त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना. ठाम निर्णय घेण्यासाठी वेळ मागितल्याने त्याचं मन खजील झालं होतं; पण दिलेला शब्द मोडणारा तो मुलगा नव्हता. त्याने निर्णय घेतला. तोही अगदी ठाम...
पुन्हा एकदा रात्रीची भकास शांतता. खोलीत फक्त भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांची आणि त्याच्या हृदयाची हालचाल. बिछान्यावर पाय दुमडून तो विचार करतोय. थोड्या वेळात बाहेरच्या बोचऱ्या थंडीचं अस्तित्व खोलीतही जाणवायला लागतं. पाय झाकले जातील, तेवढंच पांघरूण घेतो. पुन्हा विचारचक्र सुरू. मणामणाचं ओझं मनावर घेऊन तळमळत बिछान्यावर थोडा पहुडतो. तरीही नजर शून्यात. अंतर्मनाचा वेध घेण्याच्या प्रयत्नात मनात एक अनपेक्षित द्वंद्व सुरू... ""एक निर्णयही किती महत्त्वाचा असतो. तुमचं आख्खं आयुष्य पालटण्याची ताकद त्यात असते.
म्हणून तो विचार करूनच घ्यावा, हे समजत असलं तरी उमगत नाही,'' तो स्वतःशीच बोलत होता. त्यानं तिला वेळ मागणं, हे वरकरणी त्याला फारच अपराधीपणाचं वाटत होतं, पण पर्याय नव्हता. आयुष्यभराच्या "कमिटमेंट'वर सहज उत्तर देणं तितकं सोपं नव्हतं. त्यातही एकदा शब्द दिला, तर त्यासाठी प्राणही गेला तरी बेहत्तर, असा त्याचा मराठी बाणा. पण शब्द देताना थोडा विचार करून निर्णय घेण्याचा त्याचा लहानपणापासूनचा स्वभाव. त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना.
त्याचं एक मन म्हणालं, ""अरे, तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची त्या मुलीची तयारी आहे. ती तुझी आयुष्यभरासाठी साथ मागतेय. तिला केवळ टाइमपास करायचा असता, तर केव्हाच "हो' म्हणून मोकळी झाली असती, पण तसं नाही. एवढी समजूतदार मुलगी तुला शोधून सापडणार नाही. या मुलीनं तुला वास्तवाचं दर्शन घडवलं. शेवटी प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं "सेम' असतं, हेच खरं. तिला पहिल्यांदा बघितल्याबरोबर मनाने साद दिली. नुकत्याच आलेल्या एका इंग्रजी चित्रपटात दाखविलं आहे ना. परग्रहावरील प्राणी त्यांच्या वेणीसारख्या संवेदकाच्या माध्यमातून एकमेकांच्या संवेदना जाणून घेतात. आपल्याला देवाने "सिक्स्थ सेन्स' दिलाय. एखाद्याचे डोळे, चेहरा, स्वभाव आणि वागणूक बघून आपण आपलं मत बनवितो. यालाच दुसऱ्याच्या संवेदना, भावना जाणून घेणं म्हणतात. ती भावुक होऊन बोलत असताना प्रेमाचा साक्षात्कार होत होता आणि त्या प्रेमाच्या परतफेडीची निरागस आशा तिच्या बोलक्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. डोळ्यांमध्ये जमलेल्या आसवांवरून ती तुझ्याबाबत किती हळवी आहे, याचा पुरेपूर अंदाज येत होता. यालाच कदाचित दोघांची "लिंक' लागणं म्हणत असावं. तसंही तू तिला बघितलं आणि ती तुला "क्लिक' झाली. "वुई मेड फॉर इच अदर', अशी मनाने साद दिली. ती तुझी वाट बघतेय. जा, पळत जा तिच्यापाशी.''
तर दुसरं मन म्हणत होतं, ""अरे, आई-वडिलांच्या स्वप्नांचा जराही विचार न करता एखाद्याला आयुष्यभराचं "कमिटमेंट' देणं खरंच योग्य आहे? आणि तू दिलेला शब्द पाळू शकला नाहीस तर? प्रेमात रममाण होण्यासाठी तिने तुझ्यात ऊर्मी जागविली. पण चाकोरीबाहेरचा विचार करणं फारच कठीण आहे. तिच्या निखळ, निःस्वार्थ आणि निर्मळ मनाला दुखविण्याचं दुःसाहसही तुझ्याकडून होणार नाही, हे खरं. पण जोखीम घेण्यासही मन धजावत नाही. तिच्या बोलण्यात पोरकटपणा नव्हता, तर एका समजूतदार मुलीने कोणताही आडपडदा न ठेवता परखडपणे आपलं मत मांडलं होतं. त्यामुळे तुझी भीती अनाठायी व अप्रस्तुत आहे. मात्र, विचार करून निर्णय घे. आणि एकदा विचार पक्का झाल्यावर त्यावर ठाम राहा.''
बऱ्याच विचारांती त्याने आपली मान होकारार्थी या अर्थाने हलविली आणि निर्णय घेतला. एकदम पक्का आणि झोपेच्या आहारी गेला.
दुसऱ्या दिवशी टवटवीत लाल गुलाबाचं फूल आणि तळहाताच्या आकाराची कॅडबरी घेऊन तो कॉलेजला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव तिने क्षणात टिपले आणि ती कमालीची लाजली. तिच्या गालावरची गोड खळी आणखीच खुलली. त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलाचा तिनं सुहास्य वदनानं स्वीकार केला. कॅडबरी जणू हिसकूनच घेतली. तो श्वास रोखून बघत होता. एक शब्दही न बोलता तिने एक चिठ्ठी दिली. त्यात गुलाबाचं कोमेजलेलं फूल होतं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नांकित भाव उमटला. त्याने तिच्याकडे मान वळविली, तेव्हा ती म्हणाली, ""मी चार दिवसांआधीच चिठ्ठी लिहिली होती. तुझी थोडी परीक्षा घेतली. सॉरी. माफ कर. पुन्हा असं करणार नाही.''
तो चिठ्ठी उघडून पाहतो तर त्यात लिहिलं होतं...
चांदणी मी तुझी, चांद साक्षी नभी,
स्वामी हृदया, मी तुझी रे सखी,
नाव रे तुझे, कोरले हृदयी,
उच्चार स्मरे, प्रत्येक स्पंदनी.
No comments:
Post a Comment