दोघंही एकमेकांच्या घरी गेले. घरच्यांशी ओळख करून घेतली. मोठ्या हिमतीनं लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्याच्या आईनं अनुकूलता दर्शविली; पण तिच्या मम्मी-पप्पांच्या मताचं गूढ अद्याप कायम होतं. त्यांनी त्याच्या आई-वडिलांना घरी येण्याची गळ घातली.
रात्री दोघे नेटवर चॅटिंग करीत होते. ती म्हणाली, 'मी घरी आपल्याबद्दल सगळं सांगितलंय. मम्मी थोडी नाराज वाटली; पण पप्पा समजून घेतील असं वाटतंय. बघू या काय होतं ते...!'
"तुझ्या घरी काय झालं? तू सांगितलंस त्यांना आपल्याबद्दल?'' ती लिहीत होती. (स्मायली)
तो म्हणाला, "होय, मीसुद्धा घरी सांगितलंय. बाबा जाम चिडलेत. ते काहीबाही बोलत होते. पण एक गोष्ट आपल्या बाजूनं आहे- मला आईचं खंबीर पाठबळ मिळालंय. तिला तुला भेटायचंय. तू तिला आवडलीस ना, की आपण पन्नास टक्के लढाई जिंकली म्हणून समज. तू फक्त तिला इम्प्रेस कर. ती आपल्यामागे उभी राहिली ना, की जगातली कोणतीही शक्ती आपल्याला विभक्त करू शकणार नाही. तू उद्याच तिला भेटायला घरी ये. तिनं खास तुझ्यासाठी ऑफिसातून सुटी घेतली आहे.'' (स्मायली स्मायली)
"बरं मी येते दुपारी तुझ्या आईला भेटायला. अरे, पण माझ्या घरी एक नवीन प्रॉब्लेम झालाय. पप्पांनी तुला पुढल्या रविवारी घरी भेटायला बोलवलंय,'' तिनं माहिती पुरवली. (गंभीर स्मायली)
"बाप रे...' आता काय होणार! मला तर साधा कांदेपोह्यांचाही अनुभव नाही. तुझ्या मम्मी-पप्पांशी मी काय बोलणार? मला तर काहीच सुचत नाहीए. एकाच वेळी दोघांशी बोलायचं, आपली बाजू पटवून द्यायची, त्यांचा होकार मिळवायचा... बाप रे बाप! काय होईल गं...? त्यांच्याशी कसं बोलायचं...?'' भीतीची अनामिक लहर त्यांच्या सर्वांगातून गेली. (डोळे विस्फारलेली स्मायली)
ती म्हणाली, "अरे घाबरू नकोस. तुझ्या आई-वडिलांशी बोलतोस ना, तसंच बोलायचं. आणि मी असेन ना तुझ्यासोबत. आपण मिळून आपली बाजू मांडू या. तू कुठे कमी पडला की मी तुला साथ देईन. मी कुठे अडखळले तर तू सांभाळून घे... अरे पाण्यात उडी मारल्याशिवाय थोडंच पोहता येईल. तेवढं धाडस तर करावंच लागेल ना...! मी उद्या सुटी घेते आणि तुझ्या आईला भेटायला येते.'' (डोळे मिचकवत हसणारी स्मायली)
त्यांचं संभाषण संपलं असलं तरी तिच्या घरी जाण्याच्या कल्पनेनं तो पुरता घाबरला होता. तो तसाही जीडी-पीआयमध्ये कच्चा होता. कॉलेजात कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये या एकाच कारणामुळे तो एलिमिनेट झाला होता. आता तिच्या मम्मी-पप्पांशी भेटायचं म्हणजे एक घरगुती कॅम्पस इंटरव्ह्यूच होता. आणि तो कसाही करून क्रॅक करायचा होता. कारण प्रश्न दोघांच्या आयुष्यांचा होता.
दुसऱ्या दिवशी दुपारी ती त्याच्या घरी आली. आईनंच दार उघडल्यानं दोघींची दारातच तोंडओळख झाली. तोही घरी होता. थोडं जुजबी बोलणं झाल्यावर आईनं त्यांच्यासाठी साजूक तुपातला शिरा केला. तिनंही आईला मदत केली. शिरा करताना दोघींचं अखंड संभाषण सुरू होतं. त्यानं दोघींना बोलायला मुद्दाम मोकळा वेळ दिला होता. आपल्या मुलाला एवढी देखणी, सुशील, समजूतदार मुलगी कशी काय गवसली, याचा आईला हेवा वाटत होता. आपला मुलगा कधी मोठा झाला याची आपल्याला पुसटशी कल्पनादेखील आली नाही, असं मातृत्वाने भरलेल्या आईच्या मनात आलं. शिऱ्यात घालण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे तुकडे करून त्याच्या आईला देताना ती म्हणाली, ""मी तुम्हाला "आई' म्हटलं तर चालेल...?''
"अगं चालेल काय म्हणतेस... तुला पुढे तेच म्हणावं लागणार आहे. तुला चालेल ना...?'' त्याच्या आईनं असं म्हणताच तिची कळी खुलली. तिनं त्याच्या आईला आनंदानं मिठीच मारली.
रविवारी तो तिच्या घरी गेला. तिनं दार उघडून त्याला ड्राईंगरूममध्ये बसायला सांगितलं. ती घरात गेली. तो बराच वेळ एकटाच बसून होता. कधी मनगटावरील, तर कधी भिंतीवरील घड्याळ निरखत! अधेमधे आतल्या खोलीतून दबक्या आवाजात बोलण्याचा आवाज येत होता; पण बाहेर कुणीच फिरकत नव्हतं. तो बसून बसून अवघडल्यानं शरीराला आळोखेपिळोखे देऊ लागला. तेवढ्यात ती आणि तिचे पप्पा ड्रॉईंगरूममध्ये आले. तो जरा सावरून बसला. तोंडओळख झाल्यावर इतरही विषयांवर थोडीबहुत चर्चा झाली. पण मूळ विषय काही चर्चेत येत नव्हता. तिची मम्मी हातात गुलाबजामचा "ट्रे' घेऊन बैठकीत आली. तिनं सर्वांच्या हातात खोलगट मोठे बाऊल दिले.
बैठक जमल्यावर तिची मम्मी म्हणाली, "आम्ही हिला लहानपणापासून फार लाडात वाढवलंय. कधी कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही. तिचं कधी मन मारलं नाही. तिच्या शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलोय. तिच्यासाठी हा साठ लाखांचा फ्लॅट घेतलाय. ह्यांनी पुण्याला ट्रान्स्फर करून घेतली. सध्या तिच्या लग्नाचा विषय सुरू आहे. मुलगा तिच्यापेक्षा जास्त कमावणारा असावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.'' तिच्या मम्मीनं "जास्त कमावणारा' या शब्दावर जोर देताच त्याला जोराचा ठसका लागला. त्यानं पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.
तिच्या मम्मीचं बोलणं मध्येच तोडून पप्पा म्हणाले, ""बरं, तुझ्या घरी कोण-कोण आहेत? तुझे वडील काय करतात? आणि तुला नुकतीच नोकरी लागली आहे म्हणे! कोणत्या कंपनीत तू नोकरीला आहेस?'' त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्याला त्यानं यथायोग्य उत्तरं दिली. त्यानंतर आपली बाजू मांडताना तो म्हणाला, ""तुम्ही दोघं मला माझ्या आई-वडिलांसारखे आहात. मला लग्नाबिग्नाचं फारसं काही कळत नाही. माझं बोलणं कदाचित शिष्टाचाराला अनुसरून नसेल; पण मी एक सांगू शकतो- आमचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. आमचं लग्न झालं तर आम्ही दोघंही सुखा-समाधानानं जीवन व्यतीत करू. आनंदी राहू. माझं पुण्यात घर आहे. मी सध्या पुण्यातच नोकरी करणार आहे. यामुळे तुमची एकुलती एक मुलगी तुमच्या डोळ्यांसमोर राहील. याचा थोडा विचार करा. शिवाय आम्हा दोघांचा पगार आहे. आम्हाला तुमच्याकडून काहीएक नकोय. फक्त तोंडभरून आशीर्वाद द्या.'' त्यानं दोन्ही हात त्यांच्यापुढे जोडले.
तिची मम्मी म्हणाली, "अरे बाळा, लग्नाचा निर्णय वाटतो तेवढा सोपा नाही. तू तुझ्या आई-वडिलांना घेऊन एखाद्या दिवस आमच्या घरी ये...! आम्ही उभयता बोलून काय तो निर्णय घेऊ.''
त्याच्या वडिलांचा रागावलेला चेहरा त्याच्या नजरेसमोर आला. त्याचे वडील तिच्या घरी यायला राजी होतील, याची तसूभरही शक्यता नव्हती. त्यानं मूक संमती देऊन घरचा रस्ता धरला.
(क्रमशः)