April 05, 2010

तो आणि ती भाग..१० --फर्स्ट आउटिंग ऽ इंडियन सिलिकॉन व्हॅली

मुंबई, बंगळूर, हैदराबाद, ब्रिटन आणि अमेरिका तरुणाईला कायम भुरळ पाडत आली आहे. बहुमजली चकचकीत इमारती, बहुराष्ट्रीय कंपन्या, मॉडर्न लाईफ स्टाईल कॉलेजजीवनापासूनच खुणावत असते. दोघांनाही बंगळूर बघायचे होते. कारण हीच त्यांची फस्ट अँड फॉरमोस्ट आउटिंग होती...

सांस्कृतिक महोत्सवाची धुंदी ओसरल्यावर कॉलेज कट्ट्यांवर गप्पा रंगतात त्या सहलीच्या. कुठे जायचे, कसे जायचे, कोणते स्थळ चांगले, कोणते अगदी नाक मुरडावे असे, अशा सर्व प्रकारच्या चर्चांना अक्षरशः ऊत येतो. यंदा तो आणि ती यांच्या कॉलेजची सहल कम अभ्यासदौरा भारताची आयटी कॅपिटल म्हणजेच बंगळूरला जाणार होती. तीन दिवसांच्या सहलीसाठी निम्मा क्‍लास तयार झाला होता. घरून परवानगी घेतल्यावर दोघांनीही नावे नोंदविली.

सहलीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता सर्व जण कॉलेजच्या प्रांगणात जमले. क्‍लास इन्चार्जसह पाच लेक्‍चरर त्यांच्यासोबत येणार होते. थंडीचे दिवस असल्याने सर्वच जाडजूड स्वेटर, जॅकेट्‌स, मफलर, शाली लपेटून आले होते. तासाभरात भरधाव बसने पुण्याची वेस ओलांडली. गार वारा चेहऱ्यावर घेत ती खिडकीजवळ बसली होती. ती आणि तिची प्रिय मैत्रिणी वॉकमनची गाणी ऐकण्यात दंग होते. दोघींनी एकाच हेडफोनची वायर आपल्या गळ्याभोवती गुंडाळून कानापर्यंत कशीबशी पोचविली होती. एव्हाना इतर मुले गाण्याच्या भेंड्या, डमशेराज, फिश पॉंड खेळण्यात व्यस्त झाले होते. ती मात्र एवढ्या थंडीत आपली उबदार जागा सोडून खेळांच्या मैदानात उतरण्यास काहीशी अनुत्सुक होती. थोड्याच वेळात तिला आणखी गार वाटायला लागले. तिची अडचण लक्षात घेऊन त्याने आपली नाजूक शाल तिला दिली. शालीच्या रूपाने तो तिच्याजवळ होता.

त्याचा भासही सुखकारक वाटत होता. बसच्या बाहेर वेगाने पळणारी झाडे निरखत, गुलाबी भूतकाळात हळूच डोकावत ती निवांत बसली होती. चार-पाच तास कसे निघून गेले कळले नाही. तेवढ्यात त्यांच्या बसला जोरदार धक्का बसला. अगदी भूकंप व्हावा तसा. ड्रायव्हरने त्वरित रस्त्याच्या कडेला बस थांबविली. केबिनबाहेर उडी मारून ड्रायव्हर मागच्या चाकाजवळ गेला, बसला निरखू लागला. आणि अचानक अर्वाच्य शब्दांत कुणाला तरी शिव्या देऊ लागला. रस्त्यावर सर्वत्र अंधार होता. बाहेर काय सुरू आहे, हे सहजासहजी नजरेत येत नव्हते. एक-एक करीत सर्वच भराभरा बसच्या खाली उतरले. बसच्या मागे जाऊन पाहतात तर काय, एका ट्रकने बसला धडक दिलेली. सुदैवाने बसचे किरकोळ नुकसान झाले असले, तरी ट्रकच्या दर्शनी भागावरील काचेच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या. अंधाराचा फायदा उचलत ट्रकचा ड्रायव्हर कधीच फरार झाला होता. ड्रायव्हरने बसची तपासणी केली. शेवटी बस मार्गस्थ झाली. सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. आलेले संकट थोडक्‍यात निभावले. अपघात मोठा नसला तरी बर्थवर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्‍याला टेंगूळ आले होते. तर गाण्यांच्या भेंड्या खेळण्यात व्यस्त असणारे पायदानावर अलगद कोसळले होते. पुन्हा प्रवास सुरू झाल्यावर अपघाताच्या विषयांचे मोहोळ उठले. ते रात्रीच्या जेवणापर्यंत टिकून राहिले. पोटाची खळगी भरल्यानंतर अंगात हुडहुडी भरली. त्यात बसचा निरंतर खडखडाट रुंजी घालत होता. झोपेची आराधना करीत सर्वांनी कशीबशी रात्र काढली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास स्वच्छ, सुंदर, सदाहरित बंगळूरचे मनोहारी दर्शन झाले. हॉटेलच्या बाजूला बस थांबल्यावर सर्वांनी प्रवासाचा दीर्घ सुस्कारा टाकला. लगोलग तयार होऊन इन्फोसिसचे मुख्यालय बघायचे होते. त्यानंतर विप्रोच्या कार्यालयाला भेट देण्याचा बेत होता. "इन्फि'च्या चकचकीत कॅम्पसमध्ये प्रवेश केल्याबरोबर कंपनीच्या सामर्थ्याची ओळख पटली. दिमाखात उभ्या असलेल्या बहुमजली इमारतींच्या चोहीकडे गालिचे अंथरावे, तसे हिरवेगार लॉन पसरले होते. गुळगुळीत टाईल्स, काचेच्या उंचच उंच भिंती, मॉडर्न लाईफ स्टाईल, कार्पोरेट व्यवहारांमध्ये तरबेज कर्मचारी आणि "वे ऑफ वर्किंग' बघून सर्वांचेच डोळे दिपले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना कंपनीची जुजबी माहिती दिली. कंपनीच्या कार्यप्रणालीवर झगमगीत प्रकाश टाकणारे "स्लाइड शो' दाखविले. लागलीच त्यांनी विप्रोच्या कार्यालयाकडे प्रस्थान केले. विप्रोचे संकुलसुद्धा "इन्फि'च्या तोडीचे होते. त्यानंतर हिरव्या आणि पिवळ्या रंगात अंग चोरून बसलेला प्रसिद्ध बंगळूर पॅलेस बघितला. चेहऱ्यावर नैसर्गिक हास्य लेवत पॅलेससमोर मुलांचे टिपिकल ग्रुप फोटोसेशन सुरू असताना त्याने तिच्या हातात एक रुमाल दिला. त्यावर काटकोनात तिचे नाव लिहिले होते. तो म्हणाला, ""रुमाल उलटा करून बघ!'' रुमालामागे तिच्या नावातून त्याच्या नावाची सावली उमटत होती. अगदी तिच्या हृदयात उमटावी तशीच.

(क्रमशः)

No comments: