September 03, 2013

महागाई, कुपोषण आणि ऑलिम्पिकचे मेडल

दिल से (अच्युत गोडबोले)
महागाई, कुपोषण आणि ऑलिम्पिकचे मेडल  
भ्रष्टाचार हा आपल्या देशात आता इतका मुरलाय, की कोणालाच त्याचं काही वाटत नाही. एक नेता दुसर्‍यावर आरोप करतो तेव्हा दुसरा नेता मी कसा भ्रष्टाचारी नाही हे सांगण्यापेक्षा तू माझ्यापेक्षा कसा जास्त भ्रष्ट आहे, हे ओरडून सांगत असतो. मोठी गंमत आहे.
 
परवा फोर्ट परिसरात जी दंगल झाली ती अक्षम्य आहे, प्रश्‍नच नाही. म्यानमार कुठे आणि सीएसटी कुठे असं मी म्हणणार नाही. कुठल्याही गोष्टीचे पडसाद कुठेही उमटू शकतात. म्हणजे अमेरिकेने उद्या इराकवर कारण नसताना हल्ला केला आणि त्याचा निषेध करणार्‍या रॅली आपल्याकडे निघाल्या तर ते सुजाण मानवजातीचेच द्योतक असेल, पण हे सारं चांगल्या कारणासाठी, चांगल्या मार्गाने झालं पाहिजे. आपल्याकडे रॅलीला जे हिंसक वळण मिळालं त्याचं स्वरुप खूप भयानक होतं, हे बरोबर नाही.
 
क्रिकेट हा अगदी प्राचीन काळापासूनच श्रीमंतांचा खेळ मानला जात होता. आपल्या देशात हा खेळ आल्यानंतरही जमीनदार मौजमजा करण्यासाठी क्रिकेट खेळत. म्हणजे जमीनदार बॅटने बॉल टोलवायचे आणि नोकरांनी बॉल आणून द्यायचा, असं स्वरूप होतं असं म्हणतात. खेळांची परिस्थिती अजूनही फारशी बदललेली नाही. १० टक्के लोकांनी खेळायचं, त्यातून करोडपती व्हायचं आणि ९० टक्के लोकांनी फक्त टीव्ही बघत टाळ्या वाजवायच्या, अशी परिस्थिती कायम आहे.
 
लिम्पिकमध्ये आपण पाच मेडल्स पटकावली आणि आपल्या देशवासीयांचा ऊर अगदी अभिमानाने भरून गेला. खेळ हे क्षेत्र दुर्दैवाने आपल्या देशात श्रीमंतांसाठीच आहे. कोणत्याही खेळात जम बसवण्यासाठी, त्यासाठी लागणारं साहित्य विकत घेण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. ज्यांना हे शक्य आहे तेच या खेळात करीयर करण्याकडे वळतात. गरीब घरचे आईवडील आपल्या मुलांना खेळाच्या मैदानात उतरवत नाहीत, त्याचं हेच कारण आहे. खेळ खेळणं परवडत नाही. त्यातच आपल्या देशात पाणी नाही, महागाई प्रचंड आहे, कुपोषण आहे त्यामुळे तगडे, तंदुरुस्त खेळाडू हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. या मोजक्या खेळाडूंमधून सिलेक्शन होत असल्यामुळे थोडेच खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतात आणि त्यातले अगदी मोजके मेडल पटकावू शकतात.
 
----------
 
आपल्याकडची सुदृढता वाढली पाहिजे, हे जितकं खरं आहे तितकेच काही वेगळे मुद्दे पण आपण लक्षात घेतले पाहिजेत. एक उदाहरण देतो, कॅरम, बिलियर्डस्, गोल्फ हे तीनही खेळ. या तीनही खेळांमध्ये तंत्र सारखंच आहे फक्त अंतराचा फरक आ, पण गोल्फ हा अतिश्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखला जातो, बिलियर्डस् क्लबमध्ये खेळला जातो आणि कॅरम फक्त गणपती मंडळांपर्यंत मर्यादित राहिला. खेळांंचं सामाजिक आणि आर्थिक स्थान पाहिलं तर ही दरी मात्र मोठी आहे. कौशल्य प्रत्येक खेळाला तेवढंच लागतं. आपण मात्र पाश्‍चात्यांचे महागडे खेळ किती काळ खेळणार?
 
बातम्या आणि सनसनाटी
आजकाल बातम्यासुद्धा सनसनाटी असतील तरच दाखवल्या जातात. आरुषी मर्डर केस ही इतकी रंगवूून अगदी शेरलॉक होम्स स्टाईलने दाखवली जाते. शेतकर्‍यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या इतक्या प्रभावीपणे दाखवल्या जात नाहीत. आपल्या देशात पाणीटंचाई, महागाई, रोजगार, कुपोषण असे कितीतरी मुद्दे आहेत त्याच्या बातम्या का दाखवल्या जात नाहीत. कारण त्यात सनसनाटी काही नसते? हे समजण्याच्या पलीकडे आहे.
 
स्त्रीभ्रूण हत्या हे रॅकेटच
मधल्या काळात स्त्रीभ्रूण हत्यांची प्रकरणं वारंवार ऐकायला मिळत होती. मला वाटतं हे फार मोठं रॅकेट आहे. पुरुषप्रधान संस्कृती त्यामागे आहेच. पण त्यात कॉर्पोरेट इंटरेस्टही असावेत. गर्भलिंग निदान करणारी मशीन मोठ्या प्रमाणावर विकली जावीत, वापरली जावीत यासाठीही प्रयत्न होत असणार.
अर्थात यामध्ये समाजाला नुसतं सुशिक्षित नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या सुशिक्षित केलं पाहिजे. मुलगी म्हणजे पराया धन, हुंड्याचा खर्च आणि मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, इन्कमचा सोर्स हे जे काही गणित आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने रुजवलंय ते बदलंय, हे लक्षात आणून दिलं पाहिजे. आयटीच्या क्षेत्रात येणार्‍या मुली कुठेही बौद्धिक बाबतीत मुलांच्या मागे नाहीत. खरंतर अमेरिकेसारख्या मोठमोठ्या शहरातही काही ठिकाणी मुलींचे पगार मुलांपेक्षा कमी आहेत. हेसुद्धा या पुरुषप्रधान संस्कृतीचंच लक्षण आहे.
 
टीव्ही नकोच
टीव्ही पाहणं हा एक तापदायक प्रकार झालाय. टीव्हीवर सध्या नटनट्यांच्या मुलाखती, क्रिकेट आणि राजकारण या व्यतिरिक्त काहीच नसतं. एखाद्या चित्रकाराच्या, नाटककारांच्या मुलाखती क्वचितच बघायला मिळतात. मनाला आनंद मिळवून देणारं, कलाप्रेमींसाठी असलेलं असंही दाखवलं पाहिजे.