May 11, 2019

ब्लेम-शेम-गेम

ब्लेम(आरोप), शेम(सांस्कृतिक शरमिंदेपणा)चा ‘गेम’ हा वर्चस्वादी राष्ट्रांच्या पब्लिक डिप्लोमसीचा एक अनिवार्य भाग आहे. लष्करावरील खर्चासारखाच या ‘ब्लेम-शेम’ मोहिमांवर या देशांकडून प्रचंड पैसा ओतला जातो. 

आठ मार्च आला आणि गेला. जगभर हा दिवस ‘स्त्री-सन्मान-दिवस म्हणून साजरा होतो. कधीपासून सुरू झाली ही परंपरा?

१९0९ साली सर्वप्रथम अमेरिकेतील समाजवादी पार्टीने असा स्त्री-सन्मानदिन जाहीर केला. पाठोपाठ १९१0 साली डेन्मार्कमधे भरलेल्या स्त्री मेळाव्यात क्लारा झेटकिन, लुईस झीत्स अशा कडव्या कम्युनिस्ट स्त्री नेत्यांनी स्त्रियांना सन्मानाने वागविण्याची मागणी करण्यासाठी अशा आंतरराष्ट्रीय दिवसाची नितांत गरज असल्याची भूमिका मांडली. विशेषत: रशियातील बोल्शेव्हिक चळवळीने रशियन स्त्रीच्या कणखरपणाचा उदो उदो करण्यासाठी या दिवसाचा उपयोग करून घेतला. या भानगडीत आठ मार्च या दिवसाला आलेला कम्युनिस्ट आणि बोल्शेव्हिग रंग लोकशाहीच्या प्रणेत्या युरोपला न आवडल्यामुळे त्यांनी १८५७ साली फ्रान्समधे झालेल्या स्त्री-कापडगिरणी कामगारांच्या आंदोलनाचा हवाला देत-देत या स्त्री सन्मान दिनावर ‘आंतरराष्ट्रीय’ या शब्दाची तातडीची मोहोर उठवण्याची तसदी घेतली.

थोडक्यात ८ मार्च या स्त्री-सन्मान-दिनाला ठसठशीत अशी राजकीय आणि सांस्कृतिक किनार आहे. २0१५ सालातल्या स्त्री सन्मान दिनाचे औचित्य आपल्याकडे विशेष गाजले. बी.बी.सी. या ब्रिटिश सरकारच्या अधिकृत वृत्तवाहिनीने ‘इंडियाज डॉटर्स’ नावाचा माहितीपट बनवून घेतला आणि तो जगभर प्रसारित केला. माहितीपटाचा विषय आहे ‘निर्भया’ आणि तिचे अधम गुन्हेगार. लेस्ली उडवीन या एकेकाळच्या सिनेअभिनेत्रीने आणि निर्मातीने हा माहितीपट बनवला आहे. या उडवीनबाई सध्या अठ्ठावन्न वर्षांच्या आहेत. त्यांच्या स्वत:च्या देशात म्हणजे ब्रिटनमधे त्या सतरा वर्षांच्या असताना त्यांच्यावर बलात्कार झालेला होता. रॉयटरला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात की पार तेव्हापासून त्यांना एका प्रश्नाने भंडावून सोडले होते. तो प्रश्न म्हणजे- ‘पुरुषजात बलात्कार का करते?’ 

- या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात त्यांनी थेट भारत गाठला. भारत हे एकतर ब्रिटिशांचे (एकेकाळचे) गुलाम राष्ट्र; त्यांना इथे कोण अडवणार? शिवाय माओ-त्से-तुंग यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक भारतीय हा विकावू. आधीच्या यू.पी.ए. सरकार या मायबापाने उडवीनबाईंना थेट तिहार जेलमध्ये प्रवेश दिला. लेस्ली उडवीन यांना त्यांच्या देशात गोर्‍या देशबांधवाने केलेल्या बलात्काराचे उत्तर हे मुकेश सिंग या ‘निर्भया’च्या केसमधल्या बलात्कार्‍याच्या मुलाखतीमुळे मिळाले. म्हणजे बघा! या माहितीपटामुळे भारतात खूप गदारोळ माजला.  त्यातील भावनिक उद्रेक हा या लेखाचा विषय नाही. कोण बरोबर? कोण चूक? हाही येथे मुद्दा नाही. तर प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याकडील आर्थिक बळ हे ‘सॉफ्ट पॉवर’ या शस्त्रागारातले किती महत्त्वाचे अस्त्र आहे, हा आपला विषय आहे. या लेखमालेच्या सुरुवातीला आपण बाळगुटीचे रुपक वापरले होते, आठवते? ‘सॉफ्ट पॉवर’ ही बाळगुटीतल्या अफूच्या वळशासारखी असते. ती मधातून चाटवली जाते. म्हणून ती नकळत मिटक्या मारत चाटली जाते. पण त्यातला अफूचा वळसा बरोब्बर काम करतो. ओला झालेला लंगोट बदलण्याची मागणी करायचाही तो विसर पाडतो. ‘इंडियाज डॉटर्स’ या माहितीपटातला मध आणि अफू वेगवेगळी करून यावर्षीच्या ८ मार्चकडे पाहिले, तर काय दिसते? हा संपूर्ण माहितीपट एकांगी नाही. बलात्काराच्या कृतीशी संबंधित भयंकर वृत्तीवर शक्य तितक्या बाजूने प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यात केला आहे.  झोपडपट्टीतले जीवन, तिथे राहतात त्या सर्वांनाच हातातोंडाशी गाठ घालताना करावी लागणारी धडपड, स्त्रियांवरील हिंसा बघत बघत मोठे झालेले बालपण असे सारे यात दिसते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपण आणि आपला समाज असे किती हिंस्त्र पुरुष आपल्या आवारात पाळत आहोत? असे विषण्णपणे मनात येते. एक मुलगा जन्माला घातलेल्या प्रत्येक भारतीय आईच्या शिरावर आज केवळ मोठी जबाबदारी आहे, याची भीषण जाणीव होते. माहितीपटात निर्भयाच्या आई-वडिलांच्या मनोगतालाही पुरेसा वाव दिलेला आहे. मुलींना पंख देऊन उडण्याचे बळ देऊ पाहणारेही अनेक आईवडील आहेत आणि ते भारतातही असतात; ही गोष्ट त्यामुळे अधोरेखित झालेली आहे. आत्मचिंतनासाठी प्रत्येक भारतीयाने हा माहितीपट जरूर बघितला पाहिजे असे म्हटल्यावाचून राहवत नाही. 

..आणि आता त्यातला अफूचा वळसा.

भावनिक उद्रेकाच्या नशेत काही साधे प्रश्न विचारणे हे यासंदर्भात महत्त्वाचे आहे :

१) पुरुष जात बलात्कार का करते?’ या प्रश्नाचे उत्तर ‘इंडियाज डॉटर्स’ कसे असू शकते? मुकेश सिंग या बलात्कार्‍याची विधाने ही साठ कोटी भारतीय पुरुष मानसिकतेचे आंधळे सार्वत्रिकीकरण कसे काय करू शकतात?

२) निर्भयाचे खरे नाव आणि ओळख उघड न करण्याचे सौजन्य भारताने दाखविले होते. तो हक्क एका परदेशी वृत्तवाहिनीने कसा काय ओरबाडून घेतला? त्याचवेळी १७ वर्षे ६ महिने वयाच्या बलात्कारी ‘बाल’ गुन्हेगाराचे नाव मात्र गुलदस्त्यात का ठेवले? ‘निर्भया’च्या बाबतीतले हे मरणोत्तर ‘विच्छेदन’ तिच्या संमतीविना चव्हाट्यावर आणणे ही तिची मानखंडना नव्हे काय?

३) गुन्हेगारांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्याआधी म्हणजे कोर्टाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना हा तथाकथित ‘सामाजिक प्रश्नांचा अभ्यास’ कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसतो?

‘सॉफ्ट पॉवर’च्या युद्धखेळी या अशाच असतात. एखाद्या लोकसमूहाच्या मनावर सततचे सांस्कृतिक शरमिंदेपण लादत राहणे, त्याच अचूक नेमबाजी करणे आणि त्यायोगे उडणार्‍या आरोपांच्या गदारोळात हे समूह आत्मभानापासून सतत वंचित ठेवणे हा या युद्धखेळीचा भाग असतो.

झालेही तसेच! भारताची ब्रॅँड इमेज पुन्हा एकदा नकारात्मक वतरुळात सापडली. ‘बलात्कार्‍यांचा देश’ ही मोहोर कायम झाली. लाइफत्झींग विद्यापीठातील एका प्रोफेसर बाईंनी भारतीय (पुरुष) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याच्या बातम्या आल्या. गार्डीयन या वृत्तपत्राने भारतीयांच्या अज्ञानाची कीव केली. ‘इंडियाज  डॉटर्स’ ची सुटका करण्यासाठी ग्लोबल मिशन उभे राहिले. संयुक्त महासंघाच्या सेक्रेटरी जनरलने रॉयटरशी बोलताना भारतातील माध्यमस्वातंत्र्याच्या गळचेपीवर कडक भाष्य केले. ब्लेम (आरोप) शेम (सांस्कृतिक शरमिंदेपण) चा हा गेम हा वर्चस्वादी राष्ट्रांच्या पब्लिक डिप्लोमसीचा एक अनिवार्य भाग आहे. लष्करावरील खर्चासारखा या ‘ब्लेम-शेम’ मोहिमांवर या देशांकडून प्रचंड पैसा ओतला जातो.

क्षणभर एक कल्पना करून पाहा.. भारताची सरकारी वृत्तवाहिनी म्हणजे दूरदर्शन! त्यांनी एका व्यावसायिक सिनेनिर्मात्याला हाताशी धरायचे. गेल्या वर्षी वांशिक विद्वेषातून पुण्यातल्या बीडकर या आडनावाच्या एका उमद्या विद्यार्थ्याची मँचेस्टरमधे हत्त्या झाली, आठवते आहे का? या हत्त्येच्या पार्श्‍वभूमीवर ‘‘गोर्‍या लोकांच्या मनात हा वांशिक विद्वेष कुठून येतो?’ अशा स्वरूपाच्या सामाजिक प्रश्नांच्या ‘अभ्यासासाठी’ बीडकरच्या मारेकर्‍याची तुरुंगात भेट घ्यायची. एक माहितीपट बनवायचा आणि तो जगभर दाखवायचा. ऑस्ट्रीयात एका वडिलांनी आपल्या पोटच्या पोरींना ३0 वर्षे तळघरात डांबून ठेवून त्यांच्यावर निर्घृण बलात्कार केले. तिथे जाऊन ‘वडील’ या जमातीला हे असे का करावेसे वाटते? या प्रश्नासाठी असा माहितीपट बनवायचा आणि ‘ऑस्ट्रीयन’ कल्चर’ म्हणून तो जगभर दाखवायचा.

- हे काहीतरी भलते सुचवल्यासारखे वाटते ना? इतकी हीन पातळी आपण गाठू शकत नाही असे वाटते ना? खरेच आहे ते! हा थर आपण गाठायची जरूर नाही, पण देश-विदेशांच्या वृत्तपत्रांतून, ई-माध्यमांतून भारताबाबत जो सदैव ‘ब्लेम-शेम’ चा गेम चालू असतो त्यावर वैचारिक उत्तरे देण्यास त्या-त्या देशातील भारतीय दूतावासात एकेक पद मात्र आपण नक्की तयार करू शकतो. तेथे त्या-त्या भाषांतील भारतीय भाषाप्रभू नेमू शकतो. बुद्धिवादाने प्रतिवाद करु शकतो. भारताची ब्रँड इमेज जपू शकतो.

या शस्त्राचे ‘सॉफ्ट पॉवर’ आहे आणि ते अहिंसक आहे.


वैशाली करमरकर