फक्त सव्वा महिना राहिला! देवानं बसवलेली पृथ्वीची मूर्ती शास्त्रज्ञांनी नाही विसर्जित करायची तर कुणी? फ्रान्सजवळ खणलेल्या त्या कसल्याशा बोगद्यात कुठलेसे दोन कण एकमेकांवर आपटल्यानंतर जगबुडी होणार आहे म्हणे. खरंच! "इंडिया टीव्ही'शप्पथ! "क्या राहू-केतू के क्रोध से होने वाले प्रलय से बच पायेगी धरती मॉं?' ......
या सवालाचा जवाब राहून राहून "नाही' असाच येतोय. आम्हीही आमच्या पातळीवर काही निर्णय घेतले आहेत. एक तर (दंड भरून) आम्ही आमच्या सर्व विमा पॉलिश्या रद्द करवून घेणार आहोत. नोव्हेंबरात टाकलेली रजा ऑक्टोबरातच घेणार आहोत. किंबहुना मिळेल तेवढी रजा आणि पॉलिश्यांचे मिळतील तेवढे पैसे घेऊन जमल्यास स्वित्झर्लंड (नको! नको! तो बोगदा तिकडंच आहे!), किंवा सेशेल्स किंवा मॉरिशस, किंवा केरळ किंवा गोवा, अगदी कुठंच न जमल्यास महाबळेश्वरला जाऊन "ऐश' करण्याचा विचार आहे. गेल्या काही दिवसांत त्या "होम लोन'च्या वाढत्या हप्त्यामुळं आमचा जीव हप्त्या-हप्त्यानं चालला होता. आता पुढच्या महिन्यात आम्ही हप्ता देणारच नाही! बस म्हणावं... फारच तगादा लावला, तर देईन चेक २२ ऑक्टोबरचा... पोस्ट डेटेड! यंदा दिवाळी दिसेल असं काही वाटत नाही... तेव्हा आम्ही नवरात्रातच दिवाळीची भरपूर खरेदी उरकणार आहोत. दसऱ्याच्या दिवशीच भरपूर फटाके उडवून घेणार! त्या "टायटॅनिक'वर नव्हते का उडवत उंच उंच रॉकेट... मरतानाही कसं "सेलिब्रेशन' करीत जावं...
२१ ऑक्टोबरला चॅनेलवाले कसं वार्तांकन करतील? ज्याला त्याला गाठून "तुम्हे आज कैसा महसूस हो रहा है...?' हाच प्रश्न विचारतील की बदल म्हणून "अब आप के आगे के प्लॅन क्या है?' असं विचारतील? पृथ्वीची अवस्था साधारण कशी होईल, यावर "एसेमेस' मागवता येतील का? १. आग लागेल, २. समुद्र दोन मीटर वर येईल, ३. धूमकेतू-उल्का येऊन आदळतील... असे तीन "ऑप्शन' देता येतील. आणि हो, पेपरवाले, दूधवाले, केबलवाले २० तारखेलाच पैसे न्यायला येतील का? त्यांना काय सांगायचं? कसं कटवायचं?
अहो, त्या शास्त्रज्ञांना कुणी तरी जाऊन सांगा! आम्हाला अजून जगायचंय! तुमचं तुमच्या पॉलिशीवाल्याशी भांडण झालंय का? पण मग सगळ्या पृथ्वीच्या जिवावर का उठता? आमच्या अंगाचा संताप संताप झाला. त्वरित आम्ही २० ऑक्टोबरचं जिनिव्हाच्या विमानाचं बुकिंग केलं. (पॉलिसीचे पैसे आले ना!)
सिक्युरिटी तोडून आम्ही त्या शास्त्रज्ञांच्या अड्ड्यावर पोचलो. हा सेट पूर्वी कुठं तरी बघितल्यासारखा वाटत होता. अरे हां! "मि. इंडिया'त मोगॅंबोचा दरबार अगदी अस्साच होता! आम्ही जाऊन त्या मुख्य शास्त्रज्ञाची दाढी धरली... आणि आणि... त्याला मारणार तोच... हे काय... आम्हालाच हे दणके कोण घालतंय? साक्षात मातुःश्री! "ऊठ बाळा... गॅस संपलाय... लवकर नंबर लावायला जा...' गजर झाला... आम्ही निमूटपणे उठलो... ती २२ ऑक्टोबरची सकाळ होती...
No comments:
Post a Comment