या डेटातून ठरते सुपरमार्केटची रचना ( आकृती पाहा)

आपली मूळची बेताची शॉपिंग लिस्ट मारुतीच्या शेपटासारखी का वाढते? त्यामागची काही शास्त्रीय निरीक्षणे पुरेशी बोलकी आहेत. शॉपिंग मॉलमधल्या ढकलगाडीचा आकार दुपटीने वाढवल्यास ग्राहक १९ टक्केनी जास्त खरेदी करतात. आपल्या हृदयाच्या ठोक्यांच्या वेगापेक्षा कमी वेगाच्या ठोक्यांचे संगीत पार्श्‍वभूमीवर असले तर ग्राहक २९ टक्केंनी जास्त खरेदी करतात. महागड्यातली महाग वस्तू ढिगाने ठेवली की मेंदू सांगतो, ‘ती स्वस्त आहे.’ किमतीचे लेबल न पाहता आणि तुलना न करता एखाद्या झोपेत चालणार्‍या ‘झोंबी’सारखे किंवा चलप्रेतासारखे ग्राहक त्या ढिगातली एक वस्तू ढकलगाडीत टाकतो. असंख्य वस्तूंच्या किमतीतून ग्राहकाच्या लक्षात फक्त चार वस्तूंच्या किमतीच राहातात. परदेशात या वस्तू आहेत. दूध-ब्रेड-केळी-अंडी. आपल्याकडे म्हणता येईल कांदे-बटाटे-डाळ-तांदूळ.  थेंबाथेंबाने पण सातत्याने किमती वाढवत राहिल्यास ग्राहकाच्या ते लक्षातही येत नाही.

म्हणजे पुन्हा एकदा गोष्ट येते त्या बाळगुटीतल्या अफूच्या वळशाकडे. आपला कॉमनसेन्स बाजूला आणि अडगळीत टाकू शकणार्‍या सॉफ्टपॉवरच्या सार्मथ्याकडे.

‘भारतीय स्त्रिया अत्यंत सौंदर्यवती असतात’ ही गोष्ट पाश्‍चात्त्य विश्‍वात एकोणिसाव्या शतकापासून जगजाहीर झालेली होती. निमित्त होते फॉस्टर यांचे शाकुंतलाचे भाषांतर. १९९७ सालापासून विश्‍वसुंदरी स्पर्धेत अचानक दोन-चार भारतीय स्त्रिया कशा काय बुवा निवडल्या गेल्या? त्या जगाच्या दृष्टीने अचानक सुंदर कशा झाल्या? आणि आता हे सर्व कसे काय थांबले, हा प्रश्न आपण विचारत नाही. उत्तरे ब्यूटिपार्लरमध्ये मिळतात. सोळा-सतरा वर्षांचे युवक-युवती अहमहिकेने केसाला रंग लावताना दिसतात. क्रीम्स, शाम्पू, रंग या रसायनांनी भारतीय बाजारपेठेने १९९७ सालापासून पूरसदृश परिस्थिती आणली. खेड्यापाड्यात रेशनच्या धान्याची पोती अर्धीमुर्धी असली तरी शाम्पूच्या सॅशे चमकदारपणे खेडूतांचे डोळे दिपवताना दिसतात. बार, पब, तरुणाईसाठी ब्रॅण्डेड कपडे या दुकानांमध्ये जलद ठेक्याचे काहीसे कानठळ्या बसवणारे संगीत सतत वाजत असते.  फास्ट बीटचे संगीत माणसाच्या मनातली अँक्झायटी - म्हणजे असुरक्षितता किंवा अस्थिरता - झपाट्याने वाढवते. या अवस्थेत वीस ते चाळीस या वयोगटातला माणूस जास्त पितो. वाघ मागे लागल्यासारखा खातो. झापटल्यासारखा शॉपिंग करतो.माणसांचा समूह जितका अस्थिर होईल आणि त्याला सातत्याने जितके असुरक्षित वाटेल तितके या समूहाला काबूत ठेवणे सहज शक्य होते. हे पुरातन सत्य प्रत्येक धर्माने ओळखले. पुढे वसाहतवादी आणि वर्चस्ववादी संस्कृतींनी ओळखले. राजकीय मुत्सद्यांनी ओळखले. माध्यमांनी ओळखले. मग ‘बाजारपेठ’ या शक्तीने काय हो घोडे मारले? त्यांनी का मागे रहावे?

सकाळी उजाडत पेपरावर नजर टाकली की तुमचा मूड निराशावादी होतो? की तुम्ही उत्साहाने कामाला जाता? टीव्हीवर रात्रीच्या न्यूज पाहून उशीकडचा दिवा मालवताना चेहेर्‍यावर स्मितहास्य असते की आठय़ा?

- बाजारपेठेतला ‘अदृश्य हात’ हे सारे ठरवत असतो.

आपल्या व्यक्तीगत जीवनाला वेढून असलेल्या ‘सॉफ्टपॉवर’च्या खेळाचा हा एक पैलू!

 

 ग्राहक आत येताच त्याने सहजउर्मीने डावीकडे वळू नये म्हणून मॉलच्या डाव्या बाजूला १ ते ५ असे दाटीवाटीने कॅश काउण्टर्स दिसतील. ही जणू खिंड. तिथून परतीचा मार्ग जवळ जवळ बंदच म्हणा. पण तसे ग्राहकाला वाटू नये म्हणून कॅश काउण्टरच्या खिंडीत प्रीमियम ब्रॅण्ड्सची महागडी चॉकोलेट्स दिसतील.

 

डाव्या बाजूने जाण्याची उर्मी सकारात्मक वापरायला हवी ना? मग तिचे स्वागत करणारा (!) लिहिलेला इन्फर्मेशन काउण्टर. जराउजवीकडे हाच स्वागताचा, हलकाफुलका फील कायम राहाण्यास ताज्या फुलांचे दुकान, मासिके, सिगारेट्स. भूकभीक चाळवली? मग आधी सॅण्डवीच, कॉफी घ्या आणि मग उघडा तुमची शॉपिंग लिस्ट.

 

 माणसाला जगायला म्हणून जे काही लागते - आपल्या देशाच्या परसदारी पिकवलेल्या भाज्या, फळे, धान्यधुन्य एकदम मागे कोपर्‍यात. दाटीवाटीने. भिंतीला चिकटून तेथवर पोहोचण्यासाठी तुम्हाला बरेच चालायला लागणे महत्त्वाचे. कारण तुम्ही जास्तीत जास्त वेळ मॉलमध्ये रेंगाळले पाहिजे. म्हणजे तुमची शिकार करणे सोपे जाते.

 

 तिथून पुढे गेलात की ओळीने प्रशस्त अशी दालने. सुखावणारी प्रकाशयोजना. सांद्रमंद संगीत. या दालनातील एकही वस्तू ‘जीवनावश्यक’ या सदरात येणारी नाही हे लक्षात आले ना? न्यूझीलंडचे ‘कीवी’, ऑस्ट्रेलियातले ‘दही’, कॅलिफोर्नियाची सफरचंदे, फक्त ब्रॅण्डेड वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स.

 

 वैशाली करमरकर

(लेखिका आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ असून, ग्योथे इन्स्टिट्यूट मार्क्‍स म्यूलर भवन येथे विपणन प्रमुख (कॉर्पोरेट ट्रेनिंग) म्हणून कार्यरत आहेत)

टीव्ही, मोबाईल स्क्रीन आणि व्यसन

मुलांमध्ये असणारी मोबाइल, इंटरनेट, गेम्सची वाढती क्रेझ पालकांना धडकी भरवणारी असते. या सगळ्याचा अतिरिक्त वापर मुलांना या गोष्टींचे व्यसन लागण्यात बदलू शकतो. या गोष्टी नेमक्या कशा घडतात याचा ऊहापोह करणारा हा लेख.


माझी मुलगी टीव्हीसमोरून हलतच नाही, माझ्या मुलाला मोबाइलवर गेम खेळण्याशिवाय काहीही सुचत नाही, रात्रभर इंटरनेटवर काय बघतात माहिती नाही; पण इंटरनेट जरा जरी नसले तरी ही चिडचिड करते. इंटरनेट आणि गेममुळे अभ्यास होतच नाही, हे सारे कसं थांबवता येईल?

कौन्सेलर म्हणून काम करताना अशा अनेक समस्या पालकांकडून वारंवार समोर मांडल्या जातात आणि हे आता कसे थांबवता येईल, या प्रश्नाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत मोबाइल, गेमच्या अतिरेकी वापरावर निर्बंध कसे आणायचे किंवा हे व्यसन कसे सोडवायचे, असे विचारणाऱ्या पालकांची संख्या चढत्या भाजणीने वाढते आहे.

या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी पहिल्यांदा व्यसन लागते म्हणजे काय, या गोष्टीचा विचार करू. व्यसन म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर करणे किंवा कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त प्रमाणात सवय लागणे. व्यसन या गोष्टीची ही सामान्यांना समजेल अशी सोपी व्याख्या आहे. जुगार खेळणे, दारू पिणे, सतत खरेदी करणे ही व्यसने आहेतच; पण सतत इंटरनेट, मोबाइल वापरणे, गेम्स खेळणे, तासनतास टीव्ही पाहणे ही सारी नव्या पिढीला भेडसावणारी व्यसने आहेत. घराघरांत डोकावलात तर तुम्हाला 'अरे मोबाइल बंद कर' किंवा 'किती वेळ खेळणार आहेस गेम, बंद कर आता,' अशी वाक्ये ऐकू येतील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर आपला जो काही दिनक्रम आहे, त्या दिनक्रमातील गोष्टी करणे वगळून मुद्दाम एखादी गोष्टी करायला लागतो, त्या वेळी त्या गोष्टीचे व्यसन लागले आहे, असे म्हणता येईल. उदा. हातातील काम सोडून टीव्ही, व्हॉट्स अॅप पाहत राहणे, रोजची कामे टाकून गेम खेळत राहणे. अशा व्यक्तींच्या मनात सतत त्याच गोष्टींचा विचार असतो. उदा. गेम खेळणारी व्यक्ती उद्या कोणता गेम खेळायचा, तो कसा खेळायचा, कोणते धोरण असावे, असा विचार करीत राहते. टीव्ही पाहणारी नेटफ्लिक्सवर काय बघायचे? काल पाहिलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये काय होते, अमुक सीरीज कोठून मि‌ळवता येईल, असा विचार करते.

या सगळ्या गोष्टींमध्ये या व्यक्ती इतक्या गुंतून जातात, की ती गोष्ट करता न आल्यास त्यांची चिडचिड होते. ज्या व्यक्तींमुळे त्यांना ती गोष्ट करता येत नाही, त्या व्यक्ती त्यांच्यासाठी अगदी वैरीच होऊन जातात. कोणत्याही मार्गाने का होईना, ती गोष्ट करता यायलाच हवी, असा हट्ट सुरू होतो. टीव्ही पाहणे, मोबाइल वापरणे, गेम खेळणे यातून एकप्रकारचा आनंद मिळतो. ही एक मानसिक स्थिती आहे. मनाला मिळणारा हा आनंद कायम टिकत नाही. जितका वेळ तुम्ही ती गोष्ट करत असता, तितकाच वेळ तुम्हाला तो आनंद मिळतो. हा आनंद, त्यातून येणारा हल्लकपणा वारंवार हवा असे वाटायला लागते. हे सारे व्यसनात येते.

जेव्हा या पायरीवर असणारे मूल माझ्यासमोर येते, तेव्हा माझ्या मनात आणखी एक प्रश्न येतो, 'मुलांना स्क्रीनचे (टीव्ही, गेम, मोबाइल, इंटरनेट) व्यसन लागले आहे, तर त्यात दोष फक्त मुलांचा आहे का? व्यसन का लागते, या प्रश्नाचे उत्तर मिळ‌वायचे असेल, व्यसनांमागची कारणे शोधायची असतील, तर थोडे भूतकाळात डोकावून पाहणे गरजेचे आहे. खरे सांगायचे, तर या प्रश्नाला फक्त एक उत्तर नाही. या उत्तरातील काही कारणे सवयींशी, तर काही माणसांशी संबंधित आहेत.

