March 22, 2010

तो आणि ती भाग..३ --प्रेम हे प्रेम असतं...'

ती त्याला "हो' म्हणेल की "नाही', या विचारात संबंध आठवडा गेला. तरीही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. तर चला बघू या, त्यांच्या आयुष्यात काय घडतं ते...

रात्रीची नीरव शांतता. तो आपल्या खोलीत कॉटवर पाय दुमडून गाढ विचारात बसलाय. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. तास सरला की ठोक्‍यांच्या कर्कश आवाजाने त्यांची तंद्री भंगते, ती काही क्षणांसाठीच. पुन्हा तो विचारांच्या दरीत लोटला जातो. आपोआप. भावना व्यक्त केल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसत असलं तरी ती "हो' म्हणेल की "...' हा प्रश्‍न त्याला छळतोय. ""मुलीसुद्धा ना... एक "हो' किंवा "नाही' म्हणायला किती वेळ घेतात. दुसऱ्याची परीक्षा घेण्यात यांना फारच आवडतं. आमचा येथे जीव जातो. हे त्यांना कसं कळत नाही!'' तो स्वतःशीच बडबडत होता. उद्या कॉलेजात गेल्यावर तिला थेट विचारावं, असा मनात तो पक्का निर्धार करतो.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला येतच नाही. तो दिवसभर कॉलेजच्या पार्किंगमध्ये तिची वाट पाहत घुटमळत असतो. पण पदरी निराशाच पडते. शेवटचा तासही सरतो. आता त्याच्या धीराचा बांध फुटतो. तो तिच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतो. फोन फिरवतो तर "नॉट रिचेबल.' आता काय करावे! तो हतबल होतो; पण नाउमेद होत नाही. शेवटी पडल्या चेहऱ्याने बिछान्यात गुडूप होतो. ती का आली नसेल, तिला राग तर आला नसेल ना, असे अनेकानेक प्रश्‍न मनात रुंजी घालत असतात. तिसरा दिवस उगवतो. तो पुन्हा पार्किंगमध्ये तिची वाट पाहत उभा असतो. ती येते. गाडीला पार्क करून थेट त्याच्या दिशेने सरसावते. दोघेही न बोलताच जणू पूर्वनिर्धारित प्लॅनप्रमाणे कॅंटीनला जातात. कॉलेजचा पहिलाच तास असल्याने कॅंटीनमध्ये कमालीचा शुकशुकाट असतो. दोघेही गप्प असतात. केवळ त्यांच्या हृदयाची स्पंदने नकळत संवाद साधत असतात.

ती बोलती होते. म्हणते, ""मी तुझ्या भावनांचा आदर करते. तू स्वतःला निर्भीडपणे व्यक्त केलंस, याचा हेवाही वाटतो. या वयात अशा भावना मनात येणं स्वाभाविक आहेत. त्या व्यक्त करण्यातच त्याचं फलित असतं. काही मुलं घुम्या स्वभावाची असतात. मुलगी कितीही आवडली तरी व्यक्तच होत नाहीत. मुलगी बिचारी वाट बघत बसते. शेवटी त्याच्या मनात माझ्याबाबत काही नसेल, या निष्कर्षापर्यंत येऊन पोचते. अशात एखाद्या दुसऱ्या मुलानं "प्रपोज' केलं तर त्याचा भावनांचा आदर करीत केवळ त्याच्यासाठी "हो' म्हणते. मुलीला कधी कुणाच्या भावना दुखवता येत नाहीत. एखाद्या मुलाने "प्रपोज' केल्यावर एखादी मुलगी नकार देत असेल, तर त्यामागे काही छुप्या बाबी असतात. परिस्थिती त्यांना "नाही' म्हणण्यास भाग पाडते. तू मला "प्रपोज' केलंस याचा मला सार्थ अभिमान आहे.''

ती थोडी थांबून म्हणाली, ""दोघे प्रेमात पडले, गावभर गोंधळ घातला आणि शेवटी "ब्रेकअप' झाला असं सध्या प्रेमाचं स्वरूप आहे. मला तसं करायचं असतं, तर याआधीही अनेक मुलांनी मला "प्रपोज' केलं होतं. मी त्यांनाही "हो' म्हणू शकले असते. माझा तात्पुरत्या प्रेमप्रकरणावर विश्‍वास नाही. वय उथळ असलं तरी माझ्या भावना उथळ नाहीत. "ऍलुम्नी मीट'मध्ये वर्गमित्रांनी माझ्या प्रेमाबद्दल दबक्‍या आवाजात बोलावं, हे मी कधीही सहन करू शकणार नाही. मला त्यांच्यापुढे अभिमानानं मिरवायचं आहे. केवळ आजच नाही, तर शेवटच्या श्‍वासापर्यंत.''

ती बोलत होती, ""येत्या तीन-चार वर्षांत माझ्या लग्नाची बोलणी सुरू होतील. तुझं आणि माझं वय सारखंच असल्यानं या अल्पावधीत स्वतःला सिद्ध करणं तेवढं सोपं नाही. तरीही आपण मिळून काही प्रयत्न करू. त्यासाठी माझी सर्वतोपरी साथ तुला मिळेल. मी शब्द देते. तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझं वचन राहिलं. मी कुठेही कमी पडणार नाही. पण त्यासाठी हवाय तुझा जन्मभरासाठी मला साथ देण्याचा निर्धार. तो असेल तर तू माझा स्वीकार कर; अन्यथा मला फसविल्याचं पाप तुझ्या माथी लागेल. तू विचार करून उत्तर दे. मला काही घाई नाही. तू म्हणशील तोपर्यंत वाट बघण्याची तयारी आहे माझी. मला हवंय ते केवळ तुझं आश्‍वासक उत्तर. नीट विचार कर. माझ्यासाठी.''

त्याला तिचं बोलणं काही केल्या कळत नव्हतं. आता बॉल त्याच्या कोर्टात होता. ""मी उद्या सांगतो,'' असं म्हणून तो विषय संपवतो.
(
क्रमशः)

No comments: