March 19, 2010

तो आणि ती भाग..२ --प्रेमात पाहावं "पडून'

त्यानं तिला प्रपोज केलं. तेही अगदी अनपेक्षितपणे. बोलायलाही घाबरणारा थेट प्रपोजचं धाडस करतो कसा, हा प्रश्‍न मलाही पडला. चला जाणून घेऊ या त्याच्याकडून...

आता बऱ्यापैकी मैत्री झाली होती. कॅंटीनच्या मळकट कॉफीसह वह्या-पुस्तकांची देवाण-घेवाणही सुरू झाली होती. गरज नसतानाही तो तिची वही मुद्दाम घरी घेऊन जाई. वहीतील सुवाच्य अक्षरांवरून बोटं फिरवली तरी तिच्याशी संवाद साधल्याचे समाधान मिळे. मुलींमधील नीटनेटकेपणा वहीवरूनही सहज लक्षात येण्यासारखा असतो. वहीला सुंदर कव्हर, एकाही पानावर खोडतोड किंवा रफ काम नाही, पानाला दुमड नाही की पानांची ओढाताण नाही. जणू काही मुलांना देण्यासाठीच वह्या सुटसुटीत ठेवलेल्या असतात. वहीसाठी तिने कधी त्याला "नाही' म्हटले नाही.

वहीचे निमित्त पुढे करून थोडा संवाद आणि एखादी कॉफी हमखास ठरलेली असे. ती असली तर कॉलेजला जाण्याचा त्याचा उत्साह द्विगुणित होई; तर तिच्या अनुपस्थितीत कशातच मन लागत नसे. कोणी कॉलेज "बंक' करण्याचा विषय काढला तरी अस्वस्थता वाढे. पहिल्या तासाला त्याच्या उत्साहाला उधाण आलेले असे, तर शेवटच्या तासाला कॉलेज संपण्याचा विचाराने मन हिरमुसले होई. अशा प्रकारे रात्रं-दिवस ती मनात राहत असल्याने त्याच्यात दडलेला कवी कधीच जागा झाला होता. त्याने चार-दोन ओळींच्या बोलक्‍या कविता तिला वाहिल्या होत्या. त्यातील एक कडवे असे...

प्रिये तुझ्यासाठी, ओतलीत सारी नाती,
तुझ्याविना मज, राहिले ना आता कोणी,
तुझ्या एका नजरेस, एकवटले माझे जग,
रूप तुझे देखणे, माझ्या डोळ्यात बघ,
प्रिये, फक्त तुझ्याचसाठी...

एखादा मंत्र जपावा तसे हे कडवे त्याच्या ओठांवर रुळत असे. असा हा दिवास्वप्नातील निरंतर प्रवास एक दिवस त्याच्या मित्रांनी दिलेल्या खळबळजनक बातमीने भंगला. ती बातमी ऐकून पायाखालची जमीन सरकली. प्रेमातील खाचखळगे बघून काही सुचेनासे झाले. कॉलेजमधला एक "सीनियर' तिच्यावर कायम पाळत ठेवतो, बोलण्याचा प्रयत्न करतो, असे ते वृत्त होते. त्याच्या मित्रांनी तिला त्या "सीनियर'सोबत हसत बोलताना आणि शेकहॅंड करतानाही बघितले होते. दोघांमध्ये चांगला सुसंवाद रंगत असल्याची बातमीही थोड्याच दिवसांत येऊन धडकली. आता आपले काही खरे नाही बुवा. त्या "सीनियर'ने तिला कदाचित प्रपोजही केले असावे, या शंकेचे मनात काहूर माजले. दिवसागणिक अस्वस्थता वाढत होती. प्रेमाच्या दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू झाली होती. पण तिच्या मताचे गूढ अद्यापही कायम होते. तिच्या मनात त्या "सीनियर'विषयी विष कालवून दोघांच्या संबंधांमध्ये खोडा घालण्याचा विचारही मनात डोकावला. पण अजून तशी वेळ आलेली नव्हती. तिची बाजू माहिती करून घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलणे त्याच्या हितसंबंधांना घातक होते.
एकदा रात्री झोपताना या विचारांमुळे झोपच येत नव्हती. कड पलटून झाले, पलंगावर सर्व दिशा फिरून झाल्या तरी पापण्यांना पापण्या काही केल्या लागत नव्हत्या. शेवटी कसाबसा तो झोपला. पण स्थिर पाण्यात कोणी मध्येच दगड फेकावा, तसा खडबडून जागा झाला. बघतो तर काय, कपाळ घामानं चिप्प भिजलेलं. श्‍वासांची गतीही वाढलेली. त्याला खोकल्याची प्रचंड उबळ आली. घशाला लागलेली कोरड पाणी पिऊनही मिटेना. ते भयावह स्वप्न वारंवार डोळ्यांसमोर तरळून येत होतं. स्वप्नात त्या "सीनियर'नं तिला प्रपोज केलं. ती हसून "हो' म्हणाली. मग त्यांचं बाईकवर फिरणं, बागेत हुंदडणं. लग्नही जमलं. लग्नात आपण अक्षता फेकतोय आणि तो दुष्ट "सीनियर' अग्नीच्या साक्षीने फेरे घेतोय. बाप रे! माय गॉड... हे शक्‍य नाही. मी हे कदापि होऊ देणार नाही. तो स्वतःशीच बाष्कळ बडबड करीत होता. त्याने दुसऱ्या दिवशीच प्रपोज करण्याचा निर्धार केला- मी माझ्या भावना व्यक्त करणार. तिला वाट्टेल तो निर्णय घेऊ देत! तो अट्टाहासाला पेटला होता. आता गाडी सुटली तर छत्री घेऊन कायमचे बस स्टॉपवर "एकटेच' उभे राहावे लागेल, याचा पुरता अंदाज आला होता.
दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन तासांनंतर त्याने सरळ तिला कॅंटीनमध्ये नेले. आणि घाईघाईत थेट प्रपोज केले. प्रपोजची काहीही पूर्वतयारी नसल्याने पुरता गोंधळ उडाला. प्रपोज करताना प्रेमाचे ट्रेडमार्क असलेले साधे गुलाबाचे फूलही देण्याचे राहून गेले. रसभरीत कॅडबरी तर दूरच राहिली. अर्धवट मारलेल्या उडीत त्याचे चांगलेच कंबरचे मोडले. पण आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचल्याचे समाधान होते. तसा तिने सकारात्मक प्रतिसाद दिला नसला तरी, "ठीकए, उद्या सांगते' असे म्हणाल्याने आशेचा किरण अद्याप तेजोमय होता. आता ती हो म्हणेल, की "...' हा जीवघेणा प्रश्‍न त्याला छळत होता.

(क्रमशः)

No comments: