December 27, 2010

तो आणि ती भाग..१५ --स्थळांची लागली रांग; 'त्याचा' संताप संताप...

गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागल्यावर तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. अगदी सातासमुद्रापार राहणाऱ्या भारतीयांनीही प्रपोजल्स पाठविली; पण ती लग्नासाठी तयार झाली नाही. तिचं त्याच्यावर जिवापाड प्रेम होतं. मात्र, यातून जन्माला आलं एक षड्‌यंत्र. लग्न टाळण्यासाठीचं...

तिला आकर्षक पगाराची नोकरी लागल्यावर स्थळांची अक्षरशः रांग लागली. अगदी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामधून "एनआरआय' लोकांची स्थळं चालून येऊ लागली. तशीही घरामागे राहणाऱ्या जोशीकाकांनी तिच्या लग्नाची घाई चालविली होती. त्यांच्या वधू-वर सूचक मंडळात कधीच तिच्या नावाची निःशुल्क नोंद करण्यात आली होती. (जोशी सुस्वरूप मुला-मुलींची नोंद निःशुल्क करीत!) ती पदवीला असतानाच ते तिच्या पप्पांना तिच्या लग्नाविषयी कायम विचारत असत.

आता तिला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती. जोशीकाका तर दर दोन दिवसांनी घरी चहाला येऊ लागले. येताना ते चार-दोन मुलांचे पत्ते आणायला विसरत नसत. त्यांनी जणू तिच्या लग्नाचा विडाच उचलला होता. पण तिने आधीच घरी सांगून ठेवले होते, की आणखी एक-दोन वर्षं तरी तिला लग्न करायचं नाही. आताशी कुठे नोकरी लागली. आयुष्य थोडं स्थिरस्थावर झालं आहे. तरीही घरी एखाद्या नातलगाकडून लग्नाची पत्रिका आली किंवा एखाद्याच्या लग्नाचा विषय निघाल्यावर, ""अगं बाळा, तू कधी लग्न करणार आहेस? वय निघून गेल्यावर तुला कुणी पसंत करणार नाही. अगं, मुलीचं वय आणि मन चंचल पाण्यासारखं असतं. म्हणून मुलीचं लग्न कसं पंचविशीच्या आत झालेलं बरं... कळतंय का आम्ही काय म्हणतोय ते...!'' आई तिला निक्षून सांगत असे. लग्नाचा विषय निघाला की तिच्या जिवाचा तिळपापड होई. हातातलं काम अर्धवट सोडून ती तरातरा घराबाहेर निघून जात असे. आता तिच्या घरच्यांनाही शंका यायची लागली. ते बोलताना तसा उल्लेख करू लागले. ""अगं तुझं कुणावर प्रेमबिम असेल, तर तसं सांग ना आम्हाला... आमची काही हरकत नाही! मुलगा फक्त चांगल्या घरचा आणि तुझ्यापेक्षा जास्त कमावणारा हवा, एवढीच आमची रास्त अपेक्षा आहे!''

या रविवारी ते दोघे संभाजी उद्यानात भेटले. आज पहिल्यांदाच ती अबोल होती; अन्यथा दोघे भेटल्यावर तिच्या ऑफिसच्या घडामोडींचा धावता आढावा कधी संपतो, याची त्याला वाट बघावी लागायची. काही तरी अघटित झाल्याची त्याला शंका आली. त्यानं विचारल्यावर ती बोलती झाली, ""अरे, मला नोकरी लागली तेव्हापासून लग्नाची अनेक प्रपोजल्स येत आहेत. मम्मी-पप्पांनी लग्नाचा नुसता धोशा लावलाय. आमच्या घरामागचे जोशीकाका नाहीत का; तुला मी सांगितलं होतं... ते लग्नासाठी हात धुवून मागे लागले आहेत. ऑफिसला गेल्यावर कामाचा ताणतणाव आणि घरी आल्यावर घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं.... माझं अगदी सॅंडविच झालंय. कुठलाच मार्ग सापडत नाहीय...!''

""अगं, म्हणजे तू दुसऱ्याशी लग्न करणार!!! मला परकं करून जाणार... आणि मला दिलेल्या वचनाचं काय? अगदी क्षणात विसरलीस. तब्बल चार-पाच वर्षांपासून आपण एकत्र आहोत. लग्नाच्या आणाभाका घेतल्या, त्या हाच दिवस बघण्यासाठी? तुला जमणार नव्हतं तर वचन दिलंच कशाला...!'' तो जवळजवळ गळा फाडून ओरडलाच.

""स्टुपिड... असा कसा बोलतोस. उगाच गैरसमज करून घेऊ नको. तुझा माझ्यावर विश्‍वास नाही का? अरे हे आलेलं गंडांतर कसं टाळायचं, याचं सोल्यूशन तुला विचारतेय मी... आणि तू मला आधार द्यायचं सोडून माझ्यावरच संशय घेतोय. काही लाज वाटते की नाही, असं बोलायला...'' तिचाही आवाज चढला.

तिचा काही दोष नसल्याचं कळल्यावर तो थोडा वरमला. त्याला आपली चूक त्याच्या लक्षात आली. त्यानं लगेच ""सॉरी गं...माझं आजकाल असंच होतं. एसओआरआरवाय... अगं तुझ्या लग्नाचा विषय निघाल्यावर माझ्या जिवाचा संताप संताप झाला. बरं सांग, तुला काय म्हणायचं होतं ते...'' असं म्हणून तिची समजूत काढली.

ती पुन्हा बोलू लागली, ""अरे, मम्मी-पप्पा चहा-पोह्यांच्या कार्यक्रमांसाठी आग्रह करीत आहेत. मी त्यांना "नाही' म्हणून सांगितलं; पण आता ते माझ्यावरच शंका घ्यायला लागलेत. त्यांना सांगणार तरी काय? तुला नोकरी नाही. त्यांना आपल्या प्रेमप्रकरणाचं कळलं तर ते जबरदस्तीनं लग्न लावून देतील. वेळ कशी मारून घ्यावी, तेच कळत नाहीय.''
तो गप्प होता. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. घामाच्या धारा फुटल्या. खिशातून रुमाल काढून तो चेहऱ्यावरचा घाम पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होता. त्याची अस्वस्थता बघून ती म्हणाली, ""मला तुझी अवस्था कळते रे... पण मी काय करू... आपण असं केलं तर...!'' त्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं. ती बोलत होती, ""मी घरच्यांना चहा-पोह्यांसाठी "हो' म्हणते; पण कोणत्याही मुलाला पसंत करणार नाही. सर्वांमध्ये काही तरी खोट काढीन. म्हणजे मम्मी-पप्पांची नाराजी थोडी तरी दूर करता येईल आणि आपल्यालाही वेळ मिळेल. मला मुलगा पसंत नसताना ते जबरदस्तीनं लग्न करायला भाग पाडणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. तू निश्‍चिंत राहा. पण तुला स्वतःला लवकर सिद्ध करावं लागेल. नाहीतर माझा जीव टांगणीला लागायचा. कायमचा...!''

तो निरुत्तर होऊन नाराजीनंच "हो' म्हणाला. "नाही' म्हणण्याचं बळ त्याच्यात नव्हतं; पण या नव्या मार्गानं मनावर मणामणाचं ओझं आलं. त्याच्या मनानं अजूनही हा पर्याय स्वीकारलेला नव्हता. "दगडापेक्षा वीट मऊ', असं समीकरण धरत त्यानं मनाला समजावलं होतं. तरीही तिच्या घरच्यांनी एखाद्या चांगल्या स्थळाचा आग्रह धरला तर... हा खेळ जीवघेणाही ठरू शकतो. तो अगदी खिंडीत सापडला...


(क्रमशः)

No comments: