सुमारे दोन वर्षांपूर्वीची घटना. एका सत्तरी गाठलेल्या भगिनीचा दूरध्वनी आला, ""अरे अतुल, तुला माहितीच आहे, की महिन्याभरापूर्वी ह्यांचे अचानक निधन झाले. त्यांची नोकरी खासगी, त्यामुळे त्यांना पेन्शन नव्हते व मला फॅमिली पेन्शन नाही. तशी माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे; परंतु ह्यांनी ठिकठिकाणी करून ठेवलेल्या गुंतवणुकीचा गुंता कसा सोडवायचा हे मला काही सुधरत नाही. तेव्हा कमीत कमी दोन-तीन तास तरी वेळ काढून ये.''
तसं पाहिलं तर ही गृहिणी कला शाखेची पदवीधर. यजमान इंजिनिअर व एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी. दोन्ही उच्चशिक्षित मुलींची लग्ने होऊन एक अमेरिकेत, तर दुसरी ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेली. पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत स्वतःचा फ्लॅट, मुंबईत 30 वर्षांपूर्वी खरेदी केलेला दुसरा फ्लॅट, दारी चारचाकी शिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बॉंड्समध्ये चांगली गुंतवणूक, आयुर्विमा व आरोग्यविमा उतरविलेला. इतकी सांपत्तिक स्थिती चांगली असतानाही त्यांना काय अडचण आहे ते समजून घेण्यासाठी घरी गेलो असता त्यांनी पुढ्यात एक कागदपत्रांची फाईल टाकली आणि अडचणींचा पाढाच वाचला, तो काहीसा असा ः
1) ""रु. 10 लाखांचा आयुर्विमा उतरविला आहे; परंतु पॉलिसी कोठे आहे, नॉमिनी कोण आहे आणि क्लेम कोठे व कसा करायचा हे मला माहीत नाही.
2) रु. 5 लाखांची मेडिक्लेम पॉलिसी काढली आहे; पण विमा एजंट कोण आहे, प्रिमियम कधी, कोठे भरायचे ते माहीत नाही.
3) या चारचाकीचा मला काहीही उपयोग नाही; पण हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावावरील गाडी विकायची तरी कशी?
4) मुंबईचा फ्लॅट रिकामा पडून आहे. तो "ह्यांच्या' नावावर आहे व माझे नॉमिनेशन सोसायटीत केले आहे की नाही ते ठाऊक नाही. तो विकायचा कसा आणि विकल्यास आयकराचे काय?
5) राहत्या फ्लॅटवरील गृहकर्ज फिटले आहे; परंतु त्याची कागदपत्रे बॅंकेतच आहेत की लॉकरमध्ये ते ठाऊक नाही.
6) आमचे 2 लॉकर्स आहेत. एक दागिन्यांसाठी, तर दुसरा महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी. दागिन्यांसाठीचा लॉकर माझ्या नावावर आहे; परंतु महत्त्वाच्या कागदपत्रांचा लॉकर ह्यांच्या एकट्याच्या नावावर आणि नामांकन केलेले नाही. ह्यांनी मृत्यूपत्र केले नसल्यामुळे बॅंक "सक्सेशन सर्टिफिकेट' आणा असं म्हणतेय, तूच सांग या वयात वकिलाकडे आणि कोर्टात किती खेटे घालू? त्याला किती वेळ लागेल आणि खर्च किती होईल?
7) यांचे एकूण 3 डिमॅट अकाऊंट आहेत - एक ह्यांच्या एकट्याच्या नावाने आणि 2 दोन्ही मुलींबरोबर जॉईंट अकाऊंट्स. माझ्या दोन्ही मुली "NRI` आणि परदेशांत स्थायिक झालेल्या. डिमॅट अकाऊंट्समध्ये त्यांची लग्नाआधीची नावे आहेत. माझ्या नावे नामांकन केले आहे का ते मला माहीत नाही, आता हे शेअर्स विकायचे कसे?
8) हे निवृत्तीनंतर घरबसल्या नेटवर शेअर्सची खरेदी-विक्री करायचे; परंतु मला "नेट' करता येत नाही आणि "पासवर्ड' माहीत नाही. आता त्या शेअर्सचे काय होणार?
9) ह्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या बॉंड्समध्ये गुंतवणूक केली होती, त्याच्या व्याजाचे पुढील दोन वर्षांचे "पोस्ट-डेटेड' चेक्स येऊन पडलेत. आता हे हयात नसताना ते चेक्स वटविणे योग्य आहे का?
10) ह्यांचे एका खासगी बॅंकेत बचत खाते आहे आणि ते जवळच्या "ATM` मधून पैसे काढीत असत. ही बॅंक पासबुक देत नसल्याने खात्यात शिल्लक किती आहे ते मला माहीत नाही शिवाय मी कधी ATM वापरलेले नाही.
11) यांनी म्युच्युअल फंडांतही बऱ्यापैकी गुंतवणूक केली होती; पण त्याची "सर्टिफिकेट्स' सापडत नाहीत आणि ते पैसे परत कसे मिळवायचे हे मला ठाऊक नाही.''
त्यांचा प्रश्नांचा भडिमार ऐकून माझे डोके सुन्न झाले. त्यांचे यजमान त्यांना खजिन्यावर विराजमान करून गेले होते; परंतु खजिन्याची गुरूकिल्ली द्यायची राहून गेली होती. प्रथम "चूल-मूल' आणि नंतर TV वरील निरर्थक, कंटाळवाण्या मालिकांमध्ये गुंतून राहिल्यामुळे तसेच नवरा-बायकोत वेळोवेळी "अर्थ'विषयक संवाद न झाल्यामुळे या गृहिणीवर वयाच्या सत्तराव्या वर्षी आर्थिक शिक्षण घेण्याची वेळ आली होती.
गेल्या दोन वर्षांत आप्तेष्टांच्या मदतीने त्यांनी गुंतवणुकीचा गुंता सोडवीत आणला आहे, तरी प्रश्न उरतोच, की वर उल्लेख केलेल्या अकराच्या अकरा समस्या टाळता आल्या असत्या का? या प्रश्नाचे उत्तर पुढील लेखात - "सद्गृहस्थांनो, आजच तयार करा "विल' आणि "इन्व्हेस्टमेंट डायरी.'
- अतुल सुळे http://goo.gl/ugXL3