January 18, 2011

पानिपत...विजयाइतकाच सन्मानदायक पराजय!

- त्र्यं. शं. शेजवलकर



साधा क्रिकेटचा सामना हरण्यापासून निवडणुकीत झालेल्या पराभवापर्यंत अनेक ठिकाणी ' पानिपत झाले ' हा वाक्प्रचार सहजपणे वापरला जातो. पण इतिहासाची पाने नीट अभ्यासली की कळते की पानिपतावर जे घडले तो फक्त पराभव नव्हता, तर त्यात भविष्यातल्या राष्ट्रनिर्मितीची बीजे रोवलेली होती. हा मुद्दा पटवून देताना थोर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी या लढाईचे केलेले विश्लेषण त्यांच्याच शब्दात....

................................

पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला आणि तेणेकरून महाराष्ट्रावर दुःख, खेद, विषाद यांची छाया पसरली ; पण ती तात्कालिकच होती. या पराभवाचे परिणाम आपणांस सर्वस्वी मारक होतील, असे त्यांस त्या काळी वाटलेले दिसत नाही. अखिल हिंदुस्थानच्या कल्याण्याच्या दृष्टिने विचार करता काहींना हा युद्धशास्त्रदृष्ट्या झालेला पराभव, नैतिकदृष्ट्या मोठा विजयच वाटला असल्याचे दिसून येते.

इव्हॅन्स बेल या विचारवंत इतिहासाभ्यासकाने संशोधनकालापूर्वीच लिहिले की, '' पानिपताची लढाईसुद्धां मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे ! मराठे ' सर्व हिंदी लोकांसाठींच हिंदुस्थान ' या ध्येयासाठी लढले ! पण दिल्ली, अयोध्या व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीश मात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले ! आणि जरी मराठ्यांचा या युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगाण जे यानंतर एकदां परत गेले ते हिंदी राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी पुनः कधी दिल्लीस आले नाहीत !''

प्रिन्सिपॉल रॉलिन्सन काशीराजाच्या बखरीच्या आपल्या प्रस्तावनेत लिहितात, '' विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासांतील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो ; आणि मराठ्यांच्या सर्व इतिहासांत त्यांच्या फौजेने राष्ट्रांतील सर्व उत्तम शिलेदारंसह पानिपताच्या घनघोर रणक्षेत्रांत आपल्या देशाच्या व धर्माच्या वै-यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल !

ज्या सेनापतीला जय मिळतो त्याने सर्वात कमी चुका केल्या असे समजले जाते. पण वेलिंग्टन व नेपोलियन या दोघांनीहि वॉटर्लूच्या लढाईत घोडचुका केल्याचे जे नमूद आहे, त्यांच्या दशांशाहि चुका भाऊसाहेबांच्या हातून घडल्या नव्हत्या. भाऊच्या पराजयाचे कारण तो वाईट सेनानी होता हे नसून, त्याचा प्रतिस्पर्धी त्याहून जास्त चांगला सेनापति होता, हेच आहे. ’’

वरील मते त्या त्या संदर्भात खरीच वाटण्यासारखी आहेत. पण तो आपल्या वादाचा विषय नव्हे. अहमदशहा अबदालीसारख्या अडचणीत टाकणा-या शत्रूशी कलागत टाळण्यातच मराठ्यांचे शहाणपण दिसून आले असते. पानिपताला अफगाणांचा पराभव होता तरी मराठ्यांना त्यापासून फार थोडा लाभ होता. डोंगराळ व ओसाड अफगाणिस्तानवर स्वारी करून तेथे राज्य करण्याचा हेतू कोणीच धरला नसता. घराजवळचे व दक्षिणेतले याहून जास्त महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याचे टाकून सिंधु नदीवर जाऊन ठाकण्याचे मराठ्यांना काहीच कारण नव्हते ; पण मराठ्यांच्या राज्यातील सर्वात मोठा दोष या वेळी तरी त्यांच्या अज्ञानाचा होता.

सदाशिवरावभाऊ हा तत्कालीन मराठ्यांतील सर्वात जास्त कार्यक्षम, हुशार, तडफदार पुरुष मानला जात होता ; पण त्याचे दोन दोष इंग्रज वकील स्पेन्सर याने पानिपतापूर्वी चार वर्षे ओळखले होते. ते म्हणजे सबुरी नसणे व अतिरिक्त हाव. इंग्रज वकिलाने सांगितलेला सबुरी नसण्याचा दुर्गुण अज्ञानजन्य होता, असे आम्हाला वाटते. पेशव्यांची, किंबहुना, सर्व मराठ्यांची शिक्षणपद्धती अत्यंत तोकडी होती. सर्व हिंदुस्थानाचे राज्य झपाटण्यास जे उद्युक्त झाले होते, त्यांना तत्कालीन इंग्रजांइतकेही हिंदुस्थानाच्या भूगोलाचे ज्ञान होते, असे दिसत नाही.

युरोपात हिंदुस्थानाच्या आकाराचे स्वरूप चित्ररूपाने दाखविणारे जे नकाशे शतकापूर्वीच फैलावले होते, ते पेशव्यांनी पाहिलेले किंवा ऐकिलेलेसुद्धा नसावेत. भरतखंडात मुंबई, मद्रास किंवा कलकत्ता या एकमेकांपासून फार दूर असणा-या एकटाच इंग्रज एकसमयावच्छेदेकरून कसा उमटतो, याची कल्पना नकाशांच्या अभावी मराठ्यांस नव्हती. त्यामुळे ही मराठी राज्याच्या गळ्याभोवती एकच सलग तांत ओढली जात आहे, याची जाणीव त्यांस झाली नाही.

तीच गोष्ट अबदालीच्या सामर्थ्याची. फारसी भाषेच्या संपर्कामुळे रूमशाम ही नावे मराठी उच्चारीत ; पण त्यांना या ठिकाणांचा भौगोलिक बोध मुळीत होत नव्हता. अखबारनविसांची येणारी फारशी बातमीपत्रे ते ऐकत ; पण मराठवाड्यांतील आपले गाव सोडून कधीच बाहेर न गेलेल्या विद्वान पुरुषासह समुद्राची खरी कल्पना जशी येऊ शकत नाही, तशीच पेशव्यांना आशिया खंडाची किंवा जगाची कल्पना करता येत नव्हती, असे त्यांच्या लिखाणावरून व आचरणावरून स्पष्ट दिसते.

ज्ञानाचे कार्य डोक्याची तरतरी घडवून आणू शकत नाही. कै. राजवाड्यांनी आपल्या प्रस्तावनेत पेशव्यांजवळ नकाशे होते असे जे म्हटले आहे, त्याला त्यांनी पुरावा दिलेला नाही व आम्हासही तो कोठे आढळला नाही. मराठे तह करून मुलखाच्या वाटण्या करीत, यावरून त्यांच्याजवळ नकाशे होते असे गृहीत धरणे धाडसाचे आहे. हिंदुस्थानातील महालांच्या उत्पन्नांच्या व गावांच्या याद्या मोगली याद्यांवरून उतरलेल्या मराठ्यांजवळ होत्या ; पण त्यावरून अगदी स्थूल स्वरुपाचा नकाशाही कोणाला काढता आला नसता.

....................................

आपले चालू भारत ज्या प्रदेशांचे बनले आहे ते प्रदेश मराठ्यांनी आपल्या खंडणीखाली आणलेले आहेत. या उलट जो प्रदेश आता पाकिस्तानकडे गेला आहे त्यात मराठ्यांचे पाऊल पडले नव्हते, असे दिसून येते. याची जाणीव भाजलेल्या लोकांस आता अकल्पितपणे होतांना आढळते. मराठे जेथे जेथे गेले तेथील दबलेल्या हिंदूंची मुसलमानांच्या भीतीतून सुटका त्यांनी केली. हे एक प्रकारचे नैतिक पुनरुत्थानच होते.

बंगाली इतिहासकार मराठ्यांच्या स्वा-यांचे वास्तविक रहस्य न ओळखता, या बरगी लोकांनी आपल्या बंगभूमीत अनर्थ घडविला, अशी केवढीही हाकाटी करोत, पण त्यांनी विसरू नये की , जो बंगाल रघूजी भोसल्याचा व भास्कर राम कोल्हटकराच्या बारगीर शिलेदारांनी लुटला, तेवढाच आज स्वतंत्र भारतात सामील झाला आहे ! याची जाणीव ज्ञानलवदुर्विदग्ध लेखकांना नसली तरी पूर्व बंगालमधून पळून आलेल्या त्यांच्या दुर्दैवी बांधवांना आज तीव्रतेने भासते.

आमचे स्नेही नागपूरचे सरदार गुजर यांनी याबाबत एक गोष्ट आम्हास सांगितली, ती अशी - काही वर्षांमागे नागपुरास अखिल भारतीय शिक्षक परिषदेचे अधिवेशन झाले. ते झाल्यानंतर एक दिवस काही बंगाली शिक्षक मुद्दाम रिक्षा करून नागपुरात प्रत्येकाला विचारीत चालले की येथे रघूजी भोसले कोठे राहतात ?” पण त्यांना धड कोणी सांगेना. पुढे गुजरांशी त्यांची गाठ पडली ; तेव्हा ते या पाहुण्यांबरोबर भोसल्यांचे आधुनिक दत्तक वारस गावाबाहेर सकरद-यात रहात असतात तेथे गेले.

प्रस्तुत भोसले पंचाऐंशी वर्षाचे बहिरे व जवळजवळ आंधळे झालेत असे होते. त्यांच्याजवळ जाऊन हे बी.ए., बी.टी. शिक्षक मोठ्याने विचारू लागले की तुम्ही भोसल्यांनी ( म्हणजे तुमच्या पूर्वजांनी ) गंगा ओलांडून आमच्या पूर्व बंगल्यांत येण्याचा आळस कां केलात, ते आम्हास सांगा. तुमच्या या न येण्यामुळेच तेथील मुसलमान मस्त राहून त्यांनी आतां आम्हांस आमचा देश सोडण्यास लविले !” यावर त्यांतील एक अक्षरही न समजणारे आमचे रघूजी भोसले काय बोलणार ! त्यांनी आम्हांस हे काही कळत नाही. तुम्ही गावातील दुस-या कोणा जाणत्यास हे विचारा असे उत्तर, मोठ्या रागाने व त्वेषाने विचारणा-या सुशिक्षित बंगल्यास दिले.

या सज्जन बंगाल्यांस खरोखरीच असे वाटत होते, की त्यांच्या प्रदेशात मराठे जाते तर आजचा दुर्धर प्रसंग त्यांच्यावर ओढवला नसता ! आणि आम्हासही त्यांचा भाव बेडकाच्या डरकाळ्या फोडणा-या क्षुद्र बंगाली इतिहासकारांपेक्षा सत्याला जास्त धरून वाटतो ! मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान तुडविले असेल, लुटले असेल, दुस-याही अनेक चुका केल्या असतील, पण त्यांनी पाचशे वर्षाच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदु प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहाण्यास उदाहरण घालून दिले होते.

हिंदुस्थानातील मुसलमानी राज्ययंत्र त्यांनी इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंड करून उठून मुसलमान सुभेदारास हांकून द्यावे व स्वतःचे राज्य स्थापावे. या कामांत त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपतीनिर्मित मराठी राज्याची इतिकर्तव्यता होती ! इतर प्रांतातील लोकांत हे लोण जाऊन पोहोचू शकले नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखरी शोककथा होय, पानिपताचा पराभव नव्हे !

( राजहंस प्रकाशनाच्या, त्र्य. शं. शेजवलकर लिखित पानिपत १७६१ या ग्रंथातून साभार... )


January 04, 2011

सह्याद्री आणि शिवाजी-संभाजी!


शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्‌ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले. हिंदवी स्वराज्यासाठी सह्याद्रीची गिरिशिखरे, पशू-पाखरे, झरे-पऱ्हे, घोरपडी नव्हे; तर अवघा निसर्गच जणू या महत्कार्यासाठी सज्ज झाला होता.

म्हामोगल सरदारांना कल्पना नाही, आमचा मुलूख किती कठीण आणि दुर्धर आहे ते! माझ्या मुलखातून तुमचे घोडदळ हाकणे तर सोडाच; पण तुमच्या कल्पनेतील घोडीसुद्धा नाचविणे केवळ अशक्‍य आहे,'' असा खरमरीत खलिता १६६४ साली शिवाजीराजांनी मोगलांच्या बडेजावी सरदारांना पाठविला होता. राजांच्या त्या पर्शियन पत्रातून स्वराज्यातील दुर्गम अशा सह्यपर्वताबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, निष्ठा सर्व काही व्यक्त होते.

सुरतलुटीनंतर नाशिक, बागलाण व दिल्लीकर पातशहाच्या मुलखामध्ये शिवाजीराजांनी एकच उडदंग माजविला होता. तेव्हा शिवाजीला धडा शिकविण्यासाठी औरंगजेबाने रणनीती आखायला सुरवात केली. दक्षिण मुलखाची खडान्‌खडा माहिती असणाऱ्या महम्मद कुलीखान नावाच्या सरदाराची निवड केली. तो पंजाबामध्ये पंचहजारी मनसबदार म्हणून काम पाहत होता. औरंगजेब कमालीचा संशयी आणि सावध स्वभावाचा होता. त्याने कुलीखानाची कठोर परीक्षा घेतलीच; शिवाय त्याच्या जवळच्या सरदाराने पातशहाला असा अहवाल दिला की ः "कुलीखान हा बंदा इतका एकनिष्ठ आहे की, एकेकाळी आपण मरगठ्ठा होतो, हेही तो पूर्णपणे विसरून गेला आहे. हा बाटगा या जन्मी तरी पातशहा सलामतना सोडून जाणार नाही. आपण हवी तशी कामगिरी त्याच्याकडून पार पाडू शकू, खाविंद!' शिवाजीराजांना मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखानाच्या तडाख्यापुढे पुरंदरचा नामुष्कीचा तह मान्य करावा लागला होता. स्वराज्यातील बलाढ्य अशा २३ किल्ल्यांवर उदक सोडावे लागले होते. त्याच दरम्यान पन्हाळ्याच्या मोहिमेत पोचायला नेताजी पालकरला उशीर झाला. त्यामुळे राजांनी त्याची खरडपट्टी काढली, तेव्हा चिडलेल्या नेताजीने राजांना उलट जबाब केला ः ""आपण तरी कसले राजे? आणि आम्ही तरी कसले सेनापती? आता आपण मोगलांचे मनसबदार आहात!'' तेव्हा राजांनी नेताजी पालकरला तत्काळ बडतर्फ केले. त्यामुळे तो स्वराज्यातून निघून आदिलशहाकडे गेला. मात्र, हुशार मिर्झाराजाने त्याला सरळ दिल्लीकर औरंगजेबाच्या सेवेत नेऊन दाखल केले. औरंगजेबाने नेताजीसारखे रत्न तना-मनाने पातशीही सेवेत घ्यायचे ठरविले.
त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले. त्याच्या दोन्ही स्त्रियांना पातशहाने दटावून विचारले, ""तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याच्या नव्या धर्मात येता की आमच्या वहिवाटीप्रमाणे आम्हीच एखाद्या शहजादीशी याची शादी करून देऊ?'' तेव्हा नवऱ्यासाठी दोघींनी परधर्म स्वीकारला.

जेव्हा दहा पावसाळे उलटलेले, तेव्हा महम्मद कुलीखान आचार-विचाराने पुरा खानसाहेबच बनलेला. शिवाजीचे नुकसान करायचे या इराद्यानेच तो इंदापूर-माणगावच्या रानात येऊन पोचला होता. मात्र, जेव्हा त्याने दूरवर दिसणारा रायगड पाहिला, तेव्हा त्याच्या अंगावरचा पातशाही जामानिमा खाली गळून पडला. झाडांना मिठ्या मारत, इथल्या वाऱ्यावर तरंगत, अश्रू ढाळत, धावत-पळतच तो रायगड चढला. शिवरायांच्या पायावर जाऊन गडबडा लोळला; तेव्हा, "नेताजी बहाद्दरा,' अशी हाक मारत राजांनी त्याला पोटाशी धरले. त्याचे शुद्धीकरण करून त्याला स्वधर्मात आणि स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे हाच कित्ता त्याच रायगडावर राज्य करताना संभाजीराजांनी गिरवला. हरसूलच्या कुलकर्ण्यासह अनेकांना स्वधर्मात व स्वराज्यात माघारा घेतले.

जीर्णोद्धार शिवकाळातच
सह्याद्रीच्या सान्निध्यातच शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजली, फोफावली. त्यांची कीर्ती दिगंतात पसरली. राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असला तरी शिवनेरी आणि जुन्नर तालुक्‍याचा पट्टा कधीच हिंदवी स्वराज्यात नव्हता. मात्र, सानाचे थोर होत असताना शिवरायांनी एक महत्त्वाचे निरीक्षण केले होते. दिल्लीकर असोत वा निजामशहा वा आदिलशहा ते मराठी सरदारांना फक्त जहागिऱ्याच देत. किल्ल्यांचा ताबा स्वतःच्या मुठीत ठेवत अन्‌ किल्ले हेच तर राज्याचे हृदय असते. जसे इतिहासात स्कॉटिश योद्‌ध्यांनी आपल्या पराक्रमाने आणि गनिमी काव्याने इंग्लडचे सिंहासन हादरवून सोडले होते; तसेच काही दशके मराठ्यांनी सह्याद्री पर्वताचे खड्‌ग हाती घेऊन दिल्लीच्या सिंहासनाला हादरे दिले आहेत. सह्याद्रीच्या अंगरख्यावर अगदी सातवाहन आणि भोज राजापासूनच्या सम्राटांनी अनेक कठीण, बेलाग, अंजिक्‍य आणि जंगली किल्ल्यांची लेणी खोदून ठेवली आहेत. "शिवदिग्विजया'तील नोंदीनुसार घाटमाथा आणि कोकणात मिळून एकूण ३६० किल्ले आहेत. मात्र, सह्याद्रीतील किल्ल्यांचा खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार झाला तो शिवकाळातच. शिवरायांचे अवघे जीवन तर किल्ले घडवण्यात आणि घडवलेले किल्ले लढवण्यात गेले!

"किल्ले राज्यास रक्षण"
मराठ्यांच्या युद्धनीतीची मीमांसा करताना प्रसिद्ध इतिहासकार एस. एन. सेन म्हणतो, ""शिवाजीच्या स्वराज्यात अशी एकही महत्त्वाची टेकडी उरली नव्हती, जिथे संरक्षणासाठी चौक्‍या वा पहारे लावलेले नव्हते.'' शिवरायांनी अनेक नवे दुर्ग-किल्ले बांधले. जुने दुरुस्त केले. तोरणा बांधताना खजिना सापडला. त्या द्रव्याचा उपयोग कल्याणचा किल्ला बांधताना केला. दुर्गाडीचा किल्ला बांधूनच त्यांनी आपल्या बलाढ्य आरमाराच्या उभारणीस प्रारंभ केला.
""जैसा कुळंबी शेतास माळा घालून शेत राखतो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत,'' असे शिवाजीराजे सांगतात. त्यांना आपल्या गडलक्ष्मीबद्दल इतका भरवसा की ""दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने ३६० किल्ले हजरतीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी त्याला ३६० वर्षे पाहिजेत!'' महाराजांच्या या भरवशाची प्रचीती शत्रूला अनेकदा आली आहे. चाकणची छोटीशी गढीही फिरंगोजी नरसाळ्याने कित्येक दिवस झुंजती ठेवून शाहिस्तेखानाला घाम फोडला होता.

पुढे दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रावर चार लाखांची फौज घेऊन धावून आला होता, तेव्हा नाशिकजवळच्या दिंडोरी तालुक्‍यातील रामशेजचा एक छोटासा
किल्ला संभाजीराजांनी साडेसहा वर्षे लढता ठेवला होता.

सह्याद्री नि झुंजारपणा
औरंगजेबाने चार-पाच सेनानायक बदलूनही त्याला विजय संपादन करता आला नाही. शेवटी तो किल्ला पडला फंदफितुरीनेच! आजही वणी डोंगराच्या रस्त्याच्या डाव्या हाताला इतिहासाचा हा महान साक्षीदार सर्वांना दर्शन देत उभा असल्याचे दिसते.

साधेपणाने राहायचे कसे, कठीण परिस्थितीशी सामना देत झुंजायचे कसे आणि कमी खर्चात डोंगरासारखी कामे उरकायची कशी, याचे शिक्षण जणू याच सह्याद्रीने शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांना दिले होते. त्यामुळेच हिंदवी स्वराज्यात मीठ-भाकर आणि पातशाही तंबूत शिरकुर्म्याचा बेत! याच सह्यपर्वतावर राहणाऱ्या रांगड्यांच्या खांद्यावरच्या घोंगड्या शिवबाने बाजूला झटकल्या. त्यांना कमरेला शेला गुंडाळायला शिकवले. त्यांच्या हातामध्ये भाला आणि पाठीवर ढाली दिल्या. दिल्लीकर पातशहाचा सरदार महाबतखान याने तेव्हा आपल्यासोबत काबूल-कंदाहारच्या ४०० नायकिणींचा संच आणला होता. अनेकदा बागलाणाकडे त्याच्या मैफली रंगत, तेव्हा पातशहाच्या फौजेसोबत असणारा इतिहासकार भीमसेन सक्‍सेना लिहितो ः ""कुठे हे मराठे, जे तळहातावर कांदा-भाकरी घेऊन घोड्यावरून चाळीस चाळीस मैल दौड करतात; ज्यांना दिवसाची विश्रांती माहीत नाही, जे जाता जाता वाटेतल्या माळावर चार भाले रोवतात, त्यावर घोंगडी टाकून तात्पुरता आडोसा करतात अन्‌ लगेच घोड्यावरून वाऱ्यासारखी झेप घेत मोहिमेवर आगेकूच करतात अन्‌ तेच दुसरीकडे कंदाहारी नायकिणीच्या आगेमागे लाळ घोटणारे आमचे पातशाही फौजेतील उल्लूचे पठ्ठे!''

युद्धनीतीची सांगड
आजही सह्याद्रीतून उभे-आडवे फिरताना अनेक गोष्टी ध्यानी येतात. फार पूर्वीपासून कोकण किनाऱ्यावरील बंदरातून घाटमाथ्याकडे व्यापार चालायचा. अवघड, दुर्गम आणि वळणावळणाच्या पायवाटा आणि खिंडी ओलांडायला लागायच्या. बैलाच्या पाठीवर सामानांच्या गोण्या ठेवून खिंडारे चालायची. सातवाहन काळात घाटमाथ्यावरून ही वाहतूक राजधानी पैठणकडे व्हायची. नंतर पुण्याकडच्या वाटा मळल्या. घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठीच जागोजागी किल्ल्यांची रचना केलेली आहे. महाबळेश्‍वरजवळच्या पार घाटाच्या नाक्‍यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजांनी प्रतापगड बांधला. कोकण दरवाज्याजवळचा राजमाची, भोरघाटाजवळचा लोहगड, आंबा घाटाजवळचा विशाळगड ही सर्व अशीच उदाहरणे आहेत.

सह्याद्रीच्या प्रकृतीशीच शिवरायांनी आपल्या युद्धनीतीची सांगड घातली होती. गनिमी काव्याच्या खेळाला सह्यद्रीसारखा लाभदायक प्रदेश दुसरा नाही. गनिमी कावा जन्मला-वाढला, फोफावला आणि कीर्तिध्वजावर जाऊन पोचला, तो याच सह्याद्रीच्या साथीने आणि साक्षीने. एखादा पैलवान जसा समोरच्या जोडीदाराला आपल्या पटात घेतो, म्हणजेच अंगाखाली घेऊन त्याला चिरडून टाकतो, त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या साथीने शिवरायांनी भलेभले शत्रू अंगावर ओढून घेतले होते. सातारा, कोरेगावकडचा मुलूख जाळत जेव्हा अफजलखान वाईदेशी आला होता, तेव्हा अनेक ज्येष्ठांनी त्याला सल्ला दिला होता ः "शहाजीचा मुलगा धाडसी आहे. त्याच्या भेटीसाठी जावळीच्या खोऱ्यात जाऊ नका...'. तेव्हा गर्विष्ठ अफजलखानाने उत्तर केले होतेः "तुम्हाला तरी आमच्या पराक्रमाची कुठे कल्पना आहे? उलट तो शिवा आम्हाला घाबरून जावळी खोऱ्यात लपून बसला आहे...' . जशी आईच्या मांडीची बाळालाच माहिती असते, तशी लाव्हारसापासून तयार झालेल्या सह्याद्रीच्या खडकरांगांची ताकद आणि जादूगिरी शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांना माहीत होती. याच सह्याद्रीच्या निबिड अरण्याला पाठीशी घेऊन शिवरायांनी नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, कमळाजी साळुंखे, येसाजी कंक, गायकवाड यांच्यासह व्यूहरचना केली आणि अफजलखानाचा कोथळा फाडून त्याची दहा हजारांची फौज गर्दीस मिळविली. विजयाच्या कैफात मश्‍गूल न राहता पुढच्या आक्रमक आणि चपळ हालचाली केल्या. फक्त दोन आठवड्यांच्या आत पन्हाळा घेतला. प्रचंड वेगवान हालचाली, कमालीचा सावधपणा, अविश्रांत उद्योग हे सारे काही ते या रानातच शिकले होते. राजे नेहमी पालखीतून वावरायचे, हा गैरसमज आहे. कधी कधी ते पालखीचा वापर करत. मात्र, शिवाजीचा अंगरखा घातलेल्या मराठी नटांना घोड्यावर नीट बसता यायचे नाही, म्हणून सिनेमासाठी पालखी सोईची झाली! अलीकडे पडद्यावर दिसणारे शिवकालीन म्हणून दाखवलेले फेटे हे खरे तर कोल्हापूरच्या शाहूमहाराजांच्या काळातले, खूप नंतरचे आहेत.

भौगोलिकतेचा अभ्यास
दख्खनचा हा राजा स्वतःहून अनेकदा लढाईत उडी घ्यायचा. जेव्हा शाहिस्तेखान पुणे शहराच्या बोकांडी बसला होता, तेव्हा त्याने करतलबखान नावाच्या आपल्या सरदाराला कोकणच्या मोहिमेवर धाडून दिले होते. तेव्हा दोन फेब्रुवारी १६६१ ला उंबरखिंडीजवळ स्वतः शिवाजीमहाराज नेताजीला घेऊन खानाच्या समाचारासाठी उभे ठाकले होते. तेव्हा उंबरखिंडीच्या भौगोलिक परिस्थितीचा राजांनी असा कौशल्यपूर्ण उपयोग करून घेतला की, वाघाच्या जबड्यात गेल्यावर पुन्हा आभाळाचे दर्शन होणे नाही, अशी अवस्था त्यांनी खानाच्या फौजेची करून सोडली. आख्खी फौज निःशस्त्र करून करतलबखानाला माघारा पिटाळला. आजही लोणावळ्याच्या डावीकडून खाली चावणी व उंबर गावाजवळ पेण परिसरातील ही रणभूमी जशीच्या तशी शिवकाळाची साक्ष देत उभी आहे.

स्वराज्य रयतेचेच
सिद्दी जौहर स्वराज्यावर चाल करून येतो आहे, हे समजल्यावर महाराजांना स्वतःच्या संरक्षणासाठी आधीच आत सह्याद्रीच्या रांगांत धाव घेऊन बचाव करता आला असता; पण शत्रूला ते स्वराज्याच्या सीमाप्रदेशात पन्हाळगडावर आडवे गेले. शत्रूच्या जास्तीत जास्त रसदेचे नुकसान होऊ देऊन त्याला पन्हाळगडच्या वेढ्यात दीर्घकाळ तिष्ठत बसायला लावून त्यांनी ऐन पावसाळ्याचा मुहूर्त पकडला. कारण त्यांना इथल्या झऱ्यांची, वाहत्या ओढ्यांची आणि डोंगरमाथ्यावर फुटणाऱ्या ढगांचीही कल्पना होती. जुलै महिन्यात तर पन्हाळा, शाहूवाडी भागात इतका धुवॉंधार पाऊस पडतो, धुकेही माजते की, दहा-पंधरा हातांवरचेसुद्धा दिसत नाही. अशा चिखल-पावसात शत्रूकडून हत्ती आणि तोफखाना घेऊन पाठलाग होणे तर केवळ अशक्‍यच. असा पर्जन्याचा पडदा सोबतीला घेऊनच राजांनी सिद्दी जौहरच्या हातावर तुरी दिली होती.

अखंड सावधान असणाऱ्या शिवरायांनी मातीतून माणसे तयार केली. त्यांच्या हिंदवी स्वराज्याचा सात-बाराच रयतेच्या नावाचा होता. त्यामुळेच औरंगजेबाने जसे आपले मृत्युपत्र, वसियतनामा बनवला, तशी मृत्युपत्राची राजांना कधी आवश्‍यकता भासली नाही. कारण जे होते ते सर्व रयतेचेच होते. शिवराय हे फणसाच्या गऱ्यासारखे जितके गोड, तितकेच प्रसंगी गारगोटीसारखे कठीण हृदयाचेही होते. पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापूरच्या रेविंग्टन या इंग्रज साहेबाने सिद्दी जौहरला दारूगोळा विकला; पूर्ण मदत केली. राजांना त्याचा एवढा राग आला, की त्यांनी पुढे इंग्रजांच्या राजापूरच्या वखारीला खणत्या लावल्या. रेविंग्टनसाहेबाला पकडून, बांधून काळ नदीच्या खोऱ्यात आणला. रायगडासमोरच्याच लिंगाणा किल्ल्यावरच्या टोकाच्या गुहेत त्याला कैदी म्हणून तीन वर्षे आत फेकून दिले. आजही रायगडाच्या बुरुजावरून लिंगाण्याचा तो सुळका दिसतो, तेव्हा अंगात कापरे भरते.

सज्ज दरी-खोरी
ता. ४ फेब्रुवारी १६७० ला कोंढाणा किल्ला जिंकताना अवघे ३०० मावळे अंधाऱ्या रात्री वर चालून गेले होते. त्यांनी उदयभान आणि त्याची दीड ते दोन हजारांची शिबंदी सपासप कापून काढली होती. "यशवंती' नावाच्या घोरपडीच्या कमरेला दोर बांधून तानाजी रात्रीचा गड चढला, अशी दंतकथा आहे. त्याचा अन्वयार्थ एवढाच, की शिवाजीच्या हिंदवी स्वराज्यासाठी इथली दरी-खोरी, गिरी-कंदरे, पऱ्हे-झरे, घोरपडीसारखी पशू-पाखरेही नव्हे, तर अवघा निसर्गच मराठ्यांना फितूर झाला होता...चार वर्षांमागे पोलादपूर तालुक्‍यातील तानाजी मालुसरेंच्या उंबरठ या गावाला मी भेट दिली. तेव्हा गावकऱ्यांनी एका आंब्याच्या झाडाच्या डोणीमध्ये सापडलेल्या लांब पल्ल्याच्या अनेक तलवारी मला दाखवल्या. कालौघात त्यांची पाती झिजली आहेत; पण मुठी मात्र शाबूत आहेत. कोंडाजी फर्जंदाने अवघ्या ६२ साथीदारांसह एकदा पन्हाळा किल्ला जिंकला होता. अरबी आणि फारसी कागदपत्रांनी "मराठ्यांच्या फौजा म्हणजे जणू वानरसेना,' असा अनेकदा उल्लेख केला आहे, तो एका अर्थी खराच आहे. राजे आरंभी लाल महालात वावरले. त्यानंतर राजगड ही शिवरायांची राजधानी झाली.

मिर्झाराजा स्वराज्यावर जेव्हा चालून आला, तेव्हा राजांना नमविण्यासाठी राजगडच्या परिसरातील ६०-६५ गावे त्याने जाळून काढली. आपल्या वास्तव्याचा रयतेला त्रास नको म्हणूनच एखाद्या गरुडाने उंच कड्यावर आपले घरटे बांधावे, तशी राजांनी राजधानीसाठी कोकणातील रायगडाची निवड केली. जेणेकरून शत्रूच्या तोफा त्या दुर्गम प्रदेशात पोचणार नाहीत; कोकणातील व्यापारावर व समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूवर वचक ठेवता येईल, घाटमाथ्यावरील पाहुण्या-राउळ्यांचा आणि भाऊबंदांचा रोजचा त्रासही कमी होईल, असे अनेक उद्देश रायगडाच्या निवडीमागे होते. अनेक उंच गिरिशिखरांनी वेढलेल्या पर्वतरांगांच्या दाटीत मधल्या भक्कम अशा बलदंड चौथऱ्यावर रायगड उभा आहे.

"शिवलंका' या नावाने गौरवलेल्या रायगडाचे श्रीवर्धन-तळ्याकडून येणाऱ्या रस्त्याने डोंगर उतरताना वळणावर होणारे दर्शन किंवा माणगाव आणि गांगोलीच्या सपाट रानातून दूरवरचा दिसणारा कुर्रेबाज रायगड काही वेगळाच असतो. निसर्गदेवतेचे नानाविध चमत्कार आणि पौर्णिमेच्या रात्रीचा अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी रायगडासारखा दुसरा परिसर नाही. मी एकूण २७ वेळा इथल्या स्वर्गीय पौर्णिमा पाहिलेल्या आहेत. गोकुळात दह्या-दुधाने भरलेले रांजण शिगोशीग भरून वाहावेत, तसे पौर्णिमेचे चांदणे या गडाच्या आसपासच्या दऱ्याखोऱ्यांतून नुसते हुंदडत असते! गिरिशिखरांच्या सुळक्‍यांच्या शेंड्यांवर लुकलुकणाऱ्या चांदण्या पाहिल्या की जणू नक्षत्रांचा मंडपच शिवबांच्या रायगडाला ओवाळणी घालण्यासाठी खाली उतरत असल्याचा भास होतो. मला तर नेहमी असे वाटते की, महाराष्ट्रातील सर्व जाणत्या राज्यकर्त्यांनी वर्षातून किमान एखाद-दुसरा मुक्काम रायगडावर ठोकावा. पुण्यसंचय जमा करावा. जुन्या पिढीतील कविराज माधव यांनी उगाच म्हटलेले नाही ः

"प्रयाग-काशी-मथुरा-वृंदावन ही कोणाला?
नसेल ठावा रायगड जया त्या हतभाग्याला '


याच पुण्यभूमीत शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता. रायगडाच्या समोरच्या मोठ्या दरीपल्याड "कोकणदिवा' नावाचा किल्ला आहे. त्याच्या उंच टोकावरून रायगडावरची राज्यसभा, बाजारपेठ, सिंहासन सारे काही दिसते. राज्याभिषेकाचा तो स्वर्गीय सोहळा पाहण्यासाठी तेव्हा जर प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण या परिसरात आले असतील, तर त्यांनी नक्कीच कोकणदिव्याची आपल्या बैठकीसाठी निवड केली असेल.

रायगडाचे पावन दर्शन
पुणे जिल्ह्यातून कोकणाकडे येताना कावळ्याचा घाट उतरला की, त्या खिंडीच्या बाजूलाच कोकणदिवा उभा आहे. मी चार वर्षांपूर्वी काही मित्रांना घेऊन कारवीच्या झुडपांचा आधार घेत कोकणदिवा चढून वरच्या टोकाकडे गेलो होतो. त्या गडाच्या माथ्यावर सुमारे पाच पुरुष उंचीचा प्रचंड पाषाण आहे. त्यावर चढताना थोडे जरी पाऊल घसरले तर मनुष्य पलीकडच्या साडेतीन हजार फूट खोलीच्या काळदरीत कोसळलाच म्हणून समजा. माझ्या सोबतचे त्या भागातील सर्व मित्र आणि माझी चौदा वर्षांची मुलगी आम्रपाली तो प्रचंड पाषाण चढून वर गेलो. मी थोडासा घाबरून खाली थांबलो. त्या वरच्या पथकात एक जाधव नावाचा पूर्वाश्रमीचा गिरणी कामगार होता. चिंचेच्या फोकासारखा दिसणारा. अवघे ८२ वर्षे वयोमान असणारा तो म्हातारा पाषाणाच्या शेंडीवर चढला होता. समोरच्या रायगडाकडे पाहत "हर हर महादेव' असा नारा देत नाचत होता. त्या म्हातारबाचा नाच पाहून मलाही सुरसुरी आली. सहकाऱ्यांनी सोबत आणलेल्या नायलॉनच्या बळकट रश्‍शा मी खाली फेकायला लावल्या. दोन्ही काखांमधून रस्सी बांधून मी मित्रांना तो नाडा वरून खेचायला सांगितला. शेवटी धाडस करून मी पाषाणमाथ्यावर जाऊन पोचलो. तेथून जेव्हा रायगडाचे दर्शन घेतले स्वतःला पावन झाल्यासारखे वाटले.

...आप्तांनीच घेतला चावा
याच सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांवर शिवपुत्र संभाजीचा अतीव भरवसा होता. संगमेश्‍वरला पकडले जाण्याआधी त्यांचा मुक्काम जवळच्या खेळणा ऊर्फ विशाळगडावर होता. तेथून निघताना किल्ल्याचा एक मोठा बुरुज कोसळला; तेव्हा अतिदक्षता आणि अतिसावधानता या आपल्या पित्याच्या गुणांना ते जागले. भविष्यात अचानक शत्रू आला तर किल्ला आणि आसपासचा मुलूख आपल्या ताब्यातून जाऊ नये म्हणून त्यांनी तीन दिवस आणि तीन रात्रीत विशाळगडाचा संपूर्ण बुरुज बांधून काढला. ते जेव्हा महत्त्वाच्या मसलतीच्या निमित्ताने संगमेश्‍वरात आले, तेव्हा त्यांच्यासोबत महाराणी येसूबाई, रामदासांचे उत्तराधिकारी रंगनाथ स्वामी, सेनापती म्हाळोजी घोरपडे आणि तरुण धनाजी-संताजीसुद्धा होते. बाजूच्या आंबाघाटात कवी कलशांची मलकापुरी घोडी गस्त घालत होती. इथेच स्वराज्यातच काय; पण त्याच वेळी त्याच दिवशी संभाजीराजांची पंधरा हजारांची फौज दूर तामिळनाडूमध्येही मोरोपंतांच्या बंधूंच्या नेतृत्वाखाली झुंजत होती. औरंगजेबाच्या इतिहासकारांनी लिहिल्याप्रमाणे, जेथे सूर्याची किरणे पोचू शकत नाहीत, असा हा दाट झाडीचा प्रदेश. आजही हा मुलूख जवळपास तसाच आहे; त्यामुळे शत्रू तिथे पोचायची शक्‍यता अजिबात नव्हती. मात्र, भक्तिभावाने पूजेसाठी मांडलेल्या चौरंगाच्या पाटाखालीच एखादा जहरी नाग येऊन दबा धरून बसावा; तसा गणोजी शिर्के नावाचा राजांचा सख्खा मेहुणाच मुकर्रबखानाला घेऊन दगाबाजीने तिथे पोचला होता. त्या आप्तानेच जहरी चावा घेतला.मोगलांना हे पुरते ठाऊक होते की, जोवर शिवाजी आणि संभाजीसारखे धाडसी पुरुष सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर उभे असतात, तोवर त्यांच्या एकट्याच्या अंगात चारशे हत्तींचे बळ असते. त्यामुळेच सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री दिवेलागणीपर्यंत त्या किर्र जंगलातल्या मळेघाटाने मोगलांनी शंभूराजांना पळवले. त्या रात्री कऱ्हाडच्या मोगलांच्या तळावर नेऊन सोडले. मळेघाटाची जी दुर्धर वाट रानातल्या वाऱ्यालाही माहीत नव्हती, ती वैऱ्यांना स्वत: दाखवण्याचे अधम कृत्य गणोजीने केले. आजही तो घाट आहे तसा आहे. पाच वर्षांपूर्वी मीसलग चौदा तास त्या खिंडीनेच खाली उतरून तिथल्या काट्याकुट्यांचा, अगदी जहरीतल्या जहरी सर्पराजाचाही अनुभव घेतला आहे. याबाबत "संभाजी' या कादंबरीत मी लिहिले आहेच.

हकनाक बदनामी
अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा हा उरतो की, संगमेश्‍वरला संभाजीराजांना पकडल्यावर त्यांना औरंगजेबाने चाळीस ते बेचाळीस दिवस मुळात जिवंत कसे ठेवले? औरंगजेबाचा इतिहास पाहता कुशाग्र बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या दारा नावाच्या त्याच्या भावासकट त्याने आपल्या कोणत्याही शत्रूला दिसा-दोन दिसांच्या पलीकडे जिवंत ठेवले नव्हते. मात्र, औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याच्या सर्व किल्ल्यांच्या किल्ल्या आपल्या मुठीत हव्या होत्या. सुरवातीला येसूबाई धावत आपल्याकडे येईल आणि आपल्या धन्याच्या प्राणाची भीक मागण्यासाठी आपल्या पायावर गडाबडा लोळेल, असे त्याला वाटत होते. मात्र, कपाळीच्या कुंकवापेक्षा येसूबाईने हिंदवी स्वराज्याच्या भाळावरील स्वातंत्र्याच्या दिव्याला अधिक महत्त्व दिले! त्याच वेळी आपली गर्दन दहा वेळा छाटली गेली तरी शिवरायांचे स्वप्न टिकले पाहिजे, अशी भूमिका शंभूराजांनी घेतली होती. तसे गुप्त संदेशही इकडून तिकडे जात असत. शेवटी या थोर राजपुत्राने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी राष्ट्रासाठी आपले शिरकमल अर्पण केले. तेव्हा नाशिककडचे दोन-तीन किल्ले वगळता स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही. जगाच्या इतिहासात देशाच्या स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे "राष्ट्राय स्वाहा' करून मृत्यूला मिठी मारणारा असा बाजिंदा राजकुमार दुसरा कोणी जन्मला नाही अन्‌ त्याच्या तेज:पुंज कर्तृत्वाला समजून न घेता त्याच्यावर हकनाक बदनामीची राळ उठवणारा महाराष्ट्रासारखा दुसरा करंटा प्रांतही कुठे नसेल.

सह्याद्रीसारखा सुंदर तोच!
ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो, त्या इमारती वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्याला दाद देत नाहीत. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा पाया इतका मजबूत होता की, इथे गवताला भाले फुटले. राजांच्या निधनानंतर शंभूराजांनी प्रथम नऊ वर्षे आणि नंतर राजांच्या सुनांनी येसूबाई आणि ताराबाई यांनी; तसेच धनाजी आणि संताजीने औरंगजेबासारख्या कळीकाळाविरुद्ध सह्याद्रीच्या साक्षीने स्वातंत्र्याचे होमकुंड तेवतच ठेवले. चार-दोन महिन्यांच्या अवधीत महाराष्ट्र गिळण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाला सलग २७ वर्षे "दे माय धरणी ठाय' करून सोडले. औरंगजेबाने सह्याद्रीची, इथल्या गिरिशिखरांची, किल्ल्यांची आणि नेरांची खूप भीती खाल्ली होती. शंभूराजाच्या हत्येनंतरही तो पुणे किंवा साताऱ्याकडे सरकला नाही. सोलापूरजवळ ब्रह्मपुरीत चार वर्षे, विजापूरजवळ गलगले या गावी तीन वर्षे असा तो दूर भीमा नदीच्या काठाने फिरता फिरता सह्याद्रीच्या दिशेने नजर लावून उसासे टाकत म्हातारा झाला.
आपल्या इतिहास आणि संस्कृतीमुळे भारताला भाग्यवंत देश मानले जाते. मात्र, सह्याद्रीसारखे वरदान मिळायला आपल्या देशातील इतर प्रांत भाग्यवान नाहीत. आज सुखवस्तू मराठी माणूस फक्त बडोदा अगर इंदोरला जात नाही, तो लंडनच्या ऑक्‍सफर्ड स्ट्रीटवरून आणि न्यूयॉर्कच्या रस्त्यावरूनही फिरताना जीवनाचे साफल्य शोधू लागला आहे. मात्र, अशा वेळी प्रत्येक मराठी माणसाने सह्याद्री आडवातिडवा फिरून पाहिला पाहिजे. स. आ. जोगळेकरांच्या "सह्याद्री ' या ग्रंथांत या पर्वताचा अभ्यासपूर्ण पोवाडा गाइला आहे; तर आनंद पाळंदेसारख्या अभ्यासकांनी "डोंगरयात्रा' लिहून इथल्या सर्व दऱ्या-खोऱ्यांच्या, वाटा-वळणाच्या शास्त्रशुद्ध नोंदी तरुण पिढीसाठी उपलब्ध केल्या आहेत. गो. नी. दांडेकर, घाणेकर, सदाशिव हेटवलीकर व बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या गड-किल्ल्यांबाबत खूप चांगले लिहून ठेवले आहे. अर्धे जग फिरून आल्यावरही "सह्याद्रीसारखे सुंदर दुसरे काही नाही,' असे माझे मत झाले आहे. म्हणूनच आमच्या तरुणांनी या पर्वतराजीतून उभे-आडवे खूप हिंडावे. उन्हाळ्यात मोहरांनी भरलेली राने, लालभडक पळसांची बने, पावसात जागोजागी कड्यावरून कोसळणारे जलप्रपात, गौरी-गणपतीनंतर सोनकीच्या पिवळ्या फुलांनी सजलेले डोंगरउतार...सारे काही पाहून घ्यावे, असे मला वाटते.

इतिहासपुरुष सह्याद्री
साताठ वर्षांपूर्वी माझे कादंबरीकार मित्र अनंत सामंत मुंबई सेंट्रलवरून एसटीने मध्यरात्रीनंतर पाचाडला निघाले होते. तेव्हा त्यांना एसटीतच चार अंध तरुण विद्यार्थी भेटले. "आम्ही रायगड बघायला चाललोय, असा त्यांचा एकसारखा जल्लोष सुरू होता.' जेव्हा ते अंध विद्यार्थी पाचाडला उतरले, तेव्हा रोपवेने न जाता ते चौघे पायवाटेने चक्क रायगड चढले. अवघड वळणावर आपल्या हातातील पांढऱ्या काठ्या एकमेकांच्या हाती देऊन, एक-दुसऱ्याच्या आधारानेच ते सर्वजण रायगड चढत होते. त्यामध्ये शिंदे आडनावाची एक मुलगीही होती. त्यांनी जगदीश्‍वराचे मंदिर "पाहिले'! बाजाराच्या दगडी जोत्यांना आणि शिवरायांच्या पुतळ्यांच्या पायांना स्पर्श केला. "गाईड' तयार नसतानाही ते सर्वजण धाडसाने टकमक टोकसुद्धा "पाहून' आले. त्यांच्या चर्येवरचा अपूर्व आनंद आणि अमाप उत्साह पाहिल्यावर असे जाणवत होते की, डोळसांना जो रायगड कधी दिसला नाही त्याच्याहून दिव्य,अद्भुत अशा रायगडाचे आणि शिवाजीच्या मंगल मुलखाचे खरे दर्शन या चमूला झाले होते. सामंत यांनी या विषयावर "दृष्टी' या नावाची एक छोटेखानी कादंबरीही लिहिली आहे.

डोळस महाराष्ट्राने जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तेव्हा सह्याद्री नावाच्या इतिहासपुरुषाचे दर्शन घ्यायला हवे. अन्यथा तुमच्या-आमच्या उशाशी एवढा प्रचंड स्फूर्तिदायी इतिहास घडूनसुद्धा आम्हा सर्वांची अवस्था नर्मदेतल्या उघड्या गोट्याप्रमाणे होईल! दुसरे काय?
 
आपल्या "गडलक्ष्मी"बद्दल शिवरायांना इतका विश्वास की, त्यांनी म्हटले होते ः ""दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे; तो आला तरी नवे-जुने ३६० किल्ले हजरतीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी त्याला ३६० वर्षे पाहिजेत!''

राजे नेहमी पालखीतून वावरायचे, हा गैरसमज आहे. कधी कधी ते पालखीचा वापर करत. मात्र, शिवाजीचा अंगरखा घातलेल्या मराठी नटांना घोड्यावर नीट बसता यायचे नाही, म्हणून सिनेमासाठी पालखी सोईची झाली!

 

 


January 03, 2011

पानिपताच्या ओल्या जखमा

पानिपताच्या महासंग्रामाला येत्या जानेवारीत अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत अन्‌ मराठी वाङ्‌मयात इतिहास घडविणाऱ्या "पानिपत' कादंबरीची तिसावी, खास स्मृतिविशेष आवृत्ती राजहंस प्रकाशन उद्या (२० डिसेंबर) प्रकाशित करत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याचा ऊर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपताचे नाव घेताच ज्याला दु:खाने हुरहूर लागत नाही, तो मराठी मनुष्यच नव्हे! यानिमित्ताने कादंबरीकार विश्‍वास पाटील यांनी जागवलेले हे ध्यासपर्व!

पानिपत या चारअक्षरी शब्दांशी माझ्या श्‍वासाचे आणि माझ्या धमन्यांतून वाहणाऱ्या रक्ताचे असे कोणते विलक्षण नाते गुंफले गेले आहे, कोणास ठाऊक! वयाच्या ऐन पंचविसाव्या वर्षी या विषयावर कादंबरी लिहिण्याच्या इराद्याने मी साधनसामग्री गोळा करू लागलो अन्‌ वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी कादंबरीचे प्रत्यक्ष लेखन मी हातावेगळे केले.

याच विषयाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक किस्सा आठवतो. यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते, त्यांच्या मोटारींचा ताफा पंजाबातून दिल्लीकडे येत होता. रस्त्यात एका मोठ्या गावात "पानिपत' नावाचा नामफलक त्यांना दिसला. आपला प्रवास खंडित करून जेथे पानिपताचा समरप्रसंग घडला, त्या "काला आम' नावाच्या ठिकाणी ते गेले. तेथे मराठी वीरांच्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधीच्या समोरच त्यांनी शेतात अचानक बसकण मारली. त्या रानची पांढुरकी माती त्यांनी आपल्या दोन्ही मुठींमध्ये धरली व कविहृदयाचे यशवंतराव हमसून हमसून रडू लागले. त्यांची ही अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची तारांबळ उडाली. भावनेचा पहिला पूर ओसरल्यावर आपल्या ओघळत्या अश्रूंना कसाबसा बांध घालत यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले, ""दोस्तहो, हीच ती पवित्र माती. राष्ट्रसंकट उद्‌भवल्यावर त्याविरोधात लढावे कसे, शत्रूला भिडावे कसे, याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे. आमच्या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येक घराघरामधला वीर इथे कोसळला आहे. त्यांच्या रक्ता-मांसानीच या मातीचे पवित्र भस्मात रूपांतर झाले आहे!''

अगदी अलेक्‍झांडरपासून बाबर ते अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणे व्हायची ती याच रस्त्याने. अफगाणिस्तानातून, पंजाबातील सरहिंदकडून दिल्लीकडे सरकणारा हा रस्ताच जणू अनादी काळापासून रक्तासाठी चटावलेला आहे. पानिपतापासून अवघ्या काही कोसांच्या अंतरावर कुरुक्षेत्राची रणभूमी आहे. पानिपताचे तिसरे युद्ध अफगाण घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार, तारीख १४ जानेवारी १७६१ या दिवशी घडले. मध्ययुगीन कालखंडात सकाळी नऊ वाजल्यापासूनच संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. अलीकडे हिरोशिमा आणि नागासाकीवर दोन अमेरिकन अणुबॉंब पडले. त्यांच्या किरणोत्साराचा परिणाम होऊन एक-दीड लाख जीव मरायलाही दोन-तीन दिवस लागले होते. दिल्लीच्या बादशहाच्या म्हणजेच हिंदुस्थानच्या रक्षणाच्या उद्देशाने १७५२ च्या "अहमदिया करारा'नुसार मराठे एका ध्येयाने प्रेरित होऊनच पानिपतावर गेले होते. इथेच आमच्या लक्षावधी माता-भगिनींच्या बांगड्यांचा चुराडा झाला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला.

तेव्हा महाराष्ट्रात असे एकही देवघर शिल्लक उरले नसेल की, जिथल्या देवी-देवतांनी पानिपतावर खर्ची पडलेल्या वीरांसाठी आपले चांदीचे डोळे पुशीत अश्रूंचा अभिषेक केला नसेल!

माझ्या कादंबरीलेखनाच्या दरम्यान, ""तू पुणेकरांना मोठे करण्यासाठी "पानिपत' लिहिलेस काय?'' अशा शब्दांत मला दटावण्याचा प्रयत्न केला गेला. मी त्यांना म्हणालो, ""माझ्या डोळ्यांसमोर ना कोणी पुणेकर होते; ना कोणी सातारकर. पंढरीच्या वेशीमध्ये आषाढी-कार्तिकीला मराठा मातीतल्या साऱ्या दिंड्या-पताका एक व्हाव्यात तशा पानिपतावर शत्रूच्या बीमोडासाठी अन्‌ राष्ट्राच्या संरक्षणासाठी एक झालेला मराठी मुलूख उभा होता!''

जेव्हा पुण्याची लोकसंख्या वीस-बावीस हजारांच्या वर नव्हती, तेव्हा लाखभर मराठे कंबर कसून इथे उभे ठाकले होते. त्यामध्ये भाऊसाहेब, विश्‍वासरावांसह सात-आठ ब्राह्मण सरदार आणि फक्त मराठा समाजातीलच नव्हे, तर बहुजन समाजातील, अठरा पगड जातीचे, मातीचे, साठ ते सत्तर बिन्नीचे सरदार त्या समरांगणात जिवापाड लढले होते. त्या वेळच्या शाहिरांच्या पोवाड्यातील फक्त आडनावांच्या यादीवरूनच नजर फिरवा, त्याचा जरूर पडताळा येईल.
शिवाजीमहाराजांच्या काळातील आणि शिवाजीमहाराजांच्या नंतरच्या काळातील सामान्य घरांतील सामान्य माणसे असामान्यपदाला पोचल्याची अनेक उदाहरणे पानिपतप्रसंगी आढळतात. पुणे जिल्ह्यातील नीरेकाठच्या होळच्या धनगराचा पोर मल्हारी सरदार मल्हारराव होळकर बनला. साताऱ्याकडचा कण्हेरखेडचा राणोजी शिंदे, त्याचा भाऊ दत्ताजी, पुणे जिल्ह्यातील दमाजी गायकवाड याच मंडळींनी पानिपतानंतर इंदूर, ग्वाल्हेर आणि बडोद्याकडे आपल्या पराक्रमाने राज्ये उभारली. एक प्रकारे आधी पानिपताच्या मातीला रक्ताचा नैवेद्य अर्पण केल्यावरच उत्तर हिंदुस्थानाच्या राजकारणाच्या गुरुकिल्ल्या त्यांच्या हाती लागल्या.

पानिपत ही ऐन यौवनातल्या, मस्तवाल फाकड्या वीरांनी छेडलेली जीवघेणी जंग होती. आमचा शत्रू अहमदशहा अब्दाली हा तेव्हा जगातल्या बलाढ्य योद्ध्यांपैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी होता. या युद्धाच्या वेळी त्याची उमर अवघी बत्तीस होती; तर भाऊसाहेब पेशव्यांचे वय अठ्ठावीस होते. दत्ताजी शिंदे बाविशीचा, विश्‍वासराव आणि जनकोजी शिंदे तर सतरा वर्षांची मिसरूड फुटल्या वयाची पोरे होती. जेव्हा देशातील कोणत्याही नदीवर आजच्यासारखे पूल, रस्ते वा वाहतुकीची साधने नव्हती, तेव्हा सुमारे साठ हजार घोड्यांसह लाखाचा सेनासागर घेऊन बाहेर पडणे, या खायच्या गोष्टी नव्हत्या.

आम्ही झुंजलो दिल्लीच्या बादशहासाठी, हिंदुस्थानाच्या अभिमानासाठी. मात्र, दुर्दैवाने उत्तरेतल्या राजांनी मराठ्यांना मदत केली नाही. रजपूत राजे राजस्थानाच्या वाळूत लपून बसले. दुर्दैवाने या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हाला वाट्टेल ते करून धनधान्याची रसद गंगा-यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरवणारा गोविंदपंत बुंदेले ठार झाला अन्‌ तेथूनच अवकळा सुरू झाली. तरीही भाऊसाहेब पानिपताच्या मातीत गाडून उभे होते. मात्र, श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तव्याला जागले नाहीत. पुण्याहून कुमक आली नाही. पतियाळाचा अलासिंग जाट पंजाबातून कुमक पाठवत होता, ती पुढे कमी पडली. स्त्रिया-पोरांचे, यात्रेकरूंचे लटांबर सोबत असणे हे काळरूढीनेच भाऊंच्या पाठीवर लादलेले ओझे होते; पण त्यामुळे मात्र हातातल्या सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्याने तिळभर विश्रांती घेतली नाही.

शेवटी अन्नानदशा झालेली मराठी सेना झाडांची पाने आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली. कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले, यासाठी दुसऱ्या कोणा ऐऱ्यागैऱ्याची साक्ष काढण्याचे कारण नाही. ज्याच्याविरुद्ध आम्ही जंग केली, त्या आमच्या महाशत्रूनेच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे ः ""दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धादिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्‍चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्‍य!''

"पानिपत' कादंबरीसाठी प्रचंड पूर्वतयारीचे जोखड उचलताना आणि प्रत्यक्ष लेखन करतानाही जणू मी स्वत:च पानिपतावर अडकून पडलेला एक लढवय्या, चिवट मराठी सैनिक आहे, अशा तडफेने लढत होतो! तेव्हा सरकारी अधिकारी या नात्याने पुण्यात वास्तव्य होते. महाराष्ट्र शासनाने नुकताच पाच दिवसांचा आठवडा सुरू केला होता. मी दर शुक्रवारी सायंकाळी आयबी तथा इन्स्पेक्‍शन बंगलानामक सरकारी विश्रामगृहातील एका खोलीत जाऊन स्वत:ला बंद करून घेत असे. सोमवारी सकाळी तिथून किमान साठ ते सत्तर पानांचा सलग मजकूर घेऊनच मी उल्हसित मनाने बाहेर पडत असे.

इतर दिवशी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून मी सरळ इतिहास संशोधक मंडळाच्या ग्रंथालयात जाई. नित्यनेमाने तेथे तीन तास बसे. रात्री हलके जेवण करून मी झपाटल्यासारखा बेडरूममध्ये येरझाऱ्या घालत राही. समरप्रसंगी भाऊसाहेब काय म्हणाले असतील, त्यावर अब्दालीचे उत्तर, नजिबाच्या कागाळ्या, नाट्यप्रवेशच सादर केल्यासारखा मी खोलीत फिरत संवाद बोलत राही. रात्री अकराला झोपायचे की लगेच पहाटे चारला उठून प्रत्यक्ष लेखन सुरू. या अतिश्रमांनी अधेमध्ये माझ्या प्रकृतीवर परिणाम होई. एकदा छातीत दुखू लागल्याने ससूनमध्ये दाखल झालो होतो. माझे लग्न होऊन दीड वर्ष लोटलेले. तेव्हा अबोल दिसणाऱ्या माझ्या पत्नीने-चंद्रसेनाने-हॉस्पिटलमध्ये माझा हात पकडला. आपल्या डोळ्यांत पाणी आणून ऐतिहासिक थाटात, घोगऱ्या आवाजात ती हळूच मला म्हणाली, ""इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या बांगड्यांचा हिशेब जरूर मांडावा; परंतु पानिपत लिहीत असताना माझे "पानिपत' होऊ देऊ नये!''

कादंबरीचे आताचे लेखन सुरू करण्यापूर्वी सहा-सात महिने आधीही मी एकदा लेखनप्रपंच मांडला होता. चांगली साठ-सत्तर पाने लिहिली होती; पण माझे मन आतून खाऊ लागले. पानिपताची कडवी जंग ज्या तडफेने मांडायला हवी, तशी ती साधत नव्हती. त्यामुळे ती आरंभीची साठ-सत्तर पाने मी बाजूला भिरकावली. पुन्हा चिंतन, मनन, संशोधन सुरू केले. साधारणतः नोव्हेंबर १९८७ च्या दरम्यान आतून शब्दवेणा खूप ढुसण्या देऊ लागल्या. या प्रसूतीशिवाय मी जगूच शकत नाही, याची खात्री झाली. मग सलग सहा-सात महिन्यांत, नोकरीत रजा न घेताही रात्री-बेरात्री जागून मी कादंबरीचे एकटाकी लेखन पार पाडले.

या लेखनाच्या वेळी माझे जागृत मन, प्रचलित मराठी ऐतिहासिक कादंबऱ्यांचेही निरीक्षण करत होते. ऐतिहासिक कादंबरी म्हणजे मोठी आलंकारिक भाषा, वस्त्रांची रसाळ वर्णने, युद्धभूमी सोडून माजघरात आपल्या स्त्रियांशी अखंड चर्चा करत बसणारे वीर, असे होता कामा नये. पानिपत हा रणदेवतेचा विषय होता. त्यामुळेच मी जाणीवपूर्वक माजघरातल्या झोपाळ्यावरच्या गप्पाटप्पांत अडकलेली ऐतिहासिक कादंबरी रणावरच्या उन्हामध्ये घेऊन जायचे ठरवले! शिवाय या विषयाच्या पोटातच तीन महान वाङ्‌मयप्रकार सामावल्याची जाणीवही एकीकडे मला होत होती. उदगिरीपासून ते पानिपतापर्यंतची निबिड अरण्यातून मराठा लष्कराने केलेली वाटचाल हा एक उत्तम प्रवासवर्णनाचा भाग होता. अब्दाली आणि भाऊसाहेबांच्या एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या फौजा, त्यांच्या छावण्यांतले बदल, डाव-प्रतिडाव अशा संघर्षाचे एक अप्रतिम नाटक आणि युद्धोत्तरही भारलेले पानिपताचे धगधगते रणांगण हा एक महाकादंबरीचा विषय होताच.

"बचेंगे तो और भी लडेंगे' असे म्हणत काळाला सामोऱ्या जाणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या बुऱ्हाडी घाटच्या लढाईची मी जोरकस तयारी केली होती. संदर्भ, संवाद आणि व्यक्तिरेखांचे ढग मेंदूमध्ये गच्च भरून आले होते. मात्र, अचानक वाढलेल्या सरकारी कामामुळे प्रत्यक्ष लेखनासाठी वेळ मिळेना. रजाही मंजूर होईना. त्यादरम्यान पुण्याहून मंत्रालयात अनेकदा मीटिंगला यावे लागे. मात्र, मानगुटीवर बसलेल्या दत्ताजीची नशा खाली उतरत नव्हती. दरम्यान, एक दिवस डेक्कन क्वीनने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होतो. फर्स्ट क्‍लासमध्ये भोजनासाठी समोरच्या खुर्चीपाठी जो लाकडी पाट असतो, त्यावरच मी कागदांची चवड ठेवली अन्‌ पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात बुऱ्हाडी घाटचे ते आख्खे प्रकरण एकटाकी लिहून पूर्ण केले. घाईगर्दीत उतरलेले ते प्रकरण वाचकांना खूप भावले आहे.

माजगावकरांआधी चार-पाच प्रकाशकांनी हस्तलिखित पाहिले होते. म्हणजे पाहिलेच होते! एक नवखा लेखक मोठाल्या पाच फायली भरून लिहिले तरी काय दिवे लावणार आहे, अशा हिशेबाने कोणी गांभीर्याने हस्तलिखितच उघडले नव्हते, हे नंतर समजले. "चलो दिल्ली'च्या निमित्ताने आनंद यादवांनी दिलीपरावांची ओळख करून दिलेली. त्यांच्या ऑफिसमध्ये मी बळे बळे अनेकदा घुसायचो. दरम्यान, माजगावकरांनी कष्टाने उभारलेल्या "नेहरू डायरी'ची कल्पना केंद्र शासनानेच मदत करण्याऐवजी ढापली. त्यांच्या या मन:स्थितीत मी दबक्‍या आवाजात "पानिपता'वर काही लिहिल्याचे हळूच सांगितले. त्यांनी हस्तलिखित मुद्दाम मागवून घेतले, वाचले आणि चष्म्यांच्या काड्यांतून माझ्याकडे पाहत, ""ते (मराठे) हरले, तुम्ही जिंकलात'' असे खुशीने सांगितले. कादंबरीची तडाखेबंद जाहिरात केली. मला आठवते त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथनिर्मितीसाठी बॅंकेतून कर्ज उचलले होते. "कशासाठी एका नवख्या घोड्यावर एवढे पैसे लावता?' अनेक जण त्यांना विचारायचे. मात्र, "बघू, इस पार या उस पार' ते उत्तर द्यायचे.

प्रसिद्ध चित्रकार रवींद्र मेस्त्रींनी, मधुमलाईच्या जंगली मोहिमेवर असताना, त्या वास्तव्यातच "पानिपत'चे सुंदर मुखपृष्ठ चितारले. १९८८ च्या पर्जन्यमासात मी, पुण्याचे तेव्हाचे जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील, दगडूशेठ हलवाईच्या गणपती मंदिरात गेलो होतो. गणेशाचे आशीर्वाद घेऊन मुद्रणाला प्रारंभ झाला. माझ्या आणि माजगावकरांच्या जवळजवळ रोज सकाळी भेटी व्हायच्या. आम्ही शनिपाराच्या आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये कुठेतरी मिसळ खायचो. यशाबद्दल एकीकडे शंकाही वाटायची; पण सुगरणीने फोडणी दिली की तिच्या स्वयंपाकाचा सुगंध गल्लीत लपून राहत नाही, तसे झाले. स्वस्तिक मुद्रणालयातील रायरीकर पिता-पुत्रांपासून जुळाऱ्यांपर्यंत सारे बोलू लागले, ""कादंबरी भन्नाट आहे. उड्या पडतील.''

"पानिपत'चे तमाम मराठी वाचकांनी भरभरून स्वागत केले. कादंबरीवर अक्षरश: उड्या पडल्या. ग्रंथालयातील प्रती पुरेशा पडायच्या नाहीत. त्यामुळे अधीर वाचकांनी अनेक ठिकाणी बाइंडिंग उसवून फॉर्म्स वेगवेगळे केले. एका वेळी एक प्रत तिघे-चौघे जण वाचताहेत, अशीही दृश्‍ये पाहावयास मिळाली. दिलीपरावांच्या धाकट्या भगिनी अलका गोडे तेव्हा कौतुकाने बोलायच्या, ""काय कादंबरी लिहिलीत हो! पाच-सात आवृत्त्या झाल्या तरी "पानिपत'च्या प्रतींनी अजून गोडाऊन पाहिलेले नाही. अशा आल्या की अशा पटकन दुकानात जातात.'' पुढे काही नतद्रष्टांनी या लठ्ठ कादंबरीचीसुद्धा पायरसी करून आपले पोट जाळायचा निंद्य प्रकारही केला.

लोकमान्यतेबरोबरच "पानिपत'ने विद्वानांच्या पगड्याही हलवल्या. शांता शेळके, शिवाजी सावंत, ग. वा. बेहरे, म. द. हातकणंगलेकर आदींनी भरभरून परीक्षणे लिहिली. पैकी बेहरे पायाच्या व्याधीने रुग्णालयात होते. तरी त्यांनी तेथे मला मुद्दाम पाचारण करून शाबासकी दिली. ""तुम्ही चितारलेला इब्राहिमखान गारद्याच्या मृत्यूचा प्रसंग वाचताना अंगावर सरसरून काटा उभा राहतो. श्रेष्ठ कादंबरीकारासाठी आवश्‍यक असे सारे गुण तुमच्या लेखणीत आहेत. जपा त्यांना.''

तिकडे नाशकाहून वि. वा. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांनी खास प्रशंसा केली. तात्यासाहेब शिरवाडकरांनी लिहिले, ""पानिपताचा आवाका गगनाला गवसणी घालण्यासारखा आहे. कलम तुमच्यावर प्रसन्न आहे. खूप लिहा.'' या विषयावर शिरवाडकरांनाच एक कादंबरी लिहायची होती, असे त्यांनी प्रत्यक्ष भेटीत मला सांगितले. १९५८ च्या दरम्यान वि. स. खांडेकरांनी एक लेख लिहिला होता. त्यात म्हटले होते, की येत्या काही वर्षांत "पानिपत' या विषयावर एखादी दमदार कादंबरी लिहून नव्या पिढीचा एखादा कादंबरीकार जोमाने साहित्यक्षितिजावर पुढे येईल.

आता बावीस वर्षांनंतर खांडेकरांचे भाकीत माझ्या बाबतीत खरे घडले, असे म्हणायला हरकत नाही. माझ्यासारख्या खेड्यापाड्यातून पुढे आलेल्या नवागतांवर शिरवाडकर आणि कानेटकर अशी स्तुतिसुमने उधळत होते. ती तारीफ अनेक ज्येष्ठांना रुचायची नाही. या कादंबरीच्या यशाची कमान चढती राहिली. त्याच वेळी दुर्दैवाने मराठीतील काही ज्येष्ठ साहित्यिक तिच्या कीर्तीचे पंख छाटायचा छुपा, शिस्तबद्ध आणि सातत्याने प्रयत्न करतच होते. तरीही या कलाकृतीने अडथळ्यांच्या अनेक शर्यती पार पाडल्या. हे मी माझे नशीब समजतो.

या कादंबरीच्या निमित्ताने सदाशिवरावभाऊ यांची एक लेचापेचा, नवशिका सेनापती अशी जनामनात रुजवली गेलेली प्रतिमा पार पुसून गेली. पानिपत म्हणजे केवळ एक अशुभ घटना, बाजारगर्दी अशा रूढ कल्पनांनाही धक्का बसला. पानिपत हे त्या अर्थी पानिपत नसून तो एक "पुण्यपथ' असल्याचा साक्षात्कार लोकांना हळूहळू का होईना होऊ लागला आहे.

गतवर्षी माझ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनाच्या निमित्ताने मी हरिद्वारला गेलो होतो. तेव्हा शेजारच्याच पानिपत परिसरातून नव्याने हिंडून आलो. युद्धाच्या वेळची शुक्रताल, बडौत, नजिबाबाद, कुंजपुरा ही ठाणी आणि जुन्या खाणाखुणा अजूनही तशाच आहेत. पानिपत जिल्ह्यातील एका गावाचेच नाव भाऊपूर असे आहे. मराठ्यांचा दारुण पराभव होऊन काही हजार कुटुंबे पळापळीनंतर उत्तरेतच स्थायिक झाली. कर्तृत्ववान बनली. त्यापैकी काही जणांनी उत्तर प्रदेशासारख्या बलाढ्य राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. पानिपताच्या युद्धाच्या वेळी आपले बापजादे यमुनाकाठी घिसाडघाईने कपाळमोक्ष करून घेण्यासाठी आले नव्हते, तर इकडे राष्ट्राच्या उत्थानासाठी आले होते, याच नवजाणिवेने आता तिकडे स्थलांतरित मराठ्यांमध्ये नवजागृतीची लाट आली आहे. युद्धाच्या वेळी मराठी लष्कराने पानिपताच्या किल्ल्यात रोजच्या पूजेसाठी भवानीचे छोटेसे मंदिर बांधले होते. त्याचा गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला आहे. अगदी शेवटच्या क्षणी केवळ अल्लातालाच्या कृपेने अब्दालीला तेव्हा तो विजय मिळालेला होता, त्याचे निशाण उराशी कवटाळताना त्याला धाप लागली होती. खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. आज अडीचशे वर्षांच्या दीर्घ पल्ल्यानंतरही या परिसरातले जोगी जमातीचे शाहीर आम्ही केव्हाच वेड्या ठरवलेल्या भाऊसाहेब पेशव्यांचेच पोवाडे आजही गातात; अब्दालीचे नव्हेत! पराजयाचा कलंक लागूनही कळीकाळानेच जणू भाऊसाहेबांना अमरत्वाच्या सिंहासनावर आरूढ केले आहे. आज "रोड मराठा' या नावाने आपले बांधव त्या दूरदेशी लाखालाखांच्या संख्येने एकत्र येऊ लागले आहेत. हरियानात मेळावे भरवू लागले आहेत. मराठी आणि हिंदीसह गेल्या बावीस वर्षांत पानिपत कादंबरीची पताकाही फडकतच राहिली आहे.

आता तिसाव्या खास आवृत्तीच्या निमित्ताने माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि नाट्यनिर्माते मोहन वाघ या दोघांची प्रकर्षाने आठवण होते. नरसिंह राव पंतप्रधान व्हायच्या आधी भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष होते. तेव्हा काही कामानिमित्त ते मुंबईत आले होते. मराठीचा व्यासंग असलेल्या रावांनी "महाराष्ट्र टाइम्स'मध्ये हेरवाडकरांनी लिहिलेले "पानिपत'चे परीक्षण वाचले अन्‌ मुद्दाम बाजारातून प्रत मागवून ती झपाटून वाचली. अन्‌ लगेचच ही कादंबरी भारतीय ज्ञानपीठातर्फे हिंदीमध्ये प्रकाशित करावयाची व्यवस्था केली. त्यांच्यासारख्या जागरूक साहित्यप्रेमीमुळेच माझ्यासाठी हिंदी वाचकांचा महादरवाजा उघडला गेला. मोहन वाघांनी या कादंबरीवर माझ्या खनपटीला बसून "रणांगण' नावाचे नाटक लिहून घेतले. गाजवले. आज मराठी पडद्यावर आणि अनेक चॅनेल्सवर चमकणारे अनेक तारे "रणांगण'चीच देन आहेत. आज नावाप्रमाणेच वाघ असणारे मोहन वाघ हयात असते तर पानिपताच्या महासंग्रमाला अडीच शतके पार पडल्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर "रणांगणा'ची शहादणे आणि तुताऱ्या नक्कीच निनादून सोडल्या असत्या.
तिसाव्या खास आवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशक दिलीप माजगावकर, सौ. माजगावकर आणि या कादंबरीच्या हस्तलिखिताची पहिली शंभर पाने वाचल्यापासून कादंबरीची कणखरपणे पाठराखण करणारे शंकर सारडा या सर्वांचे ऋण मानावेत, तेवढे थोडेच आहेत.

"पानिपत'ला प्रियदर्शिनी पुरस्कार, गोव्याचा नाथ माधव पुरस्कार, कोलकत्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारासह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले. लक्ष लक्ष वाचकांचा आशीर्वाद मिळाला. यानिमित्ताने रेसाईड नावाच्या आंग्ल विद्वानाची आठवण होते. "पानिपत' वाचून त्यांनी मला सांगितले, ""दुसऱ्या महायुद्धात आम्ही लंडनवासियांनी लढवलेली "बॅटल ऑफ ब्रिटन' अशीच होती. तेव्हा आमचा खात्मा करण्यासाठी चहूबाजूंनी अग्निवर्षाव करत जर्मनीची विमाने आमच्या लंडननगरीवर पुन: पुन्हा चाल करून येत असत. तुमच्या पानिपतावरच्या चिवट योद्ध्यांप्रमाणेच आम्ही थेम्स नदीकाठी आणि लंडनमध्ये घराघरात भुयारे खोदून जंग खेळलो. आगीच्या लोळात अनेकदा भाजून निघालो. मात्र, पानिपताच्या धुरा-धगीच्या कल्लोळात झुंजल्या गेलेल्या महासंघर्षाला योग्य तो न्याय देणारी समर्थ लेखणी तुमच्या निमित्ताने मराठी भाषेला मिळाली. त्या तोडीचे कलम अद्याप आम्हाला मिळालेले नाही.'' रेसाईडसाहेबांचे ते शब्द ऐकून मी खूप भारावून गेलो होतो. एखाद्या लेखकाला यापेक्षा अधिक कोणते मोठे पारितोषिक मिळू शकते बरे?