April 14, 2011

आपण विश्वचषक जिंकला







खांद्याच्या पालखीत चेंडूफळीच्या देवाला बसवून मैदानाची प्रदक्षिणा सुरू झाली आणि आसमंतात केवळ घंटानाद निनादायला लागला.

आतषबाजी...!

हर्षाच्या टिकल्यांनी काळोख सवाष्ण झाला. प्रकाशाचा फडा पडला. क्षितिजावर डुबकी मारलेला सूर्य सोहळा पहायला पुन्हा वर आल्यासारखं वाटलं.

मैदानावरच्या साऱ्यांचा मिळून एकच चेहरा, आनंदानं लिंपलेला.

साऱ्यांच्या डोळ्यांच्या पणत्या आणि या सुपूत्राचं औक्षण. दोन दशकं आमची मान उंच ठेवली यानं. दिलेल्या आनंदाचं मोजमाप करता येत नाही.

जीवंतपणी आख्यायिका झालेल्या या वामनाने काय पादाक्रांत करायचं ठेवलं? डोळ्यात कायम तीन रंग गोंदलेले...

आज मात्र डोळ्यांच्या कडेला समुद वस्तीला आल्यासारखं दिसलं. बाहेरचा, आतला कोलाहल पापण्यांच्या कडांवर धडकत होता. शिंतोडे उडत होते.
आवरलं तरी आवरत नव्हतं. इतकं मोठं वादळ प्रथमच अवतरलं होतं. एरवी आतलं तुफान पृष्ठभागावर कधीच आलं नव्हतं.
चक्रव्यूहात केवळ घुसण्याची नाही तर यशस्वीपणे बाहेर येण्याची कुवत असलेल्या या अभिमन्यूच्या डोळ्यात प्रथमच दवबिंदू चमकत होते.
'हळवं' या शब्दाचा नेमका अर्थ रैना-पठाणच्या खांद्यावर हिंदकळत होता. उंचावलेला हात निरोपाचा होता का?

नक्कीच नसावा!

नसू देत!

हा प्रश्नसुद्धा भयाण आहे. जुने लोक म्हणतात 'आमच्यावेळी अमूक अमूक खेळाडू होता'. तुझ्याबाबतीत असं म्हणता येत नाही.
तू सगळ्यांच्या वेळी होतास, आहेस आणि अस. तुझं असणं हे आमचं असणं आहे. आमचं एरवीचं जगणं कसंही असो. पण तू ते खूप सुसह्य केलं आहेस.

झोपडीतला मी, ब्लॉकमधला मी, बंगल्यातला मी. भ्रष्ट मी. सज्जन (?) मी... आम्हा सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेस तू. उंचावलेला हात ओळखीचा असू दे; निरोपाचा नको.

रस्त्यावर मैदानातल्या गवतासारखी माणसं उगवली होती. ब्रिटीशांनंतर मुंबई पहिल्यांदाच एवढी घनदाट वाटली.
मुंबईच का; सारा भारतच. स्वातंत्र्याचा लढा पुन्हा सुरू झाल्यासारखं वाटलं.
आपण विश्वचषक जिंकला. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन…………………………..

- नाना पाटेकर