January 18, 2011

पानिपत...विजयाइतकाच सन्मानदायक पराजय!

- त्र्यं. शं. शेजवलकर



साधा क्रिकेटचा सामना हरण्यापासून निवडणुकीत झालेल्या पराभवापर्यंत अनेक ठिकाणी ' पानिपत झाले ' हा वाक्प्रचार सहजपणे वापरला जातो. पण इतिहासाची पाने नीट अभ्यासली की कळते की पानिपतावर जे घडले तो फक्त पराभव नव्हता, तर त्यात भविष्यातल्या राष्ट्रनिर्मितीची बीजे रोवलेली होती. हा मुद्दा पटवून देताना थोर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी या लढाईचे केलेले विश्लेषण त्यांच्याच शब्दात....

................................

पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला आणि तेणेकरून महाराष्ट्रावर दुःख, खेद, विषाद यांची छाया पसरली ; पण ती तात्कालिकच होती. या पराभवाचे परिणाम आपणांस सर्वस्वी मारक होतील, असे त्यांस त्या काळी वाटलेले दिसत नाही. अखिल हिंदुस्थानच्या कल्याण्याच्या दृष्टिने विचार करता काहींना हा युद्धशास्त्रदृष्ट्या झालेला पराभव, नैतिकदृष्ट्या मोठा विजयच वाटला असल्याचे दिसून येते.

इव्हॅन्स बेल या विचारवंत इतिहासाभ्यासकाने संशोधनकालापूर्वीच लिहिले की, '' पानिपताची लढाईसुद्धां मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे ! मराठे ' सर्व हिंदी लोकांसाठींच हिंदुस्थान ' या ध्येयासाठी लढले ! पण दिल्ली, अयोध्या व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीश मात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले ! आणि जरी मराठ्यांचा या युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगाण जे यानंतर एकदां परत गेले ते हिंदी राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी पुनः कधी दिल्लीस आले नाहीत !''

प्रिन्सिपॉल रॉलिन्सन काशीराजाच्या बखरीच्या आपल्या प्रस्तावनेत लिहितात, '' विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासांतील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो ; आणि मराठ्यांच्या सर्व इतिहासांत त्यांच्या फौजेने राष्ट्रांतील सर्व उत्तम शिलेदारंसह पानिपताच्या घनघोर रणक्षेत्रांत आपल्या देशाच्या व धर्माच्या वै-यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल !

ज्या सेनापतीला जय मिळतो त्याने सर्वात कमी चुका केल्या असे समजले जाते. पण वेलिंग्टन व नेपोलियन या दोघांनीहि वॉटर्लूच्या लढाईत घोडचुका केल्याचे जे नमूद आहे, त्यांच्या दशांशाहि चुका भाऊसाहेबांच्या हातून घडल्या नव्हत्या. भाऊच्या पराजयाचे कारण तो वाईट सेनानी होता हे नसून, त्याचा प्रतिस्पर्धी त्याहून जास्त चांगला सेनापति होता, हेच आहे. ’’

वरील मते त्या त्या संदर्भात खरीच वाटण्यासारखी आहेत. पण तो आपल्या वादाचा विषय नव्हे. अहमदशहा अबदालीसारख्या अडचणीत टाकणा-या शत्रूशी कलागत टाळण्यातच मराठ्यांचे शहाणपण दिसून आले असते. पानिपताला अफगाणांचा पराभव होता तरी मराठ्यांना त्यापासून फार थोडा लाभ होता. डोंगराळ व ओसाड अफगाणिस्तानवर स्वारी करून तेथे राज्य करण्याचा हेतू कोणीच धरला नसता. घराजवळचे व दक्षिणेतले याहून जास्त महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याचे टाकून सिंधु नदीवर जाऊन ठाकण्याचे मराठ्यांना काहीच कारण नव्हते ; पण मराठ्यांच्या राज्यातील सर्वात मोठा दोष या वेळी तरी त्यांच्या अज्ञानाचा होता.

सदाशिवरावभाऊ हा तत्कालीन मराठ्यांतील सर्वात जास्त कार्यक्षम, हुशार, तडफदार पुरुष मानला जात होता ; पण त्याचे दोन दोष इंग्रज वकील स्पेन्सर याने पानिपतापूर्वी चार वर्षे ओळखले होते. ते म्हणजे सबुरी नसणे व अतिरिक्त हाव. इंग्रज वकिलाने सांगितलेला सबुरी नसण्याचा दुर्गुण अज्ञानजन्य होता, असे आम्हाला वाटते. पेशव्यांची, किंबहुना, सर्व मराठ्यांची शिक्षणपद्धती अत्यंत तोकडी होती. सर्व हिंदुस्थानाचे राज्य झपाटण्यास जे उद्युक्त झाले होते, त्यांना तत्कालीन इंग्रजांइतकेही हिंदुस्थानाच्या भूगोलाचे ज्ञान होते, असे दिसत नाही.

युरोपात हिंदुस्थानाच्या आकाराचे स्वरूप चित्ररूपाने दाखविणारे जे नकाशे शतकापूर्वीच फैलावले होते, ते पेशव्यांनी पाहिलेले किंवा ऐकिलेलेसुद्धा नसावेत. भरतखंडात मुंबई, मद्रास किंवा कलकत्ता या एकमेकांपासून फार दूर असणा-या एकटाच इंग्रज एकसमयावच्छेदेकरून कसा उमटतो, याची कल्पना नकाशांच्या अभावी मराठ्यांस नव्हती. त्यामुळे ही मराठी राज्याच्या गळ्याभोवती एकच सलग तांत ओढली जात आहे, याची जाणीव त्यांस झाली नाही.

तीच गोष्ट अबदालीच्या सामर्थ्याची. फारसी भाषेच्या संपर्कामुळे रूमशाम ही नावे मराठी उच्चारीत ; पण त्यांना या ठिकाणांचा भौगोलिक बोध मुळीत होत नव्हता. अखबारनविसांची येणारी फारशी बातमीपत्रे ते ऐकत ; पण मराठवाड्यांतील आपले गाव सोडून कधीच बाहेर न गेलेल्या विद्वान पुरुषासह समुद्राची खरी कल्पना जशी येऊ शकत नाही, तशीच पेशव्यांना आशिया खंडाची किंवा जगाची कल्पना करता येत नव्हती, असे त्यांच्या लिखाणावरून व आचरणावरून स्पष्ट दिसते.

ज्ञानाचे कार्य डोक्याची तरतरी घडवून आणू शकत नाही. कै. राजवाड्यांनी आपल्या प्रस्तावनेत पेशव्यांजवळ नकाशे होते असे जे म्हटले आहे, त्याला त्यांनी पुरावा दिलेला नाही व आम्हासही तो कोठे आढळला नाही. मराठे तह करून मुलखाच्या वाटण्या करीत, यावरून त्यांच्याजवळ नकाशे होते असे गृहीत धरणे धाडसाचे आहे. हिंदुस्थानातील महालांच्या उत्पन्नांच्या व गावांच्या याद्या मोगली याद्यांवरून उतरलेल्या मराठ्यांजवळ होत्या ; पण त्यावरून अगदी स्थूल स्वरुपाचा नकाशाही कोणाला काढता आला नसता.

....................................

आपले चालू भारत ज्या प्रदेशांचे बनले आहे ते प्रदेश मराठ्यांनी आपल्या खंडणीखाली आणलेले आहेत. या उलट जो प्रदेश आता पाकिस्तानकडे गेला आहे त्यात मराठ्यांचे पाऊल पडले नव्हते, असे दिसून येते. याची जाणीव भाजलेल्या लोकांस आता अकल्पितपणे होतांना आढळते. मराठे जेथे जेथे गेले तेथील दबलेल्या हिंदूंची मुसलमानांच्या भीतीतून सुटका त्यांनी केली. हे एक प्रकारचे नैतिक पुनरुत्थानच होते.

बंगाली इतिहासकार मराठ्यांच्या स्वा-यांचे वास्तविक रहस्य न ओळखता, या बरगी लोकांनी आपल्या बंगभूमीत अनर्थ घडविला, अशी केवढीही हाकाटी करोत, पण त्यांनी विसरू नये की , जो बंगाल रघूजी भोसल्याचा व भास्कर राम कोल्हटकराच्या बारगीर शिलेदारांनी लुटला, तेवढाच आज स्वतंत्र भारतात सामील झाला आहे ! याची जाणीव ज्ञानलवदुर्विदग्ध लेखकांना नसली तरी पूर्व बंगालमधून पळून आलेल्या त्यांच्या दुर्दैवी बांधवांना आज तीव्रतेने भासते.

आमचे स्नेही नागपूरचे सरदार गुजर यांनी याबाबत एक गोष्ट आम्हास सांगितली, ती अशी - काही वर्षांमागे नागपुरास अखिल भारतीय शिक्षक परिषदेचे अधिवेशन झाले. ते झाल्यानंतर एक दिवस काही बंगाली शिक्षक मुद्दाम रिक्षा करून नागपुरात प्रत्येकाला विचारीत चालले की येथे रघूजी भोसले कोठे राहतात ?” पण त्यांना धड कोणी सांगेना. पुढे गुजरांशी त्यांची गाठ पडली ; तेव्हा ते या पाहुण्यांबरोबर भोसल्यांचे आधुनिक दत्तक वारस गावाबाहेर सकरद-यात रहात असतात तेथे गेले.

प्रस्तुत भोसले पंचाऐंशी वर्षाचे बहिरे व जवळजवळ आंधळे झालेत असे होते. त्यांच्याजवळ जाऊन हे बी.ए., बी.टी. शिक्षक मोठ्याने विचारू लागले की तुम्ही भोसल्यांनी ( म्हणजे तुमच्या पूर्वजांनी ) गंगा ओलांडून आमच्या पूर्व बंगल्यांत येण्याचा आळस कां केलात, ते आम्हास सांगा. तुमच्या या न येण्यामुळेच तेथील मुसलमान मस्त राहून त्यांनी आतां आम्हांस आमचा देश सोडण्यास लविले !” यावर त्यांतील एक अक्षरही न समजणारे आमचे रघूजी भोसले काय बोलणार ! त्यांनी आम्हांस हे काही कळत नाही. तुम्ही गावातील दुस-या कोणा जाणत्यास हे विचारा असे उत्तर, मोठ्या रागाने व त्वेषाने विचारणा-या सुशिक्षित बंगल्यास दिले.

या सज्जन बंगाल्यांस खरोखरीच असे वाटत होते, की त्यांच्या प्रदेशात मराठे जाते तर आजचा दुर्धर प्रसंग त्यांच्यावर ओढवला नसता ! आणि आम्हासही त्यांचा भाव बेडकाच्या डरकाळ्या फोडणा-या क्षुद्र बंगाली इतिहासकारांपेक्षा सत्याला जास्त धरून वाटतो ! मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान तुडविले असेल, लुटले असेल, दुस-याही अनेक चुका केल्या असतील, पण त्यांनी पाचशे वर्षाच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदु प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहाण्यास उदाहरण घालून दिले होते.

हिंदुस्थानातील मुसलमानी राज्ययंत्र त्यांनी इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंड करून उठून मुसलमान सुभेदारास हांकून द्यावे व स्वतःचे राज्य स्थापावे. या कामांत त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपतीनिर्मित मराठी राज्याची इतिकर्तव्यता होती ! इतर प्रांतातील लोकांत हे लोण जाऊन पोहोचू शकले नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखरी शोककथा होय, पानिपताचा पराभव नव्हे !

( राजहंस प्रकाशनाच्या, त्र्य. शं. शेजवलकर लिखित पानिपत १७६१ या ग्रंथातून साभार... )