December 25, 2014

मुलांना नकार ऐकण्याची सवय लावा

पुणे - ‘आधुनिक काळात मुलांनी मागताक्षणी हट्ट
पुरविण्याची सवय पालकांनी तातडीने बदलली पाहिजे.
मुलांच्या योग्य मागण्या नक्की पूर्ण करा, पण अवास्तव
मागणी नाकारताना पालकांनी मुलांना "का नको‘ हे पटवून
देणे ही आता काळाची गरज आहे,‘‘ असे शहरातील मानसोपचार
तज्ज्ञांनी सांगितले.
जर्किनचा हट्ट धरणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाला स्वेटर
घेण्याचे आश्वासन वडिलांनी दिले. पण, जर्किन घेण्यास नकार
दिल्याने गळफास घेऊन मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघड
झाली आहे. या पार्श्वभूमिवर मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क
साधला.
डॉ. विद्याधर वाटवे म्हणाले,
‘हल्लीच्या मुलांना नकाराची सवय नसते.
हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोष आहे. व्यक्तिमत्त्व
जरी वयाच्या अठरा वर्षांनंतर घडत असले, तरीही भविष्यात
घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वातील हा दोष प्रकर्षाने जाणवतो.
पालकांनी मुलांच्या प्रत्येक मागणीला "हो‘ म्हणू नये. पण, ते
"का नको‘ हे मात्र त्यांना पटवून द्यावे.‘‘
डॉ. मंजिरी दीक्षित म्हणाल्या, ‘मुलांमधील आक्रस्ताळेपणा,
हट्ट वाढल्याचे निरीक्षण आहे. घरातील, शाळेतील
आणि त्याच्या आजूबाजूचे वातावरण याचा परिणाम मुलांवर
होत असतो. आधुनिक काळात मुलाचे प्रत्येक हट्ट पालक पुरवत
असतात, हे प्रकर्षाने जाणवते. त्यातून त्यांची नकार
ऐकण्याची क्षमता कमी होते. मुलांमधील हे दोष लवकर
ओळखण्यास त्याला प्रतिबंध करणे शक्य आहे. आई-वडील
दोघेही कामाच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर असतात.
"वीक एंड‘ शिवाय मुलाकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे मुलाने
केलेले सर्व हट्ट "वीक एंड‘ला पुरविले जातात. अशा प्रकारातून
मुलांचा हट्टीपणा वाढतो.‘‘
डॉ. सुजला वाटवे म्हणाल्या, ‘मुलांमध्ये
सहिष्णुता राहिलेली नाही. आपल्या मनासारखे
आणि तेही लगेच व्हावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मुले
वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून भावनिक विचार करतात. त्यातच
विभक्त कुटुंब पद्धतीचाही परिणाम होतो. मध्यमवर्गीय
कुटुंबामध्ये मुलाला हवे ते पुरविण्याचा प्रयत्न केला जातो.
अर्थात, त्यामागे पालकांचा चांगला विचार असतो.‘‘
काय करावे?
- एखादी गोष्ट का हवी आहे, त्याची गरज काय, असे प्रश्न
विचारून ते आत्ता घेणे खरंच महत्त्वाचं आहे का,
याच्या निर्णयाची जबाबदारी मुलावर सोपवावी.
- पालकांच्या भूमिकेत जाऊन मुलाला विचार करण्यास
सांगावे.
- यशाबरोबरच अपयश पचविण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण
करावी
काय करू नये?
- मुलाला कोणतीही गोष्ट थेट "नाही‘ म्हणू नये.
- विनाकारण भरमसाट आश्वासने देऊ नये.
- घरात ताणतणावाचे वातावरण नसावे.

esakal.com/tiny.aspx?k=eBFTa


Posted via Blogaway