March 02, 2015

तो आणि ती भाग..१७ --दोघांच्याही घरावर पडले दोन 'अणुबॉंब'

प्रेमप्रकरणाबाबत आई-वडिलांना सांगितल्याबरोबर हिरोशिमा आणि नागासाकीप्रमाणे दोघांच्या घरांवर दोन अणुबॉंब पडले. प्रचंड मानसिक ओढाताण झाली. दोघांनी धडधडत्या अंतःकरणानं समोर ठाकलेल्या परिस्थितीचा बेजोड सामना केला. कठीण परिस्थितीतही एकमेकांची साथ सोडली नाही. किंबहुना, बंध अधिक घट्ट झाले.

संध्याकाळची वेळ. त्याची आई कांदे-पोहे बनवीत होती. वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी प्रेमप्रकरणाबाबत सांगण्याची हीच योग्य वेळ होती. तो धडधडत्या अंतःकरणानं आईजवळ गेला. अजूनही तो द्विधा मनःस्थितीत होता. आईला कळाल्यावर ती रागवणार तर नाही, अशी सारखी भीती वाटत होती; पण सांगणं अत्यावश्‍यक होतं. त्यानं भीतीनं मुठी घट्ट आवळल्या होत्या. हृदयाची धडधड सारखी कमी-जास्त होत होती. मनात गणपतीची आराधना सुरू होती. एखादी गोष्ट सांगण्यासाठी आतापर्यंत त्याला कधीच एवढं दडपण आलं नव्हतं. आई म्हणजे त्याची एक जिवाभावाची मैत्रीण. तो सगळ्या गोष्टी तिच्यासोबत बिनधास्तपणे "शेअर' करायचा. फक्त प्रेमप्रकरण लपवून ठेवलं होतं; पण आता धाडस करावंच लागणार होतं. तिला सांगावंच लागणार होतं.

आईनं फोडणीसाठी पोहे कढईत टाकले. ती पाठमोरी असल्यानं तो मागे येऊन विचार करतोय, हे तिच्या ध्यानात आलं नाही. ती काही तरी घेण्यासाठी अचानक मागे वळली, तोच तो दचकला. थोडा घाबरला, बावरला. विचारचक्र खंडित झालं. आई म्हणाली, ""अरे काय झालं? कसला विचार करतोय? मी पोहे आणणारच होते. फार भूक लागली आहे का तुला? नाही तर फ्रीजमधलं ब्रेड आणि जाम खा तोपर्यंत... मी पोहे आणतेच थोड्या वेळात.''
""ठीक आहे,'' तो निराशेनंच म्हणाला आणि डायनिंग टेबलावर जाऊन बसला.

थोड्या वेळानं आई आली. तिनं पोह्यांच्या दोन प्लेट भरल्या; पण त्याचं काहीच लक्ष नव्हतं. आईनं त्याची अस्वस्थता अचूक टिपली. ती म्हणाली, ""अरे काय झालंय? काही तरी नक्कीच बिघडलंय. मला नाही सांगणार? मी तुझी "बेस्ट फ्रेंड' आहे ना? माझ्यापासून लपवणार?''

""तसं नाही गं आई. तुझ्यापासून मी काही लपवतो का? सगळं सांगतो ना!'' ""मग...''
""अगं तुला एक महत्त्वाचं सांगायचं होतं; पण हिंमत होत नाहीए. कसं सांगावं तेच कळत नाहीए. कुठून सुरवात करावी, तेच सुचत नाहीए,'' तो बोलायचं म्हणून बोलला.
""तू एखाद्या मुलीच्या प्रेमात-बिमात तर पडला नाहीस ना? की चक्क लग्नाचा विचार केला आहेस? काय ते मला नीट सांग. त्याशिवाय मला कसं कळेल तुझ्या मनातलं...'' आईनं बरोबर ओळखलं.
पण आईच्या गेसिंगनं त्याची तंद्री भंगली. तो म्हणाला, ""अगं हो... मला एक मुलगी आवडते. अगदी मनापासून. तुलाही ती पसंत पडावी अशीच आहे; पण आता तिच्या घरचे तिचं लग्न करायचं म्हणताहेत. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही गं. मला तिच्याशी लग्न करायचं आहे.''

आई थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. आपला मुलगा कधी मोठा झाला, हे वात्सल्याने भरलेल्या तिच्या मनाला कधी जाणवलंच नव्हतं. तो मोठा झाल्यावरही आपण उगाच त्याचे लाड करीत होतो का, असंही तिच्या मनात येऊन गेलं. ती म्हणाली, ""तुला पसंत आहे ना? मग झालं. पण माझी आधी भेट करून दे... तुझ्या बाबांना मी उद्या सांगते. आज त्यांची थोडी चिडचिड झाली आहे... काळजी करू नकोस. मुलगी चांगली असेल, तर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. शेवटी आपण "बेस्ट फ्रेंड्‌स' आहोत ना? एवढी मदत तर करावीच लागेल...'' आईचे शब्द कानावर पडल्याबरोबर त्याला हायसं वाटलं.

पण आईनं बाबांना सांगितल्यावर घरी एकच गदारोळ उठला. त्यांच्या शांत-निवांत घरावर अणुबॉंब पडला. बाबांनी त्याला चांगलंच झापलं. ""अजून नोकरीचा पत्ता नाही आणि साहेब चालले लग्न करायला. लग्न म्हणजे काय खेळ वाटतो यांना? तुझ्या बापानं केलं होतं का रे... बिनानोकरीचं लग्न? आताशी कुठे "ऑफर लेटर' हातात पडलंय. अजून नोकरी मिळालेली नाही. समजलं...!'' असं काहीबाही ते बोलत होते आणि दोघं माय-लेक निमूटपणे ऐकून घेत होते.
तिनं तिच्या मम्मी-पप्पांना त्यांच्या प्रेमाची कल्पना दिली. ती म्हणाली, ""पप्पा, सध्या त्याला साधी नोकरी आहे. महिन्याकाठी दहा हजार मिळतात; पण तो हुशार आहे. कॉलेजच्या गुणवत्ता यादीतील पहिल्या तीन क्रमांकांखाली तो कधीच उतरला नाही. आयुष्यात तो नक्कीच काही तरी करून दाखवेल. माझा विश्‍वास आहे त्यावर... त्याचंही माझ्याएवढंच शिक्षण झालंय. त्याचा "कॅम्पस इंटरव्ह्यू'त नंबर लागला नाही म्हणून बाहेर नोकरी शोधावी लागली. याखेरीज माझा पगार आहेच. आम्हाला काही काही कमी पडणार नाही. आम्ही सुखात राहू.''

तिचे पप्पा शांत होते; पण मम्मी लगेच म्हणाली, ""अगं, तू असं काही करशील असं कधीच वाटलं नव्हतं आम्हाला. थोडा तरी आमचा विचार करायचास. अगं, तुला योग्य स्थळ शोधण्यासाठी जिवाचं रान करतोय आम्ही. आणि तू असं काही तरी करून बसलीस... म्हणे पगार कमी असला तर काय झालं. अगं, जगात पैशाशिवाय काहीच नाही. तुला कसं कळत नाही? साधा फ्लॅट घ्यायचा म्हटलं तरी पगार कमी असला, तर हे बॅंकवाले कर्ज देत नाहीत... शाळेत मुलाची ऍडमिशन करायची म्हटली तर बक्कळ पैसे ओतावे लागतात. अगदी उद्याचाच विचार करायचा झाला, तर "वीकेंड'चा एक मूव्ही आणि बाहेर डीनरला जायचं म्हटल्यास दोन मुलांसह चौघांना साधारणपणे दोन हजार रुपये खर्च येतो. जग इतकं सोपं नाही बाळा!''

"अगं आई, पण मीसुद्धा कमावती आहे ना? भागेल आमचं. आणि मी प्रेम करून असं काय पाप केलंय, की तुम्हाला जणू तोंड लपवून फिरावं लागणार आहे? अगं, मला सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणूनच तुम्ही झटताय ना? मग तो मी शोधला, तर त्यात काय वावगं झालं? तुम्हाला तो मुलगा पसंत पडतो की नाही, याचा आधी विचारही केला नाही. मी शोधला म्हणून त्याला विरोध करायचा, असं काही तुम्ही आधीच ठरवून ठेवलंय का? त्याची आधी भेट तर घ्या! त्याचा स्वभाव जाणून घ्या... त्याच्या आई-वडिलांशी बोला... आणि मग निर्णय घ्या!'' तिनं संभाषणाला क्रांतिकारक वळण दिलं.
तिचे पप्पा म्हणाले, ""ठीक आहे. पुढच्या रविवारी बोलंव त्याला घरी...!''


(क्रमशः)