December 06, 2010

तो आणि ती भाग..१४ --'कॅम्पस इंटरव्ह्यू'ने सुखी स्वप्नांना तडा

अभ्यास करून पास होता येतं, चांगले मार्क्‍स कमविता येतात; पण घसघशीत पगाराची नोकरी मिळविण्यासाठी व्यक्तिमत्त्वविकास आणि संभाषणकौशल्य अत्यंत आवश्‍यक आहे, हे त्याला पहिल्यांदा कळलं. तो खडबडून जागा झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण समाधानकारक यश मिळालं नाही.

बघता बघता पदवी मिळाली आणि "पीजी'चे सोपस्कारसुद्धा पार पडले. कॉलेजचे दिवस अगदी चटकन सरतात. म्हणतात ना, सुख क्षणिक असतं आणि दुःख सरता सरत नाही. सुख क्षणभंगुर असलं, तरी त्याचा गारवा कायम हवाहवासा वाटतो. म्हणूनच कॉलेजच्या आठवणी मनःपटलावर ताज्या राहतात! "तो' आणि "ती' यांना तर कॉलेजनं एकत्र आणलं. तलावातील स्थिर पाण्यात तरंग उठावेत तशी प्रेमाची ऊर्मी जागविली. एक नवं आश्‍वासक नातं बहाल केलं. मनातील सुखी स्वप्नांच्या नाजूक पाऊलखुणांची हळुवारपणे जपणूक केली. या नात्याच्या संवर्धनासाठी मित्र-मैत्रिणींनी मोलाची मदत केली होती. म्हणून कॉलेज आणि वर्गमित्र-मैत्रिणी त्यांच्यासाठी फार स्पेशल होते. कारण तेच या चिरकाल टिकणाऱ्या नात्याचे, अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होते.

"पीजी'ला असताना पुण्यातल्या एका मल्टिनॅशनल कंपनीचे "कॅम्पस इंटरव्ह्यू' झाले. चांगला "फोर पॉइंट टू'चे आकर्षक पॅकेज ऑफर करण्यात आले होते. याखेरीज पुण्यात नोकरी आणि "नो नाईट शिफ्ट'. इंटरव्ह्यूमध्ये तिचं सिलेक्‍शन झालं; पण तो अपयशी ठरला. त्याला पदवीत आणि "पीजी'ला वर्गात सर्वांत जास्त मार्क्‍स होते. तरीही तो "एचआर'ला इम्प्रेस करू शकला नाही. तसे बघितले, तर तो लहानपणापासून पुस्तकी किडा होता. दर वर्षी वर्गात पहिला क्रमांक पटकावीत नसला, तरी पहिल्या तिघांमध्ये त्याचं नाव असे. पण "एक्‍स्ट्रा करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटी' शून्य. त्यामुळे त्याचा स्वभावही ती भेटण्याआधी बऱ्यापैकी रिझर्व्ह होता. त्याच्याकडे कुठल्याही प्रश्‍नाचं अचूक उत्तर असे; पण ते उत्तर अगदी मोजक्‍या शब्दांत प्रभावीपणे मांडण्याचं कसब नव्हतं. त्यामुळे परीक्षेत चांगले मार्क्‍स पडायचे; पण "जीडी' आणि "पीआय'मध्ये कायमचीच बोंबाबोंब. त्याचं इंग्रजीतलं संभाषणकौशल्य तसं बेताचंच होतं. याचा फटका त्याला इंटरव्ह्यू देताना बसला. कॅम्पसला इतरही कंपन्या येणार असल्यानं नाकारलं गेल्याचं दुःख त्याला प्रारंभी नव्हतं; मात्र हा आघात पुढे फार जीवघेणा ठरला... प्रिन्सेस आणि त्यांच्या ग्रुपमधील कोल्हापूरच्या पप्याचंही इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्‍शन झालं होतं. त्यांच्या ग्रुपमधील तब्बल निम्म्या जणांची नावं सिलेक्‍शन लिस्टमध्ये झळकली होती. त्यात मुलींची संख्या अधिक असल्यानं त्यांना केवळ चेहरा पाहून सिलेक्‍ट करण्यात आलं, असं म्हणत काहींनी आपल्या अपयशाचं खापर मुलींवरच फोडलं होतं. मुलांचंही सिलेक्‍शन केवळ त्यांचं व्यक्तिमत्त्व पाहून केल्याच्या अफवा कॉलेजात होत्या. पण कोल्हापूरचा पप्या ना देखणा होता ना हुशार; मग त्याचं सिलेक्‍शन कसं झालं? हा प्रश्‍न होताच... त्यानं इतर कंपन्यांच्या इंटरव्ह्यूकडे लक्ष केंद्रित केलं. इंग्रजीतील संभाषणाचा सराव केला. तिच्याशी बोलताना तो इंग्रजीचा वापर करू लागला. पण म्हणावं तसं यश पदरात पडलं नाही. इतर कंपन्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा कोरडेच ठरले. त्याची ठार निराशा झाली. आता समोर फक्त अंधार होता.

"पीजी' झाल्यावर ती कंपनीत नोकरीला जाऊ लागली. त्याला मात्र दिवसभर काही काम नसल्यानं त्यानं इंग्रजीचा क्‍लास लावला. तरीही इंग्रजीत समाधानकारक सुधारणा झाली नाही. आता त्यांचं केवळ सकाळी आणि रात्री फोनवर बोलणं व्हायचं. तिला ऑफिसमध्ये "फाइव्ह डे वीक' असल्यानं शनिवारी आणि रविवारी त्याला पुरेसा वेळ देता यायचा. तिच्या बोलण्यात आता कायम ऑफिसचे संदर्भ येऊ लागले. त्यांचं फोनवर बोलणंही ऑफिसच्या धावत्या समालोचनानं सुरू व्हायचं. तो नोकरीवर नसल्यानं त्याला ते फारच बोचरं वाटायचं. अगदी पोतराजप्रमाणे अंगावर चाबूक बरसायचे. पण त्यानं तसं तिला कधी जाणवू दिलं नाही. उलट आपणहून तो तिला ऑफिसमधल्या घडामोडी विचारीत असे. दिवसांमागून दिवस जात होते; तशी त्याची नोकरीसाठी तगमग वाढायला लागली. नोकरीची शक्‍यता धूसर होत असल्याचं जाणवू लागलं. त्यांच्यात लहान-मोठी भांडणंही सुरू झाली. त्याला त्याचा चिडचिडेपणा कारणीभूत असे. तरी भांडण समोपचारानं मिटायचं. पण हाताला काम नसल्यानं ती आयुष्यात असतानाही त्याच्या सुखी जीवनातील रंगच कुणीतरी काढून घेतल्याप्रमाणे ते नीरस वाटत होतं.

भरीस भर म्हणून पाश्‍चिमात्य देशांमधील आर्थिक मंदीचा भारतात शिरकाव झाला. कित्येक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या बातम्यांवर बातम्या धडकू लागल्या. किमान दोन वर्षं मंदीच्या झळा सोसाव्या लागतील, असा अंदाज व्यक्त होऊ लागला. आधीच हातात नोकरी नव्हती, त्यावर नोकरकपातीचा बडगा. त्याला काहीच सुचेनासं झालं. कुठली वाट चोखाळायची, याचं उत्तर मिळत नव्हतं. एकीकडे त्याला नोकरी मिळेनाशी झाली असताना एक दिवस तिचा दुपारीच फोन आला. ""अरे सॉलिड न्यूज आहे. अगदी माईंड ब्लोईंग. तू ऐकशील तर वेडाच होशील. आमच्या कंपनीला मंदीतही एक मोठी असाईनमेंट मिळाली आहे. त्यामुळे माझ्या पॅकेजमध्ये चक्क लाख रुपयांनी भर पडली आहे. याखेरीज दिवाळी बोनस डबल करण्यात आला आहे,'' आनंदाच्या भरात ती श्‍वास रोखून बोलत होती. तिला धाप लागली. आणि दुसरीकडे याचा श्‍वास कोंडला गेला. दोन मिनिटं तो शांत होता. स्वतःला सावरत त्यानं तिचं अभिनंदन केलं. ""बरं यावर आपण रात्री बोलू'', असं म्हणत त्यानं वेळ मारून घेतली. तो स्तंभित झाला. कातडी सोलून काढणाऱ्या अतिउष्ण वादळांचं अफाट वाळवंट त्याच्या डोळ्यांसमोर तरळून आलं. वाळूतील बाष्पाचा कण न्‌ कण शोषून घेण्यासाठी सूर्य आपलं तेज वाढवीत होता. त्याला वाळवंट ओलांडून सुखी स्वप्नांना साकार करण्यासाठी हिरवळ शोधायची होती. आणि पाय लटपटायला लागले होते....कानात एकच गाणं गुंजत होतं...खेळ मांडीला...देवा...खेळ मांडीला...


(क्रमशः)

No comments: