March 02, 2015

तो आणि ती भाग..१६ --जेव्हा 'तिला' मुलं बघायला येतात

त्याला नोकरी शोधण्यासाठी थोडा वेळ मिळावा म्हणून तिनं घरी चहा-पोह्यांच्या कार्यक्रमांना इच्छा नसतानाही होकार दिला. त्यानं प्रयत्नांची शर्थ केली. पण रिसेशनमुळे चांगली नोकरी हातात पडत नव्हती. शेवटी एका चांगल्या कंपनीचा कॉल आला. अंधारात चाचपडताना आशेचा किरणसुद्धा प्रखर वाटू लागला.

तिनं चहा-पोह्यांच्या कार्यक्रमांना होकार दिल्यावर घरची मंडळी कामाला लागली. जोशीकाकांच्या उत्साहात तर भरच पडली. त्यांच्याजवळ आधीच स्थळांची भलीमोठी यादी तयार होती. त्या यादीतील नावांची छाननी करून एकापेक्षा एक सरस अशी स्थळं सिलेक्‍ट करण्यात आली. अर्थात, तिच्या मम्मी-पप्पांनी सिलेक्‍शन केलं असलं, तरी जोशीकाकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं होतं. जोशीकाकांनी सिलेक्‍ट केलेल्या मुलांशी बोलून "बघण्या'च्या कार्यक्रमाची तारीख आणि वेळ निश्‍चित केली. तिला "फाइव्ह डे वीक' असल्यानं सोयीनुसार शनिवार-रविवार राखून ठेवण्यात आला.

या शनिवारी तिला बघायला दोन स्थळं येणार होती. एक दुपारी आणि एक सायंकाळी. त्या दोघांचा भेटण्याचा कार्यक्रम ओघाओघानं कॅन्सल झाला. दोघांची थोडीफार चिडचिड झाली. दुपारी मुलगा बघायला येणार असल्यानं तिच्या मम्मीनं सकाळीच हिरव्या रंगाचा शालू कपाटातून बाहेर काढून ठेवला होता. तो शालू घरात येता-जाता तिच्या नजरेस पडत होता. त्यावरून अधेमधे मम्मीशी खटके उडत होते. पप्पांनीही खाण्या-पिण्याचा पदार्थांपासून तयारी चालविली होती. जणू आज त्यांच्या घरी काही खास समारंभ आहे, अशा थाटात तिचे मम्मी-पप्पा वावरत होते. तिला मात्र काही देणं-घेणं नव्हतं. ती आपली निवांत होती. अगदी बारा-साडेबारादरम्यान तिनं अंघोळ आणि जेवण आटोपलं. त्यानंतर आयपॉडवर गाणी ऐकत बसली.

दुपारी दोन वाजता पहिला मुलगा आणि त्याचे आई-वडील घरी आले. मुलगा पुण्यातल्या एक मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. सध्या तो एका प्रोजेक्‍टवर सिंगापूरला काम करीत होता. उंचापुरा-देखणा आणि विशेष म्हणजे पाच आकडी पगार असलेला हा मुलगा तिच्या मम्मी-पप्पांना आधीच आवडला होता. याखेरीज तो त्यांच्या दूरच्या मावशीचा जवळचा नातलग असल्यानं त्याला प्रायॉरिटी देण्यात आली होती. प्रारंभी थोडी तोंड ओळख झाल्यावर बेगडी शालीनता पांघरून ती बैठकीत आली. मुलाच्या आईनं तिला काही टिपिकल प्रश्‍न विचारले. तिनं यथायोग्य उत्तरं दिलीत. मुलाच्या वडिलांनीही आपली उपस्थिती नजरेस आणून दिली. मुलाची आई तिच्याकडे बघून म्हणाली, ""हे बघ...! तुझ्या नोकरीला आमची हरकत नाही. तू लग्नानंतरही आपल्या करिअरकडे लक्ष देऊ शकतेस. पण आमच्या घरी बाहेरच्या बाईनं स्वयंपाक केलेला ह्यांना चालत नाही. मी आजही पूर्ण स्वयंपाक करते. तुला नोकरी सांभाळून सकाळी मला स्वयंपाकात मदत करावी लागेल. आणि रात्री पूर्ण स्वयंपाक. तुला पटतंय का ते बघ...'' ती काहीच बोलली नाही. फक्त थोडा वेळ त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बघत होती. ""तुम्हाला नोकरी नसल्यानं तुम्ही स्वयंपाक केला नाही, तर शेजार-पाजारच्या बाया नावं नाही का ठेवणार! आणि मी दहा तासांची ताणतणावानं ओतप्रोत भरलेली नोकरी सांभाळून तुम्हाला स्वयंपाकात मदत करायची, अशी अपेक्षा तुम्ही धरता. कमालच आहे बुवा तुमची! तुमचा मुलगा करतो का नोकरीवरून आल्यावर स्वयंपाक... स्त्रीच स्त्रीची शत्रू असते, ही म्हण तुमच्यावरूनच पडली असावी...!'' ती मनातल्या मनात पुटपुटली. तिच्या मम्मीनं दोघींमधील छुपा "सुसंवाद' अचूक टिपला. वातावरणातील तणाव दूर करण्यासाठी तिची मम्मी म्हणाली, ""आमच्या हिला ना... पूर्ण स्वयंपाक येत नसला, तरी काही पदार्थ ती अप्रतिम करते. (तिच्या डोळ्यांसमोर गाजराचा हलवा तरळून आला) लग्न होईस्तोवर स्वयंपाक करायला ती सहज शिकेल.'' तिचे पप्पा गप्पच होते. मुलाच्या आईचं वागणं कदाचित त्यांना खटकलं होतं.

सायंकाळी सहा वाजता दुसरा मुलगा बघायला आला. तो मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर होता. त्याचे आई-वडीलसुद्धा वैद्यकीय व्यवसायात होते. या मुलाचाही पगार पाच आकडी होता. याखेरीज कोकणात भरपूर वडिलोपार्जित जमीन. मुंबईत दोन प्रशस्त फ्लॅट. चहा-पोहे झाल्यावर खरी बैठक सुरू झाली. मुलाच्या आईनं पुन्हा टिपिकल प्रश्‍नांचा पाढा वाचला. तिला उत्तरं अगदी पाठ झाली होती. हे कुटुंब थोडं "मॉडरेट' असल्यानं त्यांनी मुलाला आणि मुलीला बोलायला मोकळा वेळ दिला. मुलाचे वडील रिटायर्ड असल्यानं थोडे गप्पिष्ट होते. मुलाच्या आई-वडिलांना तिच्या नोकरीविषयी काही तक्रार नव्हती. त्यांच्या घरीही थोडं मोकळं वातावरण होतं. स्थळ तसं अनुरूप होतं.

रात्री जेवण झाल्यावर मम्मी-पप्पांनी स्थळांचा विषय काढला. त्यांना दुसरं स्थळ आवडलं होतं. त्यांनी तिला विचारल्यावर तिनं साफ इन्कार केला. मुलगा दिसायला चांगला नव्हता, अशी पळवाट तिनं काढली. त्यावर त्यांनी काही आक्षेप घेतला नाही. "तुला नाही ना पसंत. मग नको करू... त्यात काय एवढं...!' एवढंच ते म्हणाले. चहा-पोह्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली हीच त्यांच्या दृष्टीनं आनंदाची बाब होती. आणि तिला काही कमी स्थळं चालून आलेली नव्हती. आज नाही तर उद्या पसंत पडेल, असं त्यांना वाटलं.

रविवारी सायंकाळी दोघं संभाजी उद्यानात भेटले. तिनं सगळी हकिकत सांगितली. ""मला वाईट वाटतं रे लोकांची मनं दुखवायला. लोकं किती तरी अपेक्षा घेऊन मुली बघायला जातात. त्यांच्या आशा-अपेक्षांच्या आपण ठिकऱ्या उडवतोय,'' ती कळवळून म्हणाली. त्याचंही तसंच मत होतं. त्याचा तर चहा-पोह्यांच्या कार्यक्रमालाच विरोध होता. तिनं दुसऱ्यांसमोर पोह्यांचा ट्रे घेऊन जावं, हे त्याचं मन स्वीकार करीत नव्हतं. तो म्हणाला, ""मला एक कंपनीची ऑफर आहे. पण पगार काही मनाजोगा नाही. सध्या दहा हजार देतो म्हणालेत. पुढे परफॉर्मन्स बघून वाढवतील. करू का ही नोकरी?'' ती म्हणाली, ""चालेल. आणि पुढच्या रविवारी तू माझ्या मम्मी-पप्पांना भेटायला ये. आता पुरे झालं हे नाटक. कमी पगाराची का असेना, नोकरी आहे ना हातात. बघू या काय होतं ते.'' त्यानंही होकारार्थी मान हलविली.



(क्रमशः)

No comments: