त्यानं तिचं प्रेम म्हणजेच आयुष्यभर साथ निभावण्याचा प्रस्ताव स्वीकारला. प्रेमाची मुळाक्षरं गिरवताना थोडी मनांची ओढाताण झाली खरी; पण मनाजोगं उत्तर मिळाल्याने ती भलतीच खूष होती. हळवी संवेदनशीलता जपताना निखळ प्रेमाच्या बंधामुळे तिचा जीवनाचा प्रवास सुखकर झाला होता.
"त्याने निर्णय घेतला. अगदी ठाम. तोही माझ्यासाठी. माझ्या हळव्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी. माझ्या सरळसोट बोलण्यानं तो कदाचित दुखावला असेल. थोडा चिडलाही असेल; पण माझी बाजू स्पष्ट मांडण्याविना पर्याय नव्हता. मला हातचं राखून वागण्याची सवय नाही. जे आहे, ते मी स्पष्ट करते. माझा स्वभावच आहेच तसा. त्याच्या निखळ, निःस्वार्थी, निर्मळ मनाचा वारंवार प्रत्यय येत होता. अनपेक्षित परिस्थितीचा सामना करताना तो थोडा डगमगेल, असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही. त्याने स्वतःला केवळ व्यक्तच केलं नाही, तर एक जबाबदारी स्वीकारली. अगदी मनमोकळेपणाने. मला असाच मुलगा हवा होता. विचार करून निर्णय घेणारा. दृढनिश्चयी. तसंही, if and is noble, then why to worry about means.. शेवट दोघांच्या मनासारखा झाला, यातच मोठं समाधान आहे...'' ती स्वतःशीच बोलत होती. तिच्या स्वतंत्र खोलीत कुणीच नसलं, की ती अशीच विचारांमध्ये गुरफटून जायची. तिचं तिलाच भान राहत नसे.
ती पुन्हा शून्यात बघू लागली, "आम्ही आमच्या नात्याची कुठंही वाच्यता न करण्याचा निर्णय घेतला. त्यामागे नातं लपविण्याचा उद्देश नव्हता, तर मित्र-मैत्रिणींना आमच्या नात्याबाबत चिडविण्याची आयती संधी द्यायची नव्हती. अन्यथा त्यांनी चिडवून चिडवून हैराण केलं असतं. आमच्या ग्रुपला चेष्टा-मस्करीसाठी एखादा विषय मिळाला, की ते त्याचा चोथा केल्याशिवाय थांबत नाहीत. एखाद्याचं सूत जमलं म्हटलं, तर त्यांच्या उत्साहाला उधाण येतं. त्यांच्या चिडविण्याने दोघांनाही वाटावं, की आपण काही तरी गुन्हाच केलाय. अख्ख्या कॉलेजमध्ये तोच-तो विषय चर्चिला जायचा. आधी आम्हीही त्यांच्याच सारखे होतो. कॉलेज कपल्सला चिडविणाऱ्या अशा टारगट ग्रुपचा एक अविभाज्य भाग होतो. त्यामुळे मित्र-मैत्रिणींच्या स्वभावाची पुरेपूर जाणीव असल्याने आधीच सावध पवित्रा घेतला. अगदी दोघांनी मिळून.''
कॉलेजात असताना वर्गात दोघंही दूर दूर बसत असले, तरी त्यांची मनं मात्र एकमेकांमध्ये गुंतलेली असायची. दोघांचेही आत्मे कायम एकमेकांशी संवाद साधायचे. आता तो काय विचार करीत असेल, याची पुरेपूर कल्पना तिला येत असे. यालाच कदाचित "टेलिपथी' म्हणतात. मॅडमने विचारलेल्या प्रश्नावर त्याने चटकन उत्तर दिलं, की तिला त्याचा फार अभिमान वाटायचा. जणू काही मॅडमने तिच्याच पाठीवर कौतुकाची थाप दिली. आता दोघांचं मोबाईल फोनवरचं बोलणं बऱ्यापैकी वाढलं होतं. विषय कुठलाही असला, तरी सहज अर्धा-एक तास चर्चा रंगायची. सकाळी आणि रात्री तर चक्क एक-दीड तास बोलण्यात जायचा. रात्री बोलणं संपल्यावर तो थोडा भावुक होऊन "गुड नाईट' म्हणायचा. त्याचे हे शब्द मनाला उभारी देणारे होते. एकदा का त्याचं "गुड नाईट' ऐकलं, की रात्रभर ते शब्द कानाजवळ रुंजी घालत असत. त्यांचा मोबाईलवरचा संवाद वाढला असताना कॉलेजमधलं बोलणं मात्र कमी झालं होतं. मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात एकमेकांकडे साधा कटाक्षही ते टाकत नसत; पण वर्गात जाता-येता व्हरांड्यात नजरभेट झाली, तरी डोळ्यांतील भावना सहज वाचता यायच्या. कुणाच्या नकळत संदेशांचं आदान-प्रदान व्हायचं.
त्यांनी त्यांचं नातं लपविण्याचा लाख प्रयत्न केला; पण वर्गमित्रांच्या नजरेतून काही सुटत नव्हतं. त्यांच्या मनात आलेली पुसटशी शंकाही त्यांना अस्वस्थ करून सोडी. कोणीही त्यांच्याविषयी बोलून दाखवत नव्हतं; पण हळूहळू सर्वांच्याच लक्षात येतंय, याची जाणीव होत होती. कधी कोणी विषय काढण्याचा प्रयत्न केला, की दोघंही त्यांचं बोलणं उडवून लावायचे. तिने तर प्रपोज करण्याआधी मैत्रिणीच्या मदतीने त्याची सर्व माहिती काढली होती. त्यामुळे तिच्या मैत्रिणींना दाट शंका होती. मुलींचा स्वभाव मुळात शंकेखोर असतो. त्यावर काही औषध नाही. आता त्याची बाईकही तिला आपलीशी वाटू लागली होती. गाडी पार्क करताना ती मुद्दाम त्याच्या बाईकशेजारी गाडी लावायची. त्यामुळे त्याच्यासोबत बोलण्याची, त्याला डोळे भरून बघण्याची संधी तिला मिळत होती. तो पार्किंगमध्ये नसताना ती त्याच्या बाईकच्या सीटवरून हळुवारपणे हात फिरवायची. या वेळी ती थोडी हळवी व्हायची. भावना दाटून यायच्या. डोळे आसवांनी डबडबायचे.
एकदा रात्री त्यांचा सुसंवाद सुरू असताना तो म्हणाला, ""तू तयार केलेला एखाद्या पदार्थ मला खायचाय. तुला गाजराचा हलवा करता येतो? माझी आई फारच चविष्ट हलवा करते. मला फार आवडतो. तू गाजराचा हलवा कशी करतेस ते मला बघायचं आहे.'' तिने त्याचा हट्ट साफ फेटाळून लावला. किचनमध्ये पायही न ठेवणारी ती चक्क त्याच्यासाठी गाजराचा हलवा करून आणेल, हे अशक्यच होतं. शिवाय त्याची आई चांगली सुगरण असल्याने तो कायम आईची स्तुती करायचा. एखाद्या पदार्थाचं नाव काढलं, की माझी आई हा पदार्थ फारच अप्रतिम करते, असं त्याचं ठरलेलं वाक्य. तेव्हा थोडीही रिस्क घ्यायची कशाला! कारण गाजराचा हलवा करणं हे वरकरणी सोपं वाटतं असलं, तरी त्याला उत्तम कौशल्य लागलं; पण तो काही माघार घ्यायला तयार नव्हता. शेवटी आढेवेढे न घेता तिने "हो' म्हटलं. हो म्हणणं जेवढं सोपं होतं, तेवढंच हलवा करणं कठीण. "साम मराठी' वाहिनीवर "सुगरण' या कार्यक्रमात दाखविलेल्या गाजराच्या हलव्याची रेसिपी तिने लिहून घेतली. बाबा ऑफिसला आणि आई भिशीला गेली असताना रेसिपीत दिल्याप्रमाणे हलवा बनवला. घाईघाईत हलव्याचा डबा भरून तिच्या गाडीच्या डिकीत ठेवला. कॉलेजात हळूच त्याच्या हातात गाडीची किल्ली सरकवली. पार्किंगमध्ये कोणी नसताना त्याने डिकी उघडली. डबा ताब्यात घेतला. थोड्याच वेळात तिला त्याचा कॉल आला. तो म्हणाला, ""हलवा छान झालाय. तू खाल्ला नसेलच. मी तुझ्यासाठी थोडा डब्यात ठेवलाय.''
""अरे, पण मी हलवा खाल्ला नाही. हे याला कसं काय कळालं,'' ती स्वतःशीच बोलली. त्वरित पार्किंगमध्ये जाऊन गाडीतला हलव्याचा डबा उघडला. त्यातला एक चमचा जिभेवर ठेवला, तर तो चक्क तुरट होता. गोड नव्हताच!!! अगं बाई मी साखर घालायलाच विसरले !
क्रमश :
No comments:
Post a Comment