May 14, 2014

लाईफ

वाचा एकदा खूप मस्त आहे

थोडा वेळ लागेल पण नक्कीच

आवडेल तुम्हाला....

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला.

दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत

तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो.

काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण.

परतताना मनात विचार येतो

‘तो ड्रेस घ्यायला हवा होता''

सिग्नलला गाडी थांबते,

चिमुरडी काच ठोठावते.

गोड हसते, पण भिक मागत आहे

हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे

फार लक्ष देत नाही आपण.

२-३ रुपये द्यावे असे मनात येते.

रेंगाळत सुटे शोधता शोधता

‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो.

तेवढ्यात सिग्नल सुटतो,

गाडी पुढे घ्यायची वेळ येते.

थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,

‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला'

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र

त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो,

त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.

वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत

नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळेहोतो.

‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही

आपण गप्प राहतो."

जेवणाची सुट्टी संपते.

तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.

क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही'

निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी,

छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात.

खरं तर या छोट्या गोष्टीच

जगण्याचे कारण असतात.

गेलेले क्षण परत येत नाहीत,

राहतो तो ‘खेद’,

करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा.

जगण्याची साधने जमवताना

जगणेच राहून जात नाहीयेना

ते ‘चेक’ करा.

"आनंद झाला तर हसा,

वाईट वाटले तर डोळ्यांना

बांध घालू नका"

चांगल्या गोष्टीची दाद द्या,

आवडले नाही तर सांगा,

घुसमटू नका."

त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.

नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,

त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात

गुंफणे म्हणजेच जगणे."

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली

तर ‘लाईफ’ कसले?

आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले

तर ‘लाईफ’ कसले?

मित्रांच्या फालतू विनोदांवर

पोट दुखेस्तोवर हसलो नाही

तर ‘लाईफ’ कसले?

आनंदात आनंद आणि

दु:खात दु:ख नाही जाणवले

तर ‘लाईफ’ कसले?


Posted via Blogaway

आयुष्य खुप सुन्दर आहे.

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,

कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल..!
माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय.. जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूच येण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा,
विश्वास ठेवा,
आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे.
...


Posted via Blogaway

माया जाल

आजकाल आपण घरी, रस्त्यावर, कार्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, हॉटेल्समध्ये आणि इतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी असताना हमखास दिसणारं दृश्य म्हणजे अनेक लोक त्यांच्या मोबाईल फोनमध्ये गुंतून गेल्याचं असतं. इतर कुणाशी बोलणं, एसएमएस पाठवणं किंवा वाचणं या गोष्टी तर सुरू असतातच; पण त्याशिवाय गेम्स खेळणं, कानात इअरफोन्स टाकून गाणी ऐकणं, चॅटिंग करणं अशा अनेक गोष्टी लोक सतत करत असतात. आपल्या आजूबाजूच्या खऱ्या जगाचा विसर पडावा इतके लोक या मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. या मोबाईलच्या जोडीला आता टॅब्लेट कम्प्युटरसारखी अनेक उपकरणं आल्यामुळे त्यांच्यामध्येही कित्येक जण गुंग झालेले असतात. घरी कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर गेम खेळणारा आणि ते नसेल तर टीव्हीमध्ये बुडालेला मुलगा आपल्या आई-वडिलांशी बोलत नाही. महाविद्यालयात विद्यार्थी चोरून चॅटिंगमध्ये किंवा एसएमएसमध्ये गढून गेलेला असल्यामुळे आपल्या शिक्षकाकडे लक्ष देत नाही. हॉटेलमध्ये एकत्र जेवायला आलेल्या कुटुंबामधले अनेक जण आपापल्या मोबाईल फोनमध्ये स्वतंत्रपणे रंगून गेलेले असतात. कम्प्युटर, मोबाईल किंवा टॅब्लेट यांचा वापर करून आता फेसबुकसारखी गोष्ट उपलब्ध असल्यामुळे आबालवृध्दांना अनेक आभासी ‘मित्र’ असतात. त्यामुळे खरे मित्र-नातेवाईक नकोसे व्हायला लागतात.

या संदर्भात सगळीकडे मोठया प्रमाणावर बोललं-लिहिलं जातं. मोबाईल तसंच फेसबुक यांच्यासारख्या गोष्टींचे धोके किती प्रचंड आहेत यावर अनेक जण भाष्य करत असतात. पण काही अपवाद वगळता बहुतेक जणांवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. जणू सिगारेट विकणाऱ्या दुकानामध्ये तसंच सिगारेटच्या पाकिटावर ‘सिगारेट ओढल्यामुळे कर्करोग होऊ शकतो’ असा मजकूर लिहिलेला असूनसुध्दा सिगारेट ओढणाऱ्या लोकांच्या संख्येत भरच पडत राहते तसा हा प्रकार आहे. कारण या धोक्यांविषयी वाचूनसुध्दा त्यातून बोध घ्यावा असं फारसं कुणाला वाटत नाही.

पूर्वीपासून लोकांचं दारूचं व्यसन सुटावं यासाठी खूप लोक धडपड करायचे. त्यासाठी ‘मुक्तांगण’सारख्या अनेक संस्थाही निघाल्या. अनेक मदतगट उभे करण्यात आले. या सगळयांच्या प्रयत्नांमधून हजारो जणांची जीवघेणी व्यसनं सुटलीसुध्दा. अर्थात त्यामुळे दारूच्या खपामध्ये घट झाल्याचं ऐकिवात नाही हा भाग वेगळा! पण आता तर चक्क मोबाईल किंवा फेसबुक यांच्यासारख्या ‘व्यसनांपासून’ सुटका व्हावी यासाठीची केंद्रं उभी करण्याची वेळ आली आहे.

हा सगळा प्रकार उबगवाणा आहे. यातून प्रचंड सैरभैरपणा आणि उथळपणा यांचा जन्म झाला आहे. याविषयी मी काही मित्र-सहकारी यांच्याशी बोललो आणि त्यातून एक प्रातिनिधिक स्वरुपाची प्रतिक्रिया उमटली. अनेक जणांनी आपल्याला या सगळया ‘गॅजेट्स’चं एक प्रकारचं व्यसन लागत चालल्याचं मान्य केलं. या ‘व्यसनांची’ पातळी किंवा तीव्रता वेगवेगळी होती. अर्थातच या सगळयापासून अगदी कटाक्षानं दूर राहणारे मोजके अपवादही होते. पण ते सोडले तर उरलेल्या लोकांना यातून कसं बाहेर यायचं हे काहीस समजत नव्हतं. त्यापेक्षाही जास्त काळजी सगळयांना नव्या पिढीबद्दल लागून राहिली होती. कारण तिथे तर जवळपास सगळीकडेच हा प्रकार अगदी मोठया प्रमाणावर दिसत होता.

माझ्या स्वत:च्या बाबतीत सांगायचं तर सुरुवातीला काही वर्षं मी अट्टाहासानं मोबाईल फोनच घेतला नव्हता. मला ती कटकट वाटायची. पण नंतर एकदा खूप अवघड आणि महत्त्वाच्या एका प्रकल्पावर मी काम सुरू केलं आणि त्यामुळे माझ्या वेगवेगळया सहकाऱ्यांना माझ्याशी रात्री-अपरात्री, सुट्टीच्या दिवशी वगैरे संपर्क साधायची गरज भासायला लागली. त्यामुळे मी मोबाईल फोन घेतला. त्यातून मी फोन आणि एसएमएस एवढंच करायचो. काही काळानंतर हँडसेट बिघडल्यावर मी जरा जास्त चांगला हँडसेट घेतला. त्यात आता कॅमेराही होता. अलीकडे हा हँडसेट बिघडल्यावर नवा हँडसेट घ्यायची वेळ आली तेव्हा मला आपल्या मोबाईल फोनवरून इमेल, इंटरनेट हे सगळं वापरता आलं पाहिजे असं वाटायला लागलं. त्यामुळे आयफोन, ब्लॅकबेरी, नोकिया, सॅमसंग यांच्यापैकी अगदी आधुनिक हँडसेट घ्यावा असं मनात यायला लागलं. पण त्याच वेळेला मी या सगळया उपकरणांविषयी खोलात जाऊन विचार करायला लागलो.

अनेक लोकांना दर थोडया वेळानं उगीचच मोबाईलची बटणं दाबून बघायचा नाद असतो. कुणाचा आपल्या नकळत कॉल तर येऊन गेला नाही ना; किंवा कुणाचा एसमएस आलेला असूनही आपल्याला ते समजलंच नाही असं झालं नाही ना असं त्यांना सारखं वाटत असतं. तसंच आपल्या मोबाईलची रेंज नीट नसल्यामुळेच कुणाचा कॉल किंवा एसएमएस येत नाही असं तर होत नाही ना हेही बरेच लोक वारंवार तपासतात. रात्रीसुध्दा मोबाईल जवळ किंवा हाताशी येईल अशा अंतरावरच ते ठेवतात. सकाळी उठल्यावर आधी मोबाईलकडे बघितल्याशिवाय अनेक जणांचा दिवस सुरू होत नाही.

ऑफिसमध्ये काम करताना अनेक जणांना दिवसभर कम्प्युटर वापरावा लागतो; पण त्या दरम्यान कित्येकदा त्यांनी दिवसभर काय केलं आहे असा प्रश्न संध्याकाळी घरी जाताना पडावा अशी त्यांची अवस्था असते. याचं मुख्य कारण म्हणजे सतत इमेल आणि इंटरनेट यांच्या चक्रात ते अडकलेले असतात. म्हणजेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते कम्प्युटरवर काम तर करतातच. ऑफिसच्या कामासंबंधीच्या वेगवेगळया जबाबदाऱ्याही ते पार पाडतात. पण अधूनमधून मिळणारा वेळ आपण नक्की कशासाठी वापरतो हे त्यांना समजेनासं होतं. इंटरनेट आणि त्यातही गुगलची वेबसाईट उघडून एकापाठोपाठ एक अशी वेगवेगळया प्रकारची माहिती बघायची असा तो प्रकार असतो. तसंच सलग पाचेक मिनिटं आपल्याला कुणाचीच इमेल आली नाही तर स्वत:हून इमेलचा प्रोग्रॅम उघडून बघायचा, स्क्रीन रिफ्रेश करून बघायचा अशी सवय अनेकांना लागलेली असते. इंटरनेट सतत चालू असल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्याशिवाय वारंवार वेगवेगळया बातम्यांच्या आणि इतर वेबसाईट्स ते बघत असतात. म्हणजे त्यात फार खोलात जाऊन किंवा खूप वेळ ते कसलं वाचन करत नसतात. पण त्या वेबसाईट्सना सतत भेट दिली नाही तर आपलं काही तरी चुकतं आहे असं मात्र त्यांना नक्कीच वाटतं. त्यामुळे कम्प्युटरवर एकीकडे आपलं काम सुरू असताना दर काही मिनिटांनी ते अर्धवट सोडून हे लोक इंटरनेटकडे वळतात.

आता तर इमेलला अनेक भाईबंद आहेत. सुरुवातीला त्यासाठी ‘ऑज्ञर्ाुच्ट’ ही सोशल नेटवगिची वेबसाईट होती. त्यावर वारंवार जाऊन कुणी काय मेसेजेस टाकले आहेत हे वाचल्याशिवाय अनेकांना राहावत नसे. काही काळानंतर ‘ऑज्ञर्ाुच्ट’ची लोकप्रियता संपुष्टात आली आणि त्या ठिकाणी ‘फेसबुक’ आलं. त्यामुळे आता ‘फेसबुक’वर कुणी काय नवं लिहिलं आहे हे बघण्यासाठी अनेक जण सतत धडपडत असतात. त्याच्या जोडीला ‘गुगल प्लस’ही आहेच.

‘डिजिटल फ्यूचर्स प्रॉजेक्ट’ नावाची संस्था वेगवेगळया प्रकारच्या नव्या तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम कसे होतात याचा वार्षिक आढावा घेते. त्याच्या अहवालात अमेरिकेमधले लोक सातत्यानं इंटरनेटचा वापर जास्त प्रमाणात करत असल्याचं दिसून येतं. 2008 साली हा आकडा दर आठवडयाला 15.3 तासांवर गेला. 96 टक्के जण इमेलसाठी, 71 टक्के जण कुठलंही विशिष्ट कारण नसताना इंटरनेट बघण्यासाठी, 60 टक्के जण इंटरनेटवर बातम्या वाचण्यासाठी, 43 जण वेगवेगळया उत्पादनांची माहिती मिळवण्यासाठी, 38 टक्के जण बँकांचे व्यवहार करण्यासाठी, 37 टक्के जण चॅटिंगसाठी, 35 टक्के जण ऑनलाईन गेम्स खेळण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात असं दिसून आलं.

या सगळया गोष्टींचे अनेक वेगवेगळे परिणाम झाले असल्याचं लोक सांगतात. उदाहरणार्थ पुस्तक वाचत असताना अनेक जण पूर्वीसारखे एकाग्र होऊन आणि सलग कित्येक तास एकच पुस्तक घेऊन त्यात रमू शकत नाहीत. दर काही मिनिटांनी काही ना काही कारण काढून उठायचं, कधी इंटरनेट चालू करून इमेल बघ, कधी टीव्ही बघ, कधी उगीचच मोबाईलची बटणं दाबून बघ असले प्रकार आपल्या बाबतीत घडतात हे त्यांना जाणवतं. हे सगळं काही मिनिटं करून झालं की ते परत पुस्तकाकडे वळायचा प्रयत्न करतात. पण बहुतेक वेळा आता त्यांना ते नकोसं झालेलं असतं. त्या पुस्तकाच्या वाचनापासून सुटका करून घेण्यासाठीच तर त्यांनी हे चाळे करून बघितलेले असतात. त्यामुळे तेव्हा तरी परत त्या पुस्तकाचं वाचन होतच नाही. मग हे लोक दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे वळतात. खरं म्हणजे पुस्तकं तर फार दूरची गोष्ट झाली. चक्क मासिकांच्या बाबतीतसुध्दा असंच घडतं असं अनेक जण म्हणतात. छोटे लेख असतील तर ते लेख लोक पटापट वाचून काढायचा प्रयत्न करतात. पण एका पानाहून जास्त लांबीचा लेख दिसला की त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी ते धडपडत असतात; किंवा खूप प्रयत्न करून त्यातला काही भाग वरवर वाचल्यासारखा करून सोडून देतात. म्हणजेच त्यांची नजर त्या लेखावरून नुसती भिरभिरल्यासारखी काही मिनिटं फिरत असते आणि त्यानंतर आकारानं छोटया असलेल्या दुसऱ्या लेखाकडे ती वळते.

अलीकडे लहान मुलंही कुठलीही माहिती शोधायची असली की सर्रास गुगलचा वापर करतात. त्यांना इंटरनेट उपलब्ध नसेल तर आपल्या पालकांना ते गुगल वापरून आपल्याला हवी असलेली माहिती शोधून द्यायला सांगतात. कित्येकदा स्वत: पालकच मुलाला ही माहिती एखाद्या पुस्तकातून शोधायचे कष्ट घेण्याऐवजी पटकन गुगलवरून शोधून काढायचा सल्ला देतात. मुलांचा निरागसपणा आणि लहानपणी असलेली अगदी मर्यादित प्रमाणातली समज या गोष्टी गृहीत धरून याकडे दुर्लक्ष केलं तरी सगळयाच बाबतींमध्ये हा एक पॅटर्नच बनत चालला आहे. कुठलीही माहिती पाहिजे, गुगल उघडायचं. कुठलंही गाणं हवं, डाऊनलोड करायचं. याशिवाय लहानसहान मुलांना स्वत:चे इमेल अकाऊंट्स हवे असतात. त्यांना फेसबुकवर जायचं असतं. अशा प्रकारच्या मागण्या त्यांच्याकडून सातत्यानं वाढतच चालल्या आहेत. अमुकअमुक मित्राला किंवा मैत्रिणीला तिचे आई-बाबा हे सगळं करू देतात; मग आम्ही ते का करायचं नाही असा त्यांचा प्रश्न असतो.

हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मला आणखी एक गोष्ट खूप प्रकर्षानं जाणवायला लागली आहे. आसपासच्या फारशा कुणालाच कुठल्याच विषयाच्या फार खोलात जायला नको असतं. आजची ‘ब्रेकिंग न्यूज’, सिनेमा, क्रिकेट, तथाकथित सेलेब्रेटिज, टीव्हीवरचे भुक्कड कार्यक्रम यांच्यापलीकडे बोलायचे विषयच नसतात. तसंच याही विषयांमध्ये अगदी वरवरची माहिती चघळणं, पटापट आपली मतं बनवणं, थोडं खोलात गेलं की त्यातलं काहीच माहीत नसणं असं हे चित्र असतं. कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो समजावून घ्यावा असं फारसं कुणालाच वाटत नाही असंही दिसायला लागलं आहे. कारण ‘त्या माहितीचा मला किती उपयोग आहे’ या प्रश्नाच्या उत्तरावरूनच सगळं ठरत असतं असं दिसून येतं.

कुठल्याही गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत असल्याचं आपल्या लक्षात कुणी आणून दिल्यावर बहुतेक वेळा ‘मला वेळ नाही’ ही सबब आपण पुढे करतो. मोठी पुस्तकं वाचणं, मोठया लांबीचे चित्रपट बघणं, गाण्याच्या एखाद्या मैफिलीला जाणं अशा गोष्टी आता अपवादानंच होतात. आपण वर्तमानपत्र वाचायचं म्हटलं तरी नव्या तंत्रज्ञानामधून जन्म घेतलेल्या मोबाईल फोन किंवा इंटरनेट यांच्यासारख्या उपकरणामुळे आपलं लक्ष भलतीकडेच वेधलं जाण्याचे प्रकार सर्रास घडतात. यामुळे वर्तमानपत्रांच्या खपामध्येही विक्रमी घट होत असल्याचं दिसून येतं. 2007-12 या काळात युरोपमध्ये वर्तमानपत्रांच्या खपात 17 टक्के घट झाली. याउलट इंटरनेटवरची वर्तमानपत्रं मात्र लोक मोठया प्रमाणावर फुकटात वाचतात. यातला दुर्दैवाचा भाग असा की महागडे कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब्लेट अशी उपकरणं खरेदी करताना लोकांच्या हातून धडाधड पैसे सुटे होतात; पण एक जास्तीचं वर्तमानपत्र विकत घ्यायचं म्हटलं की बरेचदा ते का-कू करतात. त्याऐवजी इंटरनेटवर फुकटात आपल्याला वर्तमानपत्र वाचायला मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते.

या सगळयातून मोठीच अस्वस्थता वाढीला लागली. खूप प्रश्न पडायला लागले. माझा एक वरिष्ठ सहकारी खूप वाचन करणारा आणि त्यातून स्वत:ला समृध्द करत राहणारा माणूस आहे. तो सतत मला ‘हे वाच’, ‘ते वाचू नकोस’ असं वेगवेगळया विषयांविषयी सांगत असतो. असंच एकदा बोलता बोलता त्यानं ‘निकोलस कार नावाच्या संशोधकाचा गुगलच्या आपल्यावर होत असलेल्या परिणामांविषयीचा लेख वाच’ असं मला सांगितलं. ‘ऍटलांटिक’ मासिकातला तो लेख इंटरनेटवरसुध्दा उपलब्ध होता. मी तो शोधून वाचला. त्या लेखानं मला वेडंच करून टाकलं. मी ज्या घटनाक्रमाविषयी विचार करत होतो आणि आजूबाजूच्या लोकांची जी अवस्था बघत होतो नेमक्या त्याच सगळया गोष्टींविषयी कारनं लिहिलं होतं. त्यासाठी कारनं अनेक वैज्ञानिक गोष्टींचे आणि संशोधनाचे दाखलेसुध्दा दिले होते.

कारच्या लिखाणाचं सार अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करायला म्हणजेच ‘मल्टिटास्किंग’ करायला लागलो तर आपण त्यातली एकही गोष्ट नीटपणे करू शकत नाही. तसंच इंटरनेट, गुगल, मोबाईल फोन आणि सगळी नवी गॅजेट्स यांच्या वापरानं आपल्यावर अतिशय गंभीर परिणाम होत जातात. आपल्याला त्या परिणामांविषयी काही कळत नाही. कारण ते परिणाम आपल्या नकळत तर घडतातच; पण ते घडत असतानाच्या आपल्या संवेदना सुखाच्या असतात. काही काळातच या परिणामांमुळे आपण निर्बुध्दासारखे आणि कशातच रस नसल्यासारखे उथळ तसंच सैरभैर व्हायला लागतो.

फ्रेंच तत्त्ववेत्ता रेनी गिरार्ड यानं माणसाचं सगळं शिक्षण इतर लोक करत असलेल्या गोष्टींच्या नकळत केल्या जाणाऱ्या नकलांमधून होत असतं आणि त्यातून माणसाचं वागणं बदलत जातं असं म्हटलं होतं. जर माणसानं अचानकपणे इतरांची नकळतपणे करत असलेली नक्कल करायचं थांबवलं तर सगळया जगाचं शिक्षणच थांबेल असं गिरार्ड म्हणतो. यामधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांची नकळतपणे नक्कल करत असताना त्यांना काय हवं आहे याचाही माणूस अंदाज घ्यायला लागतो आणि स्वत:लाही त्या गोष्टी हव्या आहेत याचा तो हव्यास धरायला लागतो. कारण ज्यांची नक्कल माणूस नकळतपणे करत असतो त्यांना ठरावीक गोष्टी, वस्तू किंवा सुख हवं आहे याचाच अर्थ ते सगळं मिळाल्यावर ते जास्त खुश किंवा समृध्द होतील असं माणसाला वाटतं. त्यामुळे इतर जण ज्या गोष्टींचा हव्यास धरतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य आणखी चांगलं होईल असं त्याला वाटतं त्याच गोष्टी आपल्याकडे हव्यात यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. इंटरनेट हे माध्यम तर माणूस ज्या इतरांची नकळतपणे नक्कल करत असतो त्या सगळयांना काय हवं आहे हे अगदी उघडपणे दाखवून देत असतं, जाहीर करत असतं. त्यामुळे याही बाबतीत माणूस त्यांची नक्कल करायला लागतो. यातून ही स्पर्धा आणखी वाढीला लागते.

ताबडतोब मी निकोलस कारनं या लेखानंतर लिहिलेल्या पुस्तकाची ऑर्डरच दिली. तेही पुस्तक मी अधाशासारखं वाचून काढलं. त्यापाठोपाठ या विषयावरची इतरही अनेक पुस्तकं वाचून काढली. त्या सगळयांमधला सूर अगदी सारखा होता. इंटरनेट, मोबाईल, टीव्ही आणि इतर सगळया डिजिटल माध्यमांच्या अतिरेकामुळे आपण स्वत: आपलं सत्त्व गमावून बसण्याच्या मार्गावर वेगानं प्रवास करत आहोत. आपल्यानंतरच्या पिढया तर चक्क निर्बुध्दच होणार आहेत असं अनेक जण म्हणतात. अर्थातच याच्या विरूध्द मत मांडणाऱ्या काही लेखांचाही मी फडशा पाडला; पण खरं म्हणजे मला त्यात फारसं तथ्य जाणवलं नाही.

या सगळया गोष्टींचे धोके जाणवून देणारं संशोधन आता अनेक ठिकाणी झालेलं आहे. त्याचे दाखले या पुस्तकाच्या योग्य त्या प्रकरणामध्ये तर दिलेलेच आहेत; पण त्यासंबंधी थोडक्यात इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. इंटरनेट, इमेल, फेसबुक, मोबाईल या गोष्टींमुळे आता आपण ज्या समाजाला ‘प्रगत’ म्हणतो त्यामधल्या लोकांना ‘स्विच ऑन’ आणि ‘स्विच ऑफ’ करणं यांच्यामधला फरकसुध्दा समजत नाही असं वारंवार दिसून आलं आहे. 2008 साली अमेरिकन ऑनलाईन (एओएल) या कंपनीनं केलेल्या तेरा वर्षं वयापुढच्या 4000 लोकांच्या एका सर्वेक्षणात 67 लोकांनी आपल्याला नव्या तंत्रज्ञानाचं व्यसन लागलं असल्याची कबुली दिली. सकाळी उठल्याउठल्या इमेल आणि फेसबुक बघणं, दिवसभर कामाच्या ठिकाणीसुध्दा वारंवार या तंत्रज्ञानाचा वापर करणं, संध्याकाळी घरी आल्यावरसुध्दा परत एकदा त्यांच्यामध्ये गुंतून राहणं या गोष्टी हे लोक करतात. याशिवाय स्मार्टफोनमुळे तर आता रात्रंदिवस हे सगळं आपल्या आसपासच असतं असं त्यांनी सांगितलं. ज्या तंत्रज्ञानामुळे आपण आपलं संभाषण कमालीच्या वेगानं करू शकू आणि त्यामुळे आपल्याकडे इतर गोष्टींसाठी खूप वेळ शिल्लक राहील असं मानलं जात होतं त्याच तंत्रज्ञानानं आपल्याभोवती एक विलक्षण मोठा विळखा घातला आहे.

काही लोकांना विकार जडला आहे असं आपण कधीतरी वाचलं असेल. हा विकार झालेले लोक सतत अस्वस्थ असतात. नकोसे झालेले विचार किंवा भ्रम आणि तशाच प्रकारच्या भावना, कल्पना तसंच भीती यांच्यामध्ये हे लोक सातत्यानं गुंतलेले असतात. परतपरत एकच गोष्ट ते करत राहतात. या सगळयातून ते स्वत:लाच एखादी गोष्ट करण्यापासून रोखूच शकत नाहीत. याची अनेक उदाहरणं देता येतील. काही जणांना सारखं सगळीकडे स्वच्छता करायचं वेडच लागतं. त्यामुळे ते सगळं साफ करत बसतात किंवा आपले हात साबणानं धुवत बसतात. काही जण सारखं दार लावलं आहे ना किंवा दिवे-पंखे बंद आहेत ना हे तपासत बसतात. काही जण पैसे किंवा दुसरं काहीतरी सारखं मोजत राहतात. एलियास अबुजॉड नावाच्या स्टॅनफर्ड विद्यापीठामधल्या मानसोपचारतज्ज्ञानं या संदर्भात लिहिलेल्या ‘व्हर्च्युअली यू’ नावाच्या अप्रतिम पुस्तकामध्ये या सगळया गोष्टींचे भयंकर दाखले दिले आहेत. अलीकडच्या काळात अनेक लोकांचा इंटरनेटचा वापर अशाच प्रकारच्या विकारामध्ये मोडतो असं अबुजॉड म्हणतो. इतर काही लोक इंटरनेटचा वापर करताना जुगाराचं व्यसन लागलेले लोक त्यापासून दूर राहू शकत नाहीत तशा धर्तीवर करतात असंही तो सांगतो. आपल्याला या लोकांवर नीटपणे उपचार करता यावेत यासाठी अबुजॉडनं अमेरिकेमधल्या इंटरनेटच्या वापराविषयीच्या सगळयात मोठया सर्वेक्षणात भाग घेतला. वेगवेगळया वयोगटामधल्या, सामाजिक स्तरावरच्या, आर्थिक गटांमधल्या एकंदर 2500 स्त्री-पुरूषांच्या या सर्वेक्षणात मिळालेले निष्कर्ष आपल्याला हादरवून सोडणारे आहेत असं अबुजॉड म्हणतो. आपलं वैयक्तिक आयुष्य; आपले मित्र, नातेवाईक, सहकारी; आपला जोडीदार; आपली मुलं; आपली कारकीर्द या सगळयांना धोक्यात आणू शकणाऱ्या सवयी इंटरनेटनं आपल्याला लावल्या असल्याचं अबुजॉड म्हणतो. त्यातच टीव्ही, मोबाईल फोन आणि इतर गॅजेट्स यांची भर पडल्यामुळे काय होत असेल याचा आपण विचारही करू शकणार नाही. आपण स्वत:कडे आणि इतरांकडे कोणत्या नजरेनं बघतो यातसुध्दा इंटरनेटच्या अतिवापरामुळे बदल होत असल्याचं अबुजॉड म्हणतो. यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र बदल होतात. आपल्या स्वत:च्या क्षमतांविषयी विनाकारण आत्मविश्वास निर्माण होणं, इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं, आपल्या नीतिमत्तेची संकल्पना बदलणं, विचारपूर्वक निर्णय घेण्यापेक्षा घाईघाईनं पटापट निर्णय घेऊन पुढे जाणं आणि एखाद्या लहान मुलासारखं उतावीळ असणं अशा अनेक गोष्टी त्यानं सांगितल्या आहेत. यामुळे आपण कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात कसे निर्णय घेतो आणि ते अमलात आणतो, इतरांशी कसं वागतो, बोलतो, लिहितो, विचार करतो, आपल्या आशाआकांक्षांविषयी काय पावलं उचलतो या सगळया गोष्टी खूप बदलतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त इंटरनेट किंवा मोबाईल उपकरणं वापरत असताना हे बदल घडतात असंही नाही. हे सगळे बदल आपल्या मेंदूत कायमसाठी कोरले गेल्यामुळे आपल्या इंटरनेट तसंच मोबाईल यांच्या बाहेरच्या प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा आपण तसंच वागायला लागतो. आपण जास्तच स्वार्थी आणि आत्मकेंद्रित होत जातो. यातून आपल्या वागण्याबोलण्यात सर्वसाधारणपणे असलेला सावधपणा कमी होत जातो. आपण अविचारी पध्दतीनं एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं, पटकन कुणाला दुखवून जाईल असं विधान करणं अशाही गोष्टी त्यातून घडू शकतात. आपण स्वत:विषयीच्या ज्या गोष्टींसंबंधी नाखुश असतो त्या झाकून टाकणं आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात जमत नसलं तरी इंटरनेटवरच्या बरेचदा निनावी असलेल्या आयुष्यात आपल्याला जमू शकतं. त्यामुळे आपल्याला इंटरनेटवर आणखी जास्त वेळ घालवावासा वाटतो. हे सगळं आपल्याला आणखी जास्त सुखद वाटत राहतं. ज्या गोष्टी बोलताना आपण सर्वसाधारणपणे दहा वेळा विचार करू त्या धाडकन बोलून टाकतो. यामागचं कारण म्हणजे इंटरनेटवर एकमेकांशी संवाद साधून समोरच्या माणसाला आपल्या बोलण्या/लिहिण्यानं काय वाटतं आहे याचा आपल्याला लगेचच अंदाज येत नाही. त्यामुळे आपण कधीकधी अविचारीपणानं काहीतरी लिहून टाकतो. ही सवय त्यानंतर आपल्या इंटरनेटबाहेरच्या संभाषणातही घडायला लागते.

यातून 1928 सालच्या जॉन मेनार्ड केन्स या महान अर्थतज्ज्ञाच्या भाषणाची आठवण आल्यावाचून राहात नाही. केंब्रिज विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना केन्सनं आपले विचार मांडले. त्यानंतर दोन वर्षं उलटून गेल्यावर केन्सनं या विषयावर एक प्रबंधसुध्दा लिहिला. केन्सच्या म्हणण्याचा सारांश म्हणजे भांडवलशाहीची प्रगती तसंच तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या सुधारणा यामुळे साधारण 100 वर्षांच्या काळानंतर सगळीकडे समृध्दीचे वारे वाहतील आणि 2030 साली सर्वसामान्य माणसाला एका आठवडयामध्ये सरासरी 15 तास काम करूनसुध्दा आरामात राहता येईल. म्हणजेच प्रचंड भरभराटीमुळे माणूस अफाट प्रगती करेल आणि त्याला घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं सतत काम करत राहावं लागणार नाही असा केन्सचा आशावाद होता. केन्सच्या म्हणण्यानुसार खरंच भांडवलशाही अर्थव्यवस्था विलक्षण वेगानं वाढली. तसंच तंत्रज्ञानामध्येही खूप सुधारणा झाल्या. पण कामाचे तास मात्र त्या वेगानं घटले नाहीत. केन्सच्या काळातल्या आठवडयाला सरासरी 45 तासांच्या कामाचा आकडा 2030 साली फार फार तर 35 तासांवर उतरेल असं आता मानलं जातं. असं का व्हावं? याचं उत्तर म्हणजे अर्थातच ही समृध्दी सगळीकडे एकसारखी आली नाही; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्यांना या समृध्दीचा लाभ मिळाला त्यांनीसुध्दा आपलं काम कमी केलंच नाही! उलट या लोकांनी आणखी समृध्दी म्हणजे आणखी पैसा कमावण्यासाठी जंग जंग पछाडलं आणि ज्या गोष्टीमुळे त्यांची कामातून सुटका होणं अपेक्षित होतं त्यामध्ये आणखी वाढ करून घेण्यासाठी आपलं काम काही कमी केलं नाही.

इंटरनेट, इमेल, फेसबुक, मोबाईल वगैरे गोष्टींचंही तसंच आहे. या सगळयांमुळे आपलं संभाषण विलक्षण वेगानं होऊ शकेल आणि उरलेला वेळ आपण आपल्या मुख्य कामांमध्ये घालवू असं पूर्वीपासूनच मानलं जातं. प्रत्यक्षातलं चित्र मात्र एकदम वेगळंच आहे. या साधनांनी/उपकरणांनी आपलं सगळं आयुष्य इतकं व्यापून टाकलं आहे की ‘मुख्य किंवा इतर आयुष्य म्हणजे काय?’ असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. केन्सनं जो आशावाद अर्थशास्त्राच्या संदर्भात मांडला होता तो माणसानं खोटा ठरवून स्वत:च्याच पायांवर धोंडा मारून घेतला आणि आता संवाद-संभाषण-करमणूक यांच्या संदर्भात तेच होतं आहे!

अनेक मानसोपचारतज्ज्ञ आता ‘इंटरनेटचं व्यसन’ हे इतर व्यसनांप्रमाणेच भयंकर असतं असं म्हणतात. या व्यसनाला इतर आजारांचा दर्जा द्यावा असं ते म्हणतात. कुठल्याही व्यसनाच्या बाबतीत आढळून येणाऱ्या गोष्टी इंटरनेटच्या व्यसनातही आढळून येतात असं मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात. खाणं तसंच झोप यांच्यावरची वासना उडणं, दर वेळी आपल्या व्यसनाची तल्लफ भागवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ‘डोस’ लागणं या गोष्टी इंटरनेटचं व्यसन लागलेल्या माणसांच्या बाबतीत आढळून येतात. इथे ‘डोस’ म्हणजे त्या माणसाला नवनव्या इमेल्स आलेल्या असणं किंवा फेसबुकवर लोकांनी त्याच्याविषयी लिहिलेलं असणं, त्याच्या अपडेट्सना ‘लाईक’ करणं असे प्रकार असतात. पण यातून इंटरनेटचं व्यसन लागलेल्या माणसांची निराशा सातत्यानं वाढतच जाते. कारण त्यांना कुणाची इमेल आलेली नसेल किंवा खूप कमी इमेल्स आलेल्या असतील तसंच फेसबुकवर काही नवं घडलेलं नसेल तर वैतागून जाऊन हे लोक परतपरत आपल्या इमेल्स चेक करणं किंवा फेसबुकवर जाणं असले प्रकार करायला लागतात. या खेपेला तरी आपल्याला इमेल्स आल्या असतील किंवा फेसबुकवर काहीतरी घडलेलं असेल अशी आशा त्यांना वाटत असते. यातून त्यांचा त्रागा वाढत जातो. हे लोक समाज, कुटुंब, खरे मित्र यांच्यापासून दूर जायला लागतात. हळूहळू याचं रूपांतर गंभीर नैराश्यामध्ये व्हायला लागतं. त्यातून ऑनलाईन गेम्स खेळणं, सैरभैर अवस्थेत इंटरनेटवरच्या कुठल्याही वेबसाईट्स बघत राहणं आणि कित्येकदा तर पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर तासनतास घालवणं असे प्रकार यातून सुरू होतात.

मानसशास्त्राचा सुप्रसिध्द अभ्यासक सिग्मंड फ्रॉईड यानं आपल्या लेखात माणूस स्वत:च्याच प्रेमात बुडाल्यासारखा कसा वागायला लागतो याविषयी लिहिलं आहे. तशीच परिस्थिती इंटरनेट आणि मोबाईल आपल्या बाबतीत तयार करतात असं अनेक अभ्यासक म्हणतात. आपल्याला इतरांकडून इमेल्स यायला हवं असणं, फेसबुकवरच्या आपल्या गोतावळयामध्ये सतत काहीतरी होत असणं, मोबाईलवर आपल्याला सतत फोन किंवा एसएमएस येणं याकडे आपल्यापैकी काही जण सातत्यानं नजर लावून बसतात. या सगळयाचं रुपांतर व्यसनामध्ये कधी होतं हे समजतसुध्दा नाही. इंटरनेट आणि मोबाईल यांच्या अतिवापरातून काही माणसं अशा प्रकारे स्वत:मध्ये इतका मग्न होऊन जातात की त्यांना सतत आपल्याला सुखद वाटतील अशा संवेदनांचा शोध घ्यावासा वाटतो. त्यातूनच सतत इमेल्स चेक करणं, फेसबुकवर जाणं, मोबाईल चेक करणं असे प्रकार वाढीला लागतात. बाहेरून आपल्याला हे संदेश आले आहेत असं न वाटता या गोष्टी म्हणजे आपल्या जणू प्रतिमाच आहेत किंवा आपल्या अवयवांना जोडल्या गेलेल्या गोष्टीच आहेत असं या माणसांना वाटायला लागतं.

मार्क लियरी नावाचा ‘डयूक युनिव्हर्सिटी’मधला मानसोपचारतज्ज्ञ फेसबुकला ‘स्वत:ची जाहिरात करण्यासाठीचं साधन’ म्हणतो. पूर्वी वस्तूंची जाहिरात केली जात असे आणि आता लोक स्वत:ची जाहिरात करतात असं तो म्हणतो. कारण फेसबुकचा वापर करून लोक आपल्या फक्त चांगल्या गुणांवर भर द्यायचा प्रयत्न करतात आणि त्याविषयीच बोलतात असं लियरीचं म्हणणं आहे. आपल्यामधले दोष आपल्याला माहीत असतात. पण ते झाकून टाकणं किंवा त्यांच्याविषयी अजिबात न बोलणं असे प्रकार यातून शक्य होत असल्यामुळे हा जाहिरातबाजीचा प्रकार आहे असं लियरी म्हणतो.

या सगळया गोंधळात बरेचदा सर्वसामान्य माणसाला तंत्रज्ञानाविषयीची खरी माहितीच मिळत नाही. कारण त्याविषयी लिहिण्यापेक्षा नुसतंच नव्या मोबाईल फोनची फीचर्स, अमुक माहिती इंटरनेटवर कशी शोधाल वगैरे प्रकारचंच लिखाण यावर होतं. तसंच नव्या तंत्रज्ञानाच्या या झपाटयाला इतकी अमाप प्रसिध्दी दिली जाते की जे सुरू आहे ते बरोबरच आहे असं एक चित्र सगळीकडे निर्माण केलं जातं. उदाहरणार्थ ऍपल कंपनीनं ‘आयफोन फोर’ किंवा ‘आयफोन फाईव्ह’ बाजारात आणल्यानंतर त्यावर कशा उडया पडल्या, त्यामध्ये काय काय सोयी आहेत यावर जग बदलून टाकणारी एखादी घटना घडल्यासारखं सगळीकडे बोललं गेलं. त्यामुळे यातल्या फोलपणाची नव्यानं खात्री झाली. साहजिकच या सगळया प्रकारावर लिहायलाच पाहिजे असं मी ठरवलं. सुरुवातीला एका दिवाळी अंकासाठी आणि एका दैनिकाच्या रविवारच्या पुरवणीसाठी असे दोन लेख मी लिहून काढले. पण ते अपुरे आहेत असं वाटायला लागलं. त्यामुळे याचं पुस्तकच केलं पाहिजे हे मी ठरवून टाकलं आणि ते लिहून काढलं. अर्थातच यातली भीषणता मराठी वाचकासमोर मांडावी आणि निकोलस कारसारख्या काही जणांनी सुरू केलेला हा लढा सगळयांसमोर मांडावा या भूमिकेतून हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे वाचल्यावर तरी इंटरनेट, मोबाईल, फेसबुक, टीव्ही वगैरेंची गुलामी झुगारून देऊन आपण या सगळयांवर कसा ताबा मिळवायचा याविषयी वाचक विचार करायला लागेल अशी आशा आहे!


Posted via Blogaway