May 14, 2014

वपुर्झा

🌱Vapurza🌱

व. पु. काळे यांचे चार शब्द जरुर वाचा

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही
बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..!
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातेनेही तुटणार
नाहीत..!!

🌱🌱

संवाद दोनच माणसांचा होतो,
त्याच्यात तिसरा माणूस आला
की त्या गप्पा होतात..!!

🌱🌱

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असत
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!
म्हणूनच खडक झिजतात
प्रवाह रुंदावत जातो..!!

🌱🌱

जाळायला काही नसलं तर
पेटलेली काडीसुद्धा अपोआप
विझते..!!

🌱🌱

खर्च झाल्याच दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास
होतो..!!

🌱🌱

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते
शेवटपर्यंत असतात..!
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर हे असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा
असतो, कधी पैसा तर कधी
माणस..!
या तिन्ही गोष्टी पलीकडचा
प्रोब्लेम
अस्तित्वातच नसतो..!!

🌱🌱

आठवणी या मुंग्यांच्या
वारुळाप्रमाणे असतात..!
वारूळ पाहून आतमध्ये किती
मुंग्या असतील याचा अदमास
घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की
एकामागोमाग असंख्य मुंग्या
बाहेर पडतात. आठवणींचही
तसंच आहे..!!

🌱🌱

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी
घाबरलेला असतो, बरा झाल्यावर
शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!

🌱🌱

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा
देणारयाची ऐपत नेहमीच कमी
असते..!!

🌱🌱

माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!

🌱🌱

बोलायला कुणीच नसण यापेक्षा
आपण बोललेलं समोरच्यापर्यंत
न पोचणं हि शोकांतिका जास्त
भयाण..!!

🌱🌱

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. 

🌱🌱

पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.

🌱🌱

वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

🌱🌱

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

🌱🌱

आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.

🌱🌱

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

🌱🌱

संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.

🌱🌱

'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

🌱🌱

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

🌱🌱

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

🌱🌱

सुरुवात कशी झाली   बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

🌱🌱

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस!

🌱🌱

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

🌱🌱

औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

🌱🌱

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले!

🌱🌱

अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

🌱🌱

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!

🌱🌱

आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

🌱🌱


Posted via Blogaway

May 06, 2014

आयुष्य आणि आठवणीं

आयुष्यच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात पण आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज मात्र शिल्लक नसतात.
वरवर पाहता खूप सुंदर status आहे हा.... पण नीट विचार केला तर जाणवेल की मनुष्य नेहमीच आठवणींवर जगत आलेला आहे. आयुष्यात जे बरे वाईट घडत आले त्यावर विचार करत बसून आपलं उरलेलं आयुष्य समाधानत घालवण्या ऐवजी एकतर झुरण्यात किंवा स्वत:ला दोष देण्यात घालवत असतो.
अल्बम्स आपण नेहमीच पाहत असतो आणि फोटोतील आठवणींवर कधी गालावर हसू तर कधी नकळत अश्रू ओघळू लागतात. आठवणी जपाव्यात पण त्यांना नेहमी कुरवाळत बसू नये. अशामुळे तुम्हाला नवीन क्षण उपभोगायची इच्छाच उरणार नाही. आयुष्यात घडलेलं एकतर भयंकर होतं किंवा स्वर्ग सुख असा मनावर ताण आणून जगत राहणे म्हणजे आयुष्यात भविष्यात येणा-या क्षणांना बांध घालण्यासारखेच आहे.
मी अजिबात म्हणत नाही की आठवणी जपू नका म्हणून पण त्यांची पुन्हा आणखी एक कॉपी काढायची गरजच तुम्हाला कधी पडू नये याचा विचार करा. त्यापेक्षा कॅमेरा उचला आणि नवीन फोटो काढा. निगेटिव्हज खराब होतात पण अनुभवलेले क्षण कधीच पुसले जात नाहीत. ना कागदावरुन ना मनातून..

गुंतवणूक





 

तरुणांना संपत्तीसंचय करायचा असेल तर सुरुवातीपासूनच आर्थिक बाबतीत योग्य त्या सवयी लावून घेतलेल्या बऱ्या. आयुष्यात पुढे उपयोगी पडतील ,अशा आर्थिक सवयी त्यांनी रुजवाव्यात , याविषयी सांगत आहेत उमा शशिकांत 
.... 

कमवायला लागलेले आणि त्याबाबत समाधानी असलेले अनेक तरुण आर्थिक बाबी किंवा गुंतवणूक याकडे फारसे गांभिर्याने बघत नाहीत. पुरेसे पैसे नाहीत , पर्यायांचे जंजाळ आहे , हा विषयच क्लिष्ट आहे , कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही , किती कागदपत्र सांभाळावी लागतात... अशी अनेक कारणे ते पुढे करतात. पैशांचा फारसा विचार न करता येईल तसे आयुष्य जगण्याची सवय काही तरुण मंडळींची असते. या मंडळींनी आर्थिक बाबतीत पुढील चुका कटाक्षाने टाळाव्यात आणि काही गोष्टी आवर्जून कराव्यात. 

* एक 
कमावत्या असंख्य तरुणांना आर्थिक नियोजन किचकट वाटते आणि हा विषय त्यांच्यासाठी नसल्याचे वाटते. कमवायला सुरुवात केल्यावर पैशांबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवेत. पर्सनल फायनान्ससाठीचा सोपा उपाय म्हणजे , स्वतःला उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता समजावे. तुम्ही बचत व गुंतवणूक केली तर उत्पन्न बाजूला सुरक्षित राहील. तुम्ही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक केला तर अधिक कमवावे लागेल वा उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधावे लागतील. तुम्ही कर्ज घेतले तर जबाबदारी वाढेल आणि भविष्यातील उत्पन्न परतफेडीमध्ये जाईल. पर्सनल फायनान्स या संकल्पनांमध्येच सामावलेले आहे. याच संदर्भातून आपल्या सगळ्या आर्थिक निर्णयांकडे पाहावे. 

* दोन 
आपल्या सुरक्षित कोषामधून बाहेर पडावे लागले तर काही तरुण मंडळी तक्रार करतात. यामुळे त्यांचे आयुष्य किती कटकटीचे झाले आहे , हे आळवत बसतात आणि यावर उपाय शोधण्यावर मात्र कमी वेळ खर्च करतात. मुलांचे गरजेहून अधिक संरक्षण करणारे पालक मुलांच्या संगोपनामध्ये अडचणी ‌निर्माण करतात. आर्थिक निर्णयांच्या बाबतीत कृती करणे गरजेचे असते. अभ्यासात अवघड प्रश्न सोडवणारी मुले तोच दृष्टिकोन प्रत्यक्ष आयुष्यात ठेवतातच असे नाही. भूक लागल्यावर दोन मिनिटांत मॅगी बनवण्याचा झटपट पर्याय त्यांना आर्थिक बाबतीतही हवा असतो. तरुणांनी हा दृष्टिकोन बदलायला हवा आणि आर्थिक निर्णयांच्या बाबतीत दिशाहीन होणे सोडून द्यावे. 

* तीन 
आर्थिक बाबतीत चालढकल करणे हा बेजबाबदारपणा आहे. बँक स्टेटमेंट नसलेले , डिव्हिडंड चेक न भरलेले ,टॅक्स रिटर्न्स न भरलेले , तसेच म्युच्युअल फंड वा ब्रोकरकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेले असंख्य तरुण आढळतील. कंपनीचा आग्रह असतो म्हणून त्यांच्याकडे पॅनकार्ड तरी असते. गंमत म्हणून शेअरचे व्यवहार करणारेही अल्पकालीन भांडवली नफा कमावतात आणि तो करपात्र असतो. हा कर न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. आपण पकडलेच जाणार नाही , असा विचार करणे चुकीचे आहे. एका खोक्यामध्ये स्टेटमेंट ,बिले , कागदपत्रे व नोटिसा ठेवाव्यात. वेळ मिळेल तेव्हा त्याचे वर्गीकरण करावे. वेळेवर कर भरावा. या सवयी वेळेवर व लवकर रुजवल्या तर पुढील वाटचालीत मदत होईल. 

* चार 
काही तरुण गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्नाविषयी अति-आत्मविश्वास असतो. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याने त्यांना नवी नोकरी सहज मिळेल , असे त्यांना वाटते. पैसे राखून ठेवावेत ,असे भविष्यात कोणतेच संकट त्यांना दिसत नसल्याने ते सढळ हाताने खर्च करतात. खर्च केल्यानंतर हातात उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा आधीच पैसे वेगळे काढून ठेवलेले बरे. सॅलरी अकाउंटमधून थेट पैसे वळते करण्याचा पर्याय असतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे पैसे नियमितपणे गुंतवले जातात आणि बचत खात्यात विशिष्ट रक्कम जमा झाली की त्याचे रूपांतर ठेवींमध्ये केले जाते , या पर्यायांमुळे शिस्तबद्ध बचत होऊ शकते. 

* पाच 
तरुण गुंतवणूकदार अतिशय टेक-सॅव्ही असतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आर्थिक बाबींसाठी कसा करून घ्यायचा , याचा विचार त्यांनी करावा. क्रेडिट ब्युरो शैक्षणिक कर्जांच्या परतफेडीच्या नोंदी ठेवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरू शकतात , याकडे दुर्लक्ष केल्याने शैक्षणिक कर्जांच्या बाबतीत चुकारपणा दिसून येतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड योग्य प्रकारे न केल्याने नंतर होमलोन नाकारले जाते तेव्हा चूक सुधारण्यासाठी फार उशीर झालेला असतो. कोअर बँकिंग सुविधेमुळे प्रत्यक्ष बँक शाखेत न जाता इंटरनेट व मोबाइल बँकिंगमार्फत बरेचसे व्यवहार करता येतात. बजेट बनवणे , खर्चाचे नियोजन , गुंतवणुकीचे निर्णय ,नोंदी ठेवणे अशा गोष्टींसाठी सोयीची अॅप्लिकेशन देणाऱ्या तंत्रज्ञानाचा तरुणांनी जास्तीत जास्त वापर करून घ्यावा. यामुळे आर्थिक व्यवहार सुलभ व ‌अधिक सक्षम होतील. 

* सहा 
अनेक तरुण चुकीच्या पर्यायाने गुंतवणुकीची सुरुवात करतात. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे , आयपीओमध्ये पैसे ओतणे , डेरिव्हेटिव्हचे व्यवहार करणे म्हणजे पैसे कमावण्याचा सोपा मार्ग असल्याचे त्यांना वाटते. विविध मॅनेजमेंट स्कूलमध्ये शेअर व डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग गेम असतात , पण अॅसेट अॅलोकेशनवर गेम नसतात. पण अॅसेट अॅलोकेशन कंटाळवाणे वाटले तरी अत्यंत गरजेचे आहे. मुदतठेवी व पीपीएफ खाते अशा सोप्या पर्यायांमार्फत संपत्तीनिर्मिती करण्याचा पाया रचावा. नंतर डायव्हर्सिफाइड लार्ज-कॅप म्युच्युअल फंड व बाँडचा समावेश यामध्ये करता येईल. त्यानंतर शेअर्सचा समावेश करावा. तरुण गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम पाया मजबूत करायला हवा. 

वेळ ही तरुण गुंतवणूकदारांची जमेची बाजू असते. गुंतवणुकीचे योग्य निर्णय वेळीच घेतले तर त्यांना लक्षणीय संपत्तीची निर्मिती करणे शक्य होऊ शकते. चालढकल आणि दुर्लक्ष यामुळे ही संधी हातची घालवू नये. 

 

साभार: म.टा.