March 30, 2010

तो आणि ती भाग..९ --सांस्कृतिक महोत्सवात चित्तवेधक एकांकिका

अभिनय हा त्यांचा प्रांत नसतानाही उपजत हुशारी, दुर्दम्य आत्मविश्‍वास, सळसळता उत्साह, अपार कष्ट उपसण्याची तयारी ठेवून रसिकराजाचे निखळ मनोरंजन केले. तिनेही आळशी मनोवृत्तीला भीक न घालता त्याच्या प्रयत्नांचे चीज करून दाखविले. आपल्या उणिवांकडे काणाडोळा न करता मानवी क्षमतांचा कस लागेल, असा सराव केला. विजयश्री खेचून आणली.

यंदा कॉलेजात होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. स्पोर्टस, फिस्ट, विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आदी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली होती. तरुणाईचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत होता. तो आणि ती यांच्या वर्गातील प्रत्येकानेच कोणत्या-ना-कोणत्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यांचा चार-सहा जणांचा ग्रुपही याला अपवाद नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रमांत 'तें'ची म्हणजेच आपल्या आवडत्या विजय तेंडुलकरांची एकांकिका सादर करण्याचा त्यांनी बेत आखला होता. अभिनयाचा गंधही नसल्याने एकांकिकेत एखादे पात्र साकारण्यास तिचा विरोध अपेक्षित होता. त्यामुळे तिच्या नकळतच तिचे नाव या एकांकिकेसाठी त्याने दिले होते. यावर ती नाराज नसली तरी बघू या काय होतंय ते, असाच तिचा पवित्रा होता. अर्थात, त्याने तिला एकटीलाच या महासंकटात लोटले नव्हते, तर तोही यात भाग घेणार होता. त्याची मुख्य भूमिका होती. त्यानेच एकांकिका सादर करण्याचा प्लॅन तयार करून ग्रुपच्या इतरांचे मनोधैर्य वाढविले होते. सर्वांचा होकार मिळविण्यापासून एकांकिकेच्या विषयाची निवड करण्यापर्यंतची जबाबदारी लीलया पेलली होती.

त्याचा कोथरूडला मोठा बंगला होता. तो सर्वांनाच मध्यवर्ती ठिकाणी पडत होता. बंगल्यात एकांकिकेच्या रिहर्सल करण्याबाबत त्याच्या आई-वडिलांचीही काही हरकत नव्हती. उलट त्यांनी एक संबंध खोली त्यांना देऊ केली होती. कॉलेजात रिहर्सल करायची म्हटली, तर दररोज स्वतंत्र खोली मिळण्याची शक्‍यता कमीच. शिवाय फुशारकी मारणाऱ्या बघ्यांना आवरण्यातच सर्व वेळ खर्ची होतो. या अतिउत्साही फुकट्या प्रेक्षकांमुळे सादरीकरणाची लिंकही लागत नाही. म्हणून कॉलेज सुटल्यावर दररोज दोन-एक तास त्याच्या बंगल्यात रिहर्सल करण्याचे त्यांनी ठरविले. बंगल्यात पहिल्या मजल्यावर एक आयताकृती बंद खोली होती. त्यात अनावश्‍यक फर्निचर ठेवले होते. त्या खोलीचा वापर होत नसल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. त्यांच्या ग्रुपने एक दिवस मोकळा काढून आधी त्या खोलीची साफसफाई केली. बसायला काही मोजक्‍या खुर्च्या ठेवून बाकीचे फर्निचर स्टोअर रूममध्ये जमा केले.

एकांकिकेला दोन आठवडे शिल्लक असताना रिहर्सलचा श्रीगणेशा झाला. प्रत्येकाने आपले संवाद पाठ करून आणायचे आणि त्याला अनुसरून अभिनय करायचा, अशी रिहर्सलची प्राथमिक अवस्था होती. अभिनयाचा कुणालाच फारसा अनुभव नव्हता. आरंभी प्रत्येकाचीच चुकामूक व्हायची. कालांतराने सर्वांचीच लय जमायला लागली. ती पाठांतरात थोडी कच्ची होती. मध्येच संवाद विसरायची, तर कधी संवाद आणि अभिनयाचा काहीच ताळमेळ नसे. तसा तिचा अभिनयही बेताचाच होता. कितीही प्रयत्न केले तरी चेहऱ्यावरचे हावभाव तिला जमत नसत. शेवटी तिची अडचण लक्षात घेऊन त्याने तिला सर्वतोपरी मदत केली. अभिनयाची मूळाक्षरे गिरवण्यापासून तिला सुरवात करावी लागली. कर्तव्यात कसूर न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ती चुकांमधून हळूहळू शिकत गेली.

शेवटी तो दिवस उगवला. आज त्यांची एकांकिका सादर होणार होती. कॉलेजच्या कसलेल्या कलाकारांच्या सहा एकांकिकांशी त्यांची थेट स्पर्धा होती. सकाळपासूनच तिच्या जिवाची घालमेल सुरू झाली. सर्व व्यवस्थित पार पडावे, यासाठी तिने कॉलेजला जाण्याआधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. लगोलग कॉलेज गाठून कार्यक्रमांची रचना समजावून घेतली. एकांकिका सादर करण्याचा त्यांचा तिसरा क्रमांक होता. आधीच्या दोन एकांकिका त्यांनी मिळून बघितल्या. त्या एकापेक्षा एक सरस होत्या. त्यांच्या एकांकिकेची पहिली घंटा वाजताच तिच्या हृदयात धस्स झालं. सादरीकरणाच्या आधी मंचावर झालेल्या ओळखपरेडदरम्यान हजारो प्रेक्षकांना बघून तिच्या अंगावर सरसरून काटा आला. खुल्या मंचावर अभिनय करण्याची पहिलीच वेळ असल्याने, आत्मविश्‍वास डगमगू लागला. परंतु, रसिकराजाला वंदन करून एकदा सुरवात झाल्यावर त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. त्यांच्या प्रत्येक संवादाला आत्मविश्‍वासाची किनार दिसून येत होती. त्यांचा अभिनय एखाद्या कसलेल्या कलाकारापेक्षाही सरस वाटत होता.

सादरीकरण तांत्रिक न होता नैसर्गिक वाटत असल्याने सगळे जग स्तब्ध होऊन केवळ प्रेक्षक आणि ते कलाकार, अशी बायनरी भाषा प्रेक्षागृहात दिसून येत होती. प्रत्येक अदाकारीला टाळ्या ठरलेल्याच होत्या. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा उत्साह त्यांना आणखी प्रोत्साहन देत होता. प्रेक्षकांचे समाधान आणि अविस्मरणीय अदाकारी, अशा ऐतिहासिक क्षणांचे ते साक्षीदार होते. काही प्रेक्षकांनी तर आपल्या मित्रांना मोबाईल करून एकांकिका बघण्यासाठी मुद्दाम बोलावून घेतले. प्रयोग संपल्यावर त्यांनी रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले. मंचावरून खाली उतरल्यावर क्‍लास टीचरची कौतुकाने ओतप्रोत भरलेली नजर बघून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळून आले. त्यांनी मॅडमना वाकून नमस्कार केला. मॅडमनी तोंडभरून कौतुक केले. आता त्यांना वेध लागले होते ते क्रमांकाचे. प्रत्येक क्षण उत्कंठा वाढविणारा होता. एकांकिकेला किमान दुसरा क्रमांक मिळेल, असा त्यांचा विश्‍वास होता. सुदैवाने नशीब फळफळले. पहिला क्रमांक मिळाल्याचे जाहीर होताच त्यांनी प्रचंड जल्लोष केला. शिट्या वाजविल्या. एकमेकांना शुभेच्छा देत मंचाकडे मोर्चा वळविला. बक्षीस घेताना त्याने कुणाच्याही न कळत एका खास लकबीत दोन्ही डोळे मिचकावून तिला यशाचे श्रेय दिले. तिनेही थोडे लाजत, थोडी जिवणी खुलवत सुहास्य वदनाने त्याचा स्वीकार केला.

(क्रमशः)

March 29, 2010

तो आणि ती भाग..८ --कॉलेजच्या प्रिन्सेसने घातला घोळ

कॉलेजच्या प्रिन्सेसने त्यांच्या साध्या-सरळ आयुष्यात मोठी खळबळ निर्माण केली. त्याचं प्रिन्सेससोबत हसून बोलणं, कॉलेजमध्ये फिरणं, हात मिळवणं हिच्या चांगलंच जिव्हारी लागत होतं. तशी तिने उघड नाराजी व्यक्त केली नसली, तरी मनात सात्त्विक संताप खळबळत होता. कालांतराने त्याने उग्र रूप धारण केलं. शेवटी प्रकरण एक तर "ती' नाही तर "मी' येथवर येऊन पोचलं.

कोणत्याही कॉलेजचा सांस्कृतिक महोत्सव म्हणजे अतिउत्साही तरुणाईची मांदियाळीच. कॉलेज सुरू झाल्यानंतर आतुरतेने वाट पाहिली जाते ती याच उत्सवाची. दिवाळीच्या सुट्ट्या सरल्या, की चर्चा रंगते ती सांस्कृतिक महोत्सवात कुणी काय भूमिका वठवायची याची. त्यांच्या कॉलेजच्या सांस्कृतिक महोत्सवात यंदा "फॅशन शो'सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं होतं. प्रत्येक जण मी कसा स्मार्ट दिसतो, हे सांगण्यात व्यग्र दिसत होता. या "फॅशन शो'ला कॉलेजच्या स्मार्ट म्हणवून घेणाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात होणाऱ्या "मिस कॉलेज कॉम्पिटिशन्स'मध्ये प्रथम येणारी मुलगी कॉलेजची प्रिन्सेस म्हणून ओळखली जाते. किमान चार-दोन महिने तरी तिच्याच नावाची चर्चा असते. इतर कॉलेजेसमध्येही तिची ख्याती पसरते. तिला "बघायला' येणाऱ्या थव्यांमध्ये दिवसागणिक वाढ होते. अशा एका कॉलेज प्रिन्सेसने त्यांच्या नात्यात चांगलाच खोडा घातला.

प्रिन्सेसचं त्याच्यासोबत हसून बोलणं, मोबाईलवर वारंवार फोन करणं, कॉलेजमध्ये फिरणं, हात मिळवणं तिच्या चांगलंच जिव्हारी लागायला लागलं होतं. सुरवातीला तिने काही ऑब्जेक्‍शन घेतलं नाही. कारण त्याच्या इतरही मैत्रिणी थोड्याफार मोकळ्या स्वभावाच्या होत्या. त्या त्याच्याशी थोड्या खुलूनच बोलायच्या, वागायच्या; पण या प्रिन्सेसने मात्र कळसच केला. रात्री दहानंतर सगळी महत्त्वाची कामं आटोपती झाल्यावर तो आणि ती मोबाईलवर बोलत असत. ही त्यांची ठरलेली वेळ. यात कधी व्यत्यय आला नाही. कारण दोघांच्याही स्वतंत्र खोल्या होत्या आणि रात्री नऊनंतर साधारणपणे त्यांच्या खोलीत कुणी प्रवेश करीत नसे. पण काल तिने त्याला फोन लावला, तर तो बिझी होता. एवढ्या रात्री सहसा त्याचा फोन बिझी लागत नसे. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. साधारणतः अर्धा तास तरी ती बेडवर शून्यात नजर लावून बसली होती. तरी त्याचा रिप्लाय आला नाही. तिने परत फोन केला. तो बिझीच होता. आता तिच्या मनात शंकांचं काहूर माजलं. संयमाचा बांध फुटला. काय झालं असेल, असा प्रश्‍न तिला छळू लागला. तिने वारंवार पाच-सहा वेळा फोन लावला; पण काहीच रिप्लाय नाही. शेवटी तिला एक एसएमएस मिळाला. तो त्याचाच होता. "मी प्रिन्सेसशी बोलतोय, थोड्याच वेळात फोन करतो,' असं त्यात लिहिलं होतं. ते वाचून तिचा अनावर झालेला राग थेट गगनात जाऊन पोचला.

कालचीच गोष्ट. तो कॅडबरी खात होता. तेव्हा प्रिन्सेस त्याच्याजवळ आली. तीही त्याच्यासोबत होतीच. तिच्याशी साधा "हाय'-"हॅलो'ही प्रिन्सेसने केला नाही. तिला बघून थोडं स्मित करीत ओळख दाखवणं तर दूरच. प्रिन्सेसने हळूहळू त्याच्याशी सलगी करायला सुरवात केली. बोलता बोलता त्याच्या हातातल्या उष्ट्या कॅडबरीचा तुकडा तोडत आपल्या तोंडात कोंबला. हे बघून तिचं टाळकंच फिरलं; पण आवंढा गिळावा तसा तिनं राग गिळून घेतला. वर हसत काही झालं नाही, असा खोटा देखावा करीत राहिली. पण हे मात्र अतिच झालं. रात्री दहानंतर मोबाईवर बोलण्याची त्यांची हक्काची वेळ. या वेळेवर प्रिन्सेसने अतिक्रमण केलं होतं. तिच्या रागाने संतापाच्या सर्व पातळ्या ओलांडल्या. क्षणभरही न थांबता तिने आपला मोबाईल फोन "स्विच ऑफ' केला. रोज तिच्या उशीखाली राहणारा मोबाईल दूर कुठं तरी भिरकावून दिला. एका उशीला छातीशी कवटाळून विचारांच्या जत्रेत ती नकळत सामील झाली. थोड्याच वेळात डोळे डबडबले.

दुसऱ्या एका उशीखाली डोकं ठेवून ती झोपेच्या आहारी गेली. तो रात्रभर तिचा मोबाईल ट्रायच करीत राहिला. दुसऱ्या दिवशी कॉलेजला आल्यावर, ""तू मोबाईल का स्विच ऑफ केला होतास?'' असा प्रश्‍न विचारताच तिने त्याच्यावर घणाघाती आरोपांचा भडिमार केला. त्याने प्रिन्सेसशी केलेली जवळीक आता सहन केली जाणार नाही, असं स्पष्ट बोलून दाखविलं. प्रिन्सेसला अभ्यासाशी संबंधित काही काम असल्याने तिनं मला फोन केला होता, असं सत्य सांगूनही तिचं काही समाधान होत नव्हतं. शब्दाने शब्द वाढत गेला. "तू फारच "पझेसिव्ह' होत आहेस,' असं त्यानं तिच्या लक्षात आणून दिलं. त्यावर ""होय, मी पझेसिव्ह आहे तुझ्याबाबत. तुला माझा त्रास होत असेल, तर तू नातं तोडायला मोकळा आहेत. तुला जर नातं कायम राहावं असं वाटत असेल, तर एक तर तिच्याशी असलेली मैत्री तोड किंवा मला स्पष्ट सांग,'' असं तिनं ठणकावलं. तिचं रौद्र रूप पाहून तो पुरता स्तंभित झाला. हिला एवढा कसा काय राग आला, हेच त्याला कळत नव्हतं. शेवटी त्यानं तिची समजूत काढली आणि यानंतर "मी तिला कधीच एंटरटेन करणार नाही,' असं वचन दिलं. तिचीही रुसलेली खळी खुलली. चेहऱ्यावर समाधान पसरलं.

(क्रमशः)

March 26, 2010

तो आणि ती भाग.७ --सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन

तांबड्या, पिवळ्या रंगाचा शालू अंगावर ल्यालेल्या ढगांवर मान ठेवून मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे मनोहारी दृष्य बघून दोघेही पुरते स्तंभित झाले होते. एकमेकांच्या साक्षीने सूर्यास्त बघण्याचा विलक्षण अनुभव ते मनाच्या तिजोरीत मौल्यवान दागिन्याप्रमाणे साठवून घेत होते. थोड्याच वेळात तिचा मोबाईल गुणगुणू लागला. ती पुरती घाबरली. कपाळावर घामाचे दवबिंदू फुटले. क्षणात ते ओघळू लागले. आता लगोलग घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

बोलता बोलता कॉलेजमधल्या एक ना अनेक सोनेरी क्षणांना उजाळा मिळाला. मोबाईलवर दोघांची तासन्‌तास चर्चा चालायची, तरीही एकमेकांशी प्रत्यक्ष बोलण्याचा अनुभव काहीसा वेगळाच होता. दोघांनाही गप्पांसाठी विषय सुचत होते आणि निरंतर रंगत जात होते. गार वातावरणात जणू गप्पांचा उबदार फडच जमला होता. पाणी ओंजळीतून चटकन सांडावं, तसा वेळ निघून गेला. दोघांनाही कळालं नाही. पोटात ओरडणारे कावळे शांत झाले नसले, तरी मनातील पाखरांना कधीच आयुष्याचा जोडीदार मिळाला होता. बोलताना तिला जाणवले, की त्याच्यावर स्वामी विवेकानंदांचा विचारांचा जबरदस्त पगडा आहे. त्याला कन्याकुमारी येथील स्वामींच्या रॉक मेमोरियला भेट द्यायची होती. तिला काश्‍मीरचे विलक्षण आकर्षण होते. गेल्याच वर्षी मम्मी-पप्पांसह तिने हिमाचल दौरा केला होता. तरीही काश्‍मीरचा भुसभुशीत बर्फ आणि हिमाच्छादित शिखरे तिला भुरळ घालीत होती.

थोड्यावेळात दोघांच्याही पोटात भुकेचा मोठा खड्डा पडला. त्यांनी जवळच्याच एका झोपडीवजा हॉटेलकडे मोर्चा वळविला. पिठलं-भाकरीवर ताव मारीत कांदाभजीचाही आस्वाद घेतला. हॉटेल चालकाच्या अतिआग्रहास्तव दह्याचे गाडगेही रिते केले. पोटाची पोकळी भरल्याने जिवाला थोडी उभारी मिळाली. तितक्‍यात मावळ्याचा वेश धारण केलेला एक व्यक्ती हॉटेलजवळ आला. त्याने नरवीर ताजानी मालुसरे यांच्या जीवनावर आणि सिंहगडच्या इतिहासावर पोवाड्यांमधून झगमगीत प्रकाश टाकला. तानाजींच्या पराक्रमाला त्यांनी मनोमन वंदन केले. त्यानंतर नरवीर ताजानी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ऐतिहासिक कल्याण दरवाजा बघितला. जुन्या बांधणीचा हा त्या वेळचा गडाचा मुख्य दरवाजा इतिहासप्रेमींना कायम भुरळ घालत आला आहे. कल्याण दरवाजा बघितल्याशिवाय सिंहगडाची भेट पूर्ण होत नाही, जे म्हणतात ते येथे पटते. कित्येक वर्षे होऊनही या जुन्या बांधकामाला अजूनही साधा एक तडा गेलेला नाही. अवजड दगडांना आयताकृती आकार देऊन एकमेकांवर रचून या भक्कम दरवाज्याची निर्मिती करण्यात आली आहे. या तुलनेत फ्लॅटच्या भिंतींना चार-दोन वर्षांतच क्रॅक पडतात, ओल येते. त्यामुळेच जुनं ते सोनं का म्हणतात, ते इथे पटतं. त्यानंतर दोघे विंड पॉईंटकडे वळले. येथे कायम हवेचा जोर असतो. पोहचल्याबरोबर तो जाणवतो. या कडेवर फोटो काढल्याशिवाय समाधान मिळत नाही. मोबाईल फोनच्या मदतीने त्यांनी काही क्षण कॅमेराबद्ध केले. त्यावेळी संध्याकाळचे बरोबर ६ वाजले होते. सूर्य मावळतीला जात होता. पिवळी, तांबडी छटा लाभलेल्या ढगांमध्ये लालचुटूक सूर्य फारच मनमोहक दिसत होता. रणरणत्या उन्हात आपला दिनक्रम पूर्ण करून दमलेल्या सूर्याला कवेत घेण्यासाठी जमलेल्या डोंगरांनी धुक्‍याची दुलई पांघरली होती. शाळेतून परतणाऱ्या आपल्या जिवाच्या तुकड्याला कवेत घेण्यासाठी आसुसलेल्या आईप्रमाणे त्या डोंगरांची अवस्था झाली होती.

दोघांची मने सूर्यास्ताच्या हिंदोळ्यावर झुलत असताना तिचा देखणा मोबाईल गुणगुणू लागला. तिने पर्सची बटण सैल करीत मोबाईल न बघताच उचलला. पलीकडून आईचा आवाज! तिच्या पायाखालची जमीन सरकली. आई म्हणाली, ""अगं तुझा फोन लागत नव्हता. आहेस कुठे तू?'' आईच्या प्रश्‍नावर सावरासावर करीत, ""मी थोड्याच वेळात घरी पोहचते'' असे तिने सांगितले. कॉलेज सुटल्यावर मैत्रिणीच्या घरी जाणार असल्याचा बहाणा तिने केला होता. संध्याकाळ झाल्यावरही मुलगी घरी न आल्याने आईचे मन व्याकूळले. त्यामुळे तिने फोन करून आपले समाधान करून घेतले. तरीही आईचा फोन आल्याने ती पुरती घाबरली होती. आताच घरी निघूया असा रेटा तिने लावला. सूर्यास्तानंतर गडावर अंधार दाटू लागला होता. दोघेही तडक घरी जाण्यासाठी निघाले. गडावरून खाली उतरताना तुरळक वाहनेच आजू-बाजूने जात होती. गडावर बऱ्यापैकी उजेड असला, तरी रस्त्यावर गडद अंधार पडला होता. आईचा फोन आल्याने ती आधीच घाबरली असताना अंधाराची तिला आणखी भीती वाटू लागली. शिवाय वाटेत कुणी आडवे तर येणार नाही ना, या शंकेचे मनात काहूर माजले. एवढ्या काळ्याकुट्ट अंधारात, ती याआधी कधीच घराबाहेर पडली नव्हती. ती अंधाराला भीत नसली, तरी बाईकच्या हेटलाईटच्या प्रकाशात दिसणारी वेडीवाकडी झाडे जिवाचा ठाव घेत होती. गड उतरताना थोडी सोबत असण्यासाठी आपण इतर कपल्सच्या सोबत जाऊयात, असा विचार तिने बोलून दाखविला. त्यालाही तो पटला. थोड्याच वेळात त्यांच्या बाजूने जाणाऱ्या एका कपल्सच्या बाईकशी साथ करीत ते सिंहगड पायथ्याशी येऊन पोहचले. खडकवासल्याचा बेत कधीच रद्द केला होता. शुकशुकाट असणाऱ्या रस्त्यावरून त्यांची बाईक गर्दीच्या कोलाहलात संचारली. तिची बाईक असलेल्या हॉटेलसमोर त्याने तिला सोडून दिले. ती घाईघाईतच घरी पोहचली.

दिवसभर घराबाहेर असल्याने तिला थकवा जाणवत होता. जेवण आटपून ती थेट बिछ्यान्यावर पहुडली. शिणलेल्या देहाला विश्रांती मिळाली. उद्या बोलू, असा एसएमएस त्याला टाकून दिवसभरातील घडामोडींचा तिने धावता आढावा घेतला. ती कधी झोपेच्या आहारी गेली ते तिलाच कळले नाही. फक्त टेबल लॅम्प आणि हृदयाची स्पंदनं जागी होती.


क्रमशः