May 11, 2019

जरा विसावू या वळणावर

आजची पिढी ही व्यावहारिक आहे. त्यांच्या शब्दांत सांगायचे, तर 'प्रोफेशनल' आहे. ही व्यावहारिकता बाहेरच्या जगात ठीक. घरात मात्र कौटुंबिक नाती सांभाळायला हवीत. त्यांचे मोल जाणा. ही विविध नाती जोपासा; कारण ज्यांच्याजवळ ही नाती नाहीत, त्यांनी काय गमावले आहे, हे त्यांनाच माहीत

नुकतेच आम्हा मावस-मामे भावंडांचे गेट टुगेदर झाले. प्रकृतीच्या कारणामुळे आम्ही उभयता जाऊ शकलो नसलो, तरी आलेल्या छायाचित्रांवरून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जे काही चांगले क्षण अनुभवले होते, त्याची फोनद्वारे का होईना; पण उजळणी करता आली. सगळ्यांच्या भेटीगाठींनतर एक गोष्ट जाणवली, की अजूनही आम्हातील प्रेमाचे धागे पक्के आहेत. नवीन पिढीचे काय? ते एकमेकांना नियमितपणे भेटत नाहीत, की त्यांना एकमेकांविषयी माहिती आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी मोठे गेट टुगेदर करायला हवे; पण हे जमायचे कसे?

विचारांचे चक्र मनात भिरभिरू लागले. आमच्या लहानपणी आम्ही मावसी, मामाकडे सुटीत जायचो. त्यांची माया, आजीचे आम्हा नातवंडांवरील प्रेम अनुभवले आहे. पाढे, रामरक्षा, गोष्टींची पुस्तके वाचण्याची सवय आजीमुळे लागली. आता काय घडते आहे, एक नाते टिकते. पूर्वी 'हम दो हमारे दो'चा जमाना होता. काका, आत्या, मामा, मावशी अशी नाती होती. आता पुष्कळ ठिकाणी एकच अपत्य असते. त्यामुळे नाती कमी झाली आहेत आणि मुलेही एकलकोंडी होत आहेत. त्यातही आजकाल काळाची गरज म्हणून, शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग म्हणून नोकरी केली जाते आणि साचेबद्ध जीवन जगण्यास सुरुवात होते. त्यापलीकडे बघणे होत नाही. जीवनातील आनंद फक्त पैशाने विकत घेता येतो, असे मानणाराही एक वर्ग आहेच. पैशापेक्षाही मोठे आहे मनाचे समाधान. मनाचा आनंद हा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींतून मिळविता येतो. सकाळी फिरायला गेल्यानंतर अनुभवता येणारे सृष्टीचे रूप, उगवता सूर्य, त्याची कोवळी किरणे, त्यातून जाणवणारी ऊब, झाडाची पाने-फुले अनुभवता आली पाहिजेत, शनिवार-रविवार बाहेर जाता आले नाही, तर एखादे चांगले पुस्तक वाचून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. फक्त तो अनुभवता येण्यासाठी संवेदनशील मन असायला हवे. तंत्रज्ञानाच्या या जगातही पुस्तके ज्ञानाने, अनुभवाने, संस्काराने समृद्ध करत असतात. त्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. एखाद्या अडल्यानडल्याला केलेली मदत ही मनाला आनंद देणारी असते. अशा आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. फक्त त्या अनुभवता आल्या पाहिजेत.

आजची पिढी ही व्यावहारिक आहे. त्यांच्या शब्दांत सांगायचे, तर 'प्रोफेशनल' आहे. ही व्यावहारिकता बाहेरच्या जगात ठीक. घरात मात्र कौटुंबिक नाती सांभाळायला हवीत. त्यांचे मोल जाणा. देवाने दिलेली ही विविध नाती जोपासा; कारण ज्यांच्याजवळ ही नाती नाहीत, त्यांनी काय गमावले आहे, हे त्यांनाच माहीत. आजच्या पिढीत आणि आमच्या पिढीत काळाचा फरक आहे; पण आमच्याकडे जे मानसिक समाधान आहे, ते मिळविण्यासाठी या पिढीला वेगळा वेळ काढावा लागेल. थोडा त्याग करावा लागेल. नात्यांना थोडे प्रेम द्यावे लागेल.

आजच्या स्पर्धेच्या युगात जो पुढे गेला तो जिंकला आणि जो थांबला तो संपला, असे म्हणता येईल. ही स्पर्धा दुसऱ्या दुसऱ्या कोणाशी करण्याऐवजी आपण आपल्याशीच केली, तर फार बरे होईल. त्यामुळे आपल्याला जो ताण जाणवत राहतो, तो जाणवणार नाही. जास्त वेळ देऊन खूप पैसा कमावला, तरी मनात कोठेतरी खदखद असते, की कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आहे. हे सारे टाळण्यासाठी नातीगोती, मित्रमंडळ सांभाळायला हवे. त्यांना अधूनमधून भेटायला हवे. जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. चुका साऱ्यांकडूनच होत असतात. त्या विसरून जाव्या आणि चांगले क्षण स्मरणात ठेवावेत. मित्रमंडळींच्या, नात्यागोत्यांच्या वळणावर काही क्षण विसावा मिळतो. त्यातून मिळणारी ऊर्जा ही प्रेरणा देणारी, आनंद देणारी असेल.


-शुभांगी देशपांडे