March 26, 2014

साहित्य सहवास


प्रिय वपु,

आज तुमचा वाढदिवस, आपल्या समाजात नावाच्या मागे कै लागले कि जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का?
ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले? ६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग दि माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा"
आज तुम्ही असतात तर आमच्या सारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबीयांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी.
तुम्ही कुठे तरी लिहून ठेवले आहे ना " परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसा पेक्षा, ४ तासाच्या प्रवासात भेटलेली व्यक्ती कधी कधी जवळची वाटू लागते" वपु तुमचे आणि आमचे नाते तरी या पेक्षा काही वेगळे आहे का हो ? आम्हाला जेंव्हा हवे असेल तेंव्हा तुमचे कुठलेही पुस्तक उघडतो आणि मनसोक्त भेटतो?मग तुम्ही कधी प्रवासात भेटता, कधी घरीच रात्रीच्या वेळी उशिरा भेटता, कधी गाडीत भेटता तर कधी चक्क ऑफिस मध्ये भेटता.
तुम्ही जसे आम्हाला भेटता तसे आम्ही पण तुम्हाला प्रत्तेक कथेत भेटतोच ना ? तुम्ही प्रत्तेक कथा आम्हाला समोर ठेवूनच लिहित होतात ना… तुम्ही तुमचे मन आमच्या जवळ मोकळे केलेत …. आणि आम्ही आमचे !! हिशोब पूर्ण !!!!
नरक म्हणजे काय ? तुम्ही पार्टनर मध्ये किती मस्त एका ओळीत लिहून गेलात " नको असलेली व्यक्ती न जाणे म्हणजे नरक" कसे सुचत होते हो इतकी सोपे लिखाण करायला ?
तसे तुम्ही व्यवसायाने वास्तूविशारद , नोकरी केली मुंबई महानगर पालिकेत आणि नाव कमावले साहित्य विश्वात! तीनही गोष्टींचा एक दुसर्याशी अर्था अर्थी संबंध नाही, पण वपु तुम्हीच हे करू शकत होतात कदाचित महानगर पालिकेतील नोकरी मुळे तुमचा संबंध समजतील वेग वेगळ्या प्रकरच्या लोकांशी आल्या मुळे नकळत कथेला विषय आणि खाद्य मिळत गेले…पण याचा अर्थ असा नव्हे कि महानगर पालिके मुळे तुम्ही साहित्तिक झालात…. नसता मुंबई पालिकेतील प्रत्तेक कर्मचारी कथा लेखक झाला असता…. तुम्ही म्हणाला होतात न " कबुतराला गरुडा चे पंख लावता येतील पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते”
तुमच्या प्रत्तेक कथेत आदर्श नवरा किंवा बायको डोकावते , आणि संपूर्ण कथा कायम मध्यम वर्गीय घरा भोवती फिरत असते ? काय बरे कारण असावे कदाचित तुम्ही जसे वाढलात त्या वातावरणाचा कदाचित परिणाम असेल, आणि तुम्हाला सांगतो वपु त्या मुळेच तुमच्या कथा आमच्या मनाला जास्त भिडल्या .
आता हेच बघा न "किती दमता तुम्ही ? या एका वाक्याची भूक प्रत्तेक स्त्री आणि पुरुषाला असते"…. या वाक्याचे महत्व कळण्या करिता तुमच्या कथा वाचाव्या लागल्या?
तुम्ही अजून एक कलाकृती करून ठेवलीत , जे पुस्तक तुम्ही वडिलांवर लिहिलेत त्याला खरेच तोड नाही " व पु सांगे वडिलांची कीर्ती"…। याला कारण प्रत्तेकालाच वडिलान बद्दल भावना असतात, पण किती लोक समर्थ पणे त्या जाहीर करतात, तसेच साहित्य विश्वात वडील या विषयवार लिहिलेली पुस्तके अभावानेच आढळतात…. केवळ त्या एका गोष्टी मुळे पुस्तकाचे महत्व वाढत नाही कारण प्रत्तेक व्यक्ती च्या आयुष्यात वडील हि एक हळवी किनार असते … असंख्य आठवणी आणि भावना असतात पण त्या तुम्ही कशा मांडता हे फार महत्वाचे…. तुम्ही तर लेखकच पण त्याहून जास्त महत्वाचे ते एका लेखकाने एका चित्रकाराचे लिहिलेले चरित्र…
आपल्या सौ चे ब्रेन ट्युमर चे आजारपण आणि त्याचा दुखद: शेवट , दिवस रात्र मृत्यूची टांगती तलवार ….बायको हि सखी असते असे सांगत तुम्ही आम्हाला नवरा बायको या नात्याची PHILOSOPHY शिकाविलीत…. त्याच नात्या करिता नियती इतकी निष्ठुर पणे का वागली तुमच्याशी ?
कदाचित या अनुभवातून आयुष्याच सार तुम्ही इतक्या सहज पणे सांगून गेलात - "प्रोब्लेम कोणाला नसतात? ते सोडवायला कधी वेळ, कधी पैसा तरी कधी माणसे लागतात"
अंत्य यात्रे ला जाऊन आल्या नंतर अथवा स्मशानातून परत आल्यवर थकवा येण्याचे कारण किंवा मन सैरभैर का होते याचे उत्तर तुम्ही सहज देवून गेलात - "रडणाऱ्या माणसा पेक्षा सांत्वन करणार्यावर जास्त ताण पडतो " किती अचूक लिहून गेलात हो तुम्ही !
तुमचे लेखन जसे गाजले तसेच तुमचे कथा कथन गाजले ,कथाकथनाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले , तुम्ही कथाकथन थेट साता समुद्रा पार नेलेत …लन्दन , अमेरिका , कॅनडा ला कार्यक्रम झाले …अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले, कर्तुत्व तुमचे पण मान आमची उंचावली !
महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले…तुमचे असंख्य चाहते धन्य झाले.
वपुं तुमच्या दृष्टीकोनाला खरेच दंडवत ! आयुष्याकडे बघण्याचा तुमचा द्रुष्टीकोन खरोखरचं खुपं काही शिकवणारा आहे….
पत्र हे संवादाचे सगळ्यात प्रभावी माध्यम … आणि मुख्य पत्र हे असे माध्यम कि ज्यात फक्त दोन लोक संवाद साधतात…. तुम्ही म्हणून गेलाच आहात न "संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात !" म्हणून हा पत्र प्रपंच !
तुम्ही आमच्या पासून खूप दूर गेलात , पण जिथे असाल तिथे नक्कीच सुखी असाल …तुमचि कथा ऐकायला आता साक्षात पु ल , प्र के अत्रे , पु भा भावे , बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व सारखी दिग्गज मंडळी प्रेक्षक म्हणून असतील आणि तुम्ही म्हणत असाल -
आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे.


आपला वाचक ,

'असतील तरच मिळतील'


मॉलच्या गल्ल्यासमोर (कॅश काऊंटर) सामानाच्या ढकलगाडय़ा (ट्रॉली) घेऊन माणसे रांगेत उभी असतात. मनसोक्त खरेदी केल्यावर पैसे चुकते करण्याची वेळ येते आणि त्या रांगेत माणसाच्या संयमाची परीक्षा सुरू होते. कोणाचे कार्ड 'स्वाइप' होत नाही. कोणाकडे दोन ट्रॉली सामान असते. रांग काही हलत नाही. आयांच्या आणि वडिलांच्या अंगाला लटकणारी मुले तर भयंकर कंटाळतात. आणि याच क्षणासाठी बनविलेले कॅश काऊंटरचे डिझाइन एक नवा पेचप्रसंग उभा करते. रांगेत उभे असताना कॅश काऊंटरच्या बाजूला ठेवलेले चॉकलेटचे बॉक्स आणि कार्टूनच्या रूपातल्या बाहुल्या एका चार-पाच वर्षांच्या कन्येच्या डोळ्यात भरतात. मम्मी-पप्पाकडे सामोपचाराने मागणी केली जाते. दोघेही आपापल्या व्हॉटस् अ‍ॅपवरचे लक्ष ढळू देत नाहीत. मुलगी जमिनीवर बसकण मारते. आई-बापाला ती निर्वाणीचा इशारा देते- 'मी रडेन.' पण आई-वडील अविचल राहतात. आपल्या धमकीचा फारसा परिणाम दिसत नाही म्हटल्यावर मुलगी वरचा 'सा' लावते. तिची मम्मी तरीही िखड लढवत असते. 'नो बेटा.. नो बेटा'चा पाढा चालू होतो. मग मात्र मुलगी आपल्याकडील ठेवणीतील ब्रह्मास्त्र बाहेर काढते. मॉलच्या गुळगुळीत फरशीवर लोळून रडण्याचा कार्यक्रम चालू होतो.
कदाचित इथपर्यंतचा प्रसंग कमी-अधिक फरकाने आपण सगळ्यांनी बघितला असेल. मॉल, आठवडी बाजार, जत्रेतला बाजार किंवा अगदी शाळेच्या समोरच्या रस्त्यावर असले प्रसंग सहज बघायला मिळतात. अशा प्रसंगांचा शेवट हमखास दोन प्रकारे होतो : आई-बाप मुलांच्या हट्टाला दाती तृण धरून शरण जातात, नाहीतर प्रेमाने समजूत घालून किंवा दमबाजीने किंवा फटके देऊन मुलांचा हट्ट मोडून काढतात.
पण वरील प्रसंगात जे काही बघितले ते मात्र थोडे वेगळे होते. मुलीच्या वडिलांनी शांतपणे स्वत:चे पशाचे पाकीट उघडले आणि मुलीसमोर धरून तिला सांगितले, 'यातील सगळे पसे आपण घेतलेल्या सामानासाठी खर्च होणार आहेत आणि मग त्या बाहुली खरेदीसाठी पसेच नसतील आपल्याकडे.' रडून रडून चेहरा लाल झालेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यावर क्षणभर एक भलेमोठे प्रश्नचिन्ह अवतरले. पण फक्त एका क्षणासाठीच! कारण दुसऱ्या क्षणाला त्या मुलीचा हात वडिलांच्या पाकिटाकडे गेला आणि त्यातील कार्ड हातात घेऊन ती म्हणाली, ''बाहेर ते मशीन ठेवले आहे ना, त्यात हे कार्ड घाला आणि पसे घेऊन या.'' माझ्यासकट रांगेतील बहुतेक सगळेच पालक क्लीनबोल्ड झालेले दिसत होते. त्या मुलीच्या वडिलांचा गोरामोरा चेहरा बरेच काही बोलून गेला. पुढे काय घडले ते बघायला मी काही थांबले नाही, पण मनातील सगळी गणिते, सगळे आडाखे बदलून गेले.
सध्या बाल्यावस्थेत- म्हणजे तीन ते दहा वष्रे वय असलेल्या मंडळींनी पसे फारच लवकर बघितले असावेत असे मला वाटते. माझ्या या मताला काही शास्त्रोक्तआधार नाही, पण माझ्या आजूबाजूला या वयोगटातील अनेक मुले मला बघायला मिळतात. अगदी तीन वर्षांच्या मुलांना पसे कळतात. ते सांभाळून ठेवायचे, हेही त्यांना कळते. आणि सगळ्यात महत्त्वाचे-त्या पशाची क्रयशक्तीदेखील त्यांना कळते. छोटा शिशूमध्ये शिकणाऱ्या माझ्या मुलीच्या शाळेत शिक्षक-पालक सभेत 'मुलांच्या दप्तरात पसे सापडतात, त्यांना पसे देऊ नका,' असे सांगणाऱ्या शिक्षिका बघितल्या की मला माझे बालपण आठवते. नेहमी घरून जेवणाचा डबा घेऊन शाळेत जाणाऱ्या माझ्या हाती 'खाऊ'चे पसे कदाचित मी सातवी-आठवीत गेल्यावर पहिल्यांदा मिळाले असावेत. आणि तेही कदाचित अपवादात्मक परिस्थितीतच! मी अगदीच बावळट होते असे असले तरी आज आई-वडिलांचे बोट धरून शाळेत येणाऱ्या माझ्या मुलीच्या वर्गातील मुलांच्या दप्तरात पसे सापडतात, हे पचायला कठीण जाते. पण ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
मुलांच्या हाती पसे द्यायचे की नाही, यावर बालमानसशास्त्रात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. पण जर या मुलांसमोर पसे येणार असतील, तर त्यांना पशाकडे पाहण्याचा एक सुदृढ दृष्टिकोन आपण देऊ शकतो का, हा विचार करणे आवश्यक आहे. माझ्या लहानपणी 'पिगी बँक' अस्तित्वात होत्या. काहीच नाही, तर आई-वडील मुलांना एखाद्या प्लास्टिकच्या डब्याला खाच पाडून त्यात नाणी टाकायला सांगत असत. आजही या पिगी बँक मिळतात. रंगीबेरंगी आणि मुलांच्या आवडीच्या कार्टूनच्या रूपातल्या या पिगी बँक निश्चितच आकर्षक असतात. मुलांना तिथून सुरुवात करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे पसे साठवायची शिकवण निश्चितच मिळेल. माझ्या लहानपणी पिगी बँक भरायला एखाद् दोन वष्रे लागत असत. आज मात्र पिगी बँक तीन महिन्यांत सहज भरते. कारण एक आणि दोन रुपयांच्या नाण्यांची क्रयशक्ती घसरल्यामुळे आज सहजच दिवसाला दोन-चार नाणी मुलांना देणे आई-वडिलांना शक्य आहे. इथेच मुलांच्या अर्थसाक्षरतेची पुढील पायरी आहे. मुलाच्या नावे एक वेगळे बँक खाते उघडणे आणि पिगी बँकेतील नाण्यांच्या बदल्यात एक नोट बँकेत मुलाच्या खात्यावर मुलाच्या उपस्थितीत भरणे, यातूनदेखील पशाकडे आणि बचतीकडे बघायचा एक जबाबदार दृष्टिकोन आपण मुलांना देऊ शकतो. तीन-चार वर्षांच्या मुलांना बँकेचे नाव लक्षात राहते. आणि त्यांना त्यांच्या बँकेचे नाव जरी वाचता येत नसले तरी लोगो सहज ओळखता येतात. एकदा प्रयोग करून बघाच.
अनेकदा पालक मुलांना एटीएममधून पसे काढताना आपल्याबरोबर नेतात. त्यामुळे मुलांना मशीन पसे देते, हे कळते. कधी कधी हीच मुले मग कुतूहलापोटी विचारतात- 'या मशीनमध्ये पसे कुठून येतात?' हा सुवर्णक्षण चुकवू नका. आई-वडील नोकरी-व्यवसाय करतात, घरापासून दूर राहतात, तेव्हा त्यांना उत्पन्न मिळते व तेच उत्पन्न बँक या मशीनच्या माध्यमातून त्यांना देते, हे मुलांना सांगायला काहीच हरकत नाही. खात्यात असलेल्या पशापेक्षा जास्त पसे मिळत नाहीत, हेही मुलांना कळू देत. एखाद्या खात्यात शून्य शिल्लक असताना मशीन पसे देत नाही, हेदेखील त्यांना कळू द्या. एटीएम म्हणजे 'असतील तरच मिळतील' हे त्यांना कळू द्या. साधारण मोठय़ा मुलांना (८ ते  १० वयोगट) बँकेत ठेवलेल्या पशावर मिळणाऱ्या व्याजाबद्दल सोप्या शब्दांत सांगायला हरकत नाही. त्यांना काय कळते, असे म्हणायचे दिवस फार पूर्वीच संपले आहेत.
मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणती गुंतवणूक करू, असे विचारणारे अनेक पालक भेटतात. मुलाच्या नावाने गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नावर भरायचा आयकर काही कमी होत नाही. मुलाच्या नावावरील गुंतवणुकीचे करपात्र उत्पन्न त्याच्या पालकापकी ज्याचे उत्पन्न अधिक आहे, त्याच्या उत्पन्नात जोडले जाते आणि कर भरावा लागतोच. मुलाच्या नावाने आयुर्वमिा पॉलिसी काढण्यापेक्षा त्यांना अर्थसाक्षर करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना पशांचे महत्त्व निश्चितच कळेल आणि माणसांचेही.
-- साभार (श्रध्दा सावंत लोकसत्ता)

October 18, 2013

तरुण गुंतवणूकदारांनो, या चुका टाळा

budget
 
तरुणांना संपत्तीसंचय करायचा असेल तर सुरुवातीपासूनच आर्थिक बाबतीत योग्य त्या सवयी लावून घेतलेल्या बऱ्या. आयुष्यात पुढे उपयोगी पडतील ,अशा आर्थिक सवयी त्यांनी रुजवाव्यात याविषयी सांगत आहेत उमा शशिकांत 
.... 

कमवायला लागलेले आणि त्याबाबत समाधानी असलेले अनेक तरुण आर्थिक बाबी किंवा गुंतवणूक याकडे फारसे गांभिर्याने बघत नाहीत. पुरेसे पैसे नाहीत पर्यायांचे जंजाळ आहे हा विषयच क्लिष्ट आहे कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही किती कागदपत्र सांभाळावी लागतात... अशी अनेक कारणे ते पुढे करतात. पैशांचा फारसा विचार न करता येईल तसे आयुष्य जगण्याची सवय काही तरुण मंडळींची असते. या मंडळींनी आर्थिक बाबतीत पुढील चुका कटाक्षाने टाळाव्यात आणि काही गोष्टी आवर्जून कराव्यात. 

* एक 
कमावत्या असंख्य तरुणांना आर्थिक नियोजन किचकट वाटते आणि हा विषय त्यांच्यासाठी नसल्याचे वाटते. कमवायला सुरुवात केल्यावर पैशांबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवेत. पर्सनल फायनान्ससाठीचा सोपा उपाय म्हणजे स्वतःला उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता समजावे. तुम्ही बचत व गुंतवणूक केली तर उत्पन्न बाजूला सुरक्षित राहील. तुम्ही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक केला तर अधिक कमवावे लागेल वा उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधावे लागतील. तुम्ही कर्ज घेतले तर जबाबदारी वाढेल आणि भविष्यातील उत्पन्न परतफेडीमध्ये जाईल. पर्सनल फायनान्स या संकल्पनांमध्येच सामावलेले आहे. याच संदर्भातून आपल्या सगळ्या आर्थिक निर्णयांकडे पाहावे. 

* दोन 
आपल्या सुरक्षित कोषामधून बाहेर पडावे लागले तर काही तरुण मंडळी तक्रार करतात. यामुळे त्यांचे आयुष्य किती कटकटीचे झाले आहे हे आळवत बसतात आणि यावर उपाय शोधण्यावर मात्र कमी वेळ खर्च करतात. मुलांचे गरजेहून अधिक संरक्षण करणारे पालक मुलांच्या संगोपनामध्ये अडचणी ‌निर्माण करतात. आर्थिक निर्णयांच्या बाबतीत कृती करणे गरजेचे असते. अभ्यासात अवघड प्रश्न सोडवणारी मुले तोच दृष्टिकोन प्रत्यक्ष आयुष्यात ठेवतातच असे नाही. भूक लागल्यावर दोन मिनिटांत मॅगी बनवण्याचा झटपट पर्याय त्यांना आर्थिक बाबतीतही हवा असतो. तरुणांनी हा दृष्टिकोन बदलायला हवा आणि आर्थिक निर्णयांच्या बाबतीत दिशाहीन होणे सोडून द्यावे. 

* तीन 
आर्थिक बाबतीत चालढकल करणे हा बेजबाबदारपणा आहे. बँक स्टेटमेंट नसलेले डिव्हिडंड चेक न भरलेले ,टॅक्स रिटर्न्स न भरलेले तसेच म्युच्युअल फंड वा ब्रोकरकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेले असंख्य तरुण आढळतील. कंपनीचा आग्रह असतो म्हणून त्यांच्याकडे पॅनकार्ड तरी असते. गंमत म्हणून शेअरचे व्यवहार करणारेही अल्पकालीन भांडवली नफा कमावतात आणि तो करपात्र असतो. हा कर न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. आपण पकडलेच जाणार नाही असा विचार करणे चुकीचे आहे. एका खोक्यामध्ये स्टेटमेंट ,बिले कागदपत्रे व नोटिसा ठेवाव्यात. वेळ मिळेल तेव्हा त्याचे वर्गीकरण करावे. वेळेवर कर भरावा. या सवयी वेळेवर व लवकर रुजवल्या तर पुढील वाटचालीत मदत होईल. 

* चार 
काही तरुण गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्नाविषयी अति-आत्मविश्वास असतो. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याने त्यांना नवी नोकरी सहज मिळेल असे त्यांना वाटते. पैसे राखून ठेवावेत ,असे भविष्यात कोणतेच संकट त्यांना दिसत नसल्याने ते सढळ हाताने खर्च करतात. खर्च केल्यानंतर हातात उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा आधीच पैसे वेगळे काढून ठेवलेले बरे. सॅलरी अकाउंटमधून थेट पैसे वळते करण्याचा पर्याय असतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे पैसे नियमितपणे गुंतवले जातात आणि बचत खात्यात विशिष्ट रक्कम जमा झाली की त्याचे रूपांतर ठेवींमध्ये केले जाते या पर्यायांमुळे शिस्तबद्ध बचत होऊ शकते. 

* पाच 
तरुण गुंतवणूकदार अतिशय टेक-सॅव्ही असतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आर्थिक बाबींसाठी कसा करून घ्यायचा याचा विचार त्यांनी करावा. क्रेडिट ब्युरो शैक्षणिक कर्जांच्या परतफेडीच्या नोंदी ठेवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरू शकतात याकडे दुर्लक्ष केल्याने शैक्षणिक कर्जांच्या बाबतीत चुकारपणा दिसून येतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड योग्य प्रकारे न केल्याने नंतर होमलोन नाकारले जाते तेव्हा चूक सुधारण्यासाठी फार उशीर झालेला असतो. कोअर बँकिंग सुविधेमुळे प्रत्यक्ष बँक शाखेत न जाता इंटरनेट व मोबाइल बँकिंगमार्फत बरेचसे व्यवहार करता येतात. बजेट बनवणे खर्चाचे नियोजन गुंतवणुकीचे निर्णय ,नोंदी ठेवणे अशा गोष्टींसाठी सोयीची अॅप्लिकेशन देणाऱ्या तंत्रज्ञानाचा तरुणांनी जास्तीत जास्त वापर करून घ्यावा. यामुळे आर्थिक व्यवहार सुलभ व ‌अधिक सक्षम होतील. 

* सहा 
अनेक तरुण चुकीच्या पर्यायाने गुंतवणुकीची सुरुवात करतात. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आयपीओमध्ये पैसे ओतणे डेरिव्हेटिव्हचे व्यवहार करणे म्हणजे पैसे कमावण्याचा सोपा मार्ग असल्याचे त्यांना वाटते. विविध मॅनेजमेंट स्कूलमध्ये शेअर व डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग गेम असतात पण अॅसेट अॅलोकेशनवर गेम नसतात. पण अॅसेट अॅलोकेशन कंटाळवाणे वाटले तरी अत्यंत गरजेचे आहे. मुदतठेवी व पीपीएफ खाते अशा सोप्या पर्यायांमार्फत संपत्तीनिर्मिती करण्याचा पाया रचावा. नंतर डायव्हर्सिफाइड लार्ज-कॅप म्युच्युअल फंड व बाँडचा समावेश यामध्ये करता येईल. त्यानंतर शेअर्सचा समावेश करावा. तरुण गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम पाया मजबूत करायला हवा. 

वेळ ही तरुण गुंतवणूकदारांची जमेची बाजू असते. गुंतवणुकीचे योग्य निर्णय वेळीच घेतले तर त्यांना लक्षणीय संपत्तीची निर्मिती करणे शक्य होऊ शकते. चालढकल आणि दुर्लक्ष यामुळे ही संधी हातची घालवू नये. 
 
साभार: म.टा.