May 11, 2019

भाषा-अस्त्राचा गजरा!


रशिया , फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन या देशांनी आपल्या भाषेला सॉफ्टपॉवर म्हणून सतत पुढे ठेवण्याचा केलेला प्रयत्न, त्यासाठी ते करत असलेली कल्चरल डिप्लोमसी या गोष्टी आपण भारतीयांनी शिकण्यासारख्या आहेत. कारण आपण आपल्या भाषांची आबाळ करतो. खरे तर आपल्या भाषेच्या प्रसार-संवर्धनातून आपला राष्ट्राभिमान, राष्ट्रहित जोपासलं जातं असतं. भाषा हे अस्त्र नाजूक असलं तरी ते तितकंच प्रभावीही असतं. या उद्देशाने १६ जून रोजी ‘संवर्धन’ या सेवाभावी संस्थेतर्फे मुंबईत संस्कृत भाषेविषयी एक परिसंवाद होतो आहे. त्यानिमित्ताने भाषिक हत्याराचे पैलू स्पष्ट करणारा हा लेख..

बोत्सन हे युरोपातल्या दक्षिण तिरोल या प्रदेशातले एक इवलेसे गाव आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी आणि इटलीच्या अगलबगल चिमटीत सापडलेलं. ते अधिकृतरीत्या येतं इटलीत, पण तेथील २५ टक्के लोक जर्मन वंशाचे- पर्यायाने जर्मन भाषिक आहेत.


तर या इटुकल्या-मिटुकल्या गावात येत्या २८ जुलैपासून चांगला आठवडाभर जर्मन या त्यांच्या मातृभाषेचा अपूर्व सोहळा साजरा होत आहे. १९६१पासून ते आजपर्यंत निरनिराळ्या जर्मन भाषिक प्रदेशांत हा सोहळा संपन्न होतो. २०१३च्या बोत्सनमधल्या या सोहळ्यात १०० देशांमधले अडीच हजार जर्मन भाषा प्रशिक्षक आणि जर्मनभाषातज्ज्ञ आमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत. जर्मन भाषा अधिकाधिक उत्तम तऱ्हेने शिकवण्यासाठी जगभरात चालू असणाऱ्या प्रयोगांना, उपक्रमांना एक व्यासपीठ मिळणार आहे. शिवाय जर्मन पाठय़पुस्तके तयार करणारे पाच-पन्नास प्रकाशक जगभरातल्या जर्मन प्रशिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या सर्वाचा खर्च साडेसात लक्ष युरोच्या (अंदाजे सव्वापाच कोटी रुपये) घरात जाईल, असा आयोजकांचा अंदाज आहे. जर्मन भाषेचे संवर्धन आणि प्रसार यासाठी जर्मन सरकार साठीच्या दशकापासून जो अवाढव्य खर्च करत असते त्या हिमनगाचे हे अगदी शेंडय़ाएवढे उदाहरण. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात ८० टक्के बेचिराख झालेल्या या देशाने युद्धानंतर अवघ्या १६ वर्षांत आपल्या मातृभाषेच्या पद्धतशीर संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी ही एवढी थोरली आर्थिक गुंतवणूक आणि तरतूद किती दूरदृष्टीने केली असली पाहिजे!


आपल्याकडच्या ‘मातृदेवो भव’ या उक्तीतील ‘मातृ’ ही अशी जन्मदात्या भाषेपर्यंतही पोहोचवता येते हे पाहिल्यावर डोळ्यात पाणी येते. आपल्या घरातल्या प्रादेशिक भाषांच्या अक्षम्य आबाळीचा विरलेला पदर सारखा आठवत राहतो.


एकंदरीत आपल्या भारतीय मनात ‘ते विज्ञान’ आणि ‘ती भाषा’ यातले डावे-उजवे खोलवर रुतलेले आहे. गणित-सायन्स खरे! बाकी भाषा प्रावीण्य वगैरे म्हणजे एरवी आयुष्यात दुसरे काहीच जमत नसलेले लोक भाषाबिशा शिकतात असा प्रवाद फार वेळा दिसतो. त्यातही पुन्हा सत्तेची उतरंड आहे. त्यात इंग्रजी भाषा सर्वात वरच्या पायदंडीवर, तर प्रादेशिक भाषा, त्यांची आजी संस्कृत ही सगळ्यात खालच्या पायरीवर. मातृभाषांच्या या हेळसांडीमागे तशी कारणेही आहेत. शिक्षण संपल्यावर नोकरीची वेळ येते, त्या वेळी विज्ञान-तंत्रज्ञान हे कर्त्यां पुरुषासारखे काठी वाजवत ओटीवर प्रवेश करताना दिसतात. त्यांच्या चंचीत पैसे खुळखुळतात. मातृभाषा मात्र अंधाऱ्या स्वयंपाकघरात रात्रंदिवस खपणाऱ्या अन्नपूर्णेसारखी मना-संस्कारांची मशागत करत बसते. तिची मुकी माया कोणाला दिसत नाही, समजत नाही. मग तिचा कसला सोहळा करायचा?


इंग्रजीचा वाढता प्रभाव हा काही फक्त आपल्या भारतापुरता प्रश्न नाही. जगभरातल्या भाषांमध्ये तिचा चंचुप्रवेश सतत होत आहे. तरीही औद्योगिक क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर असलेले सर्व देश आपापली मातृभाषा कसोशीने जपताना दिसतात. इस्राएल, जर्मनी, स्कँडेनेव्हियातले देश, रशिया, कोरिया, जपान, चीन अशा सर्व देशांत शालेय आणि विद्यापीठीय शिक्षणाचे माध्यम त्यांची त्यांची मातृभाषा असते. इंग्रजी या मडमेला ते दिवाणखान्यात जरूर प्रवेश देतात. पण म्हणून आपले अंतर्गृह तिच्या ताब्यात देत नाहीत. या देशांतील मुले आपापल्या मातृभाषेत मोठी होतात. या मातृभाषा ज्ञानभाषा व्हाव्या म्हणून हे सर्व प्रगत देश त्यामध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणूक करतात. माननीय यशवंतराव चव्हाण हेच तर सांगत होते आपल्याला! भारतीय भाषांनी त्वरेने बोलीभाषेतून ज्ञानभाषेत उत्क्रांत होणे महत्त्वाचे आहे म्हणून.


मातृभाषेचे सबलीकरण यातला भावनिक अनुबंधाचा भाग थोडा दूर ठेवू. त्यामागचे व्यवहाराचे आणि राजकीय दूरदृष्टीचे अस्तर मात्र आपण जरूर विचारात घेण्यासारखे आहे. आपापल्या भाषांचा जगभर प्रसार करू पाहणे हा आंतरराष्ट्रीय कल्चरल डिप्लोमसीचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे.


एक डिप्लोमॅट म्हणजे मुत्सद्दी नेमका काय करतो? तर प्रथम सर्वाशी लांब-रुंद चर्चा करतो. सर्व बाजू ऐकून घेतो आणि मग विरोधी विचारांना मोठय़ा खुबीने आपल्या बाजूने वळवून घेतो. अगदी पट्टीचा मुत्सद्दी तर यापुढे चार-आठ पावले जातो. आपले विचार हेच सर्वात आदर्श विचार असे एक गारूड फार यशस्वीपणे तयार करतो.


गौरवर्णीयांनी ‘योगा’ वगैरे म्हटले की मग समूहांना घाऊक प्रमाणात योगविद्येकडे वळावेसे वाटते. धुणीभांडी करणारी माऊली पोटास चिमटा घेऊन आपल्या लेकाला ‘कॉन्व्हेंट’मध्ये घालते. त्यामुळे पुढे तो म्यानेजर झालाच जणू अशा भ्रमात जगते! ‘गोरी सत्रा गुण चोरी’ अशा म्हणी आणि वृत्ती तयार होतात. ताजवरच्या भीषण हल्ल्यात बीबीसी/ सीएनएन लावावेसे वाटते, दूरदर्शन नाही.


थोडक्यात समूहांचे ब्रेनवॉशिंग करण्याचे प्रमुख अस्त्र म्हणजे ही कल्चरल डिप्लोमसी. त्याची सुरुवात भाषेच्या प्रसारापासून होते. कारण शेवटी प्रत्येक संस्कृती अमुक एका भाषेतून विचार करत असते. ती भाषा इतर समूहांना गोड वाटली, आवडू लागली की, त्यातले आचार- विचार-संस्कारही आवडू लागतात. मग स्वत:ची मातृभाषा तोकडी वाटू लागते. स्वत:ची संस्कृती तोकडी वाटू लागते. इंग्रजांनी फार पूर्वीपासून ही काळजी घेतली. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान या देशांनी इंग्रजांचा कित्ता गिरवला. या क्लबात आता चीन दाखल झाला आहे. २०२० पर्यंत जगभरात चिनी भाषा आणि चिनी कल्चरचा प्रसार करणाऱ्या तब्बल १००० कन्फ्युशिअस इन्स्टिटय़ूट्स उभारण्याचा विडा या देशाने उचलला आहे. पैकी ५०० इन्स्टिटय़ूट कार्यरतही झाल्या आहेत. प्रत्येक इन्स्टिटय़ूटपाठी प्रतिवर्षी तब्बल ४ लाख डॉलर्स खर्च केले जातात.


आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या प्रांगणात याला ‘सॉफ्ट पॉवर’ असे नाव आहे. एखाद्या महाप्रचंड अभेद्य अशा शिळेवर अव्याहतपणे थेंब थेंब पाणी पडत राहिले तर ती कालांतराने भंगू शकते..अर्थात सुरुंग लावूनही ती भंगता येते. प्रत्येक देश स्वसंरक्षणासाठी अशा सुरुंगांची म्हणजे लष्करी तयारी करत असतो. त्याला नाव आहे हार्डपॉवर. ती दिसते. मोजता येते. अण्वस्त्रांच्या, रणगाडय़ांच्या संख्येमुळे तिचा दबदबा असतो; परंतु याच्याच जोडीला दूरदृष्टी असलेले देश सॉफ्टपॉवरसाठीही तितक्याच ताकदीनिशी पैशाची तजवीज करताना दिसतात. ही सॉफ्टपॉवर वाढवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातला सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या भाषेचे सबलीकरण करणे. आणि मग ही सबला दूर दूर देशी पाठवून आपल्या संस्कृतीचे सबलीकरण करणे. म्हणजे काय? तर इतर सर्व जगवासीयांना जणू आपला ध्यास लावून देणे. मग जगभरातल्या अत्युच्च बुद्धिमत्तेला किंवा स्वस्त मजुरांना आपल्या देशाकडे खेचून आणण्यास फारसे कष्ट पडत नाहीत. शिवाय आपल्या उत्पादनांसाठी तेथील बाजारपेठ सहज काबीज करता येते ते वेगळे!


इतका दूरदृष्टीचा विचार आपण भारतीय कधी करणार? जन्मदात्यांनी स्त्री गर्भाची कळी खुडून टाकावी तशी भारतभरातल्या प्रादेशिक भाषांना आपण मरणकळा आणत आहोत. त्यांना सबला करून कल्चरल डिप्लोमसीसाठी दूरदेशी पाठवणे तर राहिले शतयोजने दूर!


गो. नी. दांडेकरांच्या ‘पडघवली’मध्ये व्यंकू खोत नावाचे एक पात्र आहे. हा व्यंकू खोत आंधळ्या भिऊआबाच्या तरण्या पत्नीसाठी- शारदेसाठी बंदरावरून येताना रोज एक भरगच्च गजरा आणतो. चांगला कलाबूत घातलेला. मग त्या बदल्यात तिचा भोग घेतो आणि शेवटी शारदेचे घर- आगार बघता बघता व्यंकू खोताच्या नावावर होते.


अशी असते सॉफ्टपॉवर आणि त्यातली कल्चरल डिप्लोमसी!


भारतीय शारदेच्या भाळी आंधळा भिऊआबाच लिहिला आहे का? 


पण लक्षात कोण घेतो!


वैशाली करमरकर