सर्वप्रथम आपण ज्या गोष्टींची सवय लागते, उदा. गेम्स, इंटरनेट याकडे वळू. आपण टीव्ही, मोबाइल, कम्प्युटर, गेम्स, टॅब विचारात घेऊ. जुन्या जमान्यात लोक रेडिओ ऐकत असत. रेडिओतून फक्त गाणी ऐकण्याची सोय होती. त्याला स्क्रीन नव्हती. त्यामुळे रेडिओचे व्यसन लागले, असे फारसे ऐकू आले नाही. त्या काळात दारू, जुगार, अमली पदार्थांची व्यसने होती. थोडक्यात व्यसनांचे पर्याय मर्यादित होते. समाजात व्यसनांकडे पाहण्याची दृष्टी नकारात्मक होती. कालांतराने टीव्ही आला. टीव्हीत ऐकणे आणि पाहणे या दोन्ही गोष्टींची सुविधा होती. टीव्ही आला, तेव्हा त्यामागे समाज प्रबोधन करण्याचा हेतू होता. कालांतराने प्रबोधन मागे पडले आणि मनोरंजन वाढले. टीव्ही आपल्याला माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त आहे, असा समज रुजवला गेला होता. त्यामुळे टीव्ही पाहण्याकडे लोक सकारात्मक दृष्टीने पाहत होते. अशी मान्यता दारू, सिगरेट किंवा इतर अमली पदार्थांच्या व्यसनांना केव्हाच नव्हती. परिणामी टीव्ही सातत्याने पाहिल्याने दुष्परिणाम होऊ शकतात, याकडे किंचित डोळेझाक झाली. टीव्हीचे व्यसन किती टोकाला गेले, याचे एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत संध्याकाळी ठराविक वेळात वीज बंद होत असे. त्याचे कारण शोधले असता, टीव्हीवर ज्या वेळी जाहिराती येत, त्या वेळी लोक वॉशिंग मशिन, डिश वॉशर लावत आणि त्याचा ताण येऊन वीजपुरवठा बंद पडत होता, हे लक्षात आले.

त्यानंतर पुढचा टप्पा आला तो केबल आणि व्हिडिओ गेम्सचा. केबलमुळे २४ तास कार्यक्रम सुरू झाले. यातून स्क्रीनची सवय झाली आणि त्याचे व्यसनात रूपांतर कधी होत गेले ते समजले नाही. हीच गोष्ट गेमच्या बाबतही झाली. गेमचे प्रकार उपलब्ध व्हायला लागले आणि त्याची क्रेझही वाढायला लागली. याच दरम्यान जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही सामान्यांची दैनंदिनी बदलायला लागली. कम्प्युटरायझेशनचा जमाना येऊ घातला होता. जास्त वेळ आणि जास्त वेगाने काम करण्याची गरज निर्माण व्हायला लागली. त्यातून हातात जास्त पैसाही येऊ लागला. दुसरीकडे व्यावसायिक स्पर्धा, ताण वाढले. ताणातून मुक्तता मिळवण्यासाठी पटकन आनंद मिळणाऱ्या गोष्टींचा शोध घेतला जाऊ लागला. थोडा जास्तीचा पैसा हातात असल्याने चैनीच्या गोष्टींची खरेदी करण्याची मुभाही मिळाली. त्यातून गेम ही पटकन आनंद मिळणारी गोष्ट अनेकांनी आपलीशी केली. व्हिडिओ गेम, गेमिंग कन्सोल (एक्स बॉक्स, प्ले स्टेशन), कम्प्युटरवर विविध गेम्स उपलब्ध व्हायला लागले. पाठोपाठ इंटरनेट आणि मोबाइल आले. विनाबंधन कोणत्याही गोष्टींचे सर्च करणे, पाहणे, हवे ते डाउनलोड करून घेणे साध्य झाले. मोबाइलमुळे तुमच्या हातात इंटरनेट आणि 'स्क्रीन' दोन्ही मिळाले; शिवाय ती वैयक्तिक वापरणेही शक्य झाले. परिणामी वापराचा कालावधी आपोआप वाढला आणि आपण सगळेच जण कळत नकळत स्क्रीन, मोबाइल, टीव्हीच्या आधीन झालो. मुलांच्याबाबत हा प्रश्न थोडा गंभीरपणे घ्यायला हवा. आज ८ ते २० वर्षे या वयोगटात असणारी मुले जन्माला आली, तीच टीव्ही, मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात. आमचे मूल मोबाइल पाहिल्याशिवाय कसे जेवत नाही, मोबाइलवर गाणी ऐकल्याशिवाय कसे झोपत नाही, मुलाच्या दहाव्या वाढदिवसाला भेट म्हणून टॅब दिला, मूल इंटरनेटवर किती गोष्टी सहज सर्च करते, हे पालकच कौतुकाने सांगतात. या पायरीवर मुलांना समजते, की मोबाइल, टीव्ही, इंटरनेट या सगळ्या वस्तू सहज उपलब्ध आहेत, त्या वापरायलाच हव्यात. याच पायरीवर या गोष्टी किती वापरल्या पाहिजेत (मर्यादित वापर), कशाप्रकारे वापरल्या पाहिजेत (दुसऱ्याला हानी न पोहचवता) याचे बंधन मुलांना समजत नाही. मुळात पालकांनाही ते फारस् स्पष्ट नसते. उदाहरणा दाखल सांगतो. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक किशोरवयीन मुलगा पालकांसह आला. त्याने त्याच्या दोन मित्रांचे भांडण मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले, त्यांच्या मारामारीचे फोटो काढले. ही गोष्ट त्या मित्रांना समजली, तेव्हा त्यांनी या मुलाला मारहाण केली. कारण काय तर त्याने हे रेकॉर्ड का केले आणि केले आहे तर ते आता पालकांना दाखवणार किंवा व्हायरल करणार ही भीती. मुलांचा वाद विकोपाला गेला. या मुलाला मोबाइलमधून फोटो, रेकॉर्डिंग करणे माहिती होते; पण त्याच्या दुष्परिणामांची कल्पनाच नव्हती. त्याबद्दल पालकांनी त्याच्याशी कधी संवाद साधलेला नव्हता. हीच गोष्ट इंटरनेटबाबत आहे. इंटरनेटच्या वापरातून बहुतांश वेळा आपल्याला फक्त माहिती मिळत असते. बहुविध प्रकारची माहिती आपल्यावर आदळत असते; पण ते ज्ञान नसते. जी माहिती मिळत असते, ती मिळ‌ाली नाही तरी आपले फार बिघडते आहे, असेही नसते. मूल एखादा लहानसा प्रकल्प करतानाही स्वत:च्या मेंदूऐवजी 'गुगल'ची मदत घेते. यातून कल्पनाशक्तीचा विकास खुंटतो. या सगळ्यांत नव्याने समोर येत असणारा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो 'सोशल मीडिया.' सोशल मीडियाच्या आभासी जगात सतत वावरताना मुले आपोआप एकटी पडत जातात. आभासी जग त्यांना खरे वाटायला लागते. त्यातून काही गैरप्रकार घडले किंवा काही दुर्दैवी घटना समोर आल्या, की पालक जागे होतात. मोबाइल बंद, टीव्ही बंद अशी टोकाची भूमिका घेणे सुरू होते. मला मनापासून वाटते, की तंत्रयुगात आपण टीव्ही, मोबाइल, सोशल मीडियापासून मुलांना खूप काळ रोखू शकणार नाही. या गोष्टींचा अतिरेकी वापर करून मुले व्यसनाच्या पातळीवर पोहोचू नयेत असे वाटत असेल, तर पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. सुरुवातीपासून मुलांना या गोष्टींच्या वापराचे नियम सांगत राहणे गरजेचे आहे. मर्यादित वेळेत वापर आणि अनावश्यक गोष्टींसाठी वापर न करणे, यासाठी मुलांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. मुलांना मोबाइल देताना पाचवी किंवा सहावीच्या मुलाला अँड्रॉइड फोनची गरज आहे का, याचा विचार पालकांनीच करायला हवा. त्याचबरोबर तुम्ही स्वत:ही मोबाइल, टीव्हीच्या वापरावर निर्बंध घालून घ्यायला हवेत. पालकांनो, एक सोपा मंत्र लक्षात ठेवा, ज्या गोष्टी मुलांनी करू नयेत, असे तुम्हाला वाटते, त्या गोष्टी तुम्ही स्वत: करू नका. त्यासाठीच्या मर्यादा, नियम तुम्ही स्वत: पाळा; कारण तुम्ही मुलांसाठी आदर्श असता.

कुलदीप दाते

(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत)

जरा विसावू या वळणावर

आजची पिढी ही व्यावहारिक आहे. त्यांच्या शब्दांत सांगायचे, तर 'प्रोफेशनल' आहे. ही व्यावहारिकता बाहेरच्या जगात ठीक. घरात मात्र कौटुंबिक नाती सांभाळायला हवीत. त्यांचे मोल जाणा. ही विविध नाती जोपासा; कारण ज्यांच्याजवळ ही नाती नाहीत, त्यांनी काय गमावले आहे, हे त्यांनाच माहीत

नुकतेच आम्हा मावस-मामे भावंडांचे गेट टुगेदर झाले. प्रकृतीच्या कारणामुळे आम्ही उभयता जाऊ शकलो नसलो, तरी आलेल्या छायाचित्रांवरून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जे काही चांगले क्षण अनुभवले होते, त्याची फोनद्वारे का होईना; पण उजळणी करता आली. सगळ्यांच्या भेटीगाठींनतर एक गोष्ट जाणवली, की अजूनही आम्हातील प्रेमाचे धागे पक्के आहेत. नवीन पिढीचे काय? ते एकमेकांना नियमितपणे भेटत नाहीत, की त्यांना एकमेकांविषयी माहिती आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी मोठे गेट टुगेदर करायला हवे; पण हे जमायचे कसे?

विचारांचे चक्र मनात भिरभिरू लागले. आमच्या लहानपणी आम्ही मावसी, मामाकडे सुटीत जायचो. त्यांची माया, आजीचे आम्हा नातवंडांवरील प्रेम अनुभवले आहे. पाढे, रामरक्षा, गोष्टींची पुस्तके वाचण्याची सवय आजीमुळे लागली. आता काय घडते आहे, एक नाते टिकते. पूर्वी 'हम दो हमारे दो'चा जमाना होता. काका, आत्या, मामा, मावशी अशी नाती होती. आता पुष्कळ ठिकाणी एकच अपत्य असते. त्यामुळे नाती कमी झाली आहेत आणि मुलेही एकलकोंडी होत आहेत. त्यातही आजकाल काळाची गरज म्हणून, शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग म्हणून नोकरी केली जाते आणि साचेबद्ध जीवन जगण्यास सुरुवात होते. त्यापलीकडे बघणे होत नाही. जीवनातील आनंद फक्त पैशाने विकत घेता येतो, असे मानणाराही एक वर्ग आहेच. पैशापेक्षाही मोठे आहे मनाचे समाधान. मनाचा आनंद हा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींतून मिळविता येतो. सकाळी फिरायला गेल्यानंतर अनुभवता येणारे सृष्टीचे रूप, उगवता सूर्य, त्याची कोवळी किरणे, त्यातून जाणवणारी ऊब, झाडाची पाने-फुले अनुभवता आली पाहिजेत, शनिवार-रविवार बाहेर जाता आले नाही, तर एखादे चांगले पुस्तक वाचून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. फक्त तो अनुभवता येण्यासाठी संवेदनशील मन असायला हवे. तंत्रज्ञानाच्या या जगातही पुस्तके ज्ञानाने, अनुभवाने, संस्काराने समृद्ध करत असतात. त्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. एखाद्या अडल्यानडल्याला केलेली मदत ही मनाला आनंद देणारी असते. अशा आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. फक्त त्या अनुभवता आल्या पाहिजेत.

आजची पिढी ही व्यावहारिक आहे. त्यांच्या शब्दांत सांगायचे, तर 'प्रोफेशनल' आहे. ही व्यावहारिकता बाहेरच्या जगात ठीक. घरात मात्र कौटुंबिक नाती सांभाळायला हवीत. त्यांचे मोल जाणा. देवाने दिलेली ही विविध नाती जोपासा; कारण ज्यांच्याजवळ ही नाती नाहीत, त्यांनी काय गमावले आहे, हे त्यांनाच माहीत. आजच्या पिढीत आणि आमच्या पिढीत काळाचा फरक आहे; पण आमच्याकडे जे मानसिक समाधान आहे, ते मिळविण्यासाठी या पिढीला वेगळा वेळ काढावा लागेल. थोडा त्याग करावा लागेल. नात्यांना थोडे प्रेम द्यावे लागेल.

आजच्या स्पर्धेच्या युगात जो पुढे गेला तो जिंकला आणि जो थांबला तो संपला, असे म्हणता येईल. ही स्पर्धा दुसऱ्या दुसऱ्या कोणाशी करण्याऐवजी आपण आपल्याशीच केली, तर फार बरे होईल. त्यामुळे आपल्याला जो ताण जाणवत राहतो, तो जाणवणार नाही. जास्त वेळ देऊन खूप पैसा कमावला, तरी मनात कोठेतरी खदखद असते, की कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आहे. हे सारे टाळण्यासाठी नातीगोती, मित्रमंडळ सांभाळायला हवे. त्यांना अधूनमधून भेटायला हवे. जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. चुका साऱ्यांकडूनच होत असतात. त्या विसरून जाव्या आणि चांगले क्षण स्मरणात ठेवावेत. मित्रमंडळींच्या, नात्यागोत्यांच्या वळणावर काही क्षण विसावा मिळतो. त्यातून मिळणारी ऊर्जा ही प्रेरणा देणारी, आनंद देणारी असेल.


-शुभांगी देशपांडे