March 04, 2015

ठंडा मतलब?

  • गेल्या रविवारी आपल्यापुढे एक चॉईस ठेवला होता. ‘‘शहाळ्याचे पाणी की कोका-कोला?’’ तुमचे उत्तर काय असेल ते असो, पण जगाचे त्यावर उत्तर आहे कोका-कोला! जगात कुठेही गेलो तर आपल्याला गल्लोगल्ली शहाळीवाले दिसत नाहीत. शहाळी पिकवणार्‍या दस्तूरखुद्द भारतात तर त्यांची संख्या हरघडी रोडावते आहे. मात्र कुठच्या कुठच्या खेडोपाडी कोका-कोला मिळण्याची शक्यता खूप मोठी आहे. तेव्हा बहुसंख्य जगाचा कॉल कोका-कोलाला आहे हे नक्की.
    वेगवेगळ्या सवयी, भिन्न आवडीनिवडी असलेल्या अब्जावधी लोकांच्या अधिराज्य गाजवणार्‍या या पेयाने त्यासाठी गेली एकशेअठ्ठावीस वर्षे सातत्याने ‘सॉफ्ट पॉवर’ या अस्त्राचा कसा खुबीने उपयोग केला त्या रोचक कहाणीतले हे काही किस्से.
    एक ग्लास कोको-कोलामध्ये सरासरी १0 साखरेच्या क्यूब्ज एवढी साखर असते. याशिवाय  फॉस्फॉरिक अँसिड. बाकी रंग आणि कर्बवायूमि२िँं१्रूँं१त पाणी. त्यामुळे त्यात फसफसणारा गुणधर्म येतो.
    कोका-कोलाचा फॉर्म्युला हे मात्र एक जबरदस्त गुपित आहे. आजवर अनेक आरोग्य संस्थांनी आणि ग्राहकहित सांभाळणार्‍या सेवाभावी संस्थांनी कोर्टात अनेकवेळा दावे लावले आणि आग्रह धरला की कंपनीने आपला फॉर्म्युला जाहीर करावा. कारण साखर, अँसिड, कर्बवायू आणि रंग हे मिश्रण माणसाच्या आरोग्याला अत्यंत घातक असू शकते. ही माहिती जगापुढे आणण्यात आजवर यश आलेले नाही. कंपनीचे म्हणणे असे की हा फॉर्म्युला ही आमची ‘बौद्धिक संपत्ती’ आहे. आणि ती गुप्त राखण्याचा आमचा अधिकार आहे. कोका-कोलाच्या फॉर्म्युलाबद्दल इतकी प्रश्नचिन्हे का? तर आता या ‘बौद्धिक संपत्ती’विषयी थोडसे!.
    त्याचे असे झाले, अमेरिकेतील अटलांटा येथे जॉन पेंबरटन नावाचा फार्मासिस्ट राहात होता. तो आपली फार्मसी चालवीत असे. त्याला मॉर्फीन या अंमली द्रव्याचे व्यसन लागले. काही केल्या ते सुटेना. आता हा पठ्ठय़ा स्वत: रसायनशास्त्रज्ञ. तेव्हा त्याने या संबंधी अनेक प्रयोग चालू केले. कोका या वनस्पतीच्या पानापासून मिळालेले कोकेन आणि कोला या फळापासून काढलेले कॅफीन ही दोन द्रव्ये एकत्रित केली आणि त्यात साखर आणि कर्बवायूयुक्त पाणी घातले. तयार झालेले फसफसणारे पेय अगदी मॉर्फीन इतकी नाही, पण बर्‍यापैकी झिंग देऊ शकत होते. हे पेय त्याने प्रथम आपल्या फार्मसीत विकायला ठेवले. लोकांना ते प्रचंड आवडू लागले. त्याचा दणदणीत खप होऊ लागला. बरे, फार्मसीमध्ये ते विकत मिळत होते, म्हणजे त्यात हानिकारक काय असणार? उलट औषधीगुण असला पाहिजे अशी समजूत होण्यास त्याचा फारच उपयोग झाला. १८८६ साली स्वत:ची कंपनी स्थापन करून जॉन पेंबरटन फार्मासिस्टचे उद्योजक बनले. ‘पोट बिघडलंय, मग पूरक आहार म्हणून कोका-कोला प्या’ असे आता अनेक डॉक्टर्सही सांगू लागले. र्जमनीत तर अजूनही लहान मुलांचे पोट बिघडले की सर्वसामान्य मध्यमवर्गीय माउल्या डोळे मिटून पोराला कोक पाजतात. हे पेय त्याच्या रंगामुळे, फसफसणार्‍या रूपामुळे आणि ‘किक’ देणार्‍या गुणामुळे अमेरिकेत अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाले. आता सीमा ओलांडून जग जिंकण्याचा त्याला ध्यास लागला. ग्रीग्ज कँडलर हा मार्केटिंग गुरु सतत नवनवीन क्लुप्त्या शोधण्यासाठी प्रसिद्ध होता. कोका-कोलाच्या पॅकिंगसाठी लाल-पांढरा रंग निवडलेला होता आणि त्यावरची ती पल्लेदार अक्षरे. माणसाचा मेंदू अक्षरे वगैरे वाचण्याआधी रंग वाचतो, ओळखतो. तेव्हा हे लाल पांढरे कॉम्बिनेशन गुपचूपपणे आणखी कुठे बरे वापरता येईल? यावर विचार सुरू झाला. हे कॉम्बिनेशन पहाताच चटकन कोका-कोला आठवला पाहिजे हे सूत्र. सर्व लोकांनी हौसेने आवडीने कोक प्यायला पाहिजे. त्याला सर्व वयोगटात मान्यता मिळाली पाहिजे. ‘अँसिड+साखर+व्यसन लावणारा गुणधर्म’ या मिश्रणाबद्दल विरोध करण्याची त्यांची क्षमता समूळ नष्ट झाली पाहिजे. काय युक्ती करावी बरे? 
    - सापडली! तशी योग्य युक्ती सापडली. सांताक्लॉजचा मूळ हिरव्या रंगाचा पोशाख बदलून त्याचा पोशाख कोको-कोलाच्या रंगसंगतीत बनवला गेला. कोकाकोलाची यशस्वी घोडदौड चालू रहाण्यास मग त्या कंपनीने कोलंबिया पिक्चर्स ही कंपनी विकत घेतली. त्यामुळे सिनेमातला तहानलेला हिरो नेहमी कोका-कोला पीत राही. आपले बॉलिवूडचे हिरो तेच करतात. 
    कोकाकोलाचे घवघवीत यश पाहून जगभर शीतपेये बनवणार्‍या इतर काही कंपन्या स्थापन होऊ लागल्या. लोकांच्या मनाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत राहिल्या. त्यातले सर्वात मोठे नाव म्हणजे पेप्सी.  जगभर ‘कोलावॉर’ सुरू झाले. पेप्सी आणि कोक यांच्यात तुंबळ जुंपली. कधी पेप्सीने ३३.८% जगाचे मन जिंकले तर कधी कोलाने ३३.९% जगाचे. (मार्केट शेअर)  कोका-कोला कंपनीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कोका-कोला कंपनीची धुरा रॉबेटरे गोईत्सुएटा नावाच्या इटालियन वंशाच्या एका चलाख चेअरमनच्या खांद्यावर देण्यात आली. पदभार स्वीकारताच त्याने प्रथम एक गोष्ट केली. प्रत्येक देशाच्या मार्केटिंग मॅनेर्जसची एक मोठी बैठक बोलावली. जो तो आपापल्या देशाची कोकच्या आणि पेप्सीच्या खपाची आकडीवारी सादर करू लागला. एकूण चित्र भारीच निराशाजनक होते. रॉबेटरे गोईत्सुएटाने या सर्व दु:खभर्‍या कहाण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि मग त्यांनी या सर्व देशविदेशाच्या मॅनेर्जसना फक्त एक आकडेवारी सादर करण्याची आज्ञा सोडली. 
    कोणती आकडेवारी? तर आपली तहान भागवण्यासाठी २४ तासांत माणूस सरासरी किती लिटर पेये पितो? ती कोणती? तर मुख्यत: पाणी, चहा, कॉफी इ. आणि या पेयांच्या तुलनेत कोक पिण्याचे प्रमाण किती आहे? ही आकडेवारी पुरेशी बोलकी होती. यापुढची रॉबेटरे यांची टिप्पणी होती - ‘‘लोकहो म्हणजे आपली स्पर्धा पेप्सीच्या बरोबर नाहीये. तर ती या इतर पेयांबरोबर आहे. मग काळजी कसली? माणसाला तहान लागली की थंडगार पाण्याऐवजी त्याला थंडगार कोकच्या फसफसत्या ग्लासची आठवण यावी असे काहीतरी केले पाहिजे. त्यादृष्टीने आपले मार्केटिंग झाले पाहिजे’’ मग या बैठकीत पुढील स्टॅटेजी ठरली. पहिल्या प्रथम जगातल्या सर्व लहानमोठय़ा रेस्तराँच्या मालकांच्या संमतीने सर्वत्र काम करणार्‍या यच्चयावत वेटर्सना ट्रेनिंग देण्यात आले. ट्रेनिंग अर्थात पंचतारांकित माहौलमध्ये. सर्व वेटर्सना पढवण्यात आले की ग्राहक येऊन बसला की मेन्यूकार्ड देतादेताच विचारायचे ‘आपल्याला प्यायला काय आणू? कोला? वाईन? बिअर?’’ 
    - माणसाची सहज प्रवृत्ती म्हणजे मेन्यूकार्ड उघडायच्या आधी फक्त तीन चॉईस दिले की वाइन, बिअरकडे जाण्याआधी तो नकळत पहिला चॉईस स्वीकारतो. या इटालियन मॅनेजरच्या कारकिर्दीत कोको-कोलाचा खप गगनाला भिडला हे सुज्ञास सांगणे न लगे. पण त्याहीपलीकडे जाऊन माणसाच्या मनाचा सामूहिक ताबा मिळवणारी सॉफ्ट पॉवर नव्या करिष्म्यासह उद्योगजगताच्या गळ्यातला ताईन बनली.
    ठंडा मतलब? पाणी? लस्सी? रातांब्याचे सरबत? छेऽ छेऽऽ ठंडा मतलब कोका-कोला !
    हिरवा सांताक्लॉज जेव्हा लाल-पांढरा होतो.
    सांताक्लॉज हा लहान थोर, आबालवृद्ध सर्वांमध्ये लोकप्रिय. शिवाय त्याला थोडी धार्मिक बैठक.  युरोप, अमेरिका आणि इतर सर्व ख्रिश्‍चन जगाला आणि विशेषत: त्यातल्या मुलांना सांताक्लॉज किती प्रिय ! या सांताक्लॉजचा मूळ झगा हिरव्या रंगाचा होता, हे आज कुणाला आठवणारही नाही. त्याला (आपल्या कंपनीच्याच) लाल-पांढर्‍या रंगाचा नवा झगा चढवून सांताक्लॉजचे नवे रुपडे रूढ केले ते कोकाकोलाने! नुसता जाहिरातींचा धडाका लावून एखादे उत्पन्न सव्वाशे वर्षांपासून नाही विकता येत. तर त्यासाठी अशी सॉफ्ट पॉवर वापरावी लागते. लोकांच्या मनाचा गुपचूप ताबा घ्यावा लागतो.

March 03, 2015

अफुचा वळसा

                     फार  फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी आयाबायांना घर-शेताची, पोराबाळांची उस्तवार एका हाती करता करता नाकी नऊ येत. त्या काळी काही ‘एक मूल, गुलाबाचे फूल’ असा प्रकार नसे. एक चालते, एक रांगते, एक पालथे, एक पिते मूल. तिने कसा बरे उपसावा हा सारा खसाला. मग एखादे पोर भारीच किरकिरे निघाले तर ती माउली रोजच्या बाळगुटीत अफूचा वळसा उगाळी. त्यातला खारीक-मधाचा गोडवा ओळखीचा. बाळ मुटुमुटू गुटी चाटून टाकी. त्या अंमलाखाली मूल सुशांत निजे. त्या माउलीचा दिवसभराचा कार्यभाग विनासायास पार पडे. या भानगडीत त्या बाळाला ‘माझे अंथरुण ओले झाले आहे’ ‘माझे पोट दुखते आहे.’ ‘मला भूक लागली आहे’ असे काहीबाही म्हणण्याची शुद्ध (किंवा मुभा) रहात नसे, हा मुद्दा अलाहिदा.

आपल्या कार्यभागात अडथळा आणणार्‍यांना चतुराईने गप्प करण्यासाठी मनुष्यस्वभाव वेगवेगळे मार्ग निवडतो. आडदांड आणि विनाशकारी वृत्तींना बंदुकीचा धाक दाखवून गप्प करावे लागते, तर बिलंदर वृत्तींना लाडूवडीचे आमिष पुरते. एकूण काय तर वय, वृत्ती, परिस्थिती याचा लेखाजोखा घेऊन आपल्या कामात अडचण आणणार्‍यांना गप्प करता येते. आणि त्या योगे कार्यभाग बिनबोभाट उरकता येतो. लेकुरवाळी माउली हे आपले एक प्रतिनिधिक उदाहरण. मुळात हा मनुष्यस्वभाव.

हा मनुष्यस्वभाव एखाद्या शितासारखा. त्याचे प्रतिबिंब संपूर्ण भातात म्हणजे समाजात न पडले तर नवल. कुटुंब हा मनुष्यसमाजाचा एक छोटा आरसा. अशा अनेक कुटुंबाचा बनतो समाज. अठरापगड समाजांचे बनते राष्ट्र आणि अशी अनेक राष्ट्रे मिळून बनतो विश्‍वसमुदाय. आजच्या भाषेत ग्लोबल व्हिलेज.
आपले कुटुंब ही जणू मनुष्यस्वभावाला पैलू पाडणारी एक प्रयोगशाळा असते. प्रत्येक कुटुंबात वर्चस्वासाठी रस्सीखेच असते. हेवेदावे असतात. इतरांचा आवाज कौशल्याने गप्प करण्याचे प्रयोग सुरू असतात. हेच सर्व प्रयोग प्रथम समाजाच्या, मग देशाच्या प्रांगणात सुरू राहतात. त्यातले सदस्य म्हणजे त्यातले विविध समूह. अनेक धर्मांचे, व्यवसायांचे, आकाराने मोठे-छोटे, त्यातले काही चलाख, काही आडदांड, काही बघे, काही तान्हे. या सर्वांची उस्तवार गाडा हाकणार्‍याला अनेक आघाड्यांवर करायची असते. कामे निपटायची असतात. गटागटातील भांडणे मिटवण्यात भारी वेळ जातो. मग प्रत्येक गटाचे वय आणि वृत्ती पाहून कधी अफू, कधी लाडूवडी तर कधी शिप्तराचे फटके अशी अस्त्रे वापरावी लागतात आणि कामात अडथळा आणणार्‍यांना गप्प करावे लागते. हाच खेळ जगाच्या प्रांगणात विस्तारित पडद्यावर पहायला मिळतो. त्यातले सदस्य म्हणजे लहानमोठी राष्ट्रे. त्यांच्यातले सख्खे चुलत. भाऊबंदकी. क्वचित साटेलोटे. आज या विश्‍वसमुदायातील लोकांची संख्या आहे सहा अब्जाच्यावर. या सहा अब्जांना गप्प करून आपला कार्यभाग बिनबोभाट उरकायचा म्हणजे काय खायचे काम? बरे या वर्चस्वासाठी धडपडणार्‍या अनेक पाटर्य़ा, व्यापारी, उत्पादक, माध्यमे, राजकीय मुत्सद्दी, धर्म, भाषा. अगदी इतिहासकार आणि संस्कृतीसुद्धा या वर्चस्व झगड्यातून सुटलेल्या नाहीत. सार्‍या जगातील अब्जावधी प्रजेने आपली उत्पादने वापरावी, आपल्या गटाची भाषा बोलावी, आपलाच धर्म स्वीकारावा आणि आपल्या गटाची संस्कृतीच सार्‍या जगभर नांदावी- असा हा वर्चस्ववादी अट्टहास.
यातल्या काही पाटर्य़ा शरीरबळावर आणि शस्त्र बळावर धाकदपटशा करू पाहातात तर काही पाटर्य़ा मधात उगाळलेली अफूची गोळी चाटवून विरोधाची किरकिर बंद करण्याचे कसब दाखवतात आणि कोणाच्याही न कळत आपला कार्यभाग बिनबोभाट उरकतात. बाळगुटी नेहमी गोड असते. ती इवलीशी मात्रा असते. दररोज न चुकता दिली जाते. आणि ती चांदीच्या बोंडल्यात असते. ‘अंथरुण ओले झाले आहे ते बदला’ असा टाहो फोडण्याचा जन्मसिद्ध हक्क ती विसरायला लावते.

- या बाळगुटीचे नाव ‘सॉफ्ट पॉवर’.
 सॉफ्ट म्हणजे मऊ, मृदू. पॉवर म्हणजे नियंत्रणक्षमता किंवा समुदायावर वर्चस्व स्थापण्याची क्षमता.
 ही ‘सॉफ्ट पॉवर’ नावाची बाळगुटी आज जगभर आपल्या सर्वांना सतत चाटवली जात आहे. अगदी त्यातल्या अफूच्या वळशासह चोरपावलाने आणि आपल्या नकळत. उद्देश सरळ आहे. माणसाची स्वतंत्र विचार करण्याची, विरोध करण्याची शक्ती जितकी कमी होईल तितके बरे.
 विश्‍वास नाही ना बसत? मग खालील प्रश्नांची स्वत:पुरती उत्तरं द्या बरं!

  • तुम्ही प्रवासात आहात. वाटेत भूक लागलीये. शेजारी शेजारी दोन रेस्तराँ आहेत. एकावर पाटी आहे. ‘ताज्या भाजणीची थालीपीठे मिळतील.’ दुसरे रेस्तरॉ आहे मॅक्डोनल्ड. तुमची पावले कुठे वळतील? 
  • कुठेसा भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. तुम्ही गडबडीने टीव्ही लावता, तर तुम्ही दूरदर्शन लावाल? की बीबीसी किंवा तत्सम परदेशी वाहिनी? 
  • लेकरू तीन वर्षांचे आले म्हणताना योग्य शाळेच्या शोधाशोधीत तुम्ही आहात, तुमचा सहज कल मराठी माध्यमाच्या शाळेकडे जातो? की इंग्रजी माध्यमाच्या? 8तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला स्थलांतर करावेसे वाटत आहे. तर तुम्ही अमेरिकेच्या वकिलातीसमोर लाईन लावाल? की ‘ब्रीक्स’ (इफकउर) म्हणजे ब्राझील, रशिया (इंडिया), चीन, दक्षिण आफ्रिका या चारांपैकी कोणत्या तरी एका देशाच्या वकिलातीपुढे? 
हो, ठाऊक आहे. तुमच्या चॉईसला तशी कारणे आहेत. ती आजच्या मूळ प्रवाहाबरोबर वाहात जाताना क्षणभर सयुक्तिक वाटू शकतात. ‘‘मॅक्डोनल्ड निदान स्वच्छ तरी आहे. काय जाणो भाजणी ताजी आहे का नाही?’’. ‘‘मराठी शाळा? माझ्या लेकराला पुढे जाऊन न्यूनगंड आला तर?’’ . असे काही बाही.

- अगदी कबूल ! पण क्षणभर विचार करून बघा, मॅक्डोनल्डच्या जाहिराती आणि त्या भोवतालचे प्रतिमेचे वलय आपले डोळे इतके दिपवते की त्या खाण्यात शरीराला अपायकारक असे काही असू शकते अशी आपल्याला शंकासुद्धा येत नाही. हवामानानुरूप आहार आणि त्यातला सकसपणा ही साधी गोष्ट विसरायला होते.

 बीबीसीचे डोळेच आपल्याला खरी बातमी देण्याची क्षमता बाळगतात असा आपला ठाम विश्‍वास आहे.
 भारतीय भाषा या टाकावू. इंग्रजी टिकावू. ती बोलता आली की आपण ज्ञानी झालो, शहाणे झालो या भ्रमाची गुंगी साधारत: एकोणिसाव्या शतकापासून आपल्याला चढवली गेली आहे. ती उतरण्याचे नाव म्हणून घेत नाहीत. बरं हा माध्यमाचा प्रश्न कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि इंग्रजेतर युरोपियन देश असा इतरत्र कुठेही का बरे पडत नाही? तिथे मातृभाषेतून शिक्षण ही गोष्ट श्‍वासोच्छ्वासाइतकी सहजमान्य आहे, ते आपल्याला का पटत नाही?
 अमेरिकेएवढा कर्जबाजारी देश आज दुनियेत क्वचितच असेल. पण अमेरिकन इमेजचे गारुड असे काही आकर्षक की त्याने जगभरातील बुद्धिमत्ता पूर्ण झपाटली जावी! जगाचा नकाशा उलगडून पाहिला तर ब्रीक्स देशांतच पुढला विकास शक्य आहे ही गोष्ट ‘करतलआमलक’वत म्हणजे तळहातकावरल्या आवळ्याइतकी स्पष्ट आहे. हे सर्व कळते पण वळत नाही.

- तर हा असा असतो सॉफ्ट पॉवरचा प्रताप. प्रश्न विचारण्याचे, विरोध करायचे सार्मथ्य तो विसरायला लावतो. केवळ एकट्या दुकट्याला नव्हे, तर अखंड मानवसमुदायाला ही सॉफ्ट पॉवर नावाची बया साधा कॉमनसेन्स वापरण्यापासून परावृत्त करू शकते. लाओत्से या चिनी तत्त्ववेत्याने हजारभर वर्षांपूर्वी म्हणून ठेवले आहे. ‘‘सॉफ्ट इज हार्ड’’ म्हणजे मृदू वाटणार्‍या गोष्टीत वज्रासारखे काठिण्य असू शकते. एखाद्या कातळावर वर्षानुवर्षे पाणी ठिबकत राहिले तर तो सहज भंगू शकतो. तसेच समाजमनावर वर्षानुवर्षे अमुक एक गोष्ट बिंबवली तर कुठलाही अजस्त्र मानवसमाज हवा तसा वळवता येतो. हतगात्र करून टाकता येतो. त्याच्या मनावर अनिर्बंध अधिसत्ता गाजवता येते.

ही सॉफ्ट पॉवर हे आगामी युगाचे प्रभावी अस्त्र बनत चालले आहे. अनेक राष्ट्रे अत्यंत दूरदुष्टीने हे अस्त्र वापरत आहेत. भांडवलदार त्यात प्रचंड पैसा गुंतवत आहेत. जगातील विविध भाषा आणि संस्कृती जगातील सहाअब्ज लोकांचे लक्ष सतत स्वत:कडे वळत रहावे अशा कसून प्रयत्नात आहेत. स्वत:च्या संस्कृतीतील काळ्या बाजू लपवून फक्त उजळ बाजू रंगमंचावर सादर करीत आहेत. ते ही अगदी साळसूदपणे.

 - तर अशा या सॉफ्ट पॉवरच्या सुरस आणि चमत्कारिक कथा हा या लेखमालेचा विषय आहे. त्यासाठी आपण जगभरातल्या घडामोडींची सफर करणार आहोत. कधी इतिहासाला स्पर्श करणार आहोत तर कधी दैनंदिन जीवनाला. कधी माध्यमविश्‍वात डोकावणार आहोत तर कधी आंतरराष्ट्रीय राजकारणात. ही सफर चालू होईल पुढल्या रविवारी.

तोपर्यंत शहाळ्याचे पाणी घेणार? की थंडगार कोकोकोला?

 - वैशाली करमरकर

March 02, 2015

तो आणि ती भाग..१६ --जेव्हा 'तिला' मुलं बघायला येतात

त्याला नोकरी शोधण्यासाठी थोडा वेळ मिळावा म्हणून तिनं घरी चहा-पोह्यांच्या कार्यक्रमांना इच्छा नसतानाही होकार दिला. त्यानं प्रयत्नांची शर्थ केली. पण रिसेशनमुळे चांगली नोकरी हातात पडत नव्हती. शेवटी एका चांगल्या कंपनीचा कॉल आला. अंधारात चाचपडताना आशेचा किरणसुद्धा प्रखर वाटू लागला.

तिनं चहा-पोह्यांच्या कार्यक्रमांना होकार दिल्यावर घरची मंडळी कामाला लागली. जोशीकाकांच्या उत्साहात तर भरच पडली. त्यांच्याजवळ आधीच स्थळांची भलीमोठी यादी तयार होती. त्या यादीतील नावांची छाननी करून एकापेक्षा एक सरस अशी स्थळं सिलेक्‍ट करण्यात आली. अर्थात, तिच्या मम्मी-पप्पांनी सिलेक्‍शन केलं असलं, तरी जोशीकाकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं होतं. जोशीकाकांनी सिलेक्‍ट केलेल्या मुलांशी बोलून "बघण्या'च्या कार्यक्रमाची तारीख आणि वेळ निश्‍चित केली. तिला "फाइव्ह डे वीक' असल्यानं सोयीनुसार शनिवार-रविवार राखून ठेवण्यात आला.

या शनिवारी तिला बघायला दोन स्थळं येणार होती. एक दुपारी आणि एक सायंकाळी. त्या दोघांचा भेटण्याचा कार्यक्रम ओघाओघानं कॅन्सल झाला. दोघांची थोडीफार चिडचिड झाली. दुपारी मुलगा बघायला येणार असल्यानं तिच्या मम्मीनं सकाळीच हिरव्या रंगाचा शालू कपाटातून बाहेर काढून ठेवला होता. तो शालू घरात येता-जाता तिच्या नजरेस पडत होता. त्यावरून अधेमधे मम्मीशी खटके उडत होते. पप्पांनीही खाण्या-पिण्याचा पदार्थांपासून तयारी चालविली होती. जणू आज त्यांच्या घरी काही खास समारंभ आहे, अशा थाटात तिचे मम्मी-पप्पा वावरत होते. तिला मात्र काही देणं-घेणं नव्हतं. ती आपली निवांत होती. अगदी बारा-साडेबारादरम्यान तिनं अंघोळ आणि जेवण आटोपलं. त्यानंतर आयपॉडवर गाणी ऐकत बसली.

दुपारी दोन वाजता पहिला मुलगा आणि त्याचे आई-वडील घरी आले. मुलगा पुण्यातल्या एक मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. सध्या तो एका प्रोजेक्‍टवर सिंगापूरला काम करीत होता. उंचापुरा-देखणा आणि विशेष म्हणजे पाच आकडी पगार असलेला हा मुलगा तिच्या मम्मी-पप्पांना आधीच आवडला होता. याखेरीज तो त्यांच्या दूरच्या मावशीचा जवळचा नातलग असल्यानं त्याला प्रायॉरिटी देण्यात आली होती. प्रारंभी थोडी तोंड ओळख झाल्यावर बेगडी शालीनता पांघरून ती बैठकीत आली. मुलाच्या आईनं तिला काही टिपिकल प्रश्‍न विचारले. तिनं यथायोग्य उत्तरं दिलीत. मुलाच्या वडिलांनीही आपली उपस्थिती नजरेस आणून दिली. मुलाची आई तिच्याकडे बघून म्हणाली, ""हे बघ...! तुझ्या नोकरीला आमची हरकत नाही. तू लग्नानंतरही आपल्या करिअरकडे लक्ष देऊ शकतेस. पण आमच्या घरी बाहेरच्या बाईनं स्वयंपाक केलेला ह्यांना चालत नाही. मी आजही पूर्ण स्वयंपाक करते. तुला नोकरी सांभाळून सकाळी मला स्वयंपाकात मदत करावी लागेल. आणि रात्री पूर्ण स्वयंपाक. तुला पटतंय का ते बघ...'' ती काहीच बोलली नाही. फक्त थोडा वेळ त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बघत होती. ""तुम्हाला नोकरी नसल्यानं तुम्ही स्वयंपाक केला नाही, तर शेजार-पाजारच्या बाया नावं नाही का ठेवणार! आणि मी दहा तासांची ताणतणावानं ओतप्रोत भरलेली नोकरी सांभाळून तुम्हाला स्वयंपाकात मदत करायची, अशी अपेक्षा तुम्ही धरता. कमालच आहे बुवा तुमची! तुमचा मुलगा करतो का नोकरीवरून आल्यावर स्वयंपाक... स्त्रीच स्त्रीची शत्रू असते, ही म्हण तुमच्यावरूनच पडली असावी...!'' ती मनातल्या मनात पुटपुटली. तिच्या मम्मीनं दोघींमधील छुपा "सुसंवाद' अचूक टिपला. वातावरणातील तणाव दूर करण्यासाठी तिची मम्मी म्हणाली, ""आमच्या हिला ना... पूर्ण स्वयंपाक येत नसला, तरी काही पदार्थ ती अप्रतिम करते. (तिच्या डोळ्यांसमोर गाजराचा हलवा तरळून आला) लग्न होईस्तोवर स्वयंपाक करायला ती सहज शिकेल.'' तिचे पप्पा गप्पच होते. मुलाच्या आईचं वागणं कदाचित त्यांना खटकलं होतं.

सायंकाळी सहा वाजता दुसरा मुलगा बघायला आला. तो मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर होता. त्याचे आई-वडीलसुद्धा वैद्यकीय व्यवसायात होते. या मुलाचाही पगार पाच आकडी होता. याखेरीज कोकणात भरपूर वडिलोपार्जित जमीन. मुंबईत दोन प्रशस्त फ्लॅट. चहा-पोहे झाल्यावर खरी बैठक सुरू झाली. मुलाच्या आईनं पुन्हा टिपिकल प्रश्‍नांचा पाढा वाचला. तिला उत्तरं अगदी पाठ झाली होती. हे कुटुंब थोडं "मॉडरेट' असल्यानं त्यांनी मुलाला आणि मुलीला बोलायला मोकळा वेळ दिला. मुलाचे वडील रिटायर्ड असल्यानं थोडे गप्पिष्ट होते. मुलाच्या आई-वडिलांना तिच्या नोकरीविषयी काही तक्रार नव्हती. त्यांच्या घरीही थोडं मोकळं वातावरण होतं. स्थळ तसं अनुरूप होतं.

रात्री जेवण झाल्यावर मम्मी-पप्पांनी स्थळांचा विषय काढला. त्यांना दुसरं स्थळ आवडलं होतं. त्यांनी तिला विचारल्यावर तिनं साफ इन्कार केला. मुलगा दिसायला चांगला नव्हता, अशी पळवाट तिनं काढली. त्यावर त्यांनी काही आक्षेप घेतला नाही. "तुला नाही ना पसंत. मग नको करू... त्यात काय एवढं...!' एवढंच ते म्हणाले. चहा-पोह्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली हीच त्यांच्या दृष्टीनं आनंदाची बाब होती. आणि तिला काही कमी स्थळं चालून आलेली नव्हती. आज नाही तर उद्या पसंत पडेल, असं त्यांना वाटलं.

रविवारी सायंकाळी दोघं संभाजी उद्यानात भेटले. तिनं सगळी हकिकत सांगितली. ""मला वाईट वाटतं रे लोकांची मनं दुखवायला. लोकं किती तरी अपेक्षा घेऊन मुली बघायला जातात. त्यांच्या आशा-अपेक्षांच्या आपण ठिकऱ्या उडवतोय,'' ती कळवळून म्हणाली. त्याचंही तसंच मत होतं. त्याचा तर चहा-पोह्यांच्या कार्यक्रमालाच विरोध होता. तिनं दुसऱ्यांसमोर पोह्यांचा ट्रे घेऊन जावं, हे त्याचं मन स्वीकार करीत नव्हतं. तो म्हणाला, ""मला एक कंपनीची ऑफर आहे. पण पगार काही मनाजोगा नाही. सध्या दहा हजार देतो म्हणालेत. पुढे परफॉर्मन्स बघून वाढवतील. करू का ही नोकरी?'' ती म्हणाली, ""चालेल. आणि पुढच्या रविवारी तू माझ्या मम्मी-पप्पांना भेटायला ये. आता पुरे झालं हे नाटक. कमी पगाराची का असेना, नोकरी आहे ना हातात. बघू या काय होतं ते.'' त्यानंही होकारार्थी मान हलविली.



(क्रमशः)

तो आणि ती भाग..१८-तिच्या मम्मी-पप्पांशी त्याचा शर्थीने सामना

दोघंही एकमेकांच्या घरी गेले. घरच्यांशी ओळख करून घेतली. मोठ्या हिमतीनं लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्याच्या आईनं अनुकूलता दर्शविली; पण तिच्या मम्मी-पप्पांच्या मताचं गूढ अद्याप कायम होतं. त्यांनी त्याच्या आई-वडिलांना घरी येण्याची गळ घातली.

रात्री दोघे नेटवर चॅटिंग करीत होते. ती म्हणाली, 'मी घरी आपल्याबद्दल सगळं सांगितलंय. मम्मी थोडी नाराज वाटली; पण पप्पा समजून घेतील असं वाटतंय. बघू या काय होतं ते...!'

"तुझ्या घरी काय झालं? तू सांगितलंस त्यांना आपल्याबद्दल?'' ती लिहीत होती. (स्मायली)
तो म्हणाला, "होय, मीसुद्धा घरी सांगितलंय. बाबा जाम चिडलेत. ते काहीबाही बोलत होते. पण एक गोष्ट आपल्या बाजूनं आहे- मला आईचं खंबीर पाठबळ मिळालंय. तिला तुला भेटायचंय. तू तिला आवडलीस ना, की आपण पन्नास टक्के लढाई जिंकली म्हणून समज. तू फक्त तिला इम्प्रेस कर. ती आपल्यामागे उभी राहिली ना, की जगातली कोणतीही शक्ती आपल्याला विभक्त करू शकणार नाही. तू उद्याच तिला भेटायला घरी ये. तिनं खास तुझ्यासाठी ऑफिसातून सुटी घेतली आहे.'' (स्मायली स्मायली)

"बरं मी येते दुपारी तुझ्या आईला भेटायला. अरे, पण माझ्या घरी एक नवीन प्रॉब्लेम झालाय. पप्पांनी तुला पुढल्या रविवारी घरी भेटायला बोलवलंय,'' तिनं माहिती पुरवली. (गंभीर स्मायली)

"बाप रे...' आता काय होणार! मला तर साधा कांदेपोह्यांचाही अनुभव नाही. तुझ्या मम्मी-पप्पांशी मी काय बोलणार? मला तर काहीच सुचत नाहीए. एकाच वेळी दोघांशी बोलायचं, आपली बाजू पटवून द्यायची, त्यांचा होकार मिळवायचा... बाप रे बाप! काय होईल गं...? त्यांच्याशी कसं बोलायचं...?'' भीतीची अनामिक लहर त्यांच्या सर्वांगातून गेली. (डोळे विस्फारलेली स्मायली)

ती म्हणाली, "अरे घाबरू नकोस. तुझ्या आई-वडिलांशी बोलतोस ना, तसंच बोलायचं. आणि मी असेन ना तुझ्यासोबत. आपण मिळून आपली बाजू मांडू या. तू कुठे कमी पडला की मी तुला साथ देईन. मी कुठे अडखळले तर तू सांभाळून घे... अरे पाण्यात उडी मारल्याशिवाय थोडंच पोहता येईल. तेवढं धाडस तर करावंच लागेल ना...! मी उद्या सुटी घेते आणि तुझ्या आईला भेटायला येते.'' (डोळे मिचकवत हसणारी स्मायली)

त्यांचं संभाषण संपलं असलं तरी तिच्या घरी जाण्याच्या कल्पनेनं तो पुरता घाबरला होता. तो तसाही जीडी-पीआयमध्ये कच्चा होता. कॉलेजात कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये या एकाच कारणामुळे तो एलिमिनेट झाला होता. आता तिच्या मम्मी-पप्पांशी भेटायचं म्हणजे एक घरगुती कॅम्पस इंटरव्ह्यूच होता. आणि तो कसाही करून क्रॅक करायचा होता. कारण प्रश्‍न दोघांच्या आयुष्यांचा होता.

दुसऱ्या दिवशी दुपारी ती त्याच्या घरी आली. आईनंच दार उघडल्यानं दोघींची दारातच तोंडओळख झाली. तोही घरी होता. थोडं जुजबी बोलणं झाल्यावर आईनं त्यांच्यासाठी साजूक तुपातला शिरा केला. तिनंही आईला मदत केली. शिरा करताना दोघींचं अखंड संभाषण सुरू होतं. त्यानं दोघींना बोलायला मुद्दाम मोकळा वेळ दिला होता. आपल्या मुलाला एवढी देखणी, सुशील, समजूतदार मुलगी कशी काय गवसली, याचा आईला हेवा वाटत होता. आपला मुलगा कधी मोठा झाला याची आपल्याला पुसटशी कल्पनादेखील आली नाही, असं मातृत्वाने भरलेल्या आईच्या मनात आलं. शिऱ्यात घालण्यासाठी ड्रायफ्रुट्‌सचे तुकडे करून त्याच्या आईला देताना ती म्हणाली, ""मी तुम्हाला "आई' म्हटलं तर चालेल...?''
"अगं चालेल काय म्हणतेस... तुला पुढे तेच म्हणावं लागणार आहे. तुला चालेल ना...?'' त्याच्या आईनं असं म्हणताच तिची कळी खुलली. तिनं त्याच्या आईला आनंदानं मिठीच मारली.

रविवारी तो तिच्या घरी गेला. तिनं दार उघडून त्याला ड्राईंगरूममध्ये बसायला सांगितलं. ती घरात गेली. तो बराच वेळ एकटाच बसून होता. कधी मनगटावरील, तर कधी भिंतीवरील घड्याळ निरखत! अधेमधे आतल्या खोलीतून दबक्‍या आवाजात बोलण्याचा आवाज येत होता; पण बाहेर कुणीच फिरकत नव्हतं. तो बसून बसून अवघडल्यानं शरीराला आळोखेपिळोखे देऊ लागला. तेवढ्यात ती आणि तिचे पप्पा ड्रॉईंगरूममध्ये आले. तो जरा सावरून बसला. तोंडओळख झाल्यावर इतरही विषयांवर थोडीबहुत चर्चा झाली. पण मूळ विषय काही चर्चेत येत नव्हता. तिची मम्मी हातात गुलाबजामचा "ट्रे' घेऊन बैठकीत आली. तिनं सर्वांच्या हातात खोलगट मोठे बाऊल दिले.

बैठक जमल्यावर तिची मम्मी म्हणाली, "आम्ही हिला लहानपणापासून फार लाडात वाढवलंय. कधी कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही. तिचं कधी मन मारलं नाही. तिच्या शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलोय. तिच्यासाठी हा साठ लाखांचा फ्लॅट घेतलाय. ह्यांनी पुण्याला ट्रान्स्फर करून घेतली. सध्या तिच्या लग्नाचा विषय सुरू आहे. मुलगा तिच्यापेक्षा जास्त कमावणारा असावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.'' तिच्या मम्मीनं "जास्त कमावणारा' या शब्दावर जोर देताच त्याला जोराचा ठसका लागला. त्यानं पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.

तिच्या मम्मीचं बोलणं मध्येच तोडून पप्पा म्हणाले, ""बरं, तुझ्या घरी कोण-कोण आहेत? तुझे वडील काय करतात? आणि तुला नुकतीच नोकरी लागली आहे म्हणे! कोणत्या कंपनीत तू नोकरीला आहेस?'' त्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केला. त्याला त्यानं यथायोग्य उत्तरं दिली. त्यानंतर आपली बाजू मांडताना तो म्हणाला, ""तुम्ही दोघं मला माझ्या आई-वडिलांसारखे आहात. मला लग्नाबिग्नाचं फारसं काही कळत नाही. माझं बोलणं कदाचित शिष्टाचाराला अनुसरून नसेल; पण मी एक सांगू शकतो- आमचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. आमचं लग्न झालं तर आम्ही दोघंही सुखा-समाधानानं जीवन व्यतीत करू. आनंदी राहू. माझं पुण्यात घर आहे. मी सध्या पुण्यातच नोकरी करणार आहे. यामुळे तुमची एकुलती एक मुलगी तुमच्या डोळ्यांसमोर राहील. याचा थोडा विचार करा. शिवाय आम्हा दोघांचा पगार आहे. आम्हाला तुमच्याकडून काहीएक नकोय. फक्त तोंडभरून आशीर्वाद द्या.'' त्यानं दोन्ही हात त्यांच्यापुढे जोडले.

तिची मम्मी म्हणाली, "अरे बाळा, लग्नाचा निर्णय वाटतो तेवढा सोपा नाही. तू तुझ्या आई-वडिलांना घेऊन एखाद्या दिवस आमच्या घरी ये...! आम्ही उभयता बोलून काय तो निर्णय घेऊ.''

त्याच्या वडिलांचा रागावलेला चेहरा त्याच्या नजरेसमोर आला. त्याचे वडील तिच्या घरी यायला राजी होतील, याची तसूभरही शक्‍यता नव्हती. त्यानं मूक संमती देऊन घरचा रस्ता धरला.


(क्रमशः)

तो आणि ती भाग..१७ --दोघांच्याही घरावर पडले दोन 'अणुबॉंब'

प्रेमप्रकरणाबाबत आई-वडिलांना सांगितल्याबरोबर हिरोशिमा आणि नागासाकीप्रमाणे दोघांच्या घरांवर दोन अणुबॉंब पडले. प्रचंड मानसिक ओढाताण झाली. दोघांनी धडधडत्या अंतःकरणानं समोर ठाकलेल्या परिस्थितीचा बेजोड सामना केला. कठीण परिस्थितीतही एकमेकांची साथ सोडली नाही. किंबहुना, बंध अधिक घट्ट झाले.

संध्याकाळची वेळ. त्याची आई कांदे-पोहे बनवीत होती. वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी प्रेमप्रकरणाबाबत सांगण्याची हीच योग्य वेळ होती. तो धडधडत्या अंतःकरणानं आईजवळ गेला. अजूनही तो द्विधा मनःस्थितीत होता. आईला कळाल्यावर ती रागवणार तर नाही, अशी सारखी भीती वाटत होती; पण सांगणं अत्यावश्‍यक होतं. त्यानं भीतीनं मुठी घट्ट आवळल्या होत्या. हृदयाची धडधड सारखी कमी-जास्त होत होती. मनात गणपतीची आराधना सुरू होती. एखादी गोष्ट सांगण्यासाठी आतापर्यंत त्याला कधीच एवढं दडपण आलं नव्हतं. आई म्हणजे त्याची एक जिवाभावाची मैत्रीण. तो सगळ्या गोष्टी तिच्यासोबत बिनधास्तपणे "शेअर' करायचा. फक्त प्रेमप्रकरण लपवून ठेवलं होतं; पण आता धाडस करावंच लागणार होतं. तिला सांगावंच लागणार होतं.

आईनं फोडणीसाठी पोहे कढईत टाकले. ती पाठमोरी असल्यानं तो मागे येऊन विचार करतोय, हे तिच्या ध्यानात आलं नाही. ती काही तरी घेण्यासाठी अचानक मागे वळली, तोच तो दचकला. थोडा घाबरला, बावरला. विचारचक्र खंडित झालं. आई म्हणाली, ""अरे काय झालं? कसला विचार करतोय? मी पोहे आणणारच होते. फार भूक लागली आहे का तुला? नाही तर फ्रीजमधलं ब्रेड आणि जाम खा तोपर्यंत... मी पोहे आणतेच थोड्या वेळात.''
""ठीक आहे,'' तो निराशेनंच म्हणाला आणि डायनिंग टेबलावर जाऊन बसला.

थोड्या वेळानं आई आली. तिनं पोह्यांच्या दोन प्लेट भरल्या; पण त्याचं काहीच लक्ष नव्हतं. आईनं त्याची अस्वस्थता अचूक टिपली. ती म्हणाली, ""अरे काय झालंय? काही तरी नक्कीच बिघडलंय. मला नाही सांगणार? मी तुझी "बेस्ट फ्रेंड' आहे ना? माझ्यापासून लपवणार?''

""तसं नाही गं आई. तुझ्यापासून मी काही लपवतो का? सगळं सांगतो ना!'' ""मग...''
""अगं तुला एक महत्त्वाचं सांगायचं होतं; पण हिंमत होत नाहीए. कसं सांगावं तेच कळत नाहीए. कुठून सुरवात करावी, तेच सुचत नाहीए,'' तो बोलायचं म्हणून बोलला.
""तू एखाद्या मुलीच्या प्रेमात-बिमात तर पडला नाहीस ना? की चक्क लग्नाचा विचार केला आहेस? काय ते मला नीट सांग. त्याशिवाय मला कसं कळेल तुझ्या मनातलं...'' आईनं बरोबर ओळखलं.
पण आईच्या गेसिंगनं त्याची तंद्री भंगली. तो म्हणाला, ""अगं हो... मला एक मुलगी आवडते. अगदी मनापासून. तुलाही ती पसंत पडावी अशीच आहे; पण आता तिच्या घरचे तिचं लग्न करायचं म्हणताहेत. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही गं. मला तिच्याशी लग्न करायचं आहे.''

आई थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. आपला मुलगा कधी मोठा झाला, हे वात्सल्याने भरलेल्या तिच्या मनाला कधी जाणवलंच नव्हतं. तो मोठा झाल्यावरही आपण उगाच त्याचे लाड करीत होतो का, असंही तिच्या मनात येऊन गेलं. ती म्हणाली, ""तुला पसंत आहे ना? मग झालं. पण माझी आधी भेट करून दे... तुझ्या बाबांना मी उद्या सांगते. आज त्यांची थोडी चिडचिड झाली आहे... काळजी करू नकोस. मुलगी चांगली असेल, तर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. शेवटी आपण "बेस्ट फ्रेंड्‌स' आहोत ना? एवढी मदत तर करावीच लागेल...'' आईचे शब्द कानावर पडल्याबरोबर त्याला हायसं वाटलं.

पण आईनं बाबांना सांगितल्यावर घरी एकच गदारोळ उठला. त्यांच्या शांत-निवांत घरावर अणुबॉंब पडला. बाबांनी त्याला चांगलंच झापलं. ""अजून नोकरीचा पत्ता नाही आणि साहेब चालले लग्न करायला. लग्न म्हणजे काय खेळ वाटतो यांना? तुझ्या बापानं केलं होतं का रे... बिनानोकरीचं लग्न? आताशी कुठे "ऑफर लेटर' हातात पडलंय. अजून नोकरी मिळालेली नाही. समजलं...!'' असं काहीबाही ते बोलत होते आणि दोघं माय-लेक निमूटपणे ऐकून घेत होते.
तिनं तिच्या मम्मी-पप्पांना त्यांच्या प्रेमाची कल्पना दिली. ती म्हणाली, ""पप्पा, सध्या त्याला साधी नोकरी आहे. महिन्याकाठी दहा हजार मिळतात; पण तो हुशार आहे. कॉलेजच्या गुणवत्ता यादीतील पहिल्या तीन क्रमांकांखाली तो कधीच उतरला नाही. आयुष्यात तो नक्कीच काही तरी करून दाखवेल. माझा विश्‍वास आहे त्यावर... त्याचंही माझ्याएवढंच शिक्षण झालंय. त्याचा "कॅम्पस इंटरव्ह्यू'त नंबर लागला नाही म्हणून बाहेर नोकरी शोधावी लागली. याखेरीज माझा पगार आहेच. आम्हाला काही काही कमी पडणार नाही. आम्ही सुखात राहू.''

तिचे पप्पा शांत होते; पण मम्मी लगेच म्हणाली, ""अगं, तू असं काही करशील असं कधीच वाटलं नव्हतं आम्हाला. थोडा तरी आमचा विचार करायचास. अगं, तुला योग्य स्थळ शोधण्यासाठी जिवाचं रान करतोय आम्ही. आणि तू असं काही तरी करून बसलीस... म्हणे पगार कमी असला तर काय झालं. अगं, जगात पैशाशिवाय काहीच नाही. तुला कसं कळत नाही? साधा फ्लॅट घ्यायचा म्हटलं तरी पगार कमी असला, तर हे बॅंकवाले कर्ज देत नाहीत... शाळेत मुलाची ऍडमिशन करायची म्हटली तर बक्कळ पैसे ओतावे लागतात. अगदी उद्याचाच विचार करायचा झाला, तर "वीकेंड'चा एक मूव्ही आणि बाहेर डीनरला जायचं म्हटल्यास दोन मुलांसह चौघांना साधारणपणे दोन हजार रुपये खर्च येतो. जग इतकं सोपं नाही बाळा!''

"अगं आई, पण मीसुद्धा कमावती आहे ना? भागेल आमचं. आणि मी प्रेम करून असं काय पाप केलंय, की तुम्हाला जणू तोंड लपवून फिरावं लागणार आहे? अगं, मला सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणूनच तुम्ही झटताय ना? मग तो मी शोधला, तर त्यात काय वावगं झालं? तुम्हाला तो मुलगा पसंत पडतो की नाही, याचा आधी विचारही केला नाही. मी शोधला म्हणून त्याला विरोध करायचा, असं काही तुम्ही आधीच ठरवून ठेवलंय का? त्याची आधी भेट तर घ्या! त्याचा स्वभाव जाणून घ्या... त्याच्या आई-वडिलांशी बोला... आणि मग निर्णय घ्या!'' तिनं संभाषणाला क्रांतिकारक वळण दिलं.
तिचे पप्पा म्हणाले, ""ठीक आहे. पुढच्या रविवारी बोलंव त्याला घरी...!''


(क्रमशः)