October 18, 2013

तरुण गुंतवणूकदारांनो, या चुका टाळा

budget
 
तरुणांना संपत्तीसंचय करायचा असेल तर सुरुवातीपासूनच आर्थिक बाबतीत योग्य त्या सवयी लावून घेतलेल्या बऱ्या. आयुष्यात पुढे उपयोगी पडतील ,अशा आर्थिक सवयी त्यांनी रुजवाव्यात याविषयी सांगत आहेत उमा शशिकांत 
.... 

कमवायला लागलेले आणि त्याबाबत समाधानी असलेले अनेक तरुण आर्थिक बाबी किंवा गुंतवणूक याकडे फारसे गांभिर्याने बघत नाहीत. पुरेसे पैसे नाहीत पर्यायांचे जंजाळ आहे हा विषयच क्लिष्ट आहे कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही किती कागदपत्र सांभाळावी लागतात... अशी अनेक कारणे ते पुढे करतात. पैशांचा फारसा विचार न करता येईल तसे आयुष्य जगण्याची सवय काही तरुण मंडळींची असते. या मंडळींनी आर्थिक बाबतीत पुढील चुका कटाक्षाने टाळाव्यात आणि काही गोष्टी आवर्जून कराव्यात. 

* एक 
कमावत्या असंख्य तरुणांना आर्थिक नियोजन किचकट वाटते आणि हा विषय त्यांच्यासाठी नसल्याचे वाटते. कमवायला सुरुवात केल्यावर पैशांबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवेत. पर्सनल फायनान्ससाठीचा सोपा उपाय म्हणजे स्वतःला उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता समजावे. तुम्ही बचत व गुंतवणूक केली तर उत्पन्न बाजूला सुरक्षित राहील. तुम्ही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक केला तर अधिक कमवावे लागेल वा उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधावे लागतील. तुम्ही कर्ज घेतले तर जबाबदारी वाढेल आणि भविष्यातील उत्पन्न परतफेडीमध्ये जाईल. पर्सनल फायनान्स या संकल्पनांमध्येच सामावलेले आहे. याच संदर्भातून आपल्या सगळ्या आर्थिक निर्णयांकडे पाहावे. 

* दोन 
आपल्या सुरक्षित कोषामधून बाहेर पडावे लागले तर काही तरुण मंडळी तक्रार करतात. यामुळे त्यांचे आयुष्य किती कटकटीचे झाले आहे हे आळवत बसतात आणि यावर उपाय शोधण्यावर मात्र कमी वेळ खर्च करतात. मुलांचे गरजेहून अधिक संरक्षण करणारे पालक मुलांच्या संगोपनामध्ये अडचणी ‌निर्माण करतात. आर्थिक निर्णयांच्या बाबतीत कृती करणे गरजेचे असते. अभ्यासात अवघड प्रश्न सोडवणारी मुले तोच दृष्टिकोन प्रत्यक्ष आयुष्यात ठेवतातच असे नाही. भूक लागल्यावर दोन मिनिटांत मॅगी बनवण्याचा झटपट पर्याय त्यांना आर्थिक बाबतीतही हवा असतो. तरुणांनी हा दृष्टिकोन बदलायला हवा आणि आर्थिक निर्णयांच्या बाबतीत दिशाहीन होणे सोडून द्यावे. 

* तीन 
आर्थिक बाबतीत चालढकल करणे हा बेजबाबदारपणा आहे. बँक स्टेटमेंट नसलेले डिव्हिडंड चेक न भरलेले ,टॅक्स रिटर्न्स न भरलेले तसेच म्युच्युअल फंड वा ब्रोकरकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेले असंख्य तरुण आढळतील. कंपनीचा आग्रह असतो म्हणून त्यांच्याकडे पॅनकार्ड तरी असते. गंमत म्हणून शेअरचे व्यवहार करणारेही अल्पकालीन भांडवली नफा कमावतात आणि तो करपात्र असतो. हा कर न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. आपण पकडलेच जाणार नाही असा विचार करणे चुकीचे आहे. एका खोक्यामध्ये स्टेटमेंट ,बिले कागदपत्रे व नोटिसा ठेवाव्यात. वेळ मिळेल तेव्हा त्याचे वर्गीकरण करावे. वेळेवर कर भरावा. या सवयी वेळेवर व लवकर रुजवल्या तर पुढील वाटचालीत मदत होईल. 

* चार 
काही तरुण गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्नाविषयी अति-आत्मविश्वास असतो. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याने त्यांना नवी नोकरी सहज मिळेल असे त्यांना वाटते. पैसे राखून ठेवावेत ,असे भविष्यात कोणतेच संकट त्यांना दिसत नसल्याने ते सढळ हाताने खर्च करतात. खर्च केल्यानंतर हातात उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा आधीच पैसे वेगळे काढून ठेवलेले बरे. सॅलरी अकाउंटमधून थेट पैसे वळते करण्याचा पर्याय असतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे पैसे नियमितपणे गुंतवले जातात आणि बचत खात्यात विशिष्ट रक्कम जमा झाली की त्याचे रूपांतर ठेवींमध्ये केले जाते या पर्यायांमुळे शिस्तबद्ध बचत होऊ शकते. 

* पाच 
तरुण गुंतवणूकदार अतिशय टेक-सॅव्ही असतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आर्थिक बाबींसाठी कसा करून घ्यायचा याचा विचार त्यांनी करावा. क्रेडिट ब्युरो शैक्षणिक कर्जांच्या परतफेडीच्या नोंदी ठेवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरू शकतात याकडे दुर्लक्ष केल्याने शैक्षणिक कर्जांच्या बाबतीत चुकारपणा दिसून येतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड योग्य प्रकारे न केल्याने नंतर होमलोन नाकारले जाते तेव्हा चूक सुधारण्यासाठी फार उशीर झालेला असतो. कोअर बँकिंग सुविधेमुळे प्रत्यक्ष बँक शाखेत न जाता इंटरनेट व मोबाइल बँकिंगमार्फत बरेचसे व्यवहार करता येतात. बजेट बनवणे खर्चाचे नियोजन गुंतवणुकीचे निर्णय ,नोंदी ठेवणे अशा गोष्टींसाठी सोयीची अॅप्लिकेशन देणाऱ्या तंत्रज्ञानाचा तरुणांनी जास्तीत जास्त वापर करून घ्यावा. यामुळे आर्थिक व्यवहार सुलभ व ‌अधिक सक्षम होतील. 

* सहा 
अनेक तरुण चुकीच्या पर्यायाने गुंतवणुकीची सुरुवात करतात. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आयपीओमध्ये पैसे ओतणे डेरिव्हेटिव्हचे व्यवहार करणे म्हणजे पैसे कमावण्याचा सोपा मार्ग असल्याचे त्यांना वाटते. विविध मॅनेजमेंट स्कूलमध्ये शेअर व डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग गेम असतात पण अॅसेट अॅलोकेशनवर गेम नसतात. पण अॅसेट अॅलोकेशन कंटाळवाणे वाटले तरी अत्यंत गरजेचे आहे. मुदतठेवी व पीपीएफ खाते अशा सोप्या पर्यायांमार्फत संपत्तीनिर्मिती करण्याचा पाया रचावा. नंतर डायव्हर्सिफाइड लार्ज-कॅप म्युच्युअल फंड व बाँडचा समावेश यामध्ये करता येईल. त्यानंतर शेअर्सचा समावेश करावा. तरुण गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम पाया मजबूत करायला हवा. 

वेळ ही तरुण गुंतवणूकदारांची जमेची बाजू असते. गुंतवणुकीचे योग्य निर्णय वेळीच घेतले तर त्यांना लक्षणीय संपत्तीची निर्मिती करणे शक्य होऊ शकते. चालढकल आणि दुर्लक्ष यामुळे ही संधी हातची घालवू नये. 
 
साभार: म.टा.