May 11, 2019

टीव्ही, मोबाईल स्क्रीन आणि व्यसन

मुलांमध्ये असणारी मोबाइल, इंटरनेट, गेम्सची वाढती क्रेझ पालकांना धडकी भरवणारी असते. या सगळ्याचा अतिरिक्त वापर मुलांना या गोष्टींचे व्यसन लागण्यात बदलू शकतो. या गोष्टी नेमक्या कशा घडतात याचा ऊहापोह करणारा हा लेख.


माझी मुलगी टीव्हीसमोरून हलतच नाही, माझ्या मुलाला मोबाइलवर गेम खेळण्याशिवाय काहीही सुचत नाही, रात्रभर इंटरनेटवर काय बघतात माहिती नाही; पण इंटरनेट जरा जरी नसले तरी ही चिडचिड करते. इंटरनेट आणि गेममुळे अभ्यास होतच नाही, हे सारे कसं थांबवता येईल?

कौन्सेलर म्हणून काम करताना अशा अनेक समस्या पालकांकडून वारंवार समोर मांडल्या जातात आणि हे आता कसे थांबवता येईल, या प्रश्नाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत मोबाइल, गेमच्या अतिरेकी वापरावर निर्बंध कसे आणायचे किंवा हे व्यसन कसे सोडवायचे, असे विचारणाऱ्या पालकांची संख्या चढत्या भाजणीने वाढते आहे.

या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी पहिल्यांदा व्यसन लागते म्हणजे काय, या गोष्टीचा विचार करू. व्यसन म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर करणे किंवा कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त प्रमाणात सवय लागणे. व्यसन या गोष्टीची ही सामान्यांना समजेल अशी सोपी व्याख्या आहे. जुगार खेळणे, दारू पिणे, सतत खरेदी करणे ही व्यसने आहेतच; पण सतत इंटरनेट, मोबाइल वापरणे, गेम्स खेळणे, तासनतास टीव्ही पाहणे ही सारी नव्या पिढीला भेडसावणारी व्यसने आहेत. घराघरांत डोकावलात तर तुम्हाला 'अरे मोबाइल बंद कर' किंवा 'किती वेळ खेळणार आहेस गेम, बंद कर आता,' अशी वाक्ये ऐकू येतील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर आपला जो काही दिनक्रम आहे, त्या दिनक्रमातील गोष्टी करणे वगळून मुद्दाम एखादी गोष्टी करायला लागतो, त्या वेळी त्या गोष्टीचे व्यसन लागले आहे, असे म्हणता येईल. उदा. हातातील काम सोडून टीव्ही, व्हॉट्स अॅप पाहत राहणे, रोजची कामे टाकून गेम खेळत राहणे. अशा व्यक्तींच्या मनात सतत त्याच गोष्टींचा विचार असतो. उदा. गेम खेळणारी व्यक्ती उद्या कोणता गेम खेळायचा, तो कसा खेळायचा, कोणते धोरण असावे, असा विचार करीत राहते. टीव्ही पाहणारी नेटफ्लिक्सवर काय बघायचे? काल पाहिलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये काय होते, अमुक सीरीज कोठून मि‌ळवता येईल, असा विचार करते.

या सगळ्या गोष्टींमध्ये या व्यक्ती इतक्या गुंतून जातात, की ती गोष्ट करता न आल्यास त्यांची चिडचिड होते. ज्या व्यक्तींमुळे त्यांना ती गोष्ट करता येत नाही, त्या व्यक्ती त्यांच्यासाठी अगदी वैरीच होऊन जातात. कोणत्याही मार्गाने का होईना, ती गोष्ट करता यायलाच हवी, असा हट्ट सुरू होतो. टीव्ही पाहणे, मोबाइल वापरणे, गेम खेळणे यातून एकप्रकारचा आनंद मिळतो. ही एक मानसिक स्थिती आहे. मनाला मिळणारा हा आनंद कायम टिकत नाही. जितका वेळ तुम्ही ती गोष्ट करत असता, तितकाच वेळ तुम्हाला तो आनंद मिळतो. हा आनंद, त्यातून येणारा हल्लकपणा वारंवार हवा असे वाटायला लागते. हे सारे व्यसनात येते.

जेव्हा या पायरीवर असणारे मूल माझ्यासमोर येते, तेव्हा माझ्या मनात आणखी एक प्रश्न येतो, 'मुलांना स्क्रीनचे (टीव्ही, गेम, मोबाइल, इंटरनेट) व्यसन लागले आहे, तर त्यात दोष फक्त मुलांचा आहे का? व्यसन का लागते, या प्रश्नाचे उत्तर मिळ‌वायचे असेल, व्यसनांमागची कारणे शोधायची असतील, तर थोडे भूतकाळात डोकावून पाहणे गरजेचे आहे. खरे सांगायचे, तर या प्रश्नाला फक्त एक उत्तर नाही. या उत्तरातील काही कारणे सवयींशी, तर काही माणसांशी संबंधित आहेत.

सर्वप्रथम आपण ज्या गोष्टींची सवय लागते, उदा. गेम्स, इंटरनेट याकडे वळू. आपण टीव्ही, मोबाइल, कम्प्युटर, गेम्स, टॅब विचारात घेऊ. जुन्या जमान्यात लोक रेडिओ ऐकत असत. रेडिओतून फक्त गाणी ऐकण्याची सोय होती. त्याला स्क्रीन नव्हती. त्यामुळे रेडिओचे व्यसन लागले, असे फारसे ऐकू आले नाही. त्या काळात दारू, जुगार, अमली पदार्थांची व्यसने होती. थोडक्यात व्यसनांचे पर्याय मर्यादित होते. समाजात व्यसनांकडे पाहण्याची दृष्टी नकारात्मक होती. कालांतराने टीव्ही आला. टीव्हीत ऐकणे आणि पाहणे या दोन्ही गोष्टींची सुविधा होती. टीव्ही आला, तेव्हा त्यामागे समाज प्रबोधन करण्याचा हेतू होता. कालांतराने प्रबोधन मागे पडले आणि मनोरंजन वाढले. टीव्ही आपल्याला माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त आहे, असा समज रुजवला गेला होता. त्यामुळे टीव्ही पाहण्याकडे लोक सकारात्मक दृष्टीने पाहत होते. अशी मान्यता दारू, सिगरेट किंवा इतर अमली पदार्थांच्या व्यसनांना केव्हाच नव्हती. परिणामी टीव्ही सातत्याने पाहिल्याने दुष्परिणाम होऊ शकतात, याकडे किंचित डोळेझाक झाली. टीव्हीचे व्यसन किती टोकाला गेले, याचे एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत संध्याकाळी ठराविक वेळात वीज बंद होत असे. त्याचे कारण शोधले असता, टीव्हीवर ज्या वेळी जाहिराती येत, त्या वेळी लोक वॉशिंग मशिन, डिश वॉशर लावत आणि त्याचा ताण येऊन वीजपुरवठा बंद पडत होता, हे लक्षात आले.

त्यानंतर पुढचा टप्पा आला तो केबल आणि व्हिडिओ गेम्सचा. केबलमुळे २४ तास कार्यक्रम सुरू झाले. यातून स्क्रीनची सवय झाली आणि त्याचे व्यसनात रूपांतर कधी होत गेले ते समजले नाही. हीच गोष्ट गेमच्या बाबतही झाली. गेमचे प्रकार उपलब्ध व्हायला लागले आणि त्याची क्रेझही वाढायला लागली. याच दरम्यान जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही सामान्यांची दैनंदिनी बदलायला लागली. कम्प्युटरायझेशनचा जमाना येऊ घातला होता. जास्त वेळ आणि जास्त वेगाने काम करण्याची गरज निर्माण व्हायला लागली. त्यातून हातात जास्त पैसाही येऊ लागला. दुसरीकडे व्यावसायिक स्पर्धा, ताण वाढले. ताणातून मुक्तता मिळवण्यासाठी पटकन आनंद मिळणाऱ्या गोष्टींचा शोध घेतला जाऊ लागला. थोडा जास्तीचा पैसा हातात असल्याने चैनीच्या गोष्टींची खरेदी करण्याची मुभाही मिळाली. त्यातून गेम ही पटकन आनंद मिळणारी गोष्ट अनेकांनी आपलीशी केली. व्हिडिओ गेम, गेमिंग कन्सोल (एक्स बॉक्स, प्ले स्टेशन), कम्प्युटरवर विविध गेम्स उपलब्ध व्हायला लागले. पाठोपाठ इंटरनेट आणि मोबाइल आले. विनाबंधन कोणत्याही गोष्टींचे सर्च करणे, पाहणे, हवे ते डाउनलोड करून घेणे साध्य झाले. मोबाइलमुळे तुमच्या हातात इंटरनेट आणि 'स्क्रीन' दोन्ही मिळाले; शिवाय ती वैयक्तिक वापरणेही शक्य झाले. परिणामी वापराचा कालावधी आपोआप वाढला आणि आपण सगळेच जण कळत नकळत स्क्रीन, मोबाइल, टीव्हीच्या आधीन झालो. मुलांच्याबाबत हा प्रश्न थोडा गंभीरपणे घ्यायला हवा. आज ८ ते २० वर्षे या वयोगटात असणारी मुले जन्माला आली, तीच टीव्ही, मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात. आमचे मूल मोबाइल पाहिल्याशिवाय कसे जेवत नाही, मोबाइलवर गाणी ऐकल्याशिवाय कसे झोपत नाही, मुलाच्या दहाव्या वाढदिवसाला भेट म्हणून टॅब दिला, मूल इंटरनेटवर किती गोष्टी सहज सर्च करते, हे पालकच कौतुकाने सांगतात. या पायरीवर मुलांना समजते, की मोबाइल, टीव्ही, इंटरनेट या सगळ्या वस्तू सहज उपलब्ध आहेत, त्या वापरायलाच हव्यात. याच पायरीवर या गोष्टी किती वापरल्या पाहिजेत (मर्यादित वापर), कशाप्रकारे वापरल्या पाहिजेत (दुसऱ्याला हानी न पोहचवता) याचे बंधन मुलांना समजत नाही. मुळात पालकांनाही ते फारस् स्पष्ट नसते. उदाहरणा दाखल सांगतो. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक किशोरवयीन मुलगा पालकांसह आला. त्याने त्याच्या दोन मित्रांचे भांडण मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले, त्यांच्या मारामारीचे फोटो काढले. ही गोष्ट त्या मित्रांना समजली, तेव्हा त्यांनी या मुलाला मारहाण केली. कारण काय तर त्याने हे रेकॉर्ड का केले आणि केले आहे तर ते आता पालकांना दाखवणार किंवा व्हायरल करणार ही भीती. मुलांचा वाद विकोपाला गेला. या मुलाला मोबाइलमधून फोटो, रेकॉर्डिंग करणे माहिती होते; पण त्याच्या दुष्परिणामांची कल्पनाच नव्हती. त्याबद्दल पालकांनी त्याच्याशी कधी संवाद साधलेला नव्हता. हीच गोष्ट इंटरनेटबाबत आहे. इंटरनेटच्या वापरातून बहुतांश वेळा आपल्याला फक्त माहिती मिळत असते. बहुविध प्रकारची माहिती आपल्यावर आदळत असते; पण ते ज्ञान नसते. जी माहिती मिळत असते, ती मिळ‌ाली नाही तरी आपले फार बिघडते आहे, असेही नसते. मूल एखादा लहानसा प्रकल्प करतानाही स्वत:च्या मेंदूऐवजी 'गुगल'ची मदत घेते. यातून कल्पनाशक्तीचा विकास खुंटतो. या सगळ्यांत नव्याने समोर येत असणारा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो 'सोशल मीडिया.' सोशल मीडियाच्या आभासी जगात सतत वावरताना मुले आपोआप एकटी पडत जातात. आभासी जग त्यांना खरे वाटायला लागते. त्यातून काही गैरप्रकार घडले किंवा काही दुर्दैवी घटना समोर आल्या, की पालक जागे होतात. मोबाइल बंद, टीव्ही बंद अशी टोकाची भूमिका घेणे सुरू होते. मला मनापासून वाटते, की तंत्रयुगात आपण टीव्ही, मोबाइल, सोशल मीडियापासून मुलांना खूप काळ रोखू शकणार नाही. या गोष्टींचा अतिरेकी वापर करून मुले व्यसनाच्या पातळीवर पोहोचू नयेत असे वाटत असेल, तर पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. सुरुवातीपासून मुलांना या गोष्टींच्या वापराचे नियम सांगत राहणे गरजेचे आहे. मर्यादित वेळेत वापर आणि अनावश्यक गोष्टींसाठी वापर न करणे, यासाठी मुलांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. मुलांना मोबाइल देताना पाचवी किंवा सहावीच्या मुलाला अँड्रॉइड फोनची गरज आहे का, याचा विचार पालकांनीच करायला हवा. त्याचबरोबर तुम्ही स्वत:ही मोबाइल, टीव्हीच्या वापरावर निर्बंध घालून घ्यायला हवेत. पालकांनो, एक सोपा मंत्र लक्षात ठेवा, ज्या गोष्टी मुलांनी करू नयेत, असे तुम्हाला वाटते, त्या गोष्टी तुम्ही स्वत: करू नका. त्यासाठीच्या मर्यादा, नियम तुम्ही स्वत: पाळा; कारण तुम्ही मुलांसाठी आदर्श असता.

कुलदीप दाते

(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत)