March 25, 2010

तो आणि ती भाग..६ --पहिली सोनेरी भेट ऽ सिंहगड फोर्ट

त्या दोघांनी सिंहगडावर जाण्याचा बेत रचला. परतीच्या प्रवासात खडकवासल्यात थांबण्याचा प्लॅन होताच. त्याच्यासोबत एकटीने पुण्याबाहेर जाण्याच्या विचारांनी ती पुरती "एक्‍साइट' झाली होती. अर्थात, त्याचंही स्वप्न सत्यात उतरलं होतं. पहिल्यावहिल्या सिंहगड भेटीच्या कल्पनेने दोघेही भलतेच खूष होते.

वारीला जाणाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा देहू-आळंदीला भेट दिली नाही, तर त्यांना चैन पडत नाही. तसेच काहीसे पुण्यातील प्रेमवीरांचे आहे. पण यांची श्रद्धास्थाने मात्र पुरती भिन्न आहेत. महिन्यातून एकवार तरी खडकवासला, सिंहगड आणि पानशेतचे दर्शन घेतले नाही, तर त्यांनाही काहीसे चुकल्या चुकल्यासारखे वाटते. मग बेत ट्रेकचा असो किंवा बाईकवर फेरफटका मारण्याचा. तो आणि तीसुद्धा याला अपवाद नव्हते. दोघांच्या प्रेमप्रकरणाला आताशी सुरवात झाली असली, तरी दोघांची मने कधीच या श्रद्धास्थळांच्या दर्शनासाठी पुरती व्याकुळ झाली होती. अर्थात, दोघांनीही या आधी मित्र-मैत्रिणी, नातलग आणि घरच्यांसोबत अनेकदा सिंहगडला भेट दिली होती. पण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत तेथे जाण्याची मजा काही औरच. खडकवासल्याचे निळेशार पाणी बघितल्याबरोबर पुण्यापासून तेथे जाण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा क्षणात विरतो. नकळत आपल्या तळव्यांना थंडगार पाण्याचा स्पर्श झाल्याची जाणीव होते आणि अख्खे शरीर शहारते. गार वारा चक्क आपल्याभोवतीच रुंजी घालतोय, असा भास होतो. आणि मग वाऱ्यावर हेलकावणारे मन सांभाळत सूर्यास्ताचे मनोहारी दृश्‍य डोळ्यांचे पारणे फेडते.

रविवारी दोघांचा सिंहगडला जाण्याचा विचार होता. पण या दिवशी खडकवासला, सिंहगड किंवा पानशेतला भेट द्यायची म्हणजे एका दिव्यातून जावे लागते. एखाद्या जत्रेला जमलेल्या गर्दीप्रमाणे माणसांचे जथ्थेच्या जथ्थे खडकवासला धरणाशेजारी जमलेले असतात. त्या गर्दीच्या महासागरातून वाट काढत आपण कसेबसे धरणाच्या पाण्याजवळ पोचलो, की काठावरचे गढूळ पाणी बघून त्यात पाय टाकायचीही इच्छा होत नाही. सिंहगडकडे जायचे म्हटले, तर रस्त्यावर गाडी चालविण्याएवढीही जागा सापडत नाही. त्यात सारखं डोकं हॉर्नवर आपटत गर्दीत वाट शोधावी लागते. काही अतिउत्साही लोकांच्या गाड्या तर अक्षरशः सुसाट वेगाने पळत असल्याने आपण जीव मुठीत घेऊनच राहतो. गडावर ट्रेकिंग करीत जायचे म्हटले, तरी पायवाटेवर जणू शेकडो मुग्यांची रांग लागावी तसे उत्साही ट्रेकर्स दिसतात. मग एकमेकांना "फॉलो' करीत गड चढण्यात काय मजा! आणि मुख्य म्हणजे या गर्दीत कोणी आपले ओळखीचे दिसले तर... उगाच गावभर चर्चा! म्हणून दोघांनी शनिवारचा बेत पक्का केला.

पहिल्यांदाच त्याच्यासोबत पुण्याबाहेर जात असल्याने ती थोडी घाबरली होती. थोडी भेदरली होती. पण त्याच्यावर पूर्ण विश्‍वास असल्याने अस्वस्थ मनाला थोडा आधार होता. त्याच आधाराच्या बळावर तिने हा धैर्यशील निर्णय घेतला होता. कॉलेज संपल्यानंतर दोघेही दुपारी एक वाजता राजाराम पुलावर आले. त्याला बघितल्याबरोबर तिच्या जिवात जीव आला. त्याची सोबत असल्याने ती थोडी बिनधास्त झाली. पुढची वाटचाल केवळ एकाच गाडीवर करण्याचा बेत असल्याने तिची गाडी एका हॉटेलसमोर पार्क केली. सिंहगड रस्त्यावर कोणतेही हॉटेल किंवा मॉलसमोर गाडी ठेवली, तरी ती दिवसभर सुरक्षित राहते. शिवाय गाडी पार्क करताना कोणी गुरगुरत (डरकाळी फोडणे दूरच) नाही. कारण हे पार्किंग रस्ता वजा फुटपाथवर असल्याने आपणही थोडी अरेरावीची भाषा करू शकतो, याची सर्वांना पुरेपूर जाण असते.

हॉटेलसमोर गाडी ठेवल्याने सर्वांचा असाच समज होतो, की गाडीचा मालक या हॉटेलात असावा आणि थोड्या वेळातच परतेल. म्हणून गाडीच्या सुरक्षिततेची शंभर टक्के हमी असते. गाडी पार्क केल्यावर दोघेही त्याच्या बाईकवर स्वार झाले. त्यानंतर संतोष हॉल, आनंदनगर, वडगावचा अजस्त्र उड्डाणपूल आणि नंतर वाटेत लागणारी लहाने-मोठी खेडी पार करीत ते खडकवासल्यात येऊन धडकले. शनिवार असल्याने तुलनेने ट्रॅफिक जरा कमी होतं. त्यामुळे गाडीच्या वेगाच्या मर्यादाही चोखाळता आल्या. आणि सफाईदारपणे बाईक चालविण्याच्या त्याच्या कौशल्याचीही तिला ओळख झाली. धरणाच्या शेजारी पोहचल्याबरोबर गार वाऱ्याने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. सगळा थकवा क्षणार्धात नाहीसा झाला. सिंहगडापर्यंत बाईक चालविण्याचे त्याच्या मनगटात बळ आले. परत येताना खडकवासल्यात थांबण्याचा पूर्वनियोजित "प्लॅन' असल्याने त्यांनी बाईकवरूनच तलाव डोळ्यात साठविला. काही वेळात बाईक सिंहगड पायथ्याशी आली. तो म्हणाला, ""चल ट्रेक करीत गडावर जाऊया. खूप मज्जा येईल. मीठ लावलेली कोवळी काकडी, इवल्याशा मडक्‍यातले दही, खारट-गोड कुल्फी आणि आंबट ताकाची चक जिभेवर ठेवत पायवाट कापूया. खरंच खूप मजा येईल.''

त्याच्या अचानक ठेवलेल्या प्रस्तावाने ती थोडी गोंधळली. कारण तिने चक्क मोठ्या हिल्सची सॅंडल घातली होती. बाईकवर सिंहगडला जाणार असल्याने मेकअपवरही बराचसा वेळ घालविला होता. त्यामुळे तिने बाईकवरूनच गडावर जाण्याचा हट्ट धरला. शेवटी दर वेळीप्रमाणे त्याने तिच्यासमोर माघार घेतली. लहान-मोठ्या डोंगरांच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या झाडांमधून निघालेला नागमोडी रस्ता नाकासमोर ठेवत त्यांनी बाईकने गडावर चढाई सुरू केली. जाताना डोंगर-दऱ्यांचे मनोहारी दृश्‍य लक्ष वेधून घेत होते. एखाद्या खोलगट दरीत जमलेले दाट धुके एकमेकांना बोटाने दाखवत सुखद प्रवास सुरू होता. दरीत मान लपून बसलेल्या कौलारू गढ्या असलेले छोटेसे गाव डोंगरावरून अधिकच खुलून दिसत होते. त्या गावावरून त्यांना डोंगराच्या उंचीचा अंदाज येत होता.

गडाजवळ जाताच पावसाची भुरभूर सुरू झाली. धूर आणि धुक्‍याचे पारदर्शक ढग त्यांना छेदत जात असल्याचा भास होऊ लागला. अवघा सिंहगड धुक्‍याने ओथंबून वाहत होता. शेवटी ते गडावर पोचले. गाडी पार्क करून पहिल्यांदी कुल्फीचा आस्वाद घेतला. थंडीत कुल्फी खाण्याची मजा काही औरच. दातांना स्पर्शही होऊ न देता गारठलेल्या जिभेवर कुल्फी ठेवल्याबरोबर वितळते. एकमेकांच्या हातात हात देऊन कुल्फी खात गडाच्या पायऱ्या चढताना मन अगदी पिसासारखं हलकं होतं. पायऱ्या कधी संपूच नयेत अशा वाटतात. पण शेवटी दुर्भाग्य आड येणारच. पायऱ्या संपतात. पुणे दरवाजा कधी मागे पडतो तेही कळत नाही. भूक लागली असतानाही दोघांनी आधी गड बघण्याचा निर्णय घेतला. फारशी गर्दी नव्हती. पण भरपूर कपल्स आली होती. त्यामुळे गारठ्याला गुलाबी झालर चढली होती. दोघांनी गडाच्या रेलिंगला टेकून गप्पा मारण्यास सुरवात केली. ती म्हणाली, ""खरंच सगळं कसं स्वप्नासारखं वाटतंय. आपण दोघांनी एकमेकांना "प्रपोज' केलं. चक्क वेळ घेऊन दोघांनीही ते "एक्‍सेप्ट' केलं. सगळं कसं मनासारखं झालं. आता आपण या गडाच्या बुरुजावर उभे आहोत. फक्त दोघंच. समोर दऱ्या-खोऱ्यांचं विलोभनीय दृश्‍य जणू आपल्याला साद घालतंय. खरंच आपण भाग्यवान आहोत...'' तो तिच्याकडे बघत म्हणतो, ""मला फक्त तुला डोळे भरून बघायचंय.''
पुन्हा दोघांमध्ये संवाद सुरू होतो. केवळ दोघांपुरता.


(क्रमशः)

No comments: