तांबड्या, पिवळ्या रंगाचा शालू अंगावर ल्यालेल्या ढगांवर मान ठेवून मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे मनोहारी दृष्य बघून दोघेही पुरते स्तंभित झाले होते. एकमेकांच्या साक्षीने सूर्यास्त बघण्याचा विलक्षण अनुभव ते मनाच्या तिजोरीत मौल्यवान दागिन्याप्रमाणे साठवून घेत होते. थोड्याच वेळात तिचा मोबाईल गुणगुणू लागला. ती पुरती घाबरली. कपाळावर घामाचे दवबिंदू फुटले. क्षणात ते ओघळू लागले. आता लगोलग घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
बोलता बोलता कॉलेजमधल्या एक ना अनेक सोनेरी क्षणांना उजाळा मिळाला. मोबाईलवर दोघांची तासन्तास चर्चा चालायची, तरीही एकमेकांशी प्रत्यक्ष बोलण्याचा अनुभव काहीसा वेगळाच होता. दोघांनाही गप्पांसाठी विषय सुचत होते आणि निरंतर रंगत जात होते. गार वातावरणात जणू गप्पांचा उबदार फडच जमला होता. पाणी ओंजळीतून चटकन सांडावं, तसा वेळ निघून गेला. दोघांनाही कळालं नाही. पोटात ओरडणारे कावळे शांत झाले नसले, तरी मनातील पाखरांना कधीच आयुष्याचा जोडीदार मिळाला होता. बोलताना तिला जाणवले, की त्याच्यावर स्वामी विवेकानंदांचा विचारांचा जबरदस्त पगडा आहे. त्याला कन्याकुमारी येथील स्वामींच्या रॉक मेमोरियला भेट द्यायची होती. तिला काश्मीरचे विलक्षण आकर्षण होते. गेल्याच वर्षी मम्मी-पप्पांसह तिने हिमाचल दौरा केला होता. तरीही काश्मीरचा भुसभुशीत बर्फ आणि हिमाच्छादित शिखरे तिला भुरळ घालीत होती.
थोड्यावेळात दोघांच्याही पोटात भुकेचा मोठा खड्डा पडला. त्यांनी जवळच्याच एका झोपडीवजा हॉटेलकडे मोर्चा वळविला. पिठलं-भाकरीवर ताव मारीत कांदाभजीचाही आस्वाद घेतला. हॉटेल चालकाच्या अतिआग्रहास्तव दह्याचे गाडगेही रिते केले. पोटाची पोकळी भरल्याने जिवाला थोडी उभारी मिळाली. तितक्यात मावळ्याचा वेश धारण केलेला एक व्यक्ती हॉटेलजवळ आला. त्याने नरवीर ताजानी मालुसरे यांच्या जीवनावर आणि सिंहगडच्या इतिहासावर पोवाड्यांमधून झगमगीत प्रकाश टाकला. तानाजींच्या पराक्रमाला त्यांनी मनोमन वंदन केले. त्यानंतर नरवीर ताजानी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ऐतिहासिक कल्याण दरवाजा बघितला. जुन्या बांधणीचा हा त्या वेळचा गडाचा मुख्य दरवाजा इतिहासप्रेमींना कायम भुरळ घालत आला आहे. कल्याण दरवाजा बघितल्याशिवाय सिंहगडाची भेट पूर्ण होत नाही, जे म्हणतात ते येथे पटते. कित्येक वर्षे होऊनही या जुन्या बांधकामाला अजूनही साधा एक तडा गेलेला नाही. अवजड दगडांना आयताकृती आकार देऊन एकमेकांवर रचून या भक्कम दरवाज्याची निर्मिती करण्यात आली आहे. या तुलनेत फ्लॅटच्या भिंतींना चार-दोन वर्षांतच क्रॅक पडतात, ओल येते. त्यामुळेच जुनं ते सोनं का म्हणतात, ते इथे पटतं. त्यानंतर दोघे विंड पॉईंटकडे वळले. येथे कायम हवेचा जोर असतो. पोहचल्याबरोबर तो जाणवतो. या कडेवर फोटो काढल्याशिवाय समाधान मिळत नाही. मोबाईल फोनच्या मदतीने त्यांनी काही क्षण कॅमेराबद्ध केले. त्यावेळी संध्याकाळचे बरोबर ६ वाजले होते. सूर्य मावळतीला जात होता. पिवळी, तांबडी छटा लाभलेल्या ढगांमध्ये लालचुटूक सूर्य फारच मनमोहक दिसत होता. रणरणत्या उन्हात आपला दिनक्रम पूर्ण करून दमलेल्या सूर्याला कवेत घेण्यासाठी जमलेल्या डोंगरांनी धुक्याची दुलई पांघरली होती. शाळेतून परतणाऱ्या आपल्या जिवाच्या तुकड्याला कवेत घेण्यासाठी आसुसलेल्या आईप्रमाणे त्या डोंगरांची अवस्था झाली होती.
दोघांची मने सूर्यास्ताच्या हिंदोळ्यावर झुलत असताना तिचा देखणा मोबाईल गुणगुणू लागला. तिने पर्सची बटण सैल करीत मोबाईल न बघताच उचलला. पलीकडून आईचा आवाज! तिच्या पायाखालची जमीन सरकली. आई म्हणाली, ""अगं तुझा फोन लागत नव्हता. आहेस कुठे तू?'' आईच्या प्रश्नावर सावरासावर करीत, ""मी थोड्याच वेळात घरी पोहचते'' असे तिने सांगितले. कॉलेज सुटल्यावर मैत्रिणीच्या घरी जाणार असल्याचा बहाणा तिने केला होता. संध्याकाळ झाल्यावरही मुलगी घरी न आल्याने आईचे मन व्याकूळले. त्यामुळे तिने फोन करून आपले समाधान करून घेतले. तरीही आईचा फोन आल्याने ती पुरती घाबरली होती. आताच घरी निघूया असा रेटा तिने लावला. सूर्यास्तानंतर गडावर अंधार दाटू लागला होता. दोघेही तडक घरी जाण्यासाठी निघाले. गडावरून खाली उतरताना तुरळक वाहनेच आजू-बाजूने जात होती. गडावर बऱ्यापैकी उजेड असला, तरी रस्त्यावर गडद अंधार पडला होता. आईचा फोन आल्याने ती आधीच घाबरली असताना अंधाराची तिला आणखी भीती वाटू लागली. शिवाय वाटेत कुणी आडवे तर येणार नाही ना, या शंकेचे मनात काहूर माजले. एवढ्या काळ्याकुट्ट अंधारात, ती याआधी कधीच घराबाहेर पडली नव्हती. ती अंधाराला भीत नसली, तरी बाईकच्या हेटलाईटच्या प्रकाशात दिसणारी वेडीवाकडी झाडे जिवाचा ठाव घेत होती. गड उतरताना थोडी सोबत असण्यासाठी आपण इतर कपल्सच्या सोबत जाऊयात, असा विचार तिने बोलून दाखविला. त्यालाही तो पटला. थोड्याच वेळात त्यांच्या बाजूने जाणाऱ्या एका कपल्सच्या बाईकशी साथ करीत ते सिंहगड पायथ्याशी येऊन पोहचले. खडकवासल्याचा बेत कधीच रद्द केला होता. शुकशुकाट असणाऱ्या रस्त्यावरून त्यांची बाईक गर्दीच्या कोलाहलात संचारली. तिची बाईक असलेल्या हॉटेलसमोर त्याने तिला सोडून दिले. ती घाईघाईतच घरी पोहचली.
दिवसभर घराबाहेर असल्याने तिला थकवा जाणवत होता. जेवण आटपून ती थेट बिछ्यान्यावर पहुडली. शिणलेल्या देहाला विश्रांती मिळाली. उद्या बोलू, असा एसएमएस त्याला टाकून दिवसभरातील घडामोडींचा तिने धावता आढावा घेतला. ती कधी झोपेच्या आहारी गेली ते तिलाच कळले नाही. फक्त टेबल लॅम्प आणि हृदयाची स्पंदनं जागी होती.
क्रमशः
No comments:
Post a Comment