August 20, 2012

आजच तयार करा "विल' आणि "इन्व्हेस्टमेंट डायरी.' -२


स्मार्ट खबरदारी 

या लेखाच्या पहिल्या भागात पतीच्या अचानक निधनानंतर एका सर्वसामान्य गृहिणीपुढे उभ्या ठाकलेल्या 11 आर्थिक समस्यांचे वर्णन केले होते आणि त्या समस्या टाळता येण्यासारख्या होत्या का, असा सवालही केला होता. या दुसऱ्या भागात पती-पत्नीला मिळून हे प्रश्‍न निर्माणच होऊ नयेत यासाठी काय खबरदारी घेता आली असती ते सांगण्याचा हा प्रयत्न. 

1) गृहस्थांनी आपल्या सर्व गुंतवणुकींची नोंद करण्यासाठी एक "इन्व्हेस्टमेंट डायरी' बनवावी. त्यात "आयुर्विमा' सदराखाली विमा कंपनीचे नाव, विम्याची व प्रिमियमची रक्कम, ते कधी व कोठे भरायचे असते, विमा प्रतिनिधीचे नाव, पत्ता, फोन नंबर, हप्ते कधीपर्यंत भरायचे, नॉमिनीचे नाव, क्‍लेम कसा-कोठे करावा आणि पॉलिसी कोठे ठेवली इत्यादी नोंदवावे. 
2) त्याचप्रमाणे आरोग्य विमा (मेडिक्‍लेम) उतरविलेल्या कंपनीचे नाव, विम्याची रक्कम, प्रिमियमची ड्यू-डेट, विमा प्रतिनिधी व "थर्ड पार्टी एजंट (TPA) यांचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि पॉलिसी कोठे ठेवली आही याची नोंद करावी. 
3) "विल्‌' (मृत्युपत्र) करून घर, दुचाकी, चारचाकी, NSC, F.D., शेअर्स, म्युच्युअल फंड्‌स - बॉंड्‌समधील गुंतवणूक आपल्यापश्‍चात कोणाला मिळावी याची स्पष्ट नोंद करावी. "विल्‌' करणे अतिशय सोपे असते व केवळ दोन साक्षीदारांची गरज असते. 

4) हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅट असल्यास सोसायटीकडे नॉमिनेशन रजिस्टर करावे व त्याची नोंद आपल्या डायरीत ठेवावी. 
5) गृहकर्ज फिटताच बॅंकेकडून "टायटल डीड्‌स' आपल्या ताब्यात घ्यावीत व ती कोठे ठेवलेत याची नोंद "इन्व्हेस्टमेंट डायरी'त करावी. घर विकताना इस्टेट एजंट, वकील व C.A. यांची गरज पडते तेव्हा त्यांचे नाव, पत्ते, फोन नंबर डायरीत नोंदवावे. 
6) लॉकर कधीही एकट्याच्या नावावर ठेवू नये. नामांकन सुविधेचा फायदा घ्यावा. लॉकर नंबर, तो कोठे आहे, चावी कोठे ठेवली आहे, भाडे कधी भरायचे असते आणि लॉकरमध्ये काय-काय ठेवले आहे ते नोंदवावे. 

7) बचत खाते, मुदत ठेवी, NSC, डिमॅट खाते कधीही एकट्याच्या नावावर ठेवू नये. जॉईंट खाते असले तरीही नामांकन जरूर करावे. नामांकन करण्यासाठी एक (सोपा) फॉर्म डुप्लिकेटमध्ये भरून त्यातील एका कॉपीवर बॅंकेची पोच घेऊन ती कॉपी आपल्याकडे ठेवावी. 
8) "ऑन-लाईन' (नेटच्या साह्याने) शेअर्सची खरेदी-विक्री करीत असल्यास A/c या "युझर आयडी' व "पास-वर्ड' अतिशय सुरक्षित ठिकाणी नोंदवावा. स्टॉक एक्‍स्चेंजच्या नियमाप्रमाणे हा पासवर्ड दर 15 दिवसांनी बदलायचा असल्याने शक्‍यतो दोन पासवर्डच आलटून-पालटून वापरावेत. ब्रोकरमार्फत शेअर्सचे व्यवहार करीत असल्यास त्याचे नाव, पत्ता, फोन नंबर तसेच डिमॅट खाते कोठे आहे, खाते क्रमांक, नॉमिनीचे नाव, "डिलिव्हरी इन्स्ट्रक्‍शन स्लिप्स' कोठे ठेवल्यात ते डायरीत नोंदवावे. या "स्लिप्स' चेकसारख्याच सांभाळून ठेवाव्यात. त्यावर सर्व खातेदारांच्या सह्या असल्याशिवाय शेअर्स विकता येत नाहीत. 
9) RBI बॉंड्‌स, PPF, डिबेंचर्स, पोस्टाची MIS योजना, NSC इत्यादी पेपर ऍसेट्‌समध्ये नॉमिनेशन करता येते. ते केले असल्यास "सक्‍सेशन सर्टिफिकेट' मिळविण्याचा भरमसाट खर्च, वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप टळू शकतो. 
10) ज्येष्ठ नागरिकांनी काळाप्रमाणे बदलून नेट बॅंकिंग, ATM चा वापर, SMS करणे-वाचणे, e-mail करणे-वाचणे इत्यादी आपल्या आप्तेष्टांकडून शिकून घ्यावे. त्यात अवघड काहीही नसते. खासगी बॅंका बचत खात्याचे पासबुक न देता तिमाही स्टेटमेंट पाठवितात, ते ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचे असते. रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना आपल्या बचत खातेधारकांना विनाशुल्क पासबुक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत, तेव्हा खासगी बॅंका पासबुक देत नसल्यास त्यांना या आदेशाची आठवण करून देऊन पासबुक मिळवावे. 

11) म्युच्युअल फंड हल्ली "सर्टिफिकेट्‌स' इश्‍यू करीत नाहीत, त्यामुळे त्यांनी पाठविलेली "अकाऊंट स्टेटमेंट्‌स' व्यवस्थित फाऊल करून ठेवावीत. म्युच्युअल फंडातही नामांकन जरूर करावे व त्याची नोंद ठेवावी. "रिडम्पशन स्लिप' भरून म्युच्युअल फंडातील पैसे परत मिळविता येतात. आपल्या म्युच्युअल फंड सल्लागाराचे नाव, पत्ता, फोन नंबर याची नोंद "इन्व्हेस्टमेंट डायरी'त करावी. 

चला, तर आजच सुरवात करा "विल्‌' आणि "इन्व्हेस्टमेंट डायरी' बनवायला. कोण जाणे "कल हो न हो' ही "विल्‌' व "इन्व्हेस्टमेंट डायरी' वेळोवेळी अपडेट करायला तसेच जपून ठेवायला विसरू नका कारण तीच ठरणार आहे आपल्या खजिन्याची गुरूकिल्ली! पती-पत्नीमध्ये वेळोवेळी "अर्थ' या विषयावर संवाद होत राहिल्यास पुढील अनर्थ नक्कीच टळेल आणि आपण या पृथ्वीतलावर नसलात तरी आपली जीवनसंगिनी अभिमानाने म्हणू शकेल - ""मेरे जीवनसाथीने मेरा साथ निभाया, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी!'' 
- अतुल सुळे http://goo.gl/KFDkK

August 09, 2012

आजच तयार करा "विल' आणि "इन्व्हेस्टमेंट डायरी.'-१


सुमारे दोन वर्षांपूर्वीची घटना. एका सत्तरी गाठलेल्या भगिनीचा दूरध्वनी आला, ""अरे अतुल, तुला माहितीच आहे, की महिन्याभरापूर्वी ह्यांचे अचानक निधन झाले. त्यांची नोकरी खासगी, त्यामुळे त्यांना पेन्शन नव्हते व मला फॅमिली पेन्शन नाही. तशी माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे; परंतु ह्यांनी ठिकठिकाणी करून ठेवलेल्या गुंतवणुकीचा गुंता कसा सोडवायचा हे मला काही सुधरत नाही. तेव्हा कमीत कमी दोन-तीन तास तरी वेळ काढून ये.'' 

तसं पाहिलं तर ही गृहिणी कला शाखेची पदवीधर. यजमान इंजिनिअर व एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी. दोन्ही उच्चशिक्षित मुलींची लग्ने होऊन एक अमेरिकेत, तर दुसरी ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेली. पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत स्वतःचा फ्लॅट, मुंबईत 30 वर्षांपूर्वी खरेदी केलेला दुसरा फ्लॅट, दारी चारचाकी शिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड्‌स, बॉंड्‌समध्ये चांगली गुंतवणूक, आयुर्विमा व आरोग्यविमा उतरविलेला. इतकी सांपत्तिक स्थिती चांगली असतानाही त्यांना काय अडचण आहे ते समजून घेण्यासाठी घरी गेलो असता त्यांनी पुढ्यात एक कागदपत्रांची फाईल टाकली आणि अडचणींचा पाढाच वाचला, तो काहीसा असा ः 

1) ""रु. 10 लाखांचा आयुर्विमा उतरविला आहे; परंतु पॉलिसी कोठे आहे, नॉमिनी कोण आहे आणि क्‍लेम कोठे व कसा करायचा हे मला माहीत नाही. 
2) रु. 5 लाखांची मेडिक्‍लेम पॉलिसी काढली आहे; पण विमा एजंट कोण आहे, प्रिमियम कधी, कोठे भरायचे ते माहीत नाही. 
3) या चारचाकीचा मला काहीही उपयोग नाही; पण हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावावरील गाडी विकायची तरी कशी? 
4) मुंबईचा फ्लॅट रिकामा पडून आहे. तो "ह्यांच्या' नावावर आहे व माझे नॉमिनेशन सोसायटीत केले आहे की नाही ते ठाऊक नाही. तो विकायचा कसा आणि विकल्यास आयकराचे काय? 
5) राहत्या फ्लॅटवरील गृहकर्ज फिटले आहे; परंतु त्याची कागदपत्रे बॅंकेतच आहेत की लॉकरमध्ये ते ठाऊक नाही. 
6) आमचे 2 लॉकर्स आहेत. एक दागिन्यांसाठी, तर दुसरा महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी. दागिन्यांसाठीचा लॉकर माझ्या नावावर आहे; परंतु महत्त्वाच्या कागदपत्रांचा लॉकर ह्यांच्या एकट्याच्या नावावर आणि नामांकन केलेले नाही. ह्यांनी मृत्यूपत्र केले नसल्यामुळे बॅंक "सक्‍सेशन सर्टिफिकेट' आणा असं म्हणतेय, तूच सांग या वयात वकिलाकडे आणि कोर्टात किती खेटे घालू? त्याला किती वेळ लागेल आणि खर्च किती होईल? 
7) यांचे एकूण 3 डिमॅट अकाऊंट आहेत - एक ह्यांच्या एकट्याच्या नावाने आणि 2 दोन्ही मुलींबरोबर जॉईंट अकाऊंट्‌स. माझ्या दोन्ही मुली "NRI` आणि परदेशांत स्थायिक झालेल्या. डिमॅट अकाऊंट्‌समध्ये त्यांची लग्नाआधीची नावे आहेत. माझ्या नावे नामांकन केले आहे का ते मला माहीत नाही, आता हे शेअर्स विकायचे कसे? 
8) हे निवृत्तीनंतर घरबसल्या नेटवर शेअर्सची खरेदी-विक्री करायचे; परंतु मला "नेट' करता येत नाही आणि "पासवर्ड' माहीत नाही. आता त्या शेअर्सचे काय होणार? 
9) ह्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या बॉंड्‌समध्ये गुंतवणूक केली होती, त्याच्या व्याजाचे पुढील दोन वर्षांचे "पोस्ट-डेटेड' चेक्‍स येऊन पडलेत. आता हे हयात नसताना ते चेक्‍स वटविणे योग्य आहे का? 
10) ह्यांचे एका खासगी बॅंकेत बचत खाते आहे आणि ते जवळच्या "ATM` मधून पैसे काढीत असत. ही बॅंक पासबुक देत नसल्याने खात्यात शिल्लक किती आहे ते मला माहीत नाही शिवाय मी कधी ATM वापरलेले नाही. 

11) यांनी म्युच्युअल फंडांतही बऱ्यापैकी गुंतवणूक केली होती; पण त्याची "सर्टिफिकेट्‌स' सापडत नाहीत आणि ते पैसे परत कसे मिळवायचे हे मला ठाऊक नाही.'' 

त्यांचा प्रश्‍नांचा भडिमार ऐकून माझे डोके सुन्न झाले. त्यांचे यजमान त्यांना खजिन्यावर विराजमान करून गेले होते; परंतु खजिन्याची गुरूकिल्ली द्यायची राहून गेली होती. प्रथम "चूल-मूल' आणि नंतर TV वरील निरर्थक, कंटाळवाण्या मालिकांमध्ये गुंतून राहिल्यामुळे तसेच नवरा-बायकोत वेळोवेळी "अर्थ'विषयक संवाद न झाल्यामुळे या गृहिणीवर वयाच्या सत्तराव्या वर्षी आर्थिक शिक्षण घेण्याची वेळ आली होती. 
गेल्या दोन वर्षांत आप्तेष्टांच्या मदतीने त्यांनी गुंतवणुकीचा गुंता सोडवीत आणला आहे, तरी प्रश्‍न उरतोच, की वर उल्लेख केलेल्या अकराच्या अकरा समस्या टाळता आल्या असत्या का? या प्रश्‍नाचे उत्तर पुढील लेखात - "सद्‌गृहस्थांनो, आजच तयार करा "विल' आणि "इन्व्हेस्टमेंट डायरी.' 
- अतुल सुळे http://goo.gl/ugXL3