January 04, 2011

सह्याद्री आणि शिवाजी-संभाजी!


शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्‌ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले. हिंदवी स्वराज्यासाठी सह्याद्रीची गिरिशिखरे, पशू-पाखरे, झरे-पऱ्हे, घोरपडी नव्हे; तर अवघा निसर्गच जणू या महत्कार्यासाठी सज्ज झाला होता.

म्हामोगल सरदारांना कल्पना नाही, आमचा मुलूख किती कठीण आणि दुर्धर आहे ते! माझ्या मुलखातून तुमचे घोडदळ हाकणे तर सोडाच; पण तुमच्या कल्पनेतील घोडीसुद्धा नाचविणे केवळ अशक्‍य आहे,'' असा खरमरीत खलिता १६६४ साली शिवाजीराजांनी मोगलांच्या बडेजावी सरदारांना पाठविला होता. राजांच्या त्या पर्शियन पत्रातून स्वराज्यातील दुर्गम अशा सह्यपर्वताबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, निष्ठा सर्व काही व्यक्त होते.

सुरतलुटीनंतर नाशिक, बागलाण व दिल्लीकर पातशहाच्या मुलखामध्ये शिवाजीराजांनी एकच उडदंग माजविला होता. तेव्हा शिवाजीला धडा शिकविण्यासाठी औरंगजेबाने रणनीती आखायला सुरवात केली. दक्षिण मुलखाची खडान्‌खडा माहिती असणाऱ्या महम्मद कुलीखान नावाच्या सरदाराची निवड केली. तो पंजाबामध्ये पंचहजारी मनसबदार म्हणून काम पाहत होता. औरंगजेब कमालीचा संशयी आणि सावध स्वभावाचा होता. त्याने कुलीखानाची कठोर परीक्षा घेतलीच; शिवाय त्याच्या जवळच्या सरदाराने पातशहाला असा अहवाल दिला की ः "कुलीखान हा बंदा इतका एकनिष्ठ आहे की, एकेकाळी आपण मरगठ्ठा होतो, हेही तो पूर्णपणे विसरून गेला आहे. हा बाटगा या जन्मी तरी पातशहा सलामतना सोडून जाणार नाही. आपण हवी तशी कामगिरी त्याच्याकडून पार पाडू शकू, खाविंद!' शिवाजीराजांना मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखानाच्या तडाख्यापुढे पुरंदरचा नामुष्कीचा तह मान्य करावा लागला होता. स्वराज्यातील बलाढ्य अशा २३ किल्ल्यांवर उदक सोडावे लागले होते. त्याच दरम्यान पन्हाळ्याच्या मोहिमेत पोचायला नेताजी पालकरला उशीर झाला. त्यामुळे राजांनी त्याची खरडपट्टी काढली, तेव्हा चिडलेल्या नेताजीने राजांना उलट जबाब केला ः ""आपण तरी कसले राजे? आणि आम्ही तरी कसले सेनापती? आता आपण मोगलांचे मनसबदार आहात!'' तेव्हा राजांनी नेताजी पालकरला तत्काळ बडतर्फ केले. त्यामुळे तो स्वराज्यातून निघून आदिलशहाकडे गेला. मात्र, हुशार मिर्झाराजाने त्याला सरळ दिल्लीकर औरंगजेबाच्या सेवेत नेऊन दाखल केले. औरंगजेबाने नेताजीसारखे रत्न तना-मनाने पातशीही सेवेत घ्यायचे ठरविले.
त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले. त्याच्या दोन्ही स्त्रियांना पातशहाने दटावून विचारले, ""तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याच्या नव्या धर्मात येता की आमच्या वहिवाटीप्रमाणे आम्हीच एखाद्या शहजादीशी याची शादी करून देऊ?'' तेव्हा नवऱ्यासाठी दोघींनी परधर्म स्वीकारला.

जेव्हा दहा पावसाळे उलटलेले, तेव्हा महम्मद कुलीखान आचार-विचाराने पुरा खानसाहेबच बनलेला. शिवाजीचे नुकसान करायचे या इराद्यानेच तो इंदापूर-माणगावच्या रानात येऊन पोचला होता. मात्र, जेव्हा त्याने दूरवर दिसणारा रायगड पाहिला, तेव्हा त्याच्या अंगावरचा पातशाही जामानिमा खाली गळून पडला. झाडांना मिठ्या मारत, इथल्या वाऱ्यावर तरंगत, अश्रू ढाळत, धावत-पळतच तो रायगड चढला. शिवरायांच्या पायावर जाऊन गडबडा लोळला; तेव्हा, "नेताजी बहाद्दरा,' अशी हाक मारत राजांनी त्याला पोटाशी धरले. त्याचे शुद्धीकरण करून त्याला स्वधर्मात आणि स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे हाच कित्ता त्याच रायगडावर राज्य करताना संभाजीराजांनी गिरवला. हरसूलच्या कुलकर्ण्यासह अनेकांना स्वधर्मात व स्वराज्यात माघारा घेतले.

जीर्णोद्धार शिवकाळातच
सह्याद्रीच्या सान्निध्यातच शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजली, फोफावली. त्यांची कीर्ती दिगंतात पसरली. राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असला तरी शिवनेरी आणि जुन्नर तालुक्‍याचा पट्टा कधीच हिंदवी स्वराज्यात नव्हता. मात्र, सानाचे थोर होत असताना शिवरायांनी एक महत्त्वाचे निरीक्षण केले होते. दिल्लीकर असोत वा निजामशहा वा आदिलशहा ते मराठी सरदारांना फक्त जहागिऱ्याच देत. किल्ल्यांचा ताबा स्वतःच्या मुठीत ठेवत अन्‌ किल्ले हेच तर राज्याचे हृदय असते. जसे इतिहासात स्कॉटिश योद्‌ध्यांनी आपल्या पराक्रमाने आणि गनिमी काव्याने इंग्लडचे सिंहासन हादरवून सोडले होते; तसेच काही दशके मराठ्यांनी सह्याद्री पर्वताचे खड्‌ग हाती घेऊन दिल्लीच्या सिंहासनाला हादरे दिले आहेत. सह्याद्रीच्या अंगरख्यावर अगदी सातवाहन आणि भोज राजापासूनच्या सम्राटांनी अनेक कठीण, बेलाग, अंजिक्‍य आणि जंगली किल्ल्यांची लेणी खोदून ठेवली आहेत. "शिवदिग्विजया'तील नोंदीनुसार घाटमाथा आणि कोकणात मिळून एकूण ३६० किल्ले आहेत. मात्र, सह्याद्रीतील किल्ल्यांचा खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार झाला तो शिवकाळातच. शिवरायांचे अवघे जीवन तर किल्ले घडवण्यात आणि घडवलेले किल्ले लढवण्यात गेले!

"किल्ले राज्यास रक्षण"
मराठ्यांच्या युद्धनीतीची मीमांसा करताना प्रसिद्ध इतिहासकार एस. एन. सेन म्हणतो, ""शिवाजीच्या स्वराज्यात अशी एकही महत्त्वाची टेकडी उरली नव्हती, जिथे संरक्षणासाठी चौक्‍या वा पहारे लावलेले नव्हते.'' शिवरायांनी अनेक नवे दुर्ग-किल्ले बांधले. जुने दुरुस्त केले. तोरणा बांधताना खजिना सापडला. त्या द्रव्याचा उपयोग कल्याणचा किल्ला बांधताना केला. दुर्गाडीचा किल्ला बांधूनच त्यांनी आपल्या बलाढ्य आरमाराच्या उभारणीस प्रारंभ केला.
""जैसा कुळंबी शेतास माळा घालून शेत राखतो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत,'' असे शिवाजीराजे सांगतात. त्यांना आपल्या गडलक्ष्मीबद्दल इतका भरवसा की ""दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने ३६० किल्ले हजरतीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी त्याला ३६० वर्षे पाहिजेत!'' महाराजांच्या या भरवशाची प्रचीती शत्रूला अनेकदा आली आहे. चाकणची छोटीशी गढीही फिरंगोजी नरसाळ्याने कित्येक दिवस झुंजती ठेवून शाहिस्तेखानाला घाम फोडला होता.

पुढे दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रावर चार लाखांची फौज घेऊन धावून आला होता, तेव्हा नाशिकजवळच्या दिंडोरी तालुक्‍यातील रामशेजचा एक छोटासा
किल्ला संभाजीराजांनी साडेसहा वर्षे लढता ठेवला होता.

सह्याद्री नि झुंजारपणा
औरंगजेबाने चार-पाच सेनानायक बदलूनही त्याला विजय संपादन करता आला नाही. शेवटी तो किल्ला पडला फंदफितुरीनेच! आजही वणी डोंगराच्या रस्त्याच्या डाव्या हाताला इतिहासाचा हा महान साक्षीदार सर्वांना दर्शन देत उभा असल्याचे दिसते.

साधेपणाने राहायचे कसे, कठीण परिस्थितीशी सामना देत झुंजायचे कसे आणि कमी खर्चात डोंगरासारखी कामे उरकायची कशी, याचे शिक्षण जणू याच सह्याद्रीने शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांना दिले होते. त्यामुळेच हिंदवी स्वराज्यात मीठ-भाकर आणि पातशाही तंबूत शिरकुर्म्याचा बेत! याच सह्यपर्वतावर राहणाऱ्या रांगड्यांच्या खांद्यावरच्या घोंगड्या शिवबाने बाजूला झटकल्या. त्यांना कमरेला शेला गुंडाळायला शिकवले. त्यांच्या हातामध्ये भाला आणि पाठीवर ढाली दिल्या. दिल्लीकर पातशहाचा सरदार महाबतखान याने तेव्हा आपल्यासोबत काबूल-कंदाहारच्या ४०० नायकिणींचा संच आणला होता. अनेकदा बागलाणाकडे त्याच्या मैफली रंगत, तेव्हा पातशहाच्या फौजेसोबत असणारा इतिहासकार भीमसेन सक्‍सेना लिहितो ः ""कुठे हे मराठे, जे तळहातावर कांदा-भाकरी घेऊन घोड्यावरून चाळीस चाळीस मैल दौड करतात; ज्यांना दिवसाची विश्रांती माहीत नाही, जे जाता जाता वाटेतल्या माळावर चार भाले रोवतात, त्यावर घोंगडी टाकून तात्पुरता आडोसा करतात अन्‌ लगेच घोड्यावरून वाऱ्यासारखी झेप घेत मोहिमेवर आगेकूच करतात अन्‌ तेच दुसरीकडे कंदाहारी नायकिणीच्या आगेमागे लाळ घोटणारे आमचे पातशाही फौजेतील उल्लूचे पठ्ठे!''

युद्धनीतीची सांगड
आजही सह्याद्रीतून उभे-आडवे फिरताना अनेक गोष्टी ध्यानी येतात. फार पूर्वीपासून कोकण किनाऱ्यावरील बंदरातून घाटमाथ्याकडे व्यापार चालायचा. अवघड, दुर्गम आणि वळणावळणाच्या पायवाटा आणि खिंडी ओलांडायला लागायच्या. बैलाच्या पाठीवर सामानांच्या गोण्या ठेवून खिंडारे चालायची. सातवाहन काळात घाटमाथ्यावरून ही वाहतूक राजधानी पैठणकडे व्हायची. नंतर पुण्याकडच्या वाटा मळल्या. घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठीच जागोजागी किल्ल्यांची रचना केलेली आहे. महाबळेश्‍वरजवळच्या पार घाटाच्या नाक्‍यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजांनी प्रतापगड बांधला. कोकण दरवाज्याजवळचा राजमाची, भोरघाटाजवळचा लोहगड, आंबा घाटाजवळचा विशाळगड ही सर्व अशीच उदाहरणे आहेत.

सह्याद्रीच्या प्रकृतीशीच शिवरायांनी आपल्या युद्धनीतीची सांगड घातली होती. गनिमी काव्याच्या खेळाला सह्यद्रीसारखा लाभदायक प्रदेश दुसरा नाही. गनिमी कावा जन्मला-वाढला, फोफावला आणि कीर्तिध्वजावर जाऊन पोचला, तो याच सह्याद्रीच्या साथीने आणि साक्षीने. एखादा पैलवान जसा समोरच्या जोडीदाराला आपल्या पटात घेतो, म्हणजेच अंगाखाली घेऊन त्याला चिरडून टाकतो, त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या साथीने शिवरायांनी भलेभले शत्रू अंगावर ओढून घेतले होते. सातारा, कोरेगावकडचा मुलूख जाळत जेव्हा अफजलखान वाईदेशी आला होता, तेव्हा अनेक ज्येष्ठांनी त्याला सल्ला दिला होता ः "शहाजीचा मुलगा धाडसी आहे. त्याच्या भेटीसाठी जावळीच्या खोऱ्यात जाऊ नका...'. तेव्हा गर्विष्ठ अफजलखानाने उत्तर केले होतेः "तुम्हाला तरी आमच्या पराक्रमाची कुठे कल्पना आहे? उलट तो शिवा आम्हाला घाबरून जावळी खोऱ्यात लपून बसला आहे...' . जशी आईच्या मांडीची बाळालाच माहिती असते, तशी लाव्हारसापासून तयार झालेल्या सह्याद्रीच्या खडकरांगांची ताकद आणि जादूगिरी शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांना माहीत होती. याच सह्याद्रीच्या निबिड अरण्याला पाठीशी घेऊन शिवरायांनी नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, कमळाजी साळुंखे, येसाजी कंक, गायकवाड यांच्यासह व्यूहरचना केली आणि अफजलखानाचा कोथळा फाडून त्याची दहा हजारांची फौज गर्दीस मिळविली. विजयाच्या कैफात मश्‍गूल न राहता पुढच्या आक्रमक आणि चपळ हालचाली केल्या. फक्त दोन आठवड्यांच्या आत पन्हाळा घेतला. प्रचंड वेगवान हालचाली, कमालीचा सावधपणा, अविश्रांत उद्योग हे सारे काही ते या रानातच शिकले होते. राजे नेहमी पालखीतून वावरायचे, हा गैरसमज आहे. कधी कधी ते पालखीचा वापर करत. मात्र, शिवाजीचा अंगरखा घातलेल्या मराठी नटांना घोड्यावर नीट बसता यायचे नाही, म्हणून सिनेमासाठी पालखी सोईची झाली! अलीकडे पडद्यावर दिसणारे शिवकालीन म्हणून दाखवलेले फेटे हे खरे तर कोल्हापूरच्या शाहूमहाराजांच्या काळातले, खूप नंतरचे आहेत.

भौगोलिकतेचा अभ्यास
दख्खनचा हा राजा स्वतःहून अनेकदा लढाईत उडी घ्यायचा. जेव्हा शाहिस्तेखान पुणे शहराच्या बोकांडी बसला होता, तेव्हा त्याने करतलबखान नावाच्या आपल्या सरदाराला कोकणच्या मोहिमेवर धाडून दिले होते. तेव्हा दोन फेब्रुवारी १६६१ ला उंबरखिंडीजवळ स्वतः शिवाजीमहाराज नेताजीला घेऊन खानाच्या समाचारासाठी उभे ठाकले होते. तेव्हा उंबरखिंडीच्या भौगोलिक परिस्थितीचा राजांनी असा कौशल्यपूर्ण उपयोग करून घेतला की, वाघाच्या जबड्यात गेल्यावर पुन्हा आभाळाचे दर्शन होणे नाही, अशी अवस्था त्यांनी खानाच्या फौजेची करून सोडली. आख्खी फौज निःशस्त्र करून करतलबखानाला माघारा पिटाळला. आजही लोणावळ्याच्या डावीकडून खाली चावणी व उंबर गावाजवळ पेण परिसरातील ही रणभूमी जशीच्या तशी शिवकाळाची साक्ष देत उभी आहे.

स्वराज्य रयतेचेच
सिद्दी जौहर स्वराज्यावर चाल करून येतो आहे, हे समजल्यावर महाराजांना स्वतःच्या संरक्षणासाठी आधीच आत सह्याद्रीच्या रांगांत धाव घेऊन बचाव करता आला असता; पण शत्रूला ते स्वराज्याच्या सीमाप्रदेशात पन्हाळगडावर आडवे गेले. शत्रूच्या जास्तीत जास्त रसदेचे नुकसान होऊ देऊन त्याला पन्हाळगडच्या वेढ्यात दीर्घकाळ तिष्ठत बसायला लावून त्यांनी ऐन पावसाळ्याचा मुहूर्त पकडला. कारण त्यांना इथल्या झऱ्यांची, वाहत्या ओढ्यांची आणि डोंगरमाथ्यावर फुटणाऱ्या ढगांचीही कल्पना होती. जुलै महिन्यात तर पन्हाळा, शाहूवाडी भागात इतका धुवॉंधार पाऊस पडतो, धुकेही माजते की, दहा-पंधरा हातांवरचेसुद्धा दिसत नाही. अशा चिखल-पावसात शत्रूकडून हत्ती आणि तोफखाना घेऊन पाठलाग होणे तर केवळ अशक्‍यच. असा पर्जन्याचा पडदा सोबतीला घेऊनच राजांनी सिद्दी जौहरच्या हातावर तुरी दिली होती.

अखंड सावधान असणाऱ्या शिवरायांनी मातीतून माणसे तयार केली. त्यांच्या हिंदवी स्वराज्याचा सात-बाराच रयतेच्या नावाचा होता. त्यामुळेच औरंगजेबाने जसे आपले मृत्युपत्र, वसियतनामा बनवला, तशी मृत्युपत्राची राजांना कधी आवश्‍यकता भासली नाही. कारण जे होते ते सर्व रयतेचेच होते. शिवराय हे फणसाच्या गऱ्यासारखे जितके गोड, तितकेच प्रसंगी गारगोटीसारखे कठीण हृदयाचेही होते. पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापूरच्या रेविंग्टन या इंग्रज साहेबाने सिद्दी जौहरला दारूगोळा विकला; पूर्ण मदत केली. राजांना त्याचा एवढा राग आला, की त्यांनी पुढे इंग्रजांच्या राजापूरच्या वखारीला खणत्या लावल्या. रेविंग्टनसाहेबाला पकडून, बांधून काळ नदीच्या खोऱ्यात आणला. रायगडासमोरच्याच लिंगाणा किल्ल्यावरच्या टोकाच्या गुहेत त्याला कैदी म्हणून तीन वर्षे आत फेकून दिले. आजही रायगडाच्या बुरुजावरून लिंगाण्याचा तो सुळका दिसतो, तेव्हा अंगात कापरे भरते.

सज्ज दरी-खोरी
ता. ४ फेब्रुवारी १६७० ला कोंढाणा किल्ला जिंकताना अवघे ३०० मावळे अंधाऱ्या रात्री वर चालून गेले होते. त्यांनी उदयभान आणि त्याची दीड ते दोन हजारांची शिबंदी सपासप कापून काढली होती. "यशवंती' नावाच्या घोरपडीच्या कमरेला दोर बांधून तानाजी रात्रीचा गड चढला, अशी दंतकथा आहे. त्याचा अन्वयार्थ एवढाच, की शिवाजीच्या हिंदवी स्वराज्यासाठी इथली दरी-खोरी, गिरी-कंदरे, पऱ्हे-झरे, घोरपडीसारखी पशू-पाखरेही नव्हे, तर अवघा निसर्गच मराठ्यांना फितूर झाला होता...चार वर्षांमागे पोलादपूर तालुक्‍यातील तानाजी मालुसरेंच्या उंबरठ या गावाला मी भेट दिली. तेव्हा गावकऱ्यांनी एका आंब्याच्या झाडाच्या डोणीमध्ये सापडलेल्या लांब पल्ल्याच्या अनेक तलवारी मला दाखवल्या. कालौघात त्यांची पाती झिजली आहेत; पण मुठी मात्र शाबूत आहेत. कोंडाजी फर्जंदाने अवघ्या ६२ साथीदारांसह एकदा पन्हाळा किल्ला जिंकला होता. अरबी आणि फारसी कागदपत्रांनी "मराठ्यांच्या फौजा म्हणजे जणू वानरसेना,' असा अनेकदा उल्लेख केला आहे, तो एका अर्थी खराच आहे. राजे आरंभी लाल महालात वावरले. त्यानंतर राजगड ही शिवरायांची राजधानी झाली.

मिर्झाराजा स्वराज्यावर जेव्हा चालून आला, तेव्हा राजांना नमविण्यासाठी राजगडच्या परिसरातील ६०-६५ गावे त्याने जाळून काढली. आपल्या वास्तव्याचा रयतेला त्रास नको म्हणूनच एखाद्या गरुडाने उंच कड्यावर आपले घरटे बांधावे, तशी राजांनी राजधानीसाठी कोकणातील रायगडाची निवड केली. जेणेकरून शत्रूच्या तोफा त्या दुर्गम प्रदेशात पोचणार नाहीत; कोकणातील व्यापारावर व समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूवर वचक ठेवता येईल, घाटमाथ्यावरील पाहुण्या-राउळ्यांचा आणि भाऊबंदांचा रोजचा त्रासही कमी होईल, असे अनेक उद्देश रायगडाच्या निवडीमागे होते. अनेक उंच गिरिशिखरांनी वेढलेल्या पर्वतरांगांच्या दाटीत मधल्या भक्कम अशा बलदंड चौथऱ्यावर रायगड उभा आहे.

"शिवलंका' या नावाने गौरवलेल्या रायगडाचे श्रीवर्धन-तळ्याकडून येणाऱ्या रस्त्याने डोंगर उतरताना वळणावर होणारे दर्शन किंवा माणगाव आणि गांगोलीच्या सपाट रानातून दूरवरचा दिसणारा कुर्रेबाज रायगड काही वेगळाच असतो. निसर्गदेवतेचे नानाविध चमत्कार आणि पौर्णिमेच्या रात्रीचा अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी रायगडासारखा दुसरा परिसर नाही. मी एकूण २७ वेळा इथल्या स्वर्गीय पौर्णिमा पाहिलेल्या आहेत. गोकुळात दह्या-दुधाने भरलेले रांजण शिगोशीग भरून वाहावेत, तसे पौर्णिमेचे चांदणे या गडाच्या आसपासच्या दऱ्याखोऱ्यांतून नुसते हुंदडत असते! गिरिशिखरांच्या सुळक्‍यांच्या शेंड्यांवर लुकलुकणाऱ्या चांदण्या पाहिल्या की जणू नक्षत्रांचा मंडपच शिवबांच्या रायगडाला ओवाळणी घालण्यासाठी खाली उतरत असल्याचा भास होतो. मला तर नेहमी असे वाटते की, महाराष्ट्रातील सर्व जाणत्या राज्यकर्त्यांनी वर्षातून किमान एखाद-दुसरा मुक्काम रायगडावर ठोकावा. पुण्यसंचय जमा करावा. जुन्या पिढीतील कविराज माधव यांनी उगाच म्हटलेले नाही ः

"प्रयाग-काशी-मथुरा-वृंदावन ही कोणाला?
नसेल ठावा रायगड जया त्या हतभाग्याला '


याच पुण्यभूमीत शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता. रायगडाच्या समोरच्या मोठ्या दरीपल्याड "कोकणदिवा' नावाचा किल्ला आहे. त्याच्या उंच टोकावरून रायगडावरची राज्यसभा, बाजारपेठ, सिंहासन सारे काही दिसते. राज्याभिषेकाचा तो स्वर्गीय सोहळा पाहण्यासाठी तेव्हा जर प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण या परिसरात आले असतील, तर त्यांनी नक्कीच कोकणदिव्याची आपल्या बैठकीसाठी निवड केली असेल.

रायगडाचे पावन दर्शन
पुणे जिल्ह्यातून कोकणाकडे येताना कावळ्याचा घाट उतरला की, त्या खिंडीच्या बाजूलाच कोकणदिवा उभा आहे. मी चार वर्षांपूर्वी काही मित्रांना घेऊन कारवीच्या झुडपांचा आधार घेत कोकणदिवा चढून वरच्या टोकाकडे गेलो होतो. त्या गडाच्या माथ्यावर सुमारे पाच पुरुष उंचीचा प्रचंड पाषाण आहे. त्यावर चढताना थोडे जरी पाऊल घसरले तर मनुष्य पलीकडच्या साडेतीन हजार फूट खोलीच्या काळदरीत कोसळलाच म्हणून समजा. माझ्या सोबतचे त्या भागातील सर्व मित्र आणि माझी चौदा वर्षांची मुलगी आम्रपाली तो प्रचंड पाषाण चढून वर गेलो. मी थोडासा घाबरून खाली थांबलो. त्या वरच्या पथकात एक जाधव नावाचा पूर्वाश्रमीचा गिरणी कामगार होता. चिंचेच्या फोकासारखा दिसणारा. अवघे ८२ वर्षे वयोमान असणारा तो म्हातारा पाषाणाच्या शेंडीवर चढला होता. समोरच्या रायगडाकडे पाहत "हर हर महादेव' असा नारा देत नाचत होता. त्या म्हातारबाचा नाच पाहून मलाही सुरसुरी आली. सहकाऱ्यांनी सोबत आणलेल्या नायलॉनच्या बळकट रश्‍शा मी खाली फेकायला लावल्या. दोन्ही काखांमधून रस्सी बांधून मी मित्रांना तो नाडा वरून खेचायला सांगितला. शेवटी धाडस करून मी पाषाणमाथ्यावर जाऊन पोचलो. तेथून जेव्हा रायगडाचे दर्शन घेतले स्वतःला पावन झाल्यासारखे वाटले.

...आप्तांनीच घेतला चावा
याच सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांवर शिवपुत्र संभाजीचा अतीव भरवसा होता. संगमेश्‍वरला पकडले जाण्याआधी त्यांचा मुक्काम जवळच्या खेळणा ऊर्फ विशाळगडावर होता. तेथून निघताना किल्ल्याचा एक मोठा बुरुज कोसळला; तेव्हा अतिदक्षता आणि अतिसावधानता या आपल्या पित्याच्या गुणांना ते जागले. भविष्यात अचानक शत्रू आला तर किल्ला आणि आसपासचा मुलूख आपल्या ताब्यातून जाऊ नये म्हणून त्यांनी तीन दिवस आणि तीन रात्रीत विशाळगडाचा संपूर्ण बुरुज बांधून काढला. ते जेव्हा महत्त्वाच्या मसलतीच्या निमित्ताने संगमेश्‍वरात आले, तेव्हा त्यांच्यासोबत महाराणी येसूबाई, रामदासांचे उत्तराधिकारी रंगनाथ स्वामी, सेनापती म्हाळोजी घोरपडे आणि तरुण धनाजी-संताजीसुद्धा होते. बाजूच्या आंबाघाटात कवी कलशांची मलकापुरी घोडी गस्त घालत होती. इथेच स्वराज्यातच काय; पण त्याच वेळी त्याच दिवशी संभाजीराजांची पंधरा हजारांची फौज दूर तामिळनाडूमध्येही मोरोपंतांच्या बंधूंच्या नेतृत्वाखाली झुंजत होती. औरंगजेबाच्या इतिहासकारांनी लिहिल्याप्रमाणे, जेथे सूर्याची किरणे पोचू शकत नाहीत, असा हा दाट झाडीचा प्रदेश. आजही हा मुलूख जवळपास तसाच आहे; त्यामुळे शत्रू तिथे पोचायची शक्‍यता अजिबात नव्हती. मात्र, भक्तिभावाने पूजेसाठी मांडलेल्या चौरंगाच्या पाटाखालीच एखादा जहरी नाग येऊन दबा धरून बसावा; तसा गणोजी शिर्के नावाचा राजांचा सख्खा मेहुणाच मुकर्रबखानाला घेऊन दगाबाजीने तिथे पोचला होता. त्या आप्तानेच जहरी चावा घेतला.मोगलांना हे पुरते ठाऊक होते की, जोवर शिवाजी आणि संभाजीसारखे धाडसी पुरुष सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर उभे असतात, तोवर त्यांच्या एकट्याच्या अंगात चारशे हत्तींचे बळ असते. त्यामुळेच सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री दिवेलागणीपर्यंत त्या किर्र जंगलातल्या मळेघाटाने मोगलांनी शंभूराजांना पळवले. त्या रात्री कऱ्हाडच्या मोगलांच्या तळावर नेऊन सोडले. मळेघाटाची जी दुर्धर वाट रानातल्या वाऱ्यालाही माहीत नव्हती, ती वैऱ्यांना स्वत: दाखवण्याचे अधम कृत्य गणोजीने केले. आजही तो घाट आहे तसा आहे. पाच वर्षांपूर्वी मीसलग चौदा तास त्या खिंडीनेच खाली उतरून तिथल्या काट्याकुट्यांचा, अगदी जहरीतल्या जहरी सर्पराजाचाही अनुभव घेतला आहे. याबाबत "संभाजी' या कादंबरीत मी लिहिले आहेच.

हकनाक बदनामी
अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा हा उरतो की, संगमेश्‍वरला संभाजीराजांना पकडल्यावर त्यांना औरंगजेबाने चाळीस ते बेचाळीस दिवस मुळात जिवंत कसे ठेवले? औरंगजेबाचा इतिहास पाहता कुशाग्र बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या दारा नावाच्या त्याच्या भावासकट त्याने आपल्या कोणत्याही शत्रूला दिसा-दोन दिसांच्या पलीकडे जिवंत ठेवले नव्हते. मात्र, औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याच्या सर्व किल्ल्यांच्या किल्ल्या आपल्या मुठीत हव्या होत्या. सुरवातीला येसूबाई धावत आपल्याकडे येईल आणि आपल्या धन्याच्या प्राणाची भीक मागण्यासाठी आपल्या पायावर गडाबडा लोळेल, असे त्याला वाटत होते. मात्र, कपाळीच्या कुंकवापेक्षा येसूबाईने हिंदवी स्वराज्याच्या भाळावरील स्वातंत्र्याच्या दिव्याला अधिक महत्त्व दिले! त्याच वेळी आपली गर्दन दहा वेळा छाटली गेली तरी शिवरायांचे स्वप्न टिकले पाहिजे, अशी भूमिका शंभूराजांनी घेतली होती. तसे गुप्त संदेशही इकडून तिकडे जात असत. शेवटी या थोर राजपुत्राने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी राष्ट्रासाठी आपले शिरकमल अर्पण केले. तेव्हा नाशिककडचे दोन-तीन किल्ले वगळता स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही. जगाच्या इतिहासात देशाच्या स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे "राष्ट्राय स्वाहा' करून मृत्यूला मिठी मारणारा असा बाजिंदा राजकुमार दुसरा कोणी जन्मला नाही अन्‌ त्याच्या तेज:पुंज कर्तृत्वाला समजून न घेता त्याच्यावर हकनाक बदनामीची राळ उठवणारा महाराष्ट्रासारखा दुसरा करंटा प्रांतही कुठे नसेल.

सह्याद्रीसारखा सुंदर तोच!
ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो, त्या इमारती वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्याला दाद देत नाहीत. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा पाया इतका मजबूत होता की, इथे गवताला भाले फुटले. राजांच्या निधनानंतर शंभूराजांनी प्रथम नऊ वर्षे आणि नंतर राजांच्या सुनांनी येसूबाई आणि ताराबाई यांनी; तसेच धनाजी आणि संताजीने औरंगजेबासारख्या कळीकाळाविरुद्ध सह्याद्रीच्या साक्षीने स्वातंत्र्याचे होमकुंड तेवतच ठेवले. चार-दोन महिन्यांच्या अवधीत महाराष्ट्र गिळण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाला सलग २७ वर्षे "दे माय धरणी ठाय' करून सोडले. औरंगजेबाने सह्याद्रीची, इथल्या गिरिशिखरांची, किल्ल्यांची आणि नेरांची खूप भीती खाल्ली होती. शंभूराजाच्या हत्येनंतरही तो पुणे किंवा साताऱ्याकडे सरकला नाही. सोलापूरजवळ ब्रह्मपुरीत चार वर्षे, विजापूरजवळ गलगले या गावी तीन वर्षे असा तो दूर भीमा नदीच्या काठाने फिरता फिरता सह्याद्रीच्या दिशेने नजर लावून उसासे टाकत म्हातारा झाला.
आपल्या इतिहास आणि संस्कृतीमुळे भारताला भाग्यवंत देश मानले जाते. मात्र, सह्याद्रीसारखे वरदान मिळायला आपल्या देशातील इतर प्रांत भाग्यवान नाहीत. आज सुखवस्तू मराठी माणूस फक्त बडोदा अगर इंदोरला जात नाही, तो लंडनच्या ऑक्‍सफर्ड स्ट्रीटवरून आणि न्यूयॉर्कच्या रस्त्यावरूनही फिरताना जीवनाचे साफल्य शोधू लागला आहे. मात्र, अशा वेळी प्रत्येक मराठी माणसाने सह्याद्री आडवातिडवा फिरून पाहिला पाहिजे. स. आ. जोगळेकरांच्या "सह्याद्री ' या ग्रंथांत या पर्वताचा अभ्यासपूर्ण पोवाडा गाइला आहे; तर आनंद पाळंदेसारख्या अभ्यासकांनी "डोंगरयात्रा' लिहून इथल्या सर्व दऱ्या-खोऱ्यांच्या, वाटा-वळणाच्या शास्त्रशुद्ध नोंदी तरुण पिढीसाठी उपलब्ध केल्या आहेत. गो. नी. दांडेकर, घाणेकर, सदाशिव हेटवलीकर व बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या गड-किल्ल्यांबाबत खूप चांगले लिहून ठेवले आहे. अर्धे जग फिरून आल्यावरही "सह्याद्रीसारखे सुंदर दुसरे काही नाही,' असे माझे मत झाले आहे. म्हणूनच आमच्या तरुणांनी या पर्वतराजीतून उभे-आडवे खूप हिंडावे. उन्हाळ्यात मोहरांनी भरलेली राने, लालभडक पळसांची बने, पावसात जागोजागी कड्यावरून कोसळणारे जलप्रपात, गौरी-गणपतीनंतर सोनकीच्या पिवळ्या फुलांनी सजलेले डोंगरउतार...सारे काही पाहून घ्यावे, असे मला वाटते.

इतिहासपुरुष सह्याद्री
साताठ वर्षांपूर्वी माझे कादंबरीकार मित्र अनंत सामंत मुंबई सेंट्रलवरून एसटीने मध्यरात्रीनंतर पाचाडला निघाले होते. तेव्हा त्यांना एसटीतच चार अंध तरुण विद्यार्थी भेटले. "आम्ही रायगड बघायला चाललोय, असा त्यांचा एकसारखा जल्लोष सुरू होता.' जेव्हा ते अंध विद्यार्थी पाचाडला उतरले, तेव्हा रोपवेने न जाता ते चौघे पायवाटेने चक्क रायगड चढले. अवघड वळणावर आपल्या हातातील पांढऱ्या काठ्या एकमेकांच्या हाती देऊन, एक-दुसऱ्याच्या आधारानेच ते सर्वजण रायगड चढत होते. त्यामध्ये शिंदे आडनावाची एक मुलगीही होती. त्यांनी जगदीश्‍वराचे मंदिर "पाहिले'! बाजाराच्या दगडी जोत्यांना आणि शिवरायांच्या पुतळ्यांच्या पायांना स्पर्श केला. "गाईड' तयार नसतानाही ते सर्वजण धाडसाने टकमक टोकसुद्धा "पाहून' आले. त्यांच्या चर्येवरचा अपूर्व आनंद आणि अमाप उत्साह पाहिल्यावर असे जाणवत होते की, डोळसांना जो रायगड कधी दिसला नाही त्याच्याहून दिव्य,अद्भुत अशा रायगडाचे आणि शिवाजीच्या मंगल मुलखाचे खरे दर्शन या चमूला झाले होते. सामंत यांनी या विषयावर "दृष्टी' या नावाची एक छोटेखानी कादंबरीही लिहिली आहे.

डोळस महाराष्ट्राने जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तेव्हा सह्याद्री नावाच्या इतिहासपुरुषाचे दर्शन घ्यायला हवे. अन्यथा तुमच्या-आमच्या उशाशी एवढा प्रचंड स्फूर्तिदायी इतिहास घडूनसुद्धा आम्हा सर्वांची अवस्था नर्मदेतल्या उघड्या गोट्याप्रमाणे होईल! दुसरे काय?
 
आपल्या "गडलक्ष्मी"बद्दल शिवरायांना इतका विश्वास की, त्यांनी म्हटले होते ः ""दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे; तो आला तरी नवे-जुने ३६० किल्ले हजरतीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी त्याला ३६० वर्षे पाहिजेत!''

राजे नेहमी पालखीतून वावरायचे, हा गैरसमज आहे. कधी कधी ते पालखीचा वापर करत. मात्र, शिवाजीचा अंगरखा घातलेल्या मराठी नटांना घोड्यावर नीट बसता यायचे नाही, म्हणून सिनेमासाठी पालखी सोईची झाली!