May 14, 2014

मैत्री

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा,
गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून
द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला.
दिवस गेले, महिने लोटले.. वर्षे सरली.. पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही.
दगड घ्यायचा,साखळीला लावायचा आणि मग तो फेकून
द्यायचा..
शेवटी तो माणूस म्हातारा झाला...
आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत
होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष
त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले,
ती साखळी सोन्याची झाली होती...
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून
द्यायचाया नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले
नाही.. तात्पर्य :-प्रत्येकाच्या जीवनात
एकदा तरी परीस येत असतो...
तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ...
तर कधी प्रेयसीच्या नात्याने....
कोणत्या ना कोणत्यारूपात तो आपल्याला भेटत असतो...
आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो......
आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच
हातभार असतो ......
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू
शकतात.....
"माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग
मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !!"


Posted via Blogaway

द्रुष्टांत

खूप छान द्रुष्टांत आहे ...
अवश्य वाचा .....

संत ज्ञानेश्वरांनी दिलेला
एक दृष्टान्त, आपण
नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट
उलगडा करणारा आहे.
त्यांनी सांगितले आहे,

की पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे.
एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात.
या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे
काहीतरी खाद्य चिकटवलेले असते.
जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल
फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट
स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो.
ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते.
नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते.
खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच
पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो.
पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व
तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व
पकडणाऱ्याच्या हाती पडतो.
याला भयसापळा असे म्हणता येईल.
जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही,
तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
"हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली,
तर आपणही उडून जाऊ शकत असतो.
पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते,
तो उडू शकत नाही!

माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे.
(हा दृष्टान्त ओशोंकडून ऐकला; पण मुळात कोणाचा हे आठवत नाही)
एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते.
मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते;
असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघूशकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल.
माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही.
निर्णय नघेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनानेअडकते व शरीराने मडक्यापाशी.
या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.
आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत
असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित
ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा!

थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय?
निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच
मुक्तिदायक नाही काय?

एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट
करतोय,
हातांनी पाणी खळबळवतोय.
या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून
मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं. "अरे तू शांत
हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ
दिसेल व वस्तूही सापडेल!' कोणीतरी समजावत आहे.
पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही.
हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ
होता,
हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?

"दमलास?
चल परत जाऊ.
आज इतकं पुरे.
पुन्हा कधीतरी जाता येईलच.
""नाही गुरुजी. मी दमलोय;
पण आपण इतके वर
आलोय,
आज शिखरावर पोहोचायचंच!
कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय,
असं झालंय मला.''
""माझं वचन नीट आठव.
ही मोहीम पुरी होईपर्यंत,
जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस,
तर ते सत्य सांगेन'
,असं म्हणालो होतो मी.''
""होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल.
इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..''
""कितीही वर आलो असू!
तरी मी सांगतो म्हणून, हे
सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला
तू तयार आहेस,का नाही?''
""ठीक आहे गुरुजी.
मी आजची सगळी धडपड
वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर
परत जाऊ या.''
""शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो''.
""पण शिखर न येताच?''
""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून!
ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे
आणि ज्या तळापासून आपण निघालो ना,
तेच खरं पोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास.
चल आता तिथं जाऊ,
जिथं आपण असतोच; फक्त
"पोहोचलो' असं वाटत नसतं इतकंच!
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा.
माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, थयथयाट
करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा.
चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून
पाहावा. हे जमायला अवघड नसतं.
पटायलाच अवघड असतं.
भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच
तयार झालेले असतात.
त्यामुळे त्यातून बाहेर पडणे
अवघड नसते;
पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी
पटायला अवघड असतो,,




Posted via Blogaway

वपुर्झा

🌱Vapurza🌱

व. पु. काळे यांचे चार शब्द जरुर वाचा

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही
बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..!
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातेनेही तुटणार
नाहीत..!!

🌱🌱

संवाद दोनच माणसांचा होतो,
त्याच्यात तिसरा माणूस आला
की त्या गप्पा होतात..!!

🌱🌱

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असत
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!
म्हणूनच खडक झिजतात
प्रवाह रुंदावत जातो..!!

🌱🌱

जाळायला काही नसलं तर
पेटलेली काडीसुद्धा अपोआप
विझते..!!

🌱🌱

खर्च झाल्याच दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास
होतो..!!

🌱🌱

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते
शेवटपर्यंत असतात..!
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर हे असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा
असतो, कधी पैसा तर कधी
माणस..!
या तिन्ही गोष्टी पलीकडचा
प्रोब्लेम
अस्तित्वातच नसतो..!!

🌱🌱

आठवणी या मुंग्यांच्या
वारुळाप्रमाणे असतात..!
वारूळ पाहून आतमध्ये किती
मुंग्या असतील याचा अदमास
घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की
एकामागोमाग असंख्य मुंग्या
बाहेर पडतात. आठवणींचही
तसंच आहे..!!

🌱🌱

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी
घाबरलेला असतो, बरा झाल्यावर
शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!

🌱🌱

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा
देणारयाची ऐपत नेहमीच कमी
असते..!!

🌱🌱

माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!

🌱🌱

बोलायला कुणीच नसण यापेक्षा
आपण बोललेलं समोरच्यापर्यंत
न पोचणं हि शोकांतिका जास्त
भयाण..!!

🌱🌱

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. 

🌱🌱

पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.

🌱🌱

वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

🌱🌱

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

🌱🌱

आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.

🌱🌱

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

🌱🌱

संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.

🌱🌱

'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

🌱🌱

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

🌱🌱

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

🌱🌱

सुरुवात कशी झाली   बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

🌱🌱

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस!

🌱🌱

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

🌱🌱

औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

🌱🌱

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले!

🌱🌱

अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

🌱🌱

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!

🌱🌱

आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

🌱🌱


Posted via Blogaway