March 29, 2010

तो आणि ती भाग..८ --कॉलेजच्या प्रिन्सेसने घातला घोळ

कॉलेजच्या प्रिन्सेसने त्यांच्या साध्या-सरळ आयुष्यात मोठी खळबळ निर्माण केली. त्याचं प्रिन्सेससोबत हसून बोलणं, कॉलेजमध्ये फिरणं, हात मिळवणं हिच्या चांगलंच जिव्हारी लागत होतं. तशी तिने उघड नाराजी व्यक्त केली नसली, तरी मनात सात्त्विक संताप खळबळत होता. कालांतराने त्याने उग्र रूप धारण केलं. शेवटी प्रकरण एक तर "ती' नाही तर "मी' येथवर येऊन पोचलं.

कोणत्याही कॉलेजचा सांस्कृतिक महोत्सव म्हणजे अतिउत्साही तरुणाईची मांदियाळीच. कॉलेज सुरू झाल्यानंतर आतुरतेने वाट पाहिली जाते ती याच उत्सवाची. दिवाळीच्या सुट्ट्या सरल्या, की चर्चा रंगते ती सांस्कृतिक महोत्सवात कुणी काय भूमिका वठवायची याची. त्यांच्या कॉलेजच्या सांस्कृतिक महोत्सवात यंदा "फॅशन शो'सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं होतं. प्रत्येक जण मी कसा स्मार्ट दिसतो, हे सांगण्यात व्यग्र दिसत होता. या "फॅशन शो'ला कॉलेजच्या स्मार्ट म्हणवून घेणाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात होणाऱ्या "मिस कॉलेज कॉम्पिटिशन्स'मध्ये प्रथम येणारी मुलगी कॉलेजची प्रिन्सेस म्हणून ओळखली जाते. किमान चार-दोन महिने तरी तिच्याच नावाची चर्चा असते. इतर कॉलेजेसमध्येही तिची ख्याती पसरते. तिला "बघायला' येणाऱ्या थव्यांमध्ये दिवसागणिक वाढ होते. अशा एका कॉलेज प्रिन्सेसने त्यांच्या नात्यात चांगलाच खोडा घातला.

प्रिन्सेसचं त्याच्यासोबत हसून बोलणं, मोबाईलवर वारंवार फोन करणं, कॉलेजमध्ये फिरणं, हात मिळवणं तिच्या चांगलंच जिव्हारी लागायला लागलं होतं. सुरवातीला तिने काही ऑब्जेक्‍शन घेतलं नाही. कारण त्याच्या इतरही मैत्रिणी थोड्याफार मोकळ्या स्वभावाच्या होत्या. त्या त्याच्याशी थोड्या खुलूनच बोलायच्या, वागायच्या; पण या प्रिन्सेसने मात्र कळसच केला. रात्री दहानंतर सगळी महत्त्वाची कामं आटोपती झाल्यावर तो आणि ती मोबाईलवर बोलत असत. ही त्यांची ठरलेली वेळ. यात कधी व्यत्यय आला नाही. कारण दोघांच्याही स्वतंत्र खोल्या होत्या आणि रात्री नऊनंतर साधारणपणे त्यांच्या खोलीत कुणी प्रवेश करीत नसे. पण काल तिने त्याला फोन लावला, तर तो बिझी होता. एवढ्या रात्री सहसा त्याचा फोन बिझी लागत नसे. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. साधारणतः अर्धा तास तरी ती बेडवर शून्यात नजर लावून बसली होती. तरी त्याचा रिप्लाय आला नाही. तिने परत फोन केला. तो बिझीच होता. आता तिच्या मनात शंकांचं काहूर माजलं. संयमाचा बांध फुटला. काय झालं असेल, असा प्रश्‍न तिला छळू लागला. तिने वारंवार पाच-सहा वेळा फोन लावला; पण काहीच रिप्लाय नाही. शेवटी तिला एक एसएमएस मिळाला. तो त्याचाच होता. "मी प्रिन्सेसशी बोलतोय, थोड्याच वेळात फोन करतो,' असं त्यात लिहिलं होतं. ते वाचून तिचा अनावर झालेला राग थेट गगनात जाऊन पोचला.

कालचीच गोष्ट. तो कॅडबरी खात होता. तेव्हा प्रिन्सेस त्याच्याजवळ आली. तीही त्याच्यासोबत होतीच. तिच्याशी साधा "हाय'-"हॅलो'ही प्रिन्सेसने केला नाही. तिला बघून थोडं स्मित करीत ओळख दाखवणं तर दूरच. प्रिन्सेसने हळूहळू त्याच्याशी सलगी करायला सुरवात केली. बोलता बोलता त्याच्या हातातल्या उष्ट्या कॅडबरीचा तुकडा तोडत आपल्या तोंडात कोंबला. हे बघून तिचं टाळकंच फिरलं; पण आवंढा गिळावा तसा तिनं राग गिळून घेतला. वर हसत काही झालं नाही, असा खोटा देखावा करीत राहिली. पण हे मात्र अतिच झालं. रात्री दहानंतर मोबाईवर बोलण्याची त्यांची हक्काची वेळ. या वेळेवर प्रिन्सेसने अतिक्रमण केलं होतं. तिच्या रागाने संतापाच्या सर्व पातळ्या ओलांडल्या. क्षणभरही न थांबता तिने आपला मोबाईल फोन "स्विच ऑफ' केला. रोज तिच्या उशीखाली राहणारा मोबाईल दूर कुठं तरी भिरकावून दिला. एका उशीला छातीशी कवटाळून विचारांच्या जत्रेत ती नकळत सामील झाली. थोड्याच वेळात डोळे डबडबले.

दुसऱ्या एका उशीखाली डोकं ठेवून ती झोपेच्या आहारी गेली. तो रात्रभर तिचा मोबाईल ट्रायच करीत राहिला. दुसऱ्या दिवशी कॉलेजला आल्यावर, ""तू मोबाईल का स्विच ऑफ केला होतास?'' असा प्रश्‍न विचारताच तिने त्याच्यावर घणाघाती आरोपांचा भडिमार केला. त्याने प्रिन्सेसशी केलेली जवळीक आता सहन केली जाणार नाही, असं स्पष्ट बोलून दाखविलं. प्रिन्सेसला अभ्यासाशी संबंधित काही काम असल्याने तिनं मला फोन केला होता, असं सत्य सांगूनही तिचं काही समाधान होत नव्हतं. शब्दाने शब्द वाढत गेला. "तू फारच "पझेसिव्ह' होत आहेस,' असं त्यानं तिच्या लक्षात आणून दिलं. त्यावर ""होय, मी पझेसिव्ह आहे तुझ्याबाबत. तुला माझा त्रास होत असेल, तर तू नातं तोडायला मोकळा आहेत. तुला जर नातं कायम राहावं असं वाटत असेल, तर एक तर तिच्याशी असलेली मैत्री तोड किंवा मला स्पष्ट सांग,'' असं तिनं ठणकावलं. तिचं रौद्र रूप पाहून तो पुरता स्तंभित झाला. हिला एवढा कसा काय राग आला, हेच त्याला कळत नव्हतं. शेवटी त्यानं तिची समजूत काढली आणि यानंतर "मी तिला कधीच एंटरटेन करणार नाही,' असं वचन दिलं. तिचीही रुसलेली खळी खुलली. चेहऱ्यावर समाधान पसरलं.

(क्रमशः)

No comments